भगवद्गीतास्तोत्र - अध्याय पंधरावा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७७९८॥
नमुनी साष्टांगीं कुळदेवी अष्टांगीं । लोभू ते कष्टांगी करुं रिंघे ॥१॥
पंधरावे प्रसंगीं पार्थ जीवसंगी । आशंका प्रसंगीं उद्भवली ॥२॥
प्रपंचु हे तीखें दिसे कां वरुखें । वोरकीस वीखें ग्रासील हें ॥३॥
जाणूनी कल्पना नसावी सर्जुना । वृक्षाची भावना निवेदीतो ॥४॥
पुढें क्षराक्षरु उत्तम संचारु । सांगे भामावरु रखुमाईचा ॥५॥
॥७७९९॥
दितीज भंजनु कुटीला गंजनु । बोले निरंजनु योगेश्वर ॥१॥
ऊर्ध्व मुळ ब्रह्मी माया शाखा क्रमी । देहो अधो ऊर्मी जीवीताची ॥२॥
विश्वाश्वत्थु ह्मणे अश्वत्थ देखणे । श्रुतीपत्रें जाणे ऐसा कोणी ॥३॥
तोचि वेदविद गा भासे जीवलगा । येथें पावेल गा तुका स्वयें ॥४॥
॥७८००॥
जीवेश्वरीं हेत देहगा आश्रित । त्रिगुणें प्रवृद्धांत तेही ऐका ॥१॥
उपशाखोंबळें अल्प अंतराळें । पृथक तनूमूळें लिंगदेहीं ॥२॥
जीवीं ही कर्माचे जया बंध त्याचे । मनुष्यदेहाचे बेचाड गा ॥३॥
हाची ब्रह्मरज्जु जगसर्प तेजु । सांगे भक्तराजु तुकयाचा ॥४॥
॥७८०१॥
आतां आदि अंत नसे ज्या निश्चित । ह्मणावा शाश्वत तेही नाहीं ॥१॥
पाहतां जयाची मूळादि तत्वाची । वाचा स्वयंभूची खुंटली गा ॥२॥
प्रबळें विचित्र दिसे दीर्घ सूत्र । विषयीं अन्यत्र पोसला जो ॥३॥
झणी भयें चिंता धरिसी पांडुसूता । उत्सेदन आतां सांगो तूज ॥४॥
निष्काम जो दांड नि:संगाचे खांड । गुरुसेवा अखंड धैर्यवंतु ॥५॥
तो या भववृक्षा निवती हे साक्षा । वदे देवो दक्षा हता मित्रु ॥६॥
तुका ह्मणे केली पायवाट भली । जड मूढें तरलीं कासेंलागीं ॥७॥
॥७८०२॥
तें तों त्याचमाजी पद धुंडी आजी । कीं गेल्या ज्या माजी परतेना ॥१॥
लोकीं कीं पावन पुरुषां सनातन । आद्य जें कां स्थान अव्ययाचें ॥२॥
प्रवृत्ती जेथुनी नित नवी होऊनी । विस्तार पावूनी रुढली गा ॥३॥
अनद्या ते हेंची जाण सव्यसाचीं । तुका वैराग्याची सेल ठेवी ॥४॥
॥७८०३॥
नाहीं श्लाघ्य काम मोह ना संगम । दोषाचा आगम पंथ टाकी ॥१॥
निष्काम जो स्वात्मविचार संभ्रम । शेष उरे नाम रुप नाहीं ॥२॥
द्वंद्वाशी सुटला सुख:दुख संज्ञेला । ते या नित्य पदाला जाणती गा ॥३॥
अभिज्ञ अक्षय ह्मणावें तयास । तुका ह्मणे यास अधिकारु ॥४॥
॥७८०४॥
त्या पदा शशांक सूर्य हुताशन । प्रकाशिती आन नव्हे कोणी ॥१॥
एकदा गेलीया खुंटे वेरझार । पुन्हा न संसार दृष्टी पुढें ॥२॥
माझें तें सदन पावन परम । तुकयाचें धाम तेंची खरें ॥३॥
॥७८०५॥
माझा प्रतिबिंब अंश जाण पार्था । खरी तूज कथा निवेदितों ॥१॥
झालों जीव जगीं जडा चेतना जे । होय आणी गाजे अहंकार ॥२॥
मना पंचेंद्रिया अन्यासी पाहतां । प्रकृती चाळिता झालों मीच ॥३॥
तुकयाचें मनीं अनुभव जो कां । तोची सांगूं नीका कानू देई ॥४॥
॥७८०६॥
ययासवें घेतां शरीरातें आत्मा । निघे परमात्मा ईश जेव्हां ॥१॥
त्यातें घेवोनियां जातो कैशा रीती । पवन गंधाप्रती तैसा हाही ॥२॥
तुका ह्मणे खेळ खेळुनी वेगळा । अगम्य ते कळा जाणे कोण ॥३॥
॥७८०७॥
श्रोत्र डोळे कांती जीभ नाक पांच । ज्ञान दृष्टी पंच इंद्रियेंही ॥१॥
अधिष्टूनि मना तेही एकवट ॥ सेवितां संकट विषय हा ॥२॥
भोक्ता तरी असे असोनी दिसेना । आश्चर्य हें मना तुकयाच्या ॥३॥
॥७८०८॥
निघे कैसा पाहे असें कसा हेंहो । अज्ञाना वाउगें वाटे सारें ॥२॥
ज्ञानदृष्टि ज्याची डोळस तो जनीं । पाहे जो हरोनी माया दृश्य ॥३॥
तुकया संगींचा विरळा लक्षांत । असेल जाणत ईश्वराशी ॥४॥
॥७८०९॥
प्रयत्नशीळ कीं योगिये चांगला । देखती येयाला अभ्यंतरीं ॥१॥
अशुद्ध जे देहीं कर्मी अमंगळ । यत्नीं ही विटाळ जया नरा ॥२॥
स्वतां नसे ज्ञान सांगीतलें नेघे । अबुद्ध अवघें स्वैर वागे ॥३॥
न देखती ऐसें ईश्वरीं गौरव । भोगीती रौरव तुका ह्मणे ॥४॥
॥७८१०॥
जेणें तपें भानू प्रकाशी त्रिजग । शीतळत्वें चांग चंद्रमा ही ॥१॥
दोनी नसलीया पडे जैं अंधारु । तेव्हां दे आधारु पावक जो ॥२॥
ययावीण जनीं जो गुप्त प्रकाश । हृदयांचे कोश उजळीता ॥३॥
विषया उजळी माझी तेज जोतु । जेथें मिळे अंतु तुका साधु ॥४॥
॥७८११॥
धरितों शक्तीनें भूतें सपर्वत । वृक्ष नदी पंथ सरोनद ॥१॥
प्रवेशोनी धरेमाजी मी सखया । मद्वळें शेषा या आगळीक ॥२॥
उष्णें कर्पती त्या औषधीचे भार । निशि निशाकर शांतवीतो ॥३॥
रसात्मक मीच ह्मणूनी सखया । रोग जाय लया व्याधिग्रस्ति ॥४॥
नाना धातु क्रिया दिव्य रसाय । साह्य घेती गूण तुका ह्मणे ॥५॥
॥७८१२॥
प्राण्यांचे शरीरीं मीच वैश्वानर । होउनी आहार पचवीतों ॥१॥
प्रानापान द्वय भाते लाऊनीयां । भस्मची अन्ना या चतुर्विधा ॥२॥
जठरीं अन्न पचे पाहे माझी लीळा । परी नलगे बाळा ढका येथें ॥३॥
गर्भीण त्रिकाळ जेवीं डोहळयाचें । नवल देवाचें तुका ह्मणे ॥४॥
॥७८१३॥
सर्वाचीया मी हृदयीं प्रविष्ट । असें तरी स्पष्ट जाणी बघे ॥१॥
देतों श्रुति स्मृती बोध विस्मृतीला । इष्ट मी ज्ञेयाला श्रुतिगम्य ॥२॥
सर्व संतां कळें वेदांत कृद्व्यास । वेदवेत्ता ज्यास मानी विश्व ॥३॥
तुकया वरदें कवी स्मृती वेळीं । कैसी पाल्हावळी संध्या काळीं ॥४॥
॥७८१४॥
लोकीं जैसे रात्रंदिन नभ धरा । तैसे हे अवधारा द्विपें पुरुष ॥१॥
क्षर आणी दुजा अक्षर म्हणुनी । ओळखे निदानी जीव शीव ॥२॥
क्षरतो सर्व ही भूतें गा चतुरा ॥ कूटस्थ अक्षरा अंश वदे ॥३॥
ययाहोनी भिन्न ऐकावें सुजणा । तुकया चरणा लागतसे ॥४॥
॥७८१५॥
तो अन्य पुरुषोत्तम । पार न जाणे आगम ॥१॥
बिंब सर्वात्मा बोलीला । पातंजळीं निश्चय केला ॥२॥
प्रवेशुनी जो जीवत्वें । जीवा सांभाळी ईशत्वें ॥३॥
ऐसें थोडक्यांत बुझे । तुका केवळ दिन माझें ॥४॥
॥७८१६॥
क्षरातीत मी यालागीं । तुज कळावें प्रसंगीं ॥१॥
उत्तम गा अक्षराहून । माझें अगाध हें ज्ञान ॥२॥
लोकीं वेदीं ही यास्तव । आहे आमुचा चि स्तव ॥३॥
पुरुषीं उत्तम विख्यात । जाणे तुकया संमत ॥४॥
॥७८१७॥
असें जाणे माला सूज्ञ । त्यासी ह्मणावें सर्वज्ञ ॥१॥
येर मूढ शिखामणि । काय चाटावी करणी ॥२॥
जो मला पुरुषोत्तमा । मीच क्षराक्षरु नामा ॥३॥
मज भजे सर्व भावें । जैसा तुका लागे सेवे ॥४॥
॥७८१८॥
ऐसें शास्त्र बांधीयलें । सख्या गुह्य सांगीतलें ॥१॥
बुद्धीवंत जाणेल जो । तोच येईल आह्मा भजों ॥२॥
कृतकृत्य होय तो । तुका ह्मणे यम भीतो ॥३॥
॥७८१९॥
झाले पंधरा अध्याय । बोध जेथें चतुष्पाय ॥१॥
पुढें षोडशीं संयुक्त । चंद्र प्रगटेल विरक्त ॥२॥
निवती श्रोते वक्ते मनीं । मोक्ष ठेविला नीदानीं ॥३॥
पाहों तुकयाच्या सवें । कलेवर त्यक्त गर्वे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 19, 2019
TOP