भगवद्गीतास्तोत्र - नमन

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७२३५॥
धन्य धन्य देवी गीता । आदिमाया वेदमाता ॥
जाणेल जो अर्था । धन्य मातापितर ॥१॥
एक श्लोक अथवा चरण । अर्थ अनुभव अंगीं लेण ॥
भव मोक्षाचें साधन । नलगे कोठें शोधावें ॥२॥
एका चरणाचा अर्थ । राजा जनक जाणत ॥
मग विदेहाची मात । अंगीं येऊनी ठसावी ॥३॥
एका चरणाचा अर्था । मुनी वसिष्ठ जाणत ॥
शांतीच्या सदनांत निजशयनी पहुडला ॥४॥
एका चरणाचा अर्थ । मुनी वाल्मिकी जाणत ॥
दृश्य करुनी निवांत । ब्रह्मपदीं पहुडला ॥५॥
एका चरणाचा अर्थ । पंडुपुत्र धर्म जाणत ॥
सत्य भाषण यथार्थ । शत्रु मित्र समान ॥६॥
अर्जुन नर नारायण । हे तों सिद्ध साधक जाण ॥
दुष्ट करावया निर्दळण । तुका ह्मणे अवतरले ॥७॥

॥७२३६॥
आहे भगवतगीता । पूर्ण अमृतसरिता ॥१॥
एक एक अक्षरांत । आहे माझा रमाकांत ॥२॥
जो हा सगुण निर्गुण । एक रुक्मिणीरमण ॥३॥
तुका ह्मणे ज्ञानेश्वरी । आत्मपदींची सोयरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP