भगवद्गीतास्तोत्र - अध्याय अकरावा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७६५३॥
नवमाध्यायीं बोलिला । पश्यमे योगमैश्वरबोला ॥१॥
कीं पाहेरे मम ईशाची । विश्व निर्माण युक्तीचि ॥२॥
मजमाजी विश्व नसे । विश्वामाजी मी ना दिसें ॥३॥
विश्वपट ब्रह्मदोरा । ह्याही जाणावी विचारा ॥४॥
येथें संशयो वाटला । विश्वरुपा न भेटला ॥५॥
तरी हा होय कल्पतरु । मागतांच देईल वरु ॥६॥
मग काळजी ते वायां । ऐसा निश्चय करुनीयां ॥७॥
पुढें एका मागें एक । श्लोक विभूती कौतुक ॥८॥
ऐकतांना पैं शेवटीं । अपूर्वता कृष्ण गीठी ॥९॥
एकांदशेन स्थितोअ जगत । पार्थ झाला आशंकित ॥१०॥
तेंच प्रत्यक्ष पाहावें । एकादशु तेणें भावें ॥११॥
तुका एअकदेशें आला । एकदेशीं बावो जाला ॥१२॥
॥७६५४॥
घालुनियां लोटांगण । करी आपण विनंती ॥१॥
माझ्या अनुग्रहास्तव । वासूदेव कृपाळु ॥२॥
केवळ गुह्य जें अध्यात्म । ऋषी उत्तम नेणती ॥३॥
तुवां बोधिलें तेणेंची । व्यामोहाची बोळवण ॥४॥
झालों पूर्ण परी एका । शब्दीं तुका बुझतो ॥५॥
॥७६५५॥
सृष्टी संहार भूतांचे । निश्चय साचें तुजपून ॥१॥
तुजपासूनी विस्तार । चराचर आघवें ॥२॥
पद्मदळाक्षा माहात्म्य । मनोरम हें तुझें ॥३॥
दिव्य ऐकिलें तुकयानें । भरंवशानें सुटला ॥
॥७६५६॥
आपणातें हें बोलसी । आशंकेसी परिहारु ॥१॥
परमेश्वरा गा ऐसेंची । करी कृपेची सुवृष्टि ॥२॥
विश्वरुप तुझें पाहों । तेणेंचि ही नि:शंक ॥३॥
इच्छितो मी पुरुषोत्तमा । जिंका क्षमा तुकयाची ॥४॥
॥७६५७॥
जरी असे पाहों ये मी । दिसे कर्मी अधिकारु ॥१॥
समर्था मानिसी तरी । कृपा करी महाराजा ॥२॥
आपणातें तूं अव्यया । योगनिलया दाखवी ॥३॥
अधिकारु तुझ्या मुखें । तुकया सुखें झालासी ॥४॥
॥७६५८॥
हरिखे पार्थाचिये स्तुती । तो श्रीपती साहेना ॥१॥
ह्मणे उदार वाक्यानें । शतशतानें पश्यमे ॥२॥
सहस्त्रशें रुपें पार्था । त्यांत वृथा ना कोणी ॥३॥
दिव्य नाना प्रकारचीं । आकृतिचीं भिन्नत्वें ॥४॥
जे कां वेधक तुकयाचें । मीपणाचें मूळ नाशी ॥५॥
॥७६५९॥
वसु रुद्र देव पाहे । आणि पुत्र हे अश्विनी ॥१॥
देखिले तें नाहीं पाहे । मग तूं लाहो घेसील ॥२॥
भारता हें बहु नवल । पूर्वी बोले अदृष्ट ॥
तुकयाचा भाव जैसा । हरि तैसा बोलिला ॥४॥
॥७६६०॥
देहीं माझ्या या एकत्र । भरींव पात्र न्याहाळी ॥१॥
चराचर पाहे आजी । कोठें न दुजी कल्पना ॥२॥
गुडाकेशा सर्व विश्वा । मी विसांवा अक्षयी ॥३॥
जें एकहा पाहिलिया । इच्छा तुकयाची गेली ॥४॥
॥७६६१॥
परि याच स्वदृष्टीनें । अदेखणें होईल ॥१॥
मज पाहों नाशकसी । हें मानसीं उमजलों ॥२॥
तुतें देतों दिव्यदृष्टी । जेणें कष्टी ना होसी ॥३॥
पाहे ईश्वरी हा योग । निरुद्वेग तुकयाचा ॥४॥
॥७६६२॥
उल्हासला संजय बोले । हें ऐकिलें कीं नाहीं ॥१॥
राया ऐसें बोलोनियां । पार्थप्रिया श्रीकृष्ण ॥२॥
महा योगेश जो हरी । दावी सारी स्वकळा ॥३॥
रुप श्रेष्ठ परमेश्वर । करी गोचर तुकयासी ॥४॥
॥७६६३॥
नाना नेत्र मुखें ज्यांत । जें विक्रांत सौम्य ही ॥१॥
नाना दर्शनें अद्भुत । पाहतां मुक्त पातका ॥२॥
दिव्य नाना आभरणें । दिशा जेणें समजेना ॥३॥
आयुधें नाना तीक्ष्ण करीं । तुकया शिरीं वंदितु ॥४॥
॥७६६४॥
दिव्यपुष्पीं वस्त्रीं दिव्य । मूर्ती भव्य रुपाच्या ॥१॥
दिव्य गंधा विभूषिता । वासुवातादि वेडे ॥२॥
दिव्य सर्वाश्चर्यमय । झाला कौंतेय विस्मितु ॥३॥
जगदात्मक जो अनंतु । तुका संतु ज्या साठीं ॥४॥
॥७६६५॥
नभ उजळलें तेजें । नेणो सहस्त्रया पैजें ।
स्वीकारुनी दिनकर राजे । प्रभा पार्था दाविती ॥१॥
तेज नव्हे तो बंबाळ जीव पतंगा कवळ ।
ऐसे एकाकी कल्लोळ । एकसरें ऊठिला ॥२॥
माहात्म्य पूर्वी जें ऐकिलें । तें एकाकीं रुपा आलें ।
माहात्म्याचें नवल झालें । संगीं सांगाया नुरे ॥३॥
असो बोलणें बोलतां । रवीहून उपमीतां ।
तुका ह्मणे दशांशता । उपमा नसे श्रुतीची ॥४॥
॥७६६६॥
कामधेनुपासुनि पात्र । होय एकाचे सहस्त्र ॥
तैसा एक होता उग्र । मूर्तिमय मग झाला ॥१॥
नकळे पाहिली मागिली । वडिल कोणती धाकली ॥
पृथक् पृथक् विस्तारली । सृष्टि वेळ यापरी ॥२॥
देव देवाच्या शरीरीं । देखे तेव्हां कौरवारी ॥
तुका ह्मणे लोभ नगरीं । प्रवेशला भयभीतु ॥३॥
॥७६६७॥
लहानसी मूर्त्ती होती । गुप्तपणें गेली केउती ॥
घेऊन आली ऐशा व्यक्ती । होत्या कोण्या संदुकींत ॥१॥
हेंच आश्रर्याचें मूळ । कांटे उठले सोज्वळ ॥
नेणों विनोदें सकळ । आमुचें ही नाशील ॥२॥
ईश देखिला ही जरी । मायिक मोह न वचे दुरीं ॥
बाप देहाची हे थोरी । मरे होय न लाजे ॥३॥
असे अर्जुन कंपित । देवा मस्तकीं वंदित ।
तैसे कृतांजळी हात । तुका ह्मणे बोलतो ॥४॥
॥७६६८॥
देहीं तुझ्या विश्वंभरा । देखे सुर भर संभारा ॥
देखे वहनी साळंकारा । हंती हंती येरा उद्दीत ॥१॥
आणिक एक नवलावो । पंच भूतां तुझा ठावो ॥
त्याचें दिसतें येवो जावो । पैं आधारें तुमच्या ॥२॥
चराचर त्याच परीं । ब्रह्मा पद्य स्थानांतरीं ॥
अहो पाहातां त्रिपुरारी । जटाजूट गंगेसी ॥३॥
मुनी दिव्य तेजोमय । नागकुळ समुदाय ।
ऐसा पाहिला प्रत्यय । तुका साधू ज्यासाठीं ॥४॥
॥७६६९॥
नानाप्रकारीं जे दंड । मुखें कराळ वितंड ॥
नेत्र वैश्वानर कुंड । पोटें तैसीं भ्यासुरें ॥१॥
त्वद्रूप सर्वत्र अनंत । मोठें पाहातां नलगे अंत ॥
अनादि तूं विश्वतात । मध्य अंत ही तूंची ॥२॥
तुज आहे विश्वेश्वरा । विश्वरुपाच्या अंतरा ॥
तुका ह्मणे कमळावरा । भलीरे आस पुरविली ॥३॥
॥७६७०॥
गदा धरिली उजवी । चक्र झळफळीत तेवीं ॥
माथा मुगुटाची ठेवी । अनुपम वाटते ॥१॥
आज तेज सिंधु लहरी । धाली ढाळ आह्मावरी ॥
सर्वत्रहि दिशांतरीं । दीप्ति मोठी फांकते ॥२॥
सर्वत्र हें तुझें रुप । परि गा उग्रत्याचें रोप ॥
येथें दावाग्नी तो दीप । नेणों कोण्या झोंपडीं ॥३॥
रवि कर्पे ऐसी आग । किंवा बापा आला राग ॥
तुका राखावा सन्मार्ग । युगायुगीं वाढाया ॥४॥
॥७६७१॥
तूं महाराज समजलासी । शुद्ध अक्षरविलासी ॥
ऐसे कळावें जीवासी । मायापाशमुक्तत्वा ॥१॥
आत्मा जगाचा गोविंदा । निधी स्वभावें तूं सदा ॥
तो तूं वाढला एकदा । शाश्वत धर्मपाळजो ॥२॥
जो कां नित्य तूं अव्यय । सर्वकाळ अप्रमेय ॥
तुका वंदितसे पाय । याच भयें वाटतें ॥४॥
॥७६७२॥
आदि नाहीं मध्य नाहीं । तेथें क्षय आला कांहीं ॥
अनंतवीर्या तुज तेंही । काय सांगूं किती बोलूं ॥१॥
भुजा अनंत आकृती । मग भासे तो शचीपती ।
नेत्र सूर्य हा गभस्ती । तव सत्ते ना उडेल ॥२॥
चंद्र मन ह्मणवीतें । नेत्रीं तेज दाखवितें ।
मुखीं अनादी ते ।रचना आजी पाहिली ॥३॥
पाहे तयाचा प्रकाश । जो तूं दिनासी दिनेश ॥
त्रिभुवनेसीं आकाश । तुकयाठायीं दिसेना ॥४॥
॥७६७३॥
दिशा विदिशा पाहातां । अंतरिक्ष धांडोळितां ॥
तूं एक दिससी व्यापिता । हे कमलाक्षा कमलेशा ॥१॥
देखोनि हें रुप उग्र । अद्भुत अद्भुता अत्युग्र ॥
लोक भीती गा समग्र । हें माहात्म्य नवलाचें ॥२॥
तुकयाचिया विनंती । प्रगटे पुरवाव्या खंती ॥
तंव सृष्टीच जळती । असतां आयुष्य गोपाळा ॥३॥
॥७६७४॥
प्रवेशती हे सुरवृंद । जळीं जळजांसी आनंद ॥
देहीं तुमचिया खेद ॥ हे पावती हें नवल ॥१॥
कृतांजळी कृपाळुवा । तेही वाणिती तुज देवा ॥
हो कां स्वस्ति ऐशा भावा । महाऋषी बोलती ॥२॥
सिद्धमात्रही जीतुका । ह्मणुन तूतें स्तवी असका ॥
विचित्र हा भासे तुका पाहोनि झाला विस्मीत ॥३॥
॥७६७५॥
आदित्य रुद्रादि वसु जे तदादि । अनवेद विद्यीं प्रसिद्ध जे ॥१॥
गंधर्वाचा मेळ यक्षगणपाळ । पाहती सकळ वासुदेवा ॥२॥
विस्मया पावती नेणो आला शांती । भय वागवीती ययास्तव ॥३॥
मज नवल वाटे होतासी तूं कोठें । एकाएकीं भेटे तुक्या कैसा ॥४॥
॥७६७६॥
जीं जीं त्वद्रूप हें मोठेंसें बहु हें । नेत्रें तोंडें पाहे भयानक ॥१॥
भुजांघ्रीया बहु मांडया उदर बहु । कराळा ह्या बहु दंष्ट्रा तुझ्या ॥२॥
बहु ज्यांत कांहीं देखोनी हें देहीं । भ्यालें जग हेंहीं मीही तैसा ॥३॥
सुखा अवर्षणा पडिलें नारायणा । तुका ठेवी प्राणा कोणाठायीं ॥४॥
॥७६७७॥
अत्युच्च ह्मणावें उंची ना गणावें । प्रलयाब्धि हेलावे तेजोमय ॥१॥
दिव्यरुप सत्य नव्हे जें असत्य । आमुची अगत्य ऐसी नव्हती ॥२॥
चंडमुख ज्याचें ह्या दीप्त चक्षूचें । भयें आत्मयाचें धैर्य गेलें ॥३॥
पाहतां ऐसें दु:ख सोडून गेलें सुख । व्यापका ओळख तुकयाची ॥४॥
॥७६७८॥
दंष्ट्रा ह्या कराळा नृसिंहाची लीळा । तुह्मीं कां गोपाळा धरीलीसे ॥१॥
हिरण्यकशिपु नोहे येथें पार्थ आहे । कृपा करी मोहे पूर्ववत ॥२॥
विकराळ तोंडें काळाग्नीची कुंडें । देखिल्याच पडे पाहाणारु ॥३॥
दिशा नेणें देवा सुख वासुदेवा । प्रसीदात्म भावा तुकयाच्या ॥४॥
॥७६७९॥
हे सर्वही जे जे धृतराष्ट्रवीर्य जे । त्याचे सहाय जे आवांतर ॥१॥
अवनीचे विश्वाचे येथें भीष्मकाळ । द्रोणा अतुर्बळ कर्ण तैसा ॥२॥
आतां आमुचेही विश्वाचे जे देहीं । त्यांचे नवल तेंही तुका बोले ॥३॥
॥७६८०॥
मुखें तुझीं जेथें सत्वर जाति तेथें । भयानक पंथें दंताचीये ॥१॥
विकराळ दंती दांतांत श्रीपती । चर्वी तूं वीरकांती ज्यांची शीरे ॥२॥
अहो देवराया चाविसी हे वायां । आह्मा चीळसी या तुकया अंगीं ॥३॥
॥७६८१॥
नदी जळें जैसी वाहती बळेसी । वेगें सिंधूपासी मिळों येतां ॥१॥
तोही आत्म मुखीं प्रवाहातें शोखी । तैसी ज्वाळामुखीं येथें दीसे ॥२॥
अनेक आननें ज्वाळामय रसने । घेसी तूं स्वादानें रुची देवा ॥३॥
परंतु आश्चर्य वाटे लोकवर्या ॥ प्रवेशती धैर्या तुका ह्मणे ॥४॥
॥७६८२॥
किंवा पेटलीया अग्नीमाजी काया । पतंग मराया एकवटे ॥१॥
तैसें लोकमेळ मराया सकळ । निघती केवळ तुझ्या मुखीं ॥२॥
वेगें शस्त्र अस्त्रें रथ साळंकारें । गज उष्ट्र वाजी रे वाहनेंसी ॥३॥
अपारांचीं येणीं अपार तुझी खाणी । सांडूं नेणें कणी वृत्त तुका ॥४॥
॥७६८३॥
या सर्व लोकांस जेव्हां गिळीतोस । ज्वाळा मुखें त्यांस चाटीसी तूं ॥१॥
तेव्हां प्रभा तीव्र तुझ्या दर्शनाग्र । मज गमे उग्र सौदामिनी ॥२॥
जग कर्पे ज्यांत व्यापुनी तयांत । देवा तपतात अति उग्रा ॥३॥
नेणों कैसी भूक लागली अचूक । सोडीली ओळख तुकयाची ॥४॥
॥७६८४॥
तूं कोण या उग्रतनू बोले शीघ्र । देई कृपापात्र हितांचेंहें ॥१॥
प्रसन्न तूं होयी तुज वंदन पायीं । करितों हें पाही देवराया ॥२॥
जाणो तूंतें इच्छी प्रवृत्ती निरइच्छी । नेणें तुझी कैसी आद्य मूर्ती ॥३॥
कधी ना देखीला ऐसा नायकीला । तो तूं प्रगटला तुकया आंगें ॥४॥
॥७६८५॥
देव बोले आतां महाबाहो पार्था । ऐके रे अन्यथा न मानी तूं ॥१॥
जुनाट लोकांत काळ मी प्रत्यक्ष । मारुं पाहतों साक्ष पाहे माझी ॥२॥
लोकांस या येथें हारुं पाहातसे । न मारिसी कैसें वांचतील ॥३॥
नरवीर सेनेंमाजी ते असती । झाली यांची शांती धनुर्धरा ॥४॥
तुज माया येते ते मी सोडीलीसे । आतां काय कैसें जाणो तुका ॥५॥
॥७६८६॥
ह्मणोनि घे तूं हें ऊठ वश वेगीं । जिंकूनीया भोगी राज्यलक्ष्मी ॥१॥
सिद्धीची समृद्धि आहे तव निढळी । निवटी मंडळी राजयांची ॥२॥
म्यां तो केली शांती पहिलीच यांची । निघे सव्यसाची निमित्ताला ॥३॥
तुकयासी तूसी भेदना अणुभरे ॥ हीं उत्तरें हृदयीं लीही ॥४॥
॥७६८७॥
अरे हे द्रोण भीष्म आणि हा जयद्रथ । कर्ण महारथ आणि शूर ॥१॥
त्यांस म्यां मारिलें तूं मारि साक्षीला । अदृष्टी राज्याला ह्मणूनियां ॥२॥
झणी दृष्टी होसी तूं या कर्मी पार्था । जयश्री सर्वथा वरी तूझ ॥३॥
निमित्ताकारणे घे तूं धनुशर । तुकयाचें अंतर ऐसें आहे ॥४॥
॥७६८८॥
कळलें अंतर पीडे भवरोगें । थुंकूनी तो तोंडें अन्न टाकी ॥१॥
देवांचे इतर सेविती पंक्तीसी । तैसा तो रायासी बोलतसे ॥२॥
ऐकोनी केशववाक्यासी अर्जुन । वपु निज मनें घेई जे कां ॥३॥
कृतांजली किरीटी बोलतो भयभीत । वंदूनि अनंत पुन: पूना ॥४॥
गद्गद या गिरा तेजें जो अर्दिला । जीवस्वरुपाला तुका नये ॥५॥
॥७६८९॥
ऐसें त्दृषीकेश तुझिया स्थितीतें । पाहूनी हर्षतें त्रिभुवन ॥१॥
अनुरागयुक्त झालें हें पावन । पापीयासी स्नान गंगे जैसें ॥२॥
येथें जे राक्षस दिशांत लंघीती । भयास पाळीती ह्मणोनीयां ॥३॥
वंदीती सद्भावें सिद्धलोक तुज । तुका ह्मणे मौज संतांचीं हे ॥४॥
॥७६९०॥
न वंदिती कांहे समर्था तुजला । जो थोर विधीला आदि कर्ता ॥१॥
अनंत जो विश्वपटामाजी तंतूं । तूं सत असतू अक्षर तूं ॥२॥
शुद्ध ब्रह्म खरें उत्तरें देवाच्या । हृदयीं तुकयाच्या तूंची देवा ॥३॥
॥७६९१॥
विश्वादि तूं सर्व तूं परी पुराण । तूं भूमीया पूर्ण जीवालागीं ॥१॥
विश्व घट होय त्यापर्त्ता निधान । ज्ञाताही तूं ज्ञानमय यज्ञू ॥२॥
त्याच विश्वरुपें व्यापिलें सकळां । अनंत रुपाला विश्वंभरु ॥३॥
आज तुका रुपें मज उमजसी । विश्रांति मनासी आली खरी ॥४॥
॥७६९२॥
तूंच वायू यम वन्हीही चंद्रमा । देवाचाही आत्मा तूंच देवा ॥१॥
पितामहाचा तूं पिता हें कळलें । तुज सहस्त्र वेळे नमो नमो ॥२॥
नमो नमो सर्वकाळ तुज मागुती । ऐकीजे हे मती तुकयाची ॥३॥
॥७६९३॥
देवा पाठी पोटीं आहे हें कळेना । आहेस नमना करुं तैसें ॥१॥
मागें पुढें वंदूं तव पदालागीं । सर्व तूं यालागीं सर्वा वंदूं ॥२॥
अनंत सामर्थ्य पराक्रमी तूंची । पटीं विश्वयाच्या तंतू तूं गा ॥३॥
केलें नमन तरी निश्चळ राहवेना । नेणों करिल वदना भाजी कवळू ॥४॥
मागें जो हारला कीं कौरवांनी केलें । हे दुसरें आलें तुका ह्मणे ॥५॥
॥७६९४॥
जें बोलिलों मी सलगी करोनी । रे यादवा ह्मणुनी कृष्णा सख्या ॥१॥
न जाणतां महिमा देवा पुरुषोत्तमा । चुकलों या कर्मा प्रीतीचीया ॥२॥
शय्यासनीं पंक्तीं चालतां मार्गात । केला जो हास्यार्थ क्षमा असो ॥३॥
अपमान कांहीं न कळतां जाहला । तुकया जीवाला शोध ने घे ॥४॥
॥७६९५॥
मागें पुढें ही जे मज देवराया । क्षमा अप्रमेया करी सख्या ॥१॥
अच्युता अद्वया नेणोनियां गर्वे । रुसों फुगों अवघे क्षमा असो ॥२॥
चांग तेंच मागो उराउरी देवा । सारथी स्वभावा तूज केलें ॥३॥
कौरवांचे सभे धाडिलें शिष्टायी । पाहतां अन्यायी कोटि तुका ॥४॥
॥७६९६॥
पिता होसी तूं जगाचा । चराचर जडजीवांचा ॥
तूं पूज्य सर्वा गुरु । सर्वी सर्वात्मा साचारु ॥२॥
तुल्य नाहीं कोणी तुज । देवा थोर दीसे मज ॥३॥
अतुल प्रभाव त्रिलोका । कोठें येवो नेणें तुका ॥४॥
॥७६९७॥
ह्मणुन वंदि देवराया । पसरोनि स्वात्म काया ॥१॥
देवदेवा हो प्रसन्न । आह्मी तरी श्रीसंपन्न ॥२॥
पिता सुता क्षमा करी । जेविं सखा सख्या तरी ॥३॥
प्रिय प्रियाला सद्भावें । तुका क्षमा मागे जीवें ॥४॥
॥७६९८॥
हृष्ट झालों हें अपूर्व । रुप देखुनियां सर्व ॥१॥
परंतु या चित्तामाजी । भयें कांपतसें आजी ॥२॥
आतां पूर्वीचा होतास । देह दाखवी आह्मांस ॥३॥
जरी प्रसन्न व्यापका । तरी संबोखावा तुका ॥४॥
॥७६९९॥
करीं गदा सुदर्शन । किरीट मस्तकीं पावन ॥१॥
कृष्णनाथा अनाथाच्या । भेटी याची तों तुमच्या ॥२॥
सोपी चतुर्भुज मूर्ती । जे कवटाळे आह्मा हातीं ॥३॥
ती दाखवुनी हें झांका । जेथें उमज नेघे तुका ॥४॥
॥७७००॥
बोले देव तो साधूचा । महा मेघ गंभीर वाचा ॥१॥
पार्था कृपेनें दावीलें । विश्वरुप म्यां आपुलें ॥२॥
आत्मरुप तेजोमय । अनंत कीं विश्वालय ॥३॥
नेणे कोणी तूजवीण । तुका ह्मणे माझी खूण ॥४॥
॥७७०१॥
यागीं वेदाध्ययन स्थळीं । दानीं सत्कर्म मंडळीं ॥१॥
उग्र तपा हीं पार्था । जगीं शक्य न सर्वथा ॥२॥
पाहाया सरे आणीका । मी इतरा कुरुनायका ॥३॥
कांहीं नातुडे लोकांही । अरे देखे तुका देहीं ॥४॥
॥७७०२॥
या व्यथेनें मूढ मन । न हो होई सावधान ॥१॥
माझें रुप भयंकर । देखून भ्यालें रे अंतर ॥२॥
आतां एकदा मागुती । निर्भय होई वीरपती ॥३॥
रुप तेंच पाहे पुन्हा । जेथें तुका आला ध्याना ॥४॥
॥७७०३॥
संजय बोले कुरुवर्या । वासुदेव कृतकार्या ॥१॥
ऐसें बोलिले अर्जुना । कृष्णरुपें झाला पुन्हा ॥२॥
ग्राहीकाच्याच आवडी । व्यापारीक उकली घडी ॥३॥
नेघे जाणून ठेविली । तुका ह्मणे शांती दिली ॥४॥
॥७७०४॥
पार्थ आनंदे नीवाला । देव देखतां सानुला ॥१॥
स्वप्नापरी आदि तेज । क्षणें मावळे सहज ॥२॥
निशी उदयांत तारा । तेवीं देखे सैन्यभारा ॥३॥
आपण रथाखालीं उभा । वरी देखे पद्मनाभा ॥४॥
शंख चक्रादि हत्यारें । चतुर्पाणी रुपगोजिरें ॥५॥
ठाण लक्षणें नेटका । दिसे सौम्य टविटका ॥६॥
हर्षे बोले धनंजय । तुझें देखीयेल्या पाय ॥७॥
आतां बुद्धि स्मृती आली । वृत्ति राहिली चांगली ॥८॥
नको पालट घेऊं पुन्हा । तुका ह्मणे जनार्दना ॥९॥
॥७७०५॥
भक्त नायकाचे शब्द । ऐकुनि वेद झाला स्तब्ध ॥१॥
चुकी आपणाकुन झाली । ज्यासी जाणीव कळों दील्ही ॥२॥
हातीं आल्या मेरु राई ॥ सत्य बोलतों अन्वयी ॥३॥
मग ह्मणे गा वेडया । काई हांसो धनंजया ॥४॥
अरे अभ्रें वृथा गगन । खरें सांगतों निवडून ॥५॥
जयापासूनी अपार । होति जाती दश अवतार ॥६॥
कष्ट भोगिती सुरगण । रुप पाहावया संपूर्ण ॥७॥
जें कां माझें देखिलें तुवां । नव सुकरी शीव जीवा ॥८॥
तुका वदला किंचित । झालें त्रिजगतीं विख्यात ॥९॥
॥७७०६॥
दानीं तपीं वेदीं नामीं । पूजादिकांचे संभ्रमीं ॥१॥
शक्य पाहाया ये रीतीं । तुवां देखिली जे मूर्ती ॥२॥
बहू निदानींचा ठेवा । तुवां पाहिला पार्थिवा ॥३॥
सनकादिक जयासाठीं । तुका ह्मणे बहू कष्टी ॥४॥
॥७७०७॥
तो मी आत्मैक्य भक्तीनें । शक्य पार्था ये रीतीनें ॥१॥
जाणायास पाहायास । अंतीं गती प्रवेशास ॥२॥
जरी आवडी सगुणीं । चित्त ठेवी रे निर्गुणीं ॥३॥
तेंच सार्थक तत्वतां । मुका झाला या जाणतां ॥४॥
॥७७०८॥
झाला नि:संग मद्भक्त । मी थोर हा धरी हेत ॥१॥
करी मत्क्रिया चोखटी । सर्वभूतीं द्वेष नुठी ॥२॥
तो गा पांडवा पावतो । माझा मज सामावतो ॥३॥
घंटेपासुनियां नादू । तुका ह्मणे वीसंवादु ॥४॥
॥७७०९॥
संजय सांगे धृतराष्ट्रा । विश्वरुपीं झाली यात्रा ॥१॥
एकादशाचे मंडळीं । पार्थ देवता गोंधळी ॥२॥
जन्मेजया सांगे कथा । पैं तो वैशंपायन गाथा ॥३॥
केला समाप्त अध्यावो । तुका उदोकार भावो ॥४॥
॥७७१०॥
त्याचे पदाच्या पद्धतीं । चाले कवी सिद्धमती ॥१॥
तरीच अधिका उणीवा । देवो रिझाला जाणावा ॥२॥
श्रीगुरु पांडुरंगापायीं । गुरुदास ठेवी डोयी ॥३॥
येथें तुकया संगती । गीता सांपडली होती ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 19, 2019
TOP