भगवद्गीतास्तोत्र - अध्याय सातवा

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७५१५॥
द्वारकानाथ बोले । पार्था ऐकिलें पाहिजे ॥१॥
सप्रेम मन तद्रूपीं । जो निक्षेपीं भावाळु ॥२॥
मदाश्रित योगाभ्यासी । अहर्निशीं अखंड ॥३॥
सर्वज्ञत्वें जाण मातें । स्फुट ऐकतो तुकया ॥४॥

॥७५१६॥
विज्ञानेंसी तुतें ज्ञान । मी संपूर्ण सांगतों ॥१॥
जें जाणोनि पुन्हा येथें । जाणणें तें नुरेची ॥२॥
ऐसी नवलीक बोली । तुका चाली निवेदी ॥३॥

॥७५१७॥
मनुष्यांच्या सहस्त्रांत । नर क्वचित प्रयत्नीं ॥१॥
याही मोक्षयत्नीं जाण । जाणे खुण तत्वाची ॥२॥
तो विरळा मज वाटे ॥ तुकया भेटे सोयरे ॥३॥

॥७५१८॥
पंचभूतें बुद्धी मन । अहं आठवा लागून ॥
वागवीत वपुस्यंदन । कर्ज ज्यास सारथी ॥१॥
ते वोढिल तिकडेची । चाली पडली रथाची ॥
यास्तव मीपण भोगाची । ते वाजट क्षणीक ॥२॥
अष्टधा प्रकृती भेदलीसे । माझी मजची सायासें ॥
झाली उत्पन्न कैसें । चराचर व्हावें हें ॥३॥
तुका ह्मणे केली देवें । तीस कवणें वारावें ॥
वारिलीया लाभ पावे । किंवा हानी उदंड ॥४॥

॥७५१९॥
येथें अपर कारण । करुं पाहे जो आपण ॥
मूळ प्रकृति संपूर्ण । महाज्ञानी बोलती ॥१॥
परावाचा परामाया । बुझे मानसीं सखया ॥
परात्पर आपणीया । पैं ह्मणती तो सुजाण ॥२॥
आतां जीव जे चिदंश । झाले जयाच्या उद्देश ॥
जाणिजे हें जगदीश । तुका ह्मणे बोलिला ॥३॥

॥७५२०॥

ईपासोनी होती भूतें । मूळ चिच्छक्ती जाणते ॥
बहु जाणती जाणते । गोष्टी नसे झांकिली ॥१॥
आतां उत्पत्ती कीं लय । स्थान निर्मळ मी होय ॥
आहे सर्वांचा प्रत्यय । तुज असे बहु मुखें ॥२॥
मी गा तैसाची जाणीजे । वेदादिका आक्षेपिजे ।
तुका ह्मणे हे घेईजे । निज पदरी अर्थासी ॥३॥

॥७५२१॥
धनंजय या धरेचा । घे तूं धनंजय नामाचा ॥
त्यासी ह्मणे यादवाचा । राजा आपण होय जो ॥१॥
नसे कांहीं मजहूनी । पैलीकडे पाकशासनी ॥
मज माझारी होउनी । हे ठेविलें ईश्वरें ॥२॥
सूत्रीं मणी एक हेम । अळंकाराचें द्विनाम ॥
पाणी कल्लोळ हें सम । तुका वर्म निवेदी ॥३॥

॥७५२२॥
या पृथ्वीचा पुण्य गंधु । तो मी ह्मणे दीनबंधु ॥
जळीं विभूती प्रसिद्ध । रस मीच कौंतेया ॥१॥
तेंवीं चंद्र आणि सूर्यात ॥ आहे माझी प्रभा दीप्त ॥
प्रणव शब्द मी वेदांत ॥ उघड घेई अनुभवें ॥२॥
नभीं विषय शब्दाचा । तो मी कैवारी दासाचा ॥
नरीं अर्थ पुरुषार्थाचा । वीर्य मान मीच गा ॥३॥
ऐसा माझा प्रादुर्भावी । पुढें सांगुं अनुभवो ॥
पुण्य गंध पृथ्वीचा हो । भूलवणी ह्मणे तुका ॥४॥

