भगवद्गीतास्तोत्र - अध्याय चवथा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७३९७॥
आनंदाचा कंद गोविंद बोलिला ॥ ऐके या गोष्टीला पूर्वीचीया ॥१॥
पुरातन योग मीच आत्मज्ञा हें ॥ बोलिलों ज्ञान हें भानुदेवा ॥२॥
सूर्य होतकार मनुसी सांगतू ॥ तोहि अनुग्रहितू इक्ष्वाकूसी ॥३॥
ऐसें हें पूर्वीचें आहे भांडवल ॥ सांपडे नवल तुकयासी ॥४॥
॥७३९८॥
परंपरागत ऐसाचि जाणीजे ॥ ऋषी देवराजे सुखावले ॥१॥
योग तरी अचळ परि झाला चळ । बहुत युगमूळ जानोनियां ॥२॥
परंतपा अस्तमाना गेल्या रवी । प्रकाश नुरवी स्वल्पमात्र ॥३॥
तुका म्हणे भाग्य भासे सज्जनाचें । झाले प्रकाशाचें बांटेकार ॥४॥
॥७३९९॥
तोचि हा आजी म्यां तुज प्रगटिला । योग जो लोपला पूर्वी होता ॥१॥
तूं तंव माझा सखा भक्त हि वरिष्ठ । म्हणोनि उत्कृष्ट दया आली ॥२॥
न सांगें बंधूतें नारीसुतादुता । मातापिताचुलता वंचिले म्यां ॥३॥
अद्भुत रहस्य अप्राप्त सुरवरा । अतुडलें करा तुका म्हणे ॥४॥
॥७४००॥
पार्थ ह्मणे मातें विस्मय वाटतो । राग आपण तो धरुं नये ॥१॥
आलीकडे जन्म तुझा पूतनारी । उत्पन्न द्वापारीं आम्ही झालों ॥२॥
आद्य युगीं रवि त्यालागीं संवाद । वर्णीसी घिषाद आह्मां पुढें ॥३॥
आतांचे नेणवे पूर्वी जाणे कोण । अंगीं पावों खूण ऐसें करा ॥४॥
लोक संपादणी तूं तंव त्यापर । उघड विचार तुका म्हणे ॥५॥
॥७४०१॥
बोले नारायण ऐके कुरुनाथा । व्यर्थ नको पंथा संशयाचा ॥१॥
क्रमिलीं बहु जन्में माझीं तुझीं तेंही । मी जाणतों पाही ईशपणें ॥२॥
देही तूं अर्जुना नेणसी हें वर्म । तुका म्हणे धर्म हाचि मुख्य ॥३॥
॥७४०२॥
अज म्हणिजे नित्य अविनाश अक्षयीं । भाव शेषशायीं जाणवितो ॥१॥
भूतें मजपासून कोणापासून मी । आणुनी मनोक्रमीं पाहें बरें ॥२॥
होतों शुद्धबुद्ध आत्मैव मायेंत । आपुली आकृत अधिष्ठूनी ॥३॥
तुका म्हणे हरी सांगेल माहात्म । श्रोते हो उत्तम श्रवण कीजे ॥४॥
॥७४०३॥
जे जे वेळें धर्मु हानि पावे क्लेशें । दैत्य दुरा रोषे अधर्माचेनी ॥१॥
अधर्म उंचावे त्रैलोक्य जीणाया । तेव्हां आत्मकाया सृजीतों मी ॥२॥
तुका म्हणे देव सांगतों ऐकावें । जेणें पराभवें संशय हा ॥३॥
॥७४०४॥
रक्षावया साधुजनां । मारावयासी दुर्जनां ॥१॥
धर्म स्थापन करावया । होतों युगायुगीं कौंतेया ॥२॥
हेंचि देहधारण मूळ । ऐके मम मायेचा खेळे ॥३॥
तुका ह्मणे अभयाचें । दानपात्र भाविकाचें ॥४॥
॥७४०५॥
माझी जन्म कर्म लीळा । जाणे भाविकु जो भोळा ॥१॥
धन्य तोचि भूमीवरी । देहि असोनि निर्विकारी ॥२॥
पद शाश्वत पावेल । अनुपम्य हें गाइल ॥३॥
खुंटे पुन्हां त्याचा जन्म ॥ अनुभवें म्हणे तुकाराम ॥४॥
॥७४०६॥
कामक्रोधभयाविण । तोच साधू पूर्ण जाण ॥१॥
ध्याननिष्ठ मदाश्रित । त्यास आम्हीं म्हणों संत ॥२॥
बहुत ज्ञान तपें शुद्ध ॥ जाणावा तो महा सिद्ध ॥३॥
जे पावले स्वस्वरुपीं । तुकया शरण त्या चिद्रुपीं ॥४॥
॥७४०७॥
जें जें जैसे मातें भजे । मीही तया तैसा उमजे ॥१॥
जैसा भाव ठायीं माझे । फळे तेवीं त्यासहजें ॥२॥
पार्था मानव सकळ । मम मार्गी च निखळ ॥३॥
वर्तताती हे तूं जाण । तुका वंदी त्याचे चरण ॥४॥
॥७४०८॥
अन्य देवता पूजिती । जे कां कर्मसिद्धी प्रती ॥१॥
नाना विध मार्गांतरें । ध्यान उपास्य गजरें ॥२॥
कर्म मूळेंच त्यां सिद्धी । नरलोकीं पैं त्रिशुद्धी ॥३॥
पावे शीघ्र भक्तिभावें । तुका ह्मणे पूर्व दैवें ॥४॥
॥७४०९॥
विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र । वर्ण विभाग चत्वार ॥१॥
केले इच्छेनी आपुले । मार्ग भिन्नत्वीं स्थापिले ॥२॥
सांभाळितों पुन: पुन्हा । असोनि अलिप्त अर्जुना ॥३॥
अज अव्यय छंदानें । तुकया जाणतु संधानें ॥४॥
॥७४१०॥
कर्मे लिंपती नामातें । जरी माझिये साक्षीतें ॥१॥
नवल सांगतों अर्जुना । झणे संशयो हा मना ॥२॥
कर्म सुफळ प्राप्ति आशा । नसे किंचित नरेशा ॥३॥
जाणे खूण तोचि मुक्त । होय तोचि कर्मातीत ॥४॥
बद्ध शुभाशुभीं नव्हे । तुका वर्णी त्या गौरवें ॥५॥
॥७४११॥
ऐसें जाणूनि मुमुक्षीं । कर्मे केलीं पूर्वपक्षीं ॥१॥
कुरुवर्या त्या आधारें । करी कर्म साचोकारें ॥२॥
केलीं पूर्वज पूर्वजीं । तुका जयांसी नावाजी ॥३॥
॥७४१२॥
येथें मोहिलें ज्ञानियें । खुण नये ध्यानाशी ॥१॥
कैसें कर्म अकर्म तें । संशयातें दर्शवी ॥२॥
जाणून मी तूज सांगें । अशुभ अंगें सुटसी ॥३॥
तुका ह्मणे दिव्य मत । सावध चित्तें ऐकावें ॥४॥
॥७४१३॥
तत्व वेदोक्त कर्माचें । कर्म त्याचें अवधारी ॥१॥
निषिद्ध विकर्माचें जें । तेथें बुझें सर्वज्ञ ॥२॥
अकर्माचें ही जाणावें । जीवीं ध्यावें एकत्व ॥३॥
तुका वदे कर्मगती । गहन ह्मणती यास्तव ॥४॥
॥७४१४॥
न बाधे तें नव्हे कर्म ॥ मुख्य वर्म तें ऐसें ॥१॥
अकर्मता कृष्णार्पणीं ॥ सत्य वाणी मानावी ॥२॥
अकर्मीच कर्म पावे ॥ हें तों अवघें चोखट ॥३॥
तुका वदे सर्वकृत ॥ देखे मात सर्वज्ञ ॥४॥
॥७४१५॥
काम संकल्प त्यागुनि ॥ आत्मध्यानीं रतला ॥१॥
सर्व कर्मा जो आरंभी ॥ निर्मळ नभीं चंद्रमा ॥२॥
ज्ञानाग्निनें जाळी कर्मा । शिवशर्मा पैं जैसा ॥३॥
तोचि पंडित बोलती ॥ तुका स्तुति करी ज्याची ॥४॥
॥७४१६॥
सर्व टाकुनी फळाशा । स्वात्मतोषा भीतरीं ॥१॥
निराश्रय सदा तृप्त । पारंगत सच्छास्त्रीं ॥२॥
सर्व कर्मी प्रवर्तला । जैसा भला मिथिलेश ॥३॥
तरी कांहीं न तो करी । साक्षोत्तरीं तुकयाचे ॥४॥
॥७४१७॥
देहचित्त वश करुनी । जो साधनीं विनटला ॥१॥
पर्रिग्रह न ते आशा । मद ईर्ष्या नेणची ॥२॥
शरीर मात्रें जो कर्म । करी धर्म रक्षुनी ॥३॥
बंधनातें छेदून वत्तें । लाभसर ते तुकयासी ॥४॥
॥७४१८॥
लोभ सर्वासी सारिखा । तुष्ट देखा अयाचितें ॥१॥
सुख दु:ख द्वंद्व नेणे । मत्सर नेणे भावेंची ॥२॥
सिद्धी असिद्धींत सम । आत्माराम साधका ॥३॥
बद्ध नव्हे कर्म करितां । तुकया वार्ता निवेदी ॥४॥
॥७४१९॥
कर्तृत्वापासुनि मुक्त । जो विरक्त सर्वदा ॥१॥
थोर चित्त आत्मरुपीं ॥ कीं चिद्रूपीं खेळ तो ॥२॥
मखार्थ कर्माचरे ॥ निर्व्यापारें आवडीं ॥३॥
सर्वही तें जातें लया ॥ ठायीं जया तुकाराम ॥४॥
॥७४२०॥
कर्ता अग्नि हविर्द्रव्यें ॥ जिवें भावें एकाग्र ॥१॥
ब्रह्म ब्रम्हींच अर्पून ॥ झाला लीन माझारी ॥२॥
कर्मी ब्रह्म समाधिस्थ ॥ चिंताग्नींत सारिखा ॥३॥
त्याणें ब्रह्मींच पावणें ॥ सुख बाणे तुकयासी ॥४॥
॥७४२१॥
इंद्रादि भावेंचि यज्ञ । जो सर्वज्ञ स्वीकारी ॥१॥
उपासिती कर्म योगी । पुढें भोगी निज मोक्षु ॥२॥
जे कां ज्ञानी ब्रह्माग्नींत । मन चित्त सामग्री ॥३॥
यज्ञरीतींच होमिती । तयां प्राप्ती निजलाभु ॥४॥
तुका ह्मणे आणीकही । यज्ञ पाही सांगतु ॥५॥
॥७४२२॥
ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय । दाहा करणांचा प्रत्यय ॥
एकवटी समुदाय । स्वात्मसत्तें याजकु ॥१॥
पृथगाकारें निग्रह । सोडवूनी दुराग्रह ॥
करुनी आत्म अनुग्रह । नियमाग्रीं होमिती ॥२॥
त्या इंद्रियाग्नींत । सावधान याजक होत ॥
वर्ण अर्थ अर्थ सारहुत । शब्दालागीं होमिती ॥३॥
तुका ह्मणे संतांप्रती । जैसी सारांश पद्धती ।
ऐसें निवेदी श्रीपती । पार्थाप्रती ऐकावें ॥४॥
॥७४२३॥
कोणी आईक अर्जुना । पाहे निगमभावना ॥
सर्व इंद्रियस्वाधीना । हेच इष्ट सामग्री ॥१॥
पांच प्राण या देहांत । वागताती आत्मस्थित ॥
त्यांचि कर्मे यथास्थित । तीं चहुंकडे निर्मिलीं ॥२॥
आतां वृत्तीनें निवृत्ती । पद पाउनि झाली तृप्ती ॥
तेथें चिद्भानूची दीप्ती । व्यापे पृथ्वी आकाश ॥३॥
तुका म्हणे तेच कळा । निरोधाग्नीची ज्वाळा ॥
होमिती घनसांवळा । आत्मतोंडें वर्णितु ॥४॥
॥७४२४॥
धनापासून अभिज्ञ । देवद्विज पितृयज्ञ ॥
होतोचि द्रव्य यज्ञ । पैं तत्वज्ञ जाणती ॥१॥
तपोयज्ञ तापसांचा । योगयज्ञ तो योग्यांचा ॥
सुव्रत वेदार्थाचा । ज्ञानयज्ञही बोलती ॥२॥
यत्नशीळ जे पांडवा । अनुष्ठिती स्वात्मदेवा ॥
तुका म्हणे हेंच देवा । झालें पूर्ण आवडतें ॥३॥
॥७४२५॥
अपान अधस्थ आसनें । साधुनि आधार अधिष्ठानें ॥
तेथें होमिजे प्राणें । आत्महूति अपानीं ॥१॥
मग ऊर्ध्व दशेची ते गती । स्वाधिष्ठानाचे वरती ॥
मणिपुरांत आहुती । अपान घेतु प्राणाची ॥२॥
कोणी प्राण अपानास । निरोधोनि षट्चक्रांस ॥
जिणोनि प्राणायामास । उतावेळ झाले जे ॥३॥
तुका म्हणे साधक जनीं । योगमार्गा अनुभवुनी ।
पंथ ठेविला नित्यानी । वागावया पांथिका ॥४॥
॥७४२६॥
हळू योग वाटे वात । साधुनि आहार नियमित ॥
तेथें मन केवीं तृषित । पिडूं शकेल हें नेणें ॥१॥
प्राणीं प्राणास होमिती । हटयोगी ऐसे रीतीं ॥
सर्व यज्ञें पावन होती । त्या बोलती यज्ञवित ॥२॥
तुका म्हणे नारायणें । केलें पार्थासी सांगणें ॥
ना तें साधूचें मागणें । होतें कांहीं पूर्वीचें ॥३॥
॥७४२७॥
यज्ञशेष जें अमृत । देवादिक ज्या इच्छित ॥
त्याचे भोक्ते झाले संत । पूर्ण हट प्रयत्नें ॥१॥
मग यांत लाभ काय । ऐसा कोणी पुसता होय ॥
तरी परब्रह्म ठाय । पैं पावती भरंवसे ॥२॥
आतां आळसी पांडवा । नसे याजत्व स्वभावा ॥
त्यासी इहलोकीं बोलवा । मान कैसा परत्रीं ॥३॥
कुरुउत्तमा अर्जुना । चित्त द्यावें या वचना ॥
कांहीं असल्या कल्पना । त्या तूं मातें निरुपी ॥४॥
तुका ह्मणे चोखट । जें ज्ञान यज्ञा वरिष्ट ॥
तें सेविताति ब्रम्हनिष्ठ । सोहंमंत्रें करुनी ॥५॥
॥७४२८॥
बहु यज्ञाचा विस्तार । झाला विधिपासून साचार ॥
सर्व ही कर्म सारासार । ऐसें जाणून सूटसी ॥१॥
कर्मी बद्धतां पांडवा । ह्मणोनि जडपण ठेवा ॥२॥
यांचे संगें जड जीवा । तरणोपाय कायसा ॥२॥
ऐसें कल्पिसी मानसीं । ज्ञानीं विवसी ॥
हातीं नलगे ठेव्यासी । पैं गा भूतें झोंबल्या ॥३॥
तया भूताची झाडणी । करील येथें गदापाणी ।
पंचाक्षरी तो निर्वाणी । सोडविलें सोडवी ॥४॥
तुका ध्याय ध्याना जवळ । ज्याची अखंडित माळ ॥
ह्मणून संतांमाजी खेळ । झाला ब्रह्मप्राप्तीचा ॥५॥
॥७४२९॥
द्रव्य यज्ञाहून श्रेष्ठ । ज्ञानयज्ञ हा वरिष्ठ ॥
पार्था यातें ब्रह्मनिष्ठ । बहुधा ऐसें जाणती ॥१॥
लौकिक वैदिक कर्मे ॥ सर्वहि तीं ज्ञानकर्मे ॥
पावे संपत्ती सप्रेमें । नोहे कदा दरिद्री ॥२॥
हळहळ गेली ज्याची । तो संपत्तीवंत त्याची ॥
कीर्ति पाठ तुका वाची । लोकामाजी सर्वदा ॥३॥
॥७४३०॥
तें ज्ञानप्राप्ति खुण । ऐके पांडवा लक्षण ॥
अधीं सद्भावें नमन । मग प्रश्न आवडीचा ॥१॥
सेवा भावार्थे करावी । निरपेक्षता असावी ॥
तेव्हां कृपा उपजे जीवीं । मग तो होय उपदेशु ॥२॥
शास्त्रज्ञ तत्वज्ञ । ज्ञान सांगती सर्वज्ञ ॥
तेव्हां सहज वर्मज्ञ । तुका ह्मणे भाविकु ॥३॥
॥७४३१॥
जें ज्ञान जाणुनियां । पुन्हां ऐसा मायामया ॥
न मोहसील कौंतेया । दृश्य भास दिसेना ॥१॥
स्थूळ सूक्ष्म जीं भूतें । अथवा स्थावर जंगमांतें ॥
आत्मरुप तूं तयांतें । आपणातें देखसी ॥२॥
मग मजशीं ऐक्यता । होय कैसी ऐके आतां ॥
जैसें पावकें कवळीतां । दे ऐश्वर्य आपुलें ॥३॥
गंगासिंधु समागमीं । कीं भानुच्या ठायीं रश्मी ॥
तेवीं एक तेथें नामीं । तुका न वचे निराळा ॥४॥
॥७४३२॥
असलास जरी पापिया शरीरीं । नोहे कवणे परी उद्धारची ॥१॥
थोर पापि भिती ऐसी जरी गती । झाली तुजप्रती पार्थवीरा ॥२॥
तरी पापसिंधुवरि हे अगाधु । आहे कीं निर्बाधु ज्ञान नौका ॥३॥
तुका म्हणे सार निवडी रमावर । श्रवणेंचि उद्धार भाविकांचा ॥४॥
॥७४३३॥
किंवा जसा पेटे वन्हि जाळी काष्ठें । तेथें सानें मोठे न विचारीची ॥१॥
तैसा एकवेळां ज्ञानाग्नी उजळला । झाल्या कर्मकळा भस्म करी ॥२॥
तेथें पुण्यपाप नोळखे स्वरुप । उडवी संकल्प पतंग ते ॥३॥
तुका मुक्त झाला यामागें जो गेला । तोचि या जनाला उपदेशु ॥४॥
॥७४३४॥
ज्ञाना सम नसे प्रायश्चित दिसे । शुद्ध जें आपैसें देहा करी ॥१॥
ऐसें न साधन देखती लोचन । सर्वगुणें मान ज्ञानासीच ॥२॥
ज्ञात्याच्या प्रयत्नें लाभे योग चिन्हें । मग सिद्धि रत्न येती हाता ॥३॥
काळें वया चित्तांत अनुभव बिंबत । तुकयाचें हित येवढेंची ॥४॥
॥७४३५॥
श्रद्धाळू तोइ ज्ञान पावे हें तूं जाण । पूर्ण समाधान जयापासी ॥१॥
जो कां इंद्रियांतें आणितू हारितें । आणीं ब्रह्मत्वातें तत्पर जो ॥२॥
ज्ञानास पाऊनी शांतिस घेऊनी । बैसे निगमवनीं म्हणे तुका ॥३॥
॥७४३६॥
बुडे अज्ञ तैसी अश्रद्धा मानसीं । वसे जयापासी निरंतर ॥१॥
हीन जो संशयीं बुद्धि तैसी नाहीं । सुखरुप पाहीं सर्वकाळ ॥२॥
बुद्धि संशयाची नदों लोकीं रुची । फळश्रुती काची तुका ह्मणे ॥३॥
॥७४३७॥
कर्म योगांतरीं संन्यासाची थोरी । वंद्य द्विजवरीं अग्रपूजें ॥१॥
मुक्त झाला देहीं नुरे संशय कांहीं । वेदशास्त्र ग्वाही पाहूनीयां ॥२॥
जो कां आत्मवेत्ता तया कर्मवार्त्ता । न बाधी ती चित्तामाजी घेई ॥३॥
तुका म्हणे मुक्त झाले देहातीत । अधम नेणत वायां गेले ॥४॥
॥७४३८॥
तस्मा तूं हा वैरी संशय संहारी । जो वागे अंतरीं अमंगळ ॥१॥
छेदी ज्ञानखड्गें शीर याचें वेगें ॥ स्वकर्म तूं अंगें अनुष्ठि पां ॥२॥
तुका विनवणी ऐकावी सज्जनीं । समाप्त येथूनी प्रसंगू हा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 18, 2019
TOP