भगवद्गीतास्तोत्र - अध्याय तिसरा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७३५४॥
पार्थ वदे वासुदेवा । प्रश्न आमुचा ऐकावा ॥१॥
कर्मागळी बुद्धी होय । ऐसा सांगतां प्रस्ताव ॥२॥
तरी घोर कर्मी यया । जनार्दना घालावया ॥३॥
चिंतिपासुनी केशवें । तुका ह्मणे जी सोडावें ॥४॥
॥७३५५॥
या मिश्रित उत्तरा । ऐकोनी खेद अंतरा ॥१॥
बुद्धि स्थिति भांबावली । वृत्ति शौर्याची लाजली ॥२॥
एक पंथ निवडून । सांग जयांत कल्याण ॥३॥
श्रेय पावे जयास्तव । तुकया भयें नेणें जीव ॥४॥
॥७३५६॥
हांसोनि बोले राधाप्रिय । हें कौंतेया अवधारी ॥१॥
निष्ठा द्विविध या लोकीं । पूर्वी असे कीं बोलिली ॥२॥
ज्ञानयोगें चि सांख्याला । असे केला निश्चयो ॥३॥
सत्कर्मे कर्म योगी । तुका भोगी जें सुख ॥४॥
॥७३५७॥
जे कां कर्मातीत । सिद्ध प्राप्त चोखट ॥१॥
परी कर्म केल्याविण । कोण सीण मुकला ॥२॥
कर्म संन्यास मात्रें । सिद्धी वक्रें न पाहे ॥३॥
ययालागीं तुका वाणी । हे निशाणी कर्माची ॥४॥
॥७३५८॥
अहो कर्म केल्याविण । वागे कोण पृथ्वीस ॥१॥
एक पळ न ठरे कधीं । कर्म संधीवांचूनि ॥२॥
हटें छंदें करविती । कर्म प्रकृती या गुणें ॥३॥
तुका म्हणे कर्मातीत । त्या अनंत मानीना ॥४॥
॥७३५९॥
कर्मेंद्रिया अनिवारा । तो पसारा आवरुनी ॥१॥
मनीं चिंतीं विषयांस । कर्म संन्यास साधुनी ॥२॥
डोळे झांकीं मूढ बसे । मिथ्या दिसे दंभ तो ॥३॥
तुका विनवितो संता । ऐसी वार्त्ता जुनाट ॥४॥
॥७३६०॥
अरे पार्था इंद्रियांला । मनें त्यांला आवरी ॥१॥
कर्मेंद्रियीं कर्मयोग । करी नि:संग थोर तो ॥२॥
निष्कामाचें जे भजनें । तुका ह्मणे विश्रांती ॥३॥
॥७३६१॥
कर्मत्यागाहुनि कर्म । श्रेष्ठा वर्म मानतें ॥१॥
तें तूं करी विचक्षणा । अंत:करणा जे शुद्धी ॥२॥
देह निर्वाह काळजी । नलगे माझी मी जाणें ॥३॥
कर्म सोडिलिया खोटें ॥ मग उफराटें बाधील ॥४॥
तुका म्हणे जगीं खंती । कर्माहातीं न पडावें ॥५॥
॥७३६२॥
देव पितृ यज्ञ । जे वेदज्ञ जाणती ॥१॥
यावीण मिथ्या येर । नेदी थार परलोकीं ॥२॥
संगत्यागें त्या प्रीत्यर्थ । घे परमार्थ करतळीं ॥३॥
माझी प्राप्ती जयामाजी । तुका आजी पावला ॥४॥
॥७३६३॥
प्रजा यज्ञा संगें विधि । पूर्व बुद्धी प्रेरि तूं ॥१॥
जे निर्माण झाले लोक । त्यांस शोक नसावा ॥२॥
की या मखें पावा वृद्धी । कामसिद्धि धेनु वा ॥३॥
तुका ह्मणे आशीर्वाद । भवखेदवारकु ॥४॥
॥७३६४॥
देवा भजाया अध्वरें । फळ खरें देतील ॥१॥
तुह्मा लाभचि जाणावा । नित्य भावा नुतन ॥२॥
अन्योन्य भजतां ऐसें । फळ अनायासें श्रेयाचें ॥३॥
तुका वदे धर्मयज्ञीं । साह्य सुज्ञीं असावें ॥४॥
॥७३६५॥
इष्ट भोग देती तुह्मा । ऐसा महिमा देवांचा ॥१॥
यज्ञ देव पूजिलीया । तुमची क्रिया सफळ ॥२॥
देवीं दिलें देवांस । नेदी तामस चोर तो ॥३॥
तुका ह्मणे आत्मपोटा । ढोर ताटा चघळीत ॥४॥
॥७३६६॥
यज्ञाचें शेष खाणारे । पाप हारे दर्शनें ॥१॥
आत्मोदरासाठीं नेम । तो अधर्म व्यापारु ॥२॥
पापी पापचि ते खाती । जे रांधिती स्वेच्छेनें ॥३॥
तुका म्हणे रोगी जैसे । घेऊं बैसे पथ्यासी ॥४॥
॥७३६७॥
भूतें अन्नरसें होती । अन्नोप्तत्ति पर्जन्यें ॥१॥
यज्ञें करुनि पर्जन्य । लोकीं मान्य जो तिहीं ॥२॥
यज्ञकर्मापासूनियां । वर्म तुकया ठावकें ॥३॥
॥७३६८॥
वेदापासूनियां कर्म । उघड वर्म कळतें ॥१॥
वेद अक्षर संभव । वासूदेव बोलती ॥२॥
तस्मात्सर्वगतहि । श्रुतिग्वाही साधकां ॥३॥
प्रतिष्ठित यज्ञीं सदा । तुकया छंदा पालक ॥४॥
॥७३६९॥
ऐसें वर्तविलें चक्र । कर्म सूत्र यज्ञाचें ॥१॥
लोकीं न वर्तवी जो का । व्यर्थ असका यातिचा ॥२॥
वृथा आयुष्य पातकी । इंद्रिय मुखीं घालीतु ॥३॥
तुका ह्मणे वायां भ्रष्ट । केले कष्ट निष्फळ ॥४॥
॥७३४०॥
श्रद्धा आत्मस्वरुपीं भली । वृत्ति रंगली विटेना ॥१॥
आत्मलाभें झाला तृप्त । भक्त्यासक्त भावार्थी ॥२॥
स्वरुपीं तुष्ट झालें मन। जन विजन सारिखे ॥३॥
त्याला नसे हे खटपट । तुकया पेठ कौलाची ॥४॥
॥७३७१॥
नसे फळ त्याच्या कर्मे । अविश्रमे विरक्तु ॥१॥
प्रत्यवाय उणेपणीं । हे तो काहाणी संपली ॥२॥
न ज्यास सर्व भूतीं । कांहीं प्रीती फळाची ॥३॥
इच्छा नाहीं ह्मणे तुका । तो नेटका मुक्त पैं ॥४॥
॥७३७२॥
यालागीं वीरा पार्था । कामीं निष्काम अर्था ॥
सदा आपुले परमार्था । साधकानें पाहाणें ॥१॥
करावें तें न सांडे कीं । कर्मरेषा नेटकी ॥
करी पार्थिवा बाकी । झाडावया पाशाची ॥२॥
काम त्यागिल्या निष्काम । पुरुष पावे परब्रह्म ॥
तुका ह्मणे वर्म । सुटे केलें निर्मळ ॥३॥
॥७३७३॥
कर्मे चि कविता सिद्धी । प्राप्त श्रेष्ठास त्रिशुद्धी ॥
जनकादिक राज्यामधीं । पूर्झ झाले विदेही ॥१॥
वैराग्य झालें पुरें । आत्मतत्त्व कळे खरें ॥
तरी लोक संग्रहारे । या कर्मासि न सांडूं ॥२॥
तुका ह्मणे पार्थाप्रती । कर्ममार्गाची पद्धती ॥
देव सांगे लोकस्थिती । आदिअंती पाळणें ॥३॥
॥७३७४॥
जैसें आचरती श्रेष्ठ । तो परनिष्ठ पडे मार्ग ॥१॥
तैसें इतर लोक । हा विवेक चाळिती ॥२॥
श्रेष्ठ निर्णया सारिखे । जग या सुखें मनावें ॥३॥
तुका म्हणे सुफळ न्याय । वेदराय सभेचा ॥४॥
॥७३७५॥
पार्था तूं मातें पाहे । नसे कांहीं हि संदेह ॥
पूर्णरुप ब्रम्ह देह । जन सर्वही जाणती ॥१॥
नसे कांहीं कर्तव्यता । किंवा फळइच्छा चिंता ॥
तरी या लोकीं आतां । वागे जगासारिखा ॥२॥
अवाप्त सर्वही कामीं । कामीं असोनि निष्कामी ॥
तुका म्हणे तरि नामीं । वर्ते कर्मी निरत ॥३॥
॥७३७६॥
कर्मी जरी न वर्ते मी । सुखें राहे स्वात्मधामीं ॥
यत्न पूर्वक करी नामीं । मार्गयोनी धर्माचा ॥१॥
मग तैसीच राहाटी । पडे जग परीपाठी ॥
जो तो म्हणेल देव हटी । नाहीं कर्मी वागला ॥२॥
मग कांहो आपणास । आश्रम धर्माचा सायास ॥
भक्षूं भक्षवे सुरस । पेऊं अपेय पान जें ॥३॥
भक्त नाहीं देव नाहीं । गुरु शिष्य नाम नाहीं ॥
राजा नाहीं प्रजा नाहीं । ऐसा मार्ग पडेल ॥४॥
स्वर्ग नरक मिथ्या शब्द । वृथा शास्त्र वृथा वेद ॥
तुका म्हणे कलिछंद । मग सहज अनिवार ॥५॥
॥७३७७॥
आधींच हें मायामय । जग अनिवार होय ॥
सांडोनेयां स्वार्थन्याय । भलता पंथ स्वीकारी ॥१॥
त्यांत आमुची वर्तणूक । जरी देखती न्यूनक ॥
भ्रष्ट होती मग अधिक । पैंगा चिंता हे मनीं ॥२॥
जरी कर्मी न वागें मी । स्वेच्छा करीन अन्यकामीं ॥
तरी प्रजा रक्षण नेमी । प्रभु ऐसा होईना ॥३॥
तुका म्हणे धाके ऐसा । देव वागे सम माणसा ॥
आपण तारक तो सहसा । येर बुडतां कळवळी ॥४॥
॥७३७८॥
कर्मे नेमिलीं विधीनें । सिद्धि जावया साधनें ॥
फळप्रातिचीं संधानें । अज्ञानास आनंदू ॥१॥
तैसें अवघें नाशवंत । ज्ञानी सिद्धातें संमत ॥
जाणते जे झाले संत । तरी कर्मा नये सोडूं ॥२॥
लोक संग्रहो भारता । रक्षणें हा मार्ग आतां ॥
पूर्ण सृष्टीचीया हिता । तुका ह्मणे कळवळे ॥३॥
॥७३७९॥
व्हावी कामना संपूर्ण । काम्यहेतूच तूं जाण ॥
तैसेंच मग तूं साधन । कर्मठ ऐसें बोलिजे ॥१॥
अज्ञान झोंबिन्नलें । ऐसें दृष्टीनें पाहिलें ॥
तरी त्याचें अंतर भलें । भेदूं नये सज्ञानें ॥२॥
जरी तत्ववेत्ता झाला । अथवा प्राप्त पुरुष भला ॥
तरी जनांच्या कर्माला । तेज द्यावें म्हणे तुका ॥३॥
॥७३८०॥
कर्मे सर्व प्रकृतीच्या । गुणीं खेळची मायेचा ॥
सोडिलीं तीं ज्याच्या । पुन्हा गळीं लागती ॥१॥
जंववरी देहसंगू । तंव न सुटे प्रसंगु ॥
उगा आग्रही उल्लंघू । पाहातां येथें नाडेल ॥२॥
अहंकारें मूढ बुद्धे । म्हणे माझी हे उपाधी ॥
तुका म्हणे कधीं । सुटे ऐसी दिसेना ॥३॥
॥७३८१॥
तत्त्वज्ञीं गुण कर्माला । भेदोन अकर्त्याला ॥
पाहे स्वस्व विषयांला । इंद्रियें हीं वर्तती ॥१॥
जाणिवेचें तुझें अंग । महाबाहो प्रेमें चांग ॥
वश वर्ती लक्ष्मी रंग । भाग्य पूर्ण पांडवा ॥२॥
स्वकर्माचें पाळण । कीजे नको उत्थापन ॥
तुका बोलिला साधन । तेंच पाहे सर्वदा ॥३॥
॥७३८२॥
लागती प्रकृतीछंदी । पडावया मोहोबंदीं ॥
वृथा संसाराची मांदी । मेळविती पुष्कळ ॥१॥
गुणीं रिझले प्रकृतीचे । मूढ झोंबें विषयीं लांचें ॥
अज्ञान पाहोनि काचे । खवळूं नये सर्वज्ञें ॥२॥
मोठे अहंकारी पाप । घेऊनि मायेचें निज माप ॥
उगाणीती विषयदाप । तुका त्यासीं दाविना ॥३॥
॥७३८३॥
कर्म काय होईल जें । प्रकृतीच्या योगबीजें ॥
तें तें मम रुपी अर्पिजे । सर्वाध्यात्ममतीनें ॥१॥
टाकूनि ममता आशा । युद्धा करी तूं वीरेशा ॥
विगतताप माझी दशा । तुझ्या अंगीं बाणेल ॥२॥
ऐकतांच तो बोल । आला पार्था अंगीं डोल ॥
तुका म्हणे फोल । झाला सर्व संशय ॥३॥
॥७३८४॥
उपेक्षून गुणदोषादि लक्षण । नि:प्रांजळपण बोलिलों कीं ॥१॥
तैसेंच पाहावें हेंच अनुष्ठावें । सुखेंचि सुटावें कर्मबंधें ॥२॥
मानव तराया दोष संहाराया । केली नौका व्हाया पैलपार ॥३॥
तुका म्हणे जड नायकती मूढ । पुढें ही दगड होऊनि राहाती ॥४॥
॥७३८५॥
अथवा कुटिळ द्वेष ठेवी खळ । ज्यासि देहीं मळ अहंतेचा ॥१॥
हें मत सोडोनी दोषही जोडोनी । आत्ममत मनीं अनुष्ठीती ॥२॥
तरी ज्ञानमार्गी सर्वांच्या असंगीं । बुद्धि भ्रंशे जगीं विमूढ ते ॥३॥
तुका म्हणे देवा वरिष्ठ जाणावा । अव्हेर करावा जेणें याचा ॥४॥
॥७३८६॥
ज्ञानी पूर्ण झाला शास्त्रें शाखें उमजला । परी त्या लागला पूर्व संगू ॥१॥
प्रकृती हे मिळे प्राचीनाच्या बळें । तैसी बुद्धि खेळे साधूची कीं ॥२॥
पंच भूत भव वेगळे गौरव । देती अनुभव क्षणक्षणा ॥३॥
प्रकृति स्वाधीन पडली म्हणोन । निग्रही अज्ञान म्हणे तुका ॥४॥
॥७३८७॥
पांचा विषयांची गोडि आत्मरुची । घेती तैं रागाची वस्ती होते ॥१॥
वाईट पाहिलें क्लेशें उपेक्षिलें । द्वेषाचें हें झालें जन्मस्थान ॥२॥
राग द्वेष दोन वैरी पुरातन । न व्हावें स्वाधीन तुका म्हणे ॥३॥
॥७३८८॥
भलताही स्वधर्मयोनीसंभवकर्म । उत्तमें उत्तम अनुष्ठीजे ॥१॥
अगुणी झालीया देतु महाश्रेया । जैसी बाळा माया लांसी जरी ॥२॥
स्वधर्मी मेले जे घेत रमा सेजे । परधर्मा रिझे वायां जाय ॥३॥
वधूचें कुरुप ज्याचें तया सुख । पराव्यासी विख होऊं ठाके ॥४॥
तुका म्हणे स्वधर्मकर्मेची वर्तावें । परधर्मे पावावें पतनालागीं ॥५॥
॥७३८९॥
पार्थासी संदेह देवा पुसताहे । आतां कोणें आहे पाठवीला ॥१॥
करितो पापासी सांगावें आह्मासी । बळें योजी ऐशी इच्छा नसतां ॥२॥
अनिच्छे आदळी दोषाचळमोळी । सांगे हे नवाळी वार्ष्णेया तूं ॥३॥
तुका म्हणे प्रश्न हिताचा मार्ग पाडायाचे । तुका म्हणे यांचें कुशलत्व ॥४॥
॥७३९१॥
विस्तु धुरें वेढे नवल हें मोठें । ऐके त्याचे फांटे जन्म खळ ॥१॥
आरसा मळानें गर्भासी नाळानें ॥ कीं तत्वें वेश्यानें जिंकी तैसा ॥२॥
चैतन्या शेजारी वस्ती नीरंतरी । अनिवार भारी म्हणे तुका ॥३॥
॥७३९२॥
ज्ञान जरी शुद्ध होतें असंबद्ध । वेष्टन प्रसिद्ध यांचे म्हणुनी ॥१॥
नित्यारि ज्ञान्याचा हाचि सत्य वाचा । कामना रुपाचा गोंधळु जो ॥२॥
अग्निवत भारी जयाची दुधारी । तुका म्हणे मारी वैराग्यासी ॥३॥
॥७३९३॥
इंद्रिय मन बुद्धि ही कामाधिष्ठानीं । बोलिजे सज्ञानीं तेंही खरें ॥१॥
येणेंचि मोहित ज्ञान होतें खरें । बुडालें नुद्धरे गर्वडोहीं ॥२॥
विरहित असावें मग तेणें बोलावें । ऐसें न दिसाव काय करुं ॥३॥
तुका विदेहात्मा केला या अनंतें । आपुल्या उचितें दयाळुवें ॥४॥
॥७३९४॥
तस्मात इंद्रियें जे कां दशविध । आहे तया बुध अधिकारी ॥१॥
भरतर्षभा जय घेतां यापासुनी । कामाच्या भुवनीं अग्नि पेटे ॥२॥
ज्ञान नाश पुढें विज्ञाना न ठेवी । तयास नुरवी तुका ह्मणे ॥३॥
॥७३९५॥
स्थूला पुढें करणें वागती हे पार्था । मन पैल पंथा तयाचीये ॥१॥
मना पैलीकडे बुद्धिची तिकडे । आत्मा तो निवडे त्या परता ॥२॥
साक्षी होवोनियां लिप्त नव्हे कर्मा । आतुलीया वर्मा रीझे वीरा ॥३॥
तुका ह्मणे देव कृपावंत खरा । वरी उजगरा दशा आली ॥४॥
॥७३९६॥
तिनें असे तीसी परता आपण । जाणे वरी खूण हेचि पार्था ॥१॥
जाणोनी थांबवी तीसी मनापासी । शक्ति चैतन्यासी जंव मीळे ॥२॥
परि सामर्थ्याची उठावणी करी । हा शत्रु संहारी कामरुप ॥३॥
महाबाहो नाम तरीं साच वाटे । अजिंक्य नीवटे तुका ह्मणे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 18, 2019
TOP