॥७५२३॥
आतां पंच पावकांत | आहे ज्योत्स्ना मीच जोत ॥
जीवन जें प्राणियांत । पै गा मीच नांदतों ॥१॥
तपतापशामाझारीं । आहें म्हणतु कंसारी ॥
तरी धाक चराचरीं । पैं लागतो तयांचा ॥२॥
नाहीं शस्त्र अस्त्र सेना । नाहीं मेळविलें धना ॥
तरी धाक तपोधना । दे मुनि इंद्रा विधीसी ॥३॥
तुका ह्मणे नाम ज्याचें । ऐकिल्या यम काळाचें ॥
हृदय फुटे मग जीवाचें । काय सांगूं माहात्म्य ॥४॥

॥७५२४॥
सर्व भूतांमध्यें बीज । तो मी ह्मणे लक्ष्मी नीज ॥
विधी पुरातन अज । पार्था प्रगटी पुढें ॥१॥
भूतें मिथ्या मृगजळ । मी दिनकर सर्वकाळ ॥
नव्हे ऐश्वर्य विकळ । रति मात्र फालगुन ॥२॥
असे तद्बीज नित्य मी । बुद्धिमंतांत बुद्धि मी ॥
तेज तेजस्वीयांत मी तुका ह्मणे हरि वदे ॥३॥

॥७५२५॥
बळवंतांमाजी बळ । तो मी बोलें मेघनीळ ॥
कामरागहीन चळ । नातुडे तें नित्य मी ॥१॥
विरुद्ध न धर्मासी । काम तो मी गुणराशी ॥
याचिलागीं पुण्यराशी । पैं वेंचती असंख्य ॥२॥
अरे पार्था धनुर्धरा । चराचराचा पसारा ॥
वागवीतों सदयोदरा । तुका ह्मणे अनुभवें ॥३॥

॥७५२६॥
आतां सत्वगुणी शुद्ध । रजोगुणी तो विरुद्ध ॥
तम केवळ निषिद्ध । भाव असे तयाचे ॥१॥
आहे माझी सूत्रदोरी । तरी अक्षय तोरी ॥
त्याची आहे दानवारी । अप्रसिद्धांत आणवी ॥२॥
ते मिथ्या सर्वदोर । रुपें आहे निर्विकार ॥
कीं मी रज्जु नसे थार । मज रज्जुंत सर्प ते ॥३॥
तुका ह्मणे सत्य गोष्टी । आली अनुभवा सृष्टी ॥
देव जाणे हें अदृष्टी । माया मोहें नेणती ॥४॥

॥७५२७॥
अरे त्रिगुण भावांत । विश्व मोहलें संतत ॥
मातें नेणोनियां मात । मायेचीच ऐकती ॥१॥
नेणें जो मी आत्मादोरु । गुणसर्पा पैल थोरु ॥
झाकी उघडी बाजारु । तैसें नव्हे गारुड ॥२॥
उघडें येतें अनुभवा । बाल्य तारुण्य प्रभावा ॥
वृद्धपणीं ही विसांवा । तुका ह्मणे विसरले ॥३॥

॥७५२८॥
मी देव माझी हे त्रिगुण वेणी हे । नंदिनी संदेहे असंभाव्य ॥१॥
न तरवे कांहीं उपावची नाहीं । मातें भजे तो ही तरुं शके ॥२॥
माझीया नामाची सांगड फुकाची । मग या मायेची सत्ता राहे ॥३॥
तुका ह्मणे मातें बोलिला अनंत । उतरले संत संख्या नसे ॥४॥

॥७५२९॥
मातें न भजती पापी जे कुमती । पुढें मूर्खोत्पत्ती झाली ज्यांची ॥१॥
अधम ते प्राणी भ्रष्ट कुव्यसनी । बुद्धि जे मायेनी हरितली ॥२॥
पावले वैभवा दैत्याच्या कुभावा । कुहरांत दीवा मालवला ॥३॥
तुका ह्मणे संगी यमाचा नि:संगी । राहती कुसंगी कल्पवरी ॥४॥

॥७५३०॥
भजती पुण्याचे न येथें फुकाचे । आमुच्या द्वाराचे अधिकारी ॥१॥
चतुर्विध जाणा ऐकावें अर्जुना । ठेवी गोष्टी मना पैलतटीं ॥२॥
आरोग्य कामास दुसरा जिज्ञास । अर्थार्थी परीस आत्मवीद ॥३॥
ज्ञानीयांत युक्त सांगेल अच्युत । तुका ह्मणे अंत नाहीं सुखा ॥४॥

॥७५३१॥
युक्त ज्ञानी दिसे ज्यांत भक्ति वसे । एकत्वीं विलसे भक्ति ज्याची ॥१॥
तो थोर अर्जुना आवडतो मना । त्या प्रिय भावना आत्मा जैसा ॥२॥
तो ही आत्मा मज प्रिय हेंचि निज । बोले यदुराज तुका ह्मणे ॥३॥

॥७५३२॥
तोही थोर परी ज्ञानीया शरीरीं । मीच वस्तीधारी मानीताती ॥१॥
मातें सर्वस्वानें ज्याचेनी भजनें । सद्गती ते मनें वरीयेली ॥२॥
भजे युक्त चित्तें प्राचीन संचितें । योजी वंचीना ते काया मसी ॥३॥
अनुराग येणें घेतु बळ दुणें । सार्थक करणें मानी तुका ॥४॥

॥७५३३॥
बहुत जन्मांचिये अंतीं ऐसी सोय । लाभे निधी होय पायाळाच्या ॥१॥
ज्ञानी मातें भजे ऐसाची जाणीजे । तो यज्ञेंचि वरसे कणगर्भी ॥२॥
किंवा वासुदेव दिसे भास सर्व । जेवीं विस्तरे पर्व विधि मुखें ॥३॥
तो थोर दुर्लभ न अती सुलभ । तुकया अंगीं कोंभ उमटला ॥४॥

॥७५३४॥
ज्या ज्या कामीं ज्ञान नेलें सुरसाधन । अंतरा आयन घ्यावें तें हें ॥१॥
त्यास मी प्रिय कीं आत्माच नित्य कीं । तो ही स्वात्मा बाकी काय उरे ॥२॥
मज प्रिय प्रिय नव्हेच अप्रिय । तुका तो सुप्रिय किती वाणूं ॥३॥

॥७५३५॥
जो जो जी जी भक्ती तनू पुरातनू । श्रद्धे सनातनू ह्मणे भजों ॥१॥
त्या त्यास अचळा श्रद्धेचा जिव्हाळा । देतो कुंती बाळा त्या त्या रुपें ॥२॥
आमुची आगत्य यतुली सांप्रत । तैसें त्या सर्वत्र माझ्या ठायीं ॥३॥
मातेच्या उदरीं वसवी कुमार । प्रीत भारे थार तुका पदीं ॥४॥

॥७५३६॥
त्या श्रद्धेनें त्यांस पूजी सावकाश । त्यांत जो अन्यास सेवा धारी ॥१॥
त्यां पासुनि पावे काम सदभावें । कामातें स्वभावें मीच निर्मी ॥२॥
सारांश जे वृत्ती सारोनी प्रवृत्ती । देतु आत्मप्रीती कृपाळु मी ॥३॥
तुका ह्मणे देव नभ भक्तभाव । वायूचा प्रभाव कवळीत ॥४॥

॥७५३७॥
अल्प बुद्धी ज्याला फळें प्राप्त त्याला । होती सकळांला अंतवंत ॥१॥
मेले ते तयांस पावती बहुवस । मद्भक्तां निवास माझ्याठायीं ॥२॥
ह्मणुनीयां ज्ञानी असे जो साधनी । तेणें मी निदानीं नये सांडूं ॥३॥
आपुलें माहात्म्य वर्णी जलद श्याम । तुका ह्मणे प्रेम असो येथें ॥४॥

॥७५३८॥
पार्था बा अपुलें वर्णीतों नवलें । भक्तें वश्य केलें भुलवणी ॥१॥
व्यक्त मी मानीतों ऐसेंच कल्पीतों । अव्यक्तास होतो शब्द कैसा ॥२॥
अज्ञानपणानें विसरती मनें । मूढ या भावनें येती केवीं ॥३॥
प्रत्यक्षा प्रमाण लावीती दूषण । अव्यक्त निर्गुण गूढ कल्पी ॥४॥
नेणतां हे पर वस्तु अगोचर । अव्यय प्रकार अत्युत्तम ॥५॥
तुका ह्मणे दया हरिची असलीया । तरीच प्रत्यया प्रकार गोष्टि येती ॥६॥

॥७५३९॥
झांकलों मी असे कोणासी न दिसे । योगमाया भासे मजवरी ॥१॥
सर्वसी प्रगट न दिसें मी अचाट । मूढ फळकट काय जाणें ॥२॥
जो कां मी अनादी अनंत परवादी । मौन जेथें वेदीं घेतलेंसे ॥३॥
अगाध मीचही कांहीं जें स्वल्पही । तुका गर्जे ग्वाही मृत्यु लोकीं ॥४॥

॥७५४०॥
जीं गेलीं तयांस जाणे मी वीरेशा । होतीं त्यांची दशा पाहाताहे ॥१॥
भूतें भविष्यानें होणार जें पुढें । आहे मजकडे जाणीव तें ॥२॥
मातें गा कोणीच नेणती पांडवा । ऐशा नवलावा किती सांगूं ॥३॥
तुका ह्मणे आत्मा जाण जैसा देह । देहास संदेह आत्मरुपीं ॥४॥

॥७५४१॥
प्रिय इच्छा तैसा अर्पियांत द्वेष । होतसे उत्कर्ष त्रिभुवनीं ॥१॥
द्वंद्व मोह यासी असे मुळबीज । जाणसी सहज बोलों आह्मीं ॥२॥
सर्व भूतें सृष्टि काळीं मोहालागी । पावती प्रसंगीं अनुभवें ॥३॥
पूर्वील मोह दोरा वोवी जीव मणी । तुका ह्मणे खाणी दु:खाची जे ॥४॥

॥७५४२॥
क्रिया चोख ज्यांची तिचीया बळानें । कां पृथ्वी जळानें नीच पाहावी ॥१॥
ज्यांच्या अंतरींचीं गेलीं पुण्यपापें । अंगीं मारे सर्पे चंदनाच्या ॥२॥
मातें जो भजेल सुटेल निश्चयें । त्यासी नाहीं भय दोघांचें या ॥३॥
दृढवत तेची घेणार मोक्षासी । तुका ह्मणे ऐसी गोष्टी झाली ॥४॥

॥७५४३॥
नासावया जन्ममरणाचें मुळ । जे कां यत्नशीळ महाश्रय ॥१॥
ते ब्रह्म जाणती काशास्तव जरी । अध्यात्मिक सारी कर्म मार्गु ॥२॥
तेचि गा तरले तारीती आणीका । मार्ग हा आसका विस्तारुनी ॥३॥
तुका ह्मणे आतां शेवटील श्लोक । तो जगन्नायक बोले कैसा ॥४॥

॥७५४४॥
अधिभूत अधियज्ञासिरे पार्था । सहित वीरनाथा अधिदैव ॥१॥
मीच होय ऐसा भरंवसा मानुनी । भजती अनुदिनीं प्राणी जे कां ॥२॥
प्रयाणीं ही तेची जाणती पांडवा । तुका ह्मणे जीवा केलें मुक्त ॥३॥

॥७५४५॥
ऐसे हे प्रसंग संपले पैं सात । गीता देवा भक्त वरदानी ॥१॥
श्रवणें पठणें करी कार्यसिद्धी । मायिक उपाधी वारुनियां ॥२॥
तुका विनवणी करी साधुजना । श्रवणीं भावना शुद्ध धरा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP