भगवद्गीतास्तोत्र - अध्याय पांचवा

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७४३९॥
पुसे पांडुपुत्र परिसे नीरदगात्र । संशयाचें क्षेत्र एक दिसे ॥१॥
बोलोनियां कर्म संन्यासाचें वर्म । कर्मयोगोत्तम निवेदीसी ॥२॥
परि यां दोहींत श्रेष्ठ दावी हित । मज सांग साद्यंत कृष्णनाथा ॥३॥
तुका म्हणे जगव्यापकाचा संग । तेथें ज्ञान मग काय ऊणें ॥४॥

॥७४४०॥
बोले लक्ष्मीकांत विश्वाचा जो अंत ॥ कल्याणकरांत संन्यास हा ॥१॥
कर्मयोग तैसा जाण तूं वीरेशा । थोर त्यागोद्देशा कर्माचीया ॥२॥
कर्मयोग श्रेष्ठ बोलती परनिष्ठ । विचारेंचि जेष्ठ तुका म्हणे ॥३॥

॥७४४१॥
संन्यासी जाणावा येथें तो बरवा । नेणे द्वेषभावा कदा जगीं ॥१॥
सुखें आढळतां नेणें सुखवितां । मूळ विरक्तता यतीश्वरा ॥२॥
निर्द्वंद्व सर्वदा भोगीत आनंदा । अनायासें बंधा पासाव तो ॥३॥
सुटे हा संशय केवीं देतु त्राय । जेथें ऐक्यमय तुका झाला ॥४॥

॥७४४२॥
बोलती ते सांख्ययोगांसीं पंडित । पृथक अज्ञानांत ज्यांची बुद्धि ॥१॥
कीं हा एक दीसे अनुष्ठिल तया । फळ पावे द्वयामाजी एक ॥२॥
आतां विचारांत बरी दृष्टि देयी । जेणें तुक्याठायीं विरामेला ॥३॥

॥७४४३॥
पावती ज्या स्थळा सांख्य अनुभूतीं । तेथेंच पावती योगीराज ॥१॥
सांख्ययोगा ऐसें ऐक्य जो पाहिल । डोळस होईल पार्थिवा तो ॥२॥
श्रीकृष्णवचन प्राण हा वेदाचा । तुका म्हणे साचा अनुभव ॥३॥

॥७४४४॥
नव्हे ऐसा तो संन्यास । दुर्लभ कर्मावीण वोस ॥१॥
कर्मयोग आचरणीं । घेती स्वसुख निर्वाणीं ॥२॥
पावे झडकरी परब्रह्म । ऐसा मार्ग हा सुगम ॥३॥
तुका ह्मणे आन एक । ऐका बुद्धीचे बोधक ॥४॥

॥७४४५॥
चित्तशुद्धि कर्मयोगें । कोणा पुसावें न लागे ॥१॥
अहो जिंकुनियां मन । केलीं इंद्रियें स्वाधीन ॥२॥
जीव भूतांचा जो देह । नलगे किमपी संदेह ॥३॥
अलिप्त जो करितां ही । तुका ह्मणे तो वीदेही ॥४॥

॥७४४६॥
ऐसें कांहीं न करितो । स्मृति साक्षीतें वर्ततो ॥१॥
मानीतो नित्याचारी । तत्ववेत्ता ब्रह्मचारी ॥२॥
विषयीं वर्ततां जातां । न सुटे समाधि तत्वतां ॥३॥
निद्रा घेतों श्वास सांडी ॥ तुका म्हणे सहज खोडी ॥४॥

॥७४४७॥
वाचा पाणि पाद लिंग । गुद पांच हे कर्मांग ॥१॥
यांच्या आचरतां क्रिया । अंतर शुद्ध बाहेर माया ॥२॥
निमिषादिक ही हालतां । छिन्न नव्हे संयोगता ॥३॥
इंद्रियें आत्मविषें । पैं वागतां तुका हर्षे ॥४॥

॥७४४८॥
कर्मे ब्रह्मीं अर्पून ॥ झालें मानस उन्मन ॥१॥
करी सांडुनियां संगु । निरपेक्ष तोचि चांगु ॥२॥
पापें न लिंपे तो जैसें । स्फटिक रंगाचे कडवसे ॥३॥
जळीं पत्र कमळिणीचें ॥ तुकयासि साम्य त्याचें ॥४॥

॥७४४९॥
काया मानस एकाग्र ॥ बुद्धि होऊं नेदी उग्र ॥१॥
गेली वासना पळाली । करणें एका पंथीं आलीं ॥२॥
मग वांछी चित्तशुद्धी । करी नि:संगत्व सिद्धी ॥३॥
संग टाकुनियां क्रिया । स्वात्मप्राप्ती हे तुकया ॥४॥

॥७४५०॥
योगी ऐशा चिन्हीं जाण । कर्मफळीं निराकरण ॥१॥
आत्मस्थितीस पावला । सहज शांति आली त्याला ॥२॥
सकामता लागे पाप । जेथें कामना संकल्प ॥३॥
बद्धफलाशें बांधतो । तुका म्हणे वायां जातो ॥४॥

॥७४५१॥
करुनी निष्काम कर्मास । योगी संपादी संन्यास ॥१॥
सुखी होऊनियां मनें । न करी क्षुद्रादि साधनें ॥२॥
नव द्वारें पुरे देहीं । वस्ती संरक्षी विदेही ॥३॥
स्वयें न करी करवी हिना । तुका म्हणे इतर जनां ॥४॥

॥७४५२॥
कर्तृत्व कर्म लोकांचें । अथवा त्याच्या प्रपंचाचें ॥१॥
ईश्वर निर्मुनि निराळा । कर्मसाक्षित्वें वेगळा ॥२॥
न तो कर्मास करवी । अथवा फलश्रुति भोगावी ॥३॥
वर्ते संसाराचें चक्र । तुका सर्वदा अवक्र ॥४॥

॥७४५३॥
पाप हि नेघे तो कोणाचें । जेणें योगें पूर दु:खाचे ॥१॥
नेघे पुण्यही ईश्वर । पावावया स्वर्गद्वार ॥२॥
आज्ञानानें जें वेष्टित । ज्ञानमोहें विष्कळित ॥३॥
यास्तव करिती भोगिती । तुका ह्मणे अहंमती ॥४॥

॥७४५४॥
आज्ञान निजबुद्धीचें । नासी ज्ञान जिव्हाळ्याचें ॥१॥
परि ज्ञान शुद्ध चोखट । नाशि अज्ञानाचें दु:ख ॥२॥
पराजडाचे तें ज्यांचे । अंध नेत्र तिमिराचे ॥३॥
ज्ञानसूर्यउदयांत । तुका झाला स्वरुपवंत ॥४॥

॥७४५५॥
बुद्धि चित्त त्याचि ज्ञानीं । एकविध नियमुनी ॥१॥
परमाश्रयें तेचि निष्ठा ॥ साजे सदा योगभ्रष्टा ॥२॥
मोक्ष पावती ऐसे ते । विश्वंभरीं एकचित्तें ॥२॥
तुका म्हणे दग्ध केलें । ज्ञानें संचित जाळिलें ॥४॥

॥७४५६॥
विद्या सद्गुण संपन्न । अयाचित लोकमान्य ॥१॥
ब्राह्मणीं धेनुमध्यें । याति भेदादि संबंधें ॥२॥
गजीं शुनीं तें चांडाळीं । सम पंडितु न्याहाळी ॥३॥
ज्ञान ज्याचें अखंडित । तुका ह्मणे तो पंडित ॥४॥

॥७४५७॥
सर्वभूतीं मन आपुलें । जेणें समान स्थापिलें ॥१॥
तेणें जीत असतां वीरा । केला मातेरा भवाचा ॥२॥
समब्रह्म तें निर्दोष । जें नि:शेष निर्मळ ॥३॥
तस्नाद्‍ ब्रह्मीं न ते समी ॥ तुकया वर्मी मनराते ॥४॥

॥७४५८॥
न हर्षे प्रिय होतांना । ज्याच्या मना निश्चळता ॥१॥
नोहे घाबरा अप्रियें । ज्ञानराय ज्ञान्याचा ॥२॥
न जो मूढ स्थिरबुद्धी । देहशुद्धीरहित ॥३॥
ब्रह्मीं स्थिर ब्रम्हवेत्ता । तुकया चित्ता मिळाला ॥४॥

॥७४५९॥
स्पृहा न बाह्य विषयीं । एकें ठायीं एकला ॥१॥
सुख पावतां स्वरुपीं । सहज पापीं त्यागिला ॥२॥
युक्त चित्त ब्रम्हयोगीं । सुख भोगी अक्षया ॥३॥
तुका म्हणे या परतें । काय उरतें बोलाया ॥४॥

॥७४६०॥
जो कां स्पर्शे भोग विषय । मोहो बाह्य धरुनी ॥१॥
तें तंव कारण दु:खाचें । जेथें वेचें आयुष्य ॥२॥
आद्यंतवंत पार्था । हे अवस्था भूमीची ॥३॥
रमे ज्ञानी न त्या सुखीं । तुका दु:खी प्रपंची ॥४॥

॥७४६१॥
जो जितांचि अर्जुना । सोसूं भावना शकेल ॥१॥
पूर्वीच मरणाहूनी । न्याहाळूनी उपेक्षी ॥२॥
काम वेग क्रोधोद्भव । स्वानुभव रक्षकु ॥३॥
नर तो सुखीं तोचि योगी । पांडुरंगी तुकयातो ॥४॥

॥७४६२॥
अंतरसुखी अंतरिं रमे ॥ उंच प्रेमें निर्मळु ॥१॥
अंतर्ज्योतींत जो स्वतां । निर्मुक्तता प्रपंची ॥२॥
योगी ब्रह्मचि तो झाला । सांग त्याला उणीव ॥३॥
पावे निर्वाण पदा । तुकया सदा हरिकृपें ॥४॥

॥७४६३॥
लाभे ब्रह्मरुपता देहीं । नि:संदेही आकल्प ॥१॥
क्षीणपातक जे ज्ञानी ॥ जगीं वसुनी अलिप्त ॥२॥
स्थिर मति नासे द्वैत । यातायात नोळखे ॥३॥
सर्व भूतहितींरत । पाहाती संत तुकयासी ॥४॥

॥७४६४॥
कामक्रोधाविरहित ॥ झाला संत तो एक ॥१॥
जेणें प्रयत्न केला बहु । मनवाहु कवळिला ॥२॥
देह मग मरो वांचो । अथवासाची संपत्ती ॥३॥
केवळ मुक्त आत्मविद । तुकया पद वंदितु ॥४॥

॥७४६५॥
पुढें साहावे प्रसंगीं । सांगणें आहेच योगी ॥
यया लागीं तो सारंगी । दंश येथें जाणवी ॥१॥
आस्था लागावी अर्जुना । ऐसी मनाची वासना ॥
म्हणोनि सांख्य तें सज्जना । यथाशक्ति सांगतु ॥२॥
बाहेर बाह्य विषया । वीतरागें दापुनियां ॥
दृष्टि देउनि भोंवया । मध्यभागीं अवकाशीं ॥३॥
घ्राणीं वाहे निजप्रानु । तेविंच मेळवी अपानु ॥
तुका वदे देतो मानु । लोकामध्यें योगीया ॥४॥

॥७४६६॥
बुद्धींद्रियें ही आकारा । मनधरणें साधन बारा ।
मुनिमोक्षाच्या मंदिरा । एकसरां चालिलें ॥१॥
चाड न धरी सिद्धीची । तेविंच कामना मोक्षाची ॥
झाला मुक्त सव्यसाची । पुन:पुना किति सांगूं ॥२॥
पैं गा जन्माचें सार्थक । मातें भासे हेंच एक ॥
जाणुनि तुकयाचा विवेक । पदरीं घेती ज्ञातये ॥३॥

॥७४६७॥
भोक्ता यज्ञ तपांचा मी । आहे ऐश्वर्य भूमी ॥
सर्व लोकीं महेश मी । सखा तेवीं सर्वांचा ॥१॥
ऐसा प्रभूचा अन्वय । झाला तेथें अहंक्षय ॥
मग शांती वधुप्राय । तो पावतो निर्मळ ॥२॥
तुका विनवी वारंवार । माझ्या मतीं हर्ष फार ॥
संतीं न करावा अव्हेर । प्राकृत भाषा ह्मणोनि ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP