भगवद्गीतास्तोत्र - अध्याय अठरावा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७८७५॥
अहो ऐकियले बोल । आला पार्था अंगीं डोल ॥१॥
आतां शेवटीं अठरावा । जाणोनि पूसे वासुदेवा ॥२॥
येथुनि गीता देवी पूजा । झाली वाचावीद वोजा ॥३॥
तुकयास महा आनंद । सांगे श्रोतया गोविंद ॥४॥
॥७८७६॥
विनविला विनय भावें । प्राण गोपीचा गौरवें ॥१॥
म्हणे अर्जुन संन्यास । महाबाहो नेदी त्रास ॥२॥
अहो तत्व तें स्मरतें । जाणे अज अव्ययातें ॥३॥
त्यागाचें ही त्दृषीकेशा । केवीं न बोलसी कैसा ॥४॥
माझ्यावरुन तुकयाचें । देह जंतु उद्धरायाचे ॥५॥
॥७८७७॥
काम्य कर्माचा ज्ञानी तो । विनियोग मनीं घेतो ॥१॥
त्याग संन्यास जाणती । शुद्ध आहे ज्यांची मती ॥२॥
फळ त्याग सर्व कर्म । एका सांपडले वर्म ॥३॥
ईश्वरार्पण तो त्याग । जाणे तुका सार भाग ॥४॥
॥७८७८॥
परी कर्म जें दोषाचें । हृदय भेदी जाण त्याचें ॥१॥
एक बोलती टाकावे । येणे बंधना अल्पवे ॥२॥
नवे टाकूं ही बोलती । कोणी समूळ त्यागीती ॥३॥
तप क्रीया यज्ञ दान । आहे तुकया स्वाधीन ॥४॥
॥७८७९॥
माझा निश्चय आईक । तुज न सांगूं मायीक ॥१॥
त्यागी तूंच भरतर्षभा । वाक्य जाणून प्रारंभा ॥२॥
पुरुष व्याघ्र हा त्याग । जो मी जाणें यथासांग ॥३॥
बोलिला हे जो त्रिविधु । वर्णी तुका पूर्ण बोधु ॥४॥
॥७८८०॥
नये सांडुं ती करावीं । जे कां कर्मे माझ्या जीवीं ॥१॥
यज्ञ दान तप क्रीया । हीं तों जडास ताराया ॥२॥
पावनें हीं बुद्धिमंतीं । मार्गुअ दावणें लोकांतीं ॥३॥
यज्ञ दान क्रिया तपें । गेलीं तुकयाची पापें ॥४॥
॥७८८१॥
हें ही मीपण त्यागोनी । प्रपंचासही वंचूनी ॥१॥
फळ त्याग मदर्पणें । सुख मुक्तींचे भोगणें ॥२॥
करोनि माझें करणें । जया दासाचें पावणें ॥३॥
उत्तम मत हें निश्चयें । तुका विवेक धामिये ॥४॥
॥७८८२॥
नित्य कर्माच्या स्वरुपें । जो कां अनित्य आरोपें ॥१॥
त्याग शास्त्रें घडेचिना । पाहे अज्ञान कल्पना ॥२॥
अविवेकें करी त्याग । मूर्ख सहज ह्मणे जग ॥३॥
बोलिजे तो त्याग येथें । तम तुकया पंथें ॥४॥
॥७८८३॥
कष्ट मानुनी हें कर्म । नोहे लोकीं पाळी शर्म ॥१॥
देह क्लेश भय त्यजी । जीवें जीवितास यजी ॥२॥
केल्या राजस या त्यागा काय फल लाभु अंगा ॥३॥
तुका ह्मणे जी चतुरीं । घ्यावें सत्वास पदरीं ॥४॥
॥७८८४॥
नित्य विहितें जाणोनी । न सांडी तो पूर्ण ज्ञानी ॥१॥
करी टाकुनी मीपण । परी नेणे भाग शीण ॥२॥
कृष्णार्पण ययालागा । फलत्यागें महाभागा ॥३॥
त्याग सात्विक बोलणें । तुका सांगे लाभ घेणें ॥४॥
॥७८८५॥
निंदीना प्रवृत्तीचें । बंधू न मनीं कर्माचें ॥१॥
नव्हे आसक्त निवृत्तीं । सदा सावधान मती ॥२॥
वरा युक्त सत्वें गुणें तुका झाला ॥४॥
॥७८८६॥
ऐके विचक्षणवंता । देहधारि जीव जंता ॥१॥
कर्मत्याग हा घडेना । घडल्या दाखवी पतना ॥२॥
कर्मे अर्पुनीयां ब्रह्मीं । आपण वागतो निष्कर्मी ॥३॥
त्यागी तो एक बोलिजे । मन भासे तुका साजे ॥४॥
॥७८८७॥
संन्यास त्याग पूर्वी । जो कां बोलिलों अपूर्वी ॥१॥
नसे ज्यांस की धारणा । फलें तयांसी सुजाणा ॥२॥
बरें वाईट की मिश्रें । कर्म फळ ही अव्यग्रें ॥३॥
तुका ह्मणें कदाचित् । नव्हे संन्यासी हा लिप्त ॥४॥
॥७८८८॥
आतां हेच नि:संगता । तुज सांगूं पांडुसुता ॥१॥
पांच कारणें कर्माची । युक्ति बुझे सव्यसाची ॥२॥
सांख्यवेदांतीं बोलिले । बरें पाहिजे ऐकिलें ॥३॥
तूं आत्मा नि:संग जाणुनी । तुका ह्मणे धरा ध्यानीं ॥४॥
॥७८८९॥
अधिष्ठान क्षेत्र कर्ता । जो या देहे संगापता ॥१॥
मुख्य वागे अहंकार । घेउनि इंद्रियें सत्वर ॥२॥
चेष्टा प्राणाची या दैवें । ऐसे चार हे जाणावे ॥३॥
तद्भोगमद ऐसे । पांच तुका जाणतसे ॥४॥
॥७८९०॥
काय वाचा मनें ही जे । निजकर्मे आरंभीजे ॥१॥
तो नर तया वाईट या । कर्मबंधन पांची तया ॥२॥
हेंच कारण मुख्यत्वें । रक्षी संतत ही सत्त्वें ॥३॥
तुका ह्मणे आन एक । बोलीयला यदुनायक ॥४॥
॥७८९१॥
ऐसे असोनी ही हीरे । कर्त्ता महा चमत्कारें ॥१॥
आत्मयास जो केवळा । मनीं विचार ना स्थळा ॥२॥
नसे बुद्धीचा ही शोध । तेथें कैचा शास्त्रबोध ॥३॥
अंध म्हणावें तयासी । नेणें जो का तुकयासी ॥४॥
॥७८९२॥
अहो मीच सर्वकर्त्ता । नेणें वार्ता जन्मांत ॥१॥
केल्या कर्मी घ्यावें फळ । बुद्धि केवळ शीरेना ॥२॥
मग त्याच नि:संशया । हातें लया जग पावे ॥३॥
कधीं बद्धता न वचे । तुकया त्याचें नवल ॥४॥
॥७८९३॥
साधुलागीं साधन तें । कर्मा न ते करुनी ॥१॥
परि त्रिविध त्या भेदु । तुज संवांदु जाणऊं ॥२॥
कर्म करण हा कर्त्ता । हेच वार्त्ता भेदाची ॥३॥
कर्म संग्रहो हि त्रिधा । तुका सिद्धा निरुपी ॥४॥
॥७८९४॥
ज्ञान कर्म कर्त्ता हे गा । आले भोगा हे भेद ॥१॥
सत्व रज तम तिन्ही । या प्रमाणीं वोळखे ॥२॥
सांख्यशास्त्रमतें सांगूं ॥ मग पांगूं नको तूं ॥३॥
ऐके यथाविधी राया । तुका अद्वयाचा संगी ॥४॥
॥७८९५॥
सर्वां भूतीं देवों एक । हा विवेक जागृत ॥१॥
भाव अव्यय पाहाणें । भिन्नपणें चळेना ॥२॥
नाशिवंतीं अविनाश । नलगे पाश यमाचा ॥३॥
ऐसें पाहे तें सात्विक । ज्ञान एक तुकयाचें ॥४॥
॥७८९६॥
पृथकभावें पाहे जगा । द्विज मांगा निवडी ॥१॥
जीव भासे नेणे शीवा । नावा नावा क्षणीक ॥२॥
कोळें गोरें लोहो हेम । हंसोत्तम कावळा ॥३॥
देखे राजस ज्ञानातें । जें तुकयातें नेणे गा ॥४॥
॥७८९७॥
सर्व कारणीं ते गती । अंधमती पाउली ॥१॥
स्वात्मकार्या वांचूनियां । नेणे जाया कीं नर ॥२॥
नसे तत्वीं अशाश्वतीं । जे पाहाती अयुक्त ॥३॥
क्षुद्र ज्ञानें गर्व पोसे । तुका नसे तामस ॥४॥
॥७८९८॥
नीतीपंथिचा नि:संग । केला त्याग अहंते ॥१॥
प्रिया प्रिय नेणे जो कां । गुरुनायका चिंतनीं ॥२॥
रोज कर्मात निराशा । प्रेमपाशा सांपडला ॥३॥
कर्म सत्वाचें तें झालें । ज्यांत डोले तुकया ॥४॥
॥७८९९॥
स्कंदी घेतला मी पणें । आन शाहणे न लेखी ॥१॥
काम आशा पुरवावी । हेच ओवी धुंडाळी ॥२॥
अति सायासें विषयो । कीं प्रळयो ज्या संगीं ॥३॥
केलें कर्म तें राजस । तुका ज्यास न पाहे ॥४॥
॥७९००॥
माया बंधु जयामाजी । कीं घात जी पराचा ॥१॥
लय पावे स्वात्म जीव । ऐसी हाव वोखटी ॥२॥
करितो दंभु लोकीं । धर्मादिकीं नांदना ॥३॥
छंद तामस कर्म तें । तुकयातें मानेना ॥४॥
॥७९०१॥
फळाशा न अभिमान । परी मान उत्सवीं ॥१॥
धृती जयाची ते नेटकी । नाचे टाकी कल्पना ॥२॥
झालें गेलें नि:संशय । न सिरे पाय वासने ॥३॥
कर्त्ता सत्वगुणी खरा । ये उत्तरा तुकयाचा ॥४॥
॥७९०२॥
कमीं फळाशा गुंडाळा । जो कां माळा पाळक ॥१॥
कृपण मलीन जे वृत्ति । जीव घाती सर्वदा ॥२॥
हरिखें सवेंच शोस वाहे । क्षणु पाहे विचवुं ॥३॥
ऐसा राजसु हा कर्त्ता । तुका परता निवेदी ॥४॥
॥७९०३॥
आतां युक्त नसे जया । पापी काया कुटीळ ॥१॥
शठ आळसी कपटीया । ह्मणों तया तामस ॥२॥
द्वेषी दीर्घसूत्रीं पुरा । हा कर्त्तारा तमची ॥३॥
तुका ह्मणे सत्यवंत । हरी सांगत पुढारा ॥४॥
॥७९०४॥
बुद्धि धारणेचे पार्था । गुण सर्वथा ऐक रे ॥१॥
भेद त्रिविध बोलिले । आह्मी ठेविले जे पोटीं ॥२॥
तेंच तुज सर्व आज । सांगों गुज गौप्य ही ॥३॥
पृथकाकारें धनंजया । जें तुकया सांगेल ॥४॥
॥७९०५॥
जाणे प्रवृत्ती निवृत्ती । चोख मति विचारु ॥१॥
कार्याकार्य भयाभयें । त्या अन्वय घेतला ॥२॥
बंध मोक्षाची ओळख । झालें सुख मग त्या ॥३॥
निर्भय बुद्धि ते सात्विकी । तुकया लोकीं पावन ॥४॥
॥७९०६॥
यया धर्म अधर्मास । जें मानस जागृत ॥१॥
कार्याकार्य तयापरी । निजांतरीं ओळखे ॥२॥
जाणे सर्व नेणें एक । जो व्यापक चिदात्मा ॥३॥
राजस ते बुद्धि जाण । नव्हे प्राण तुकयाचा ॥४॥
॥७९०७॥
आतां अधर्मातें धर्म । नेणे वर्म दुरात्मा ॥१॥
वागे विपरीत अर्थी । तो परमार्थी पाहेना ॥२॥
अविद्या व्याली गुंडें । विख चढे गर्वाचें ॥३॥
वेद शास्त्र निंदी ज्यास । ते तामस गा बुद्धि ॥४॥
आतां ऐका सत्वगुण । उण खुण तुकयाची ॥५॥
॥७९०८॥
आतां त्रिगुण ते धृती । सांगों स्पष्ट तुक प्रती ॥
प्रथम सत्वाची जे रीती । श्रवण करी भूमीपा ॥१॥
ज्या कां धरीजे धारणें । अव्यग्रता निश्चलपणें ।
मन प्राणेंद्रियाचरणें । विश्वंभरीं जें मिळे ॥२॥
तेथें अविद्या राहिली । जैसी मंथरा दुर्बोली ॥
रामें नाहीं उद्धरिली । ऐसी परी अलिप्त ॥३॥
तुका विनवी साधूस । सत्वधृति हे देवास ।
आवडली अर्जुनास । सांगें प्रेम आदरे ॥४॥
॥७९०९॥
येउनियां देहगांवा । स्वर्ग संसार दोसवा ॥
नांदें आनंद या जीवा । त्रि उपायें करुनी ॥१॥
मनोरथाचीया ठायीं । धर्म अर्थ काम भावी ॥
तेणें धैर्य बळें पाही । क्रिया करी उदीम ॥२॥
वासना जे इच्छूं जाय । लाभ चौगुणी तो होय ॥
प्रसंगे न लाहे । साह्य झालीया धृति ॥३॥
कृष्ण सांगत अर्जुना । ऐक बापा विचक्षणा ॥
तुका ह्मणे जाणा । हे धारणा राजसी ॥४॥
॥७९१०॥
जिणें निद्रा अखंडित । स्वप्नबोधाचा पंडित ॥
सदां भयानें दंडित । तरीं न सोडी विषादु ॥१॥
मदादिकास न त्यजी । पार्था मस्त तयामाजी ॥
त्यास दुर्बुद्धि ते राजी । माळ घाली घातकी ॥२॥
ते गा धारणा तामसी । सत्य सांगों तूजपासी ।
जे कां नावडे तुकयासी । देह क्षेत्रामाझारीं ॥३॥
॥७९११॥
आतां ह्याच्या वाटणीला । आलें त्रिविध सुखाला ॥
ऐकावें कीं तूं दादुला । होसी विरक्ति वधूस ॥१॥
लागे योगियाचें चित्त । ययाध्यासें दु:खातीत ॥
वृत्ति होइल निभ्रांत । पंचाक्षरी विवसीये ॥२॥
नाश झाल्या कृतक्लेशा । सुख अक्षय नरेशा ॥
तुका ह्मणे जैसी दशा । येतां नुरे दरिद्र ॥२॥
॥७९१२॥
कटु प्रथम औषधी । पुढें हरी महा व्याधी ॥
किंवा कष्टपाका मधीं । दे मग सुख तृप्तीचें ॥१॥
तैसें विखवत भासे । सेखीं अमृत होतसे ॥
चित्त बुद्धिच्या उल्हासें । प्राणी पावे प्रसादु ॥२॥
हें गा सात्विकाचें सुख । आह्मी सांगों प्रसन्मुख ॥
आतां कांहीं तैसें तिख । तुका वर्णी रजातें ॥३॥
॥७९१३॥
विषय इंद्रिया मीळणी । होती सुखा वोळगणी ॥
तेथें हरीखा लोळणी । घालूं वाटे सर्वदा ॥१॥
मग काय तें अमृत । शिळें ह्मणुनि वीटे चित्त ॥
आतां शेवटीं अहित । मैथुन जेवीं शुनींचें ॥२॥
कर्जावरी लग्नारंभु । व्याघ्र सौजन्याचा लाभु ॥
पुढें विघ्नाचा प्रारंभु । धेनु पावे शेवटीं ॥३॥
धन धणी चोर होती । परी रक्षका तोडिती ॥
तुकयाचे न लगे मती । सुख तें गा राजस ॥४॥
॥७९१४॥
आरंभीच घाला पडे । फळ प्राप्ति वेळे रडे ॥
कोल्हाटिय जा परवडे । करिती उपजीविका ॥१॥
मारा भेणें परग्रहीं । प्रमदा राहे दुराग्रहीं ॥
तेथें तेच तें विदेही । जे कां उठती उमाळे ॥२॥
आतां मद्य प्राशिलीया । घाणें स्मृती लया ॥
जाय तेथें निजलिया । वाटे गेला स्वर्गासी ॥३॥
अळसें होय वपु जड । सुख तामस निवाड ॥
तुका ह्मणे ज्याणें द्वाड । तें सात्विक ऐकावें ॥४॥
॥७९१५॥
न तें पृथ्वी माझी पाहो । स्वर्गी जयाचा संदेहो ॥
तेथें सिद्धगण समुहो । सत्वाहीन बापुडें ॥१॥
अमरगणीं जे मिळेना । पाहतां इंद्रानें स्वनयना ॥
मज भासतें अर्जुना । या त्रिगुणा नातळें ॥२॥
माझा जीव तें गा सत्व । तेथें सुखावला शिव ॥
केला खाणीचा उद्भव । परिसत्व न टळे ॥३॥
तुका ह्मणे ऐका वचन । काय बोलिला भगवान ॥
तेथें देउनियां मन । वर्ण धर्म अवधारा ॥४॥
॥७९१६॥
विप्र बाहुजां वैश्यांला । शूद्र शुद्ध तमीं ज्याला ।
क्रिया पृथक याला । पूर्वी असे स्थापिली ॥१॥
अधिष्ठान स्वभावें जे । झाले त्रिगुण सहजे ॥
तया गुणीं मुनीराजे । व्याख्या बहू वाणिली ॥२॥
तेच येथें ही प्रसंगीं । कथी अर्जुना सारंगी ॥
तुका सर्व जनालागी । निर्मिलासे वदाया ॥३॥
॥७९१७॥
तप प्रथम विप्राचा । गुणदायक मोक्षाचा ॥
क्षमेविण नाश त्याचा । होता फळ ना लागे ॥१॥
शम दम काशास्तव । घ्यावा इंद्रियांचा जीव ॥
शौच तैसाच स्वभाव । आस्तिकाचा पाहिजे ॥२॥
नव्हे भूतांसी वांकुडा । ज्ञानें नव्हे विषयीं वेडा ॥
वक्ता विज्ञान पवांडा । सांगे जगा तारणी ॥३॥
क्रिया ब्राह्मणा प्रथम । सांगे पार्था पुरुषोत्तम ॥
पुढें क्षत्रियाचे नेम । तुका वर्णी स्वानंदें ॥४॥
॥७९१८॥
शौर्य तरी रणधीट । तेजें शस्त्राचीं तीखट ।
परी धारणा चोखट । जाणें न्याय अन्याया ॥१॥
दक्ष जैसा दक्षापरी । युद्धीं पळवणे वैरी ॥
दाता जेवीं धरेवरी । पुण्यश्लोक जगासी ॥२॥
सेवा महंताची जाणें । तद्वत मन देवा अर्पणें ॥
हीं गा नव्हती लक्षणें । जगदोद्धार गुरु तो ॥३॥
राज्यांतीं नरक तया । बोलणार पावे क्षया ॥
सुख साम्राज्य आलेया । आले तुर्की एकत्व ॥४॥
॥७९१९॥
उदरार्थ कुटुंबार्थ । करि कृषि वळी स्वार्थ ॥
परी तयांत परमार्थ । जें रक्षण गाईचें ॥१॥
द्रव्य व्यवसावो तेवीं । वाणि ज्यांत उठा ठेवी ॥
वैश्य कर्म तृतिय भावी । तूं ओळखे सुजाणा ॥२॥
आतां शूद्र जोकां असे । वर्णत्रय सेवा वसे ॥
त्याचें जीवन जाण ऐसें । चार वर्णा ह्या क्रिया ॥३॥
सांगावया हें कारण । क्षत्रिय वंशीं तूं निर्माण ॥
झाल्या सुटेल कैसें रण । तुकया जैसा संसारु ॥४॥
॥७९२०॥
आपुलाले कर्माचरे । वर्णाश्रम या आधारें ॥
जें कां स्वहित उपचारें । आलें असे वांटणी ॥१॥
न करितां प्रयत्न कांहीं । सिद्धी वोळे त्याच्या गेहीं ॥
नवल होय लोकीं तीहीं । नर हा ह्मणती पुण्यात्मा ॥२॥
स्पष्ट सांगतों वीरेशा । आकर्णी तूं गुडाकेशा ॥
साहित्येसी प्राप्त दशा । प्राण्या प्रगटे भूलोकीं ॥३॥
जरी सांडिला स्वधर्म । मग आवघें वृथा कर्म ॥
न सांपडे सौख्य वर्म । तुका जेणें सांगिजे ॥४॥
॥७९२१॥
भूतप्रवृत्ति जेथुनी । होती उत्पन्न मेदिनी ॥
स्थिति पालक निदानीं । प्रळय दावी रुसल्या ॥१॥
जगा व्यापिलेसें जेणें । जो विश्वात्मा येणें गुणें ॥
त्यास स्वधर्म आचरणें । तोषवावें संतत ॥२॥
त्याचे सोळा प्रकाराचें । कर्मचि एवंविध वाचे ॥
पूजन घडे माधवाचें ॥ नित्य नूतन आवडीं ॥३॥
त्याचा सहज उतरायी । आशीर्वाद ये ते ठायीं ॥
मनोरथ पुरे पायीं । घाली तुका मुरकुंडी ॥४॥
॥७९२२॥
नीच न मानी स्वधर्म । आले भाग प्रांत कर्म ॥
ज्ञान झालें तरी श्रम । स्वयातिचा न मानिजे ॥१॥
बाळा मायच पाहिजे । तेथें उर्वशी ना सुजे ॥
मीनें जळावीण मरिजे । मधुघटाभीतरीं ॥२॥
एवं न करी वेदपत्र । यति हातीं आलें शस्त्र ॥
व्यर्थ तेविं शोभे वक्र । स्वात्म धर्म आचरणें ॥३॥
बोलसी तूं गोत्रवधीं । हत्या घडते संबंधी ॥
तव कर्म पाप वधी । येसी शुद्धी तुकयाचे ॥४॥
॥७९२३॥
वर्ण विभागांत सुकृत दुष्कृत । पुढें जन्म होत त्याच्या लेशें ॥१॥
तेथें गुणी खरें अवगुणी निकरें । वेष्टिलासे धुरें जैसा अग्नी ॥२॥
यास्तव वोखटें । मानिजे गोमटें । चैत्रीं कडुवटें निंब जेवीं ॥३॥
कुश्चळ भ्रतारीं मन ठेवी नारी । पावेल संसारीं तुका ह्मणे ॥४॥
॥७९२४॥
निष्काम जें मन मुक्तिचें भुवन । त्या कर जोडून सिद्धि नमी ॥१॥
पावतो संन्यासें प्रपंच उदासें । मानस उल्हासे हरीपदीं ॥२॥
कर्मी नव्हे लिप्त बुद्धि जितचित्त । झाला स्पृहागत आत्मबोधें ॥३॥
तुका ह्मणे जन्मसार्थक उत्तम । तयामाजी प्रेम अनंताचें ॥४॥
॥७९२५॥
दे तु गुरुकृपा लाभ झाला सोपा । पावला निरोपा सिद्धाचिया ॥१॥
कैसा ब्रह्म पावे सिद्धी ज्यास भावे । ओवाळिती नावें चिन्मयाचें ॥२॥
ते स्थिती निश्चयें संक्षेपें अन्वयें । ऐके आणि होय तूं ही तैसा ॥३॥
ज्ञान निष्ठावंत परात्परीं चित्त । योगीया अतीत तुका झाला ॥४॥
॥७९२६॥
चित्त जें निष्काम भजे आत्माराम । तोची घाली नेम कर्णासी रे ॥१॥
धरुनी धारणें योगाच्या बिंदाणे । जगी विचरणें निरंकुश ॥२॥
शब्दस्पर्शादिक विषय दशक । त्यागी नपुंसक जारीण ते ॥३॥
प्राप्तीचा हरीख अप्राप्तीचें तीख । तुका शिव वीख प्राशीत जा ॥४॥
॥७९२७॥
नावडे लौकिक संगु प्रपंचीक । आहार रसीक भरे पोटा ॥१॥
मना वाचें कायें नेमित निग्रहें । न पीडी आग्रहें शिष्यवर्गी ॥२॥
तिष्ठे सदा मन योगाचें आसन । सोडूं नेणें ध्यान ईश्वराचें ॥३॥
धरी बळकटा वितराग् दारवंटा । तुका ह्मणे तोटा नफा नेणें ॥४॥
॥७९२८॥
तनु बळा नेणें गर्वास टाळणें । अहं चळवणें ठीकाणीचा ॥१॥
कामा भंगीतसा क्रोध केला पीसा । धाडी दीशा वसा परिग्रहो ॥२॥
मेली जेथें ममता अन्न अन्न करितां । शांतीची दुहिता वाढविली ॥३॥
ते ब्रह्म जीवा या भावें अर्पूनियां । झाला उत्तरायि या तुकयाचा ॥४॥
॥७९२९॥
सुप्रसन्न आत्मा त्याचा वीरोत्तमा । झाला जेव्हां ब्रह्मसंगमांत ॥१॥
मग त्या परती इच्छा ते केउती । शोक तरी हंती धरी कैसा ॥२॥
जेथें तेथें माझी भक्ति गंगेमाझी । सर्वभूतें आजी शुद्ध झालीं ॥३॥
समान सर्वात शांती हेलावत । तुका ह्मणे मात हरपली ॥४॥
॥७९३०॥
ते गा सर्वात्मता भक्तिचा जाणता । झाला सप्रेमता देहभावें ॥१॥
अनंत ब्रह्मांडें अनंतींच घडे । अनंता सौंगडे केले जीवा ॥२॥
तत्त्वीं प्रवेशला प्रांताचे वेळेला । जया लेशें आला तेथें गुप्त ॥३॥
पुन्हा मग निघणें प्राणांतीहीं नेणें । ऐसी स्थिती बाणें तुकयास ॥४॥
॥७९३१॥
कर्म घडतें सारें । संचीत आधारें । जाणता विचारें यथायोग ॥१॥
मग तेंच कर्मा मातें वीरोत्तमा । अर्पीतो सप्रेमा मदाश्रित ॥२॥
माझीया प्रसादें तो पावे स्वानंदें । अव्यय जे पदें अनुच्छिष्टें ॥३॥
शाश्वतपणाची गति नेणें वीरंची । तेथें तुकयाचें येणें झालें ॥४॥
॥७९३२॥
सर्व कर्मे पार्था अर्पूनी सर्वथा । ऐके माझी कथा अखंडित ॥१॥
मत्पर मनानें करी हरिध्यान । डोले स्वानंदाने निर्विकल्प ॥२॥
ज्ञानाचा अथवा योगाचा पांडवा । आश्रय राखाव मन पक्षी ॥३॥
तूंच ऐसा होय मद्रूपीं संशय । नाहीं आण वाहे तुका जेथें ॥४॥
॥७९३३॥
मश्चितें करुन भद्रार्थ पाऊन । होय समाधान मत्प्रसादें ॥१॥
दु:खगीरि जळे न वंचतां पळे । सर्वही मावळे क्लेंश कांटा ॥२॥
आतां अहंकारें जरी या नीतिरे । नायकसी बारे घात तुझा ॥३॥
मद्वाक्यें तरला बहुलोक बुडाला । जें नाहीं तुक्याला केलें मान्य ॥४॥
॥७९३४॥
अहंपणें म्हणसी न भांडे मी यासी । यास्तव हेळसी आमुचें मत ॥१॥
कौरवां मारणें पापी व्हावें कोणें । दिसे लाजिर्वाणें जीणें पुढें ॥२॥
हें मिथ्या कल्पित तन स्वभावांत । सहज होईल घात कौरवांचा ॥३॥
प्रकृती क्षत्रियांची अनीवार साची । तुका ह्मणे अरिची पुर्वीन पाठ ॥४॥
॥७९३५॥
कर्म प्रादुर्भाव संस्कार त्या परी । वागे धरेवरी भूत जात ॥१॥
प्रारब्धें बांधलें तें कैसें सुटेल । जरी कां दाटेल उर मोहें ॥२॥
न इच्छिसी स्नेहें अगत्य करिसी । तूंची क्रोधी होसी काळासम ॥३॥
तुका ह्मणे देहस्वभाव कवणा । नावरे हें जाणा विधी लेख ॥४॥
॥७९३६॥
सकळ भूतांच्या हृदयीं देव आहे । अनुभवें पाहे वीरोत्तमा ॥१॥
त्यास मान्य झालें तरेल तें कर्म । अमान्य अकर्म सहजची ॥२॥
जो कां बुद्धिसूत्रें कळावेळ यंत्रें । नाचवी सर्वत्रें बाहूलिया ॥३॥
एकास पळवी पाठी लावी एका । हरपवी तुका पळमात्रें ॥४॥
॥७९३७॥
त्यातें शरण जावें काया वाचा मनें । व्हावें गा अनन्य अनन्यानी ॥१॥
भाव भक्ति बोध राहे चिरंतन । ऐसें घे मागून प्रसादास ॥२॥
त्याच्या अशीर्वादें शांति प्राप्त होय । जें पद आलय शाश्वताचें ॥३॥
ऐसा लाभ जाणा न सोडी अर्जुना । तुका जैसा मना समर्पीता ॥४॥
॥७९३८॥
ऐसें हें गुह्याचें अंतर जें गुप्त । कधीं प्रगटीत झालें नव्हतें ॥१॥
ऐसा श्रोता कोणी नव्हतां मीळाला । जो प्रेमे अथीला परीपूर्ण ॥२॥
तुज ज्ञान श्रेष्ठ उपदेशीलें आह्मीं । पाहे अंतर्यामी अशेष जें ॥३॥
या वरी मानेल तें करी वीरेशा । तुकयाची अशा पूर्णा येणें ॥४॥
॥७९३९॥
सर्वा गुह्यामाजी गुह्य हें किरीटी । हे नव्हे चावटी बाजारी गा ॥१॥
आतां ऐके शब्द हा जो शेवटींचा । कां कीं सद्बुद्धीचा घडीव तूं ॥२॥
मित्र माझा आणि म्हणविसी दास । यास्तव हितास सांगतसों ॥३॥
तुका विनयत्वें प्रार्थी साधुजनां । काय त्या अर्जुना बोले देव ॥४॥
॥७९४०॥
मद्रूपीं सतत यया मना लावी । मद्भक्ती करावी दृढव्रतें ॥१॥
यजन माझेंची वंदावें मातेंची । मग स्वरुपाची पडे ग्रंथी ॥२॥
मीच तूं तूं मीच ऐसें होईल गा । शिवांतरीं जागा जेंवी विष्णु ॥३॥
विष्णुहृदयीं पहुडे शिव परमात्मा । प्रतिज्ञा प्रतिमा तुकीं येतो ॥४॥
॥७९४१॥
सर्व धर्माप्रती त्यागुनी सखया । शरण माझें ठाया तुवां यावें ॥१॥
एक मी प्रसन्न होईना जोंवरी । धर्माचें आदरी तंव मानी ॥२॥
तेथें धर्मी वागे मत्कृपा ना ज्यास । सहज पतनास अधिकारु ॥३॥
संचितें क्रियमाणें पापासी हरीन । भेया ये त्यागुन तुका ह्मणे ॥४॥
॥७९४२॥
अतपी पार्था जो त्यास आमुची गोष्टी । कदापी किरीटी न चावळी ॥१॥
अथवा तपी झाला मज न भजतां । त्या प्रती हे वार्ता सांगूं नये ॥२॥
तपीं भक्ती खरी श्रवणीं नेदी मन । मग त्या सांगून फळ काय ॥३॥
किंवा मातें दोष ठेवी जो अर्जुना । तुका ह्मणे जाणा नव्हे पात्र ॥४॥
॥७९४३॥
भक्तवृंदीं भक्ती करुनियां मान्य । झाला त्यास धन्य आह्मी ह्मणूं ॥१॥
तेथें गुह्य श्रेष्ठ प्रगटूनी वाणील । तैसाची ऐकेल भावें कोणी ॥२॥
निश्चयें पावन माझ्याठायीं येती । तुकया संगती कीर्ती तेची ॥३॥
॥७९४४॥
मानवकोटींत विचारीतां नित्य । त्या ऐसा सांप्रत नसे कोणी ॥१॥
त्याचा तो प्रियकर येतूला ओळखे । भानु चक्षीं देखे घडेचिना ॥२॥
पुढें ही होणार भविष्यें पाहिलें । परी न पडले लाभा दृष्टीं ॥३॥
त्या लोकीं मत्प्रीय त्याहूनी दिसेना । तुका विनवी दीना परीक्षीजे ॥४॥
॥७९४५॥
नित्य ज्याला नेम उष:काळीं स्नान । करुनी संध्यापठण करी पाठ ॥१॥
हा धर्म संवाद मज तूच शब्दीं । अनुवादलों नादीं लागोनीयां ॥२॥
तरी ज्ञान यज्ञें मज तेणें यजिलें । कीं भासे पूजीलें उपचारें ॥३॥
तुका ह्मणे देवा आवड जे मोठी । तेची कसवटी भक्तामाजी ॥४॥
॥७९४६॥
हृदयीं जागे ज्याच्या श्रद्धा । जो कां निंदिना विबुधा ॥१॥
ऐके सदा ठेवुनि भाव । ऐशा नराचा उपाव ॥२॥
माझें पद पावे अंतीं । निष्पातक वागुनि क्षितीं ॥३॥
जेथें लोक पुण्यवान् तुकया तेथें अधिष्ठान ॥४॥
॥७९४७॥
बरी ऐकिली कीं गीता । किंवा न मानीली चित्ता ॥१॥
पार्था मानस एकाग्र । आहे येथें कीं अव्यग्र ॥२॥
अज्ञान मोह खळ । गेला नाहीं कीं प्रांजळ ॥३॥
सांग मातें धनंजया । एक वेळ हें तुकया ॥४॥
॥७९४८॥
ऐके सुरप्रियकार्या । यादवकुलकमलसूर्या ॥१॥
मोह गेला स्मृती आली । चित्तवृती आनंदली ॥२॥
तुझ्या प्रसादें अच्युता । ज्ञानमात्रेचा देखता ॥३॥
जीं जीं झालों एक वेळ । गतसंदेह प्रांजळ ॥४॥
असें निश्चळ आतां मी । तुझें वाक्य मानिन स्वामी ॥५॥
निवटिन कौरवांला । निश्चय रक्षिन तुकयाला ॥६॥
॥७९४९॥
श्रीमद्वासुदेव आणि । धनुर्धर गांडिवपाणी ॥१॥
संवादले महाद्भुत । ऐसे कोण या धरेंत ॥२॥
ऐकिलें हो महा भूपा । दावी अद्यापि तनुकंपा ॥३॥
रोमहर्षणें फूगतां । तुका घाली दंडवता ॥४॥
॥७९५०॥
राया व्यासकृपेस्तव । या योगाचा अनुभव ॥१॥
ऐकियलें गुह्य ज्ञान । सप्रचीत समाधान ॥२॥
योगेश्वर जो कृष्णजी । तेणें श्रीमुखपंकजीं ॥३॥
साक्षात्प्रीतिकारोत्तरें । तुका रिझविला आदरें ॥४॥
॥७९५१॥
केशवार्जुन उभयांचा । हा हो संवाद सुखाचा ॥१॥
पुण्यदाता महाद्भुत । तूंतें वदलों साद्यंत ॥२॥
पुन:पुन्हा आठउनी । हर्षतों मी आत्ममनीं ॥३॥
देवासारिखे त्या पुसे । तुका विनवी ऐका कैसें ॥४॥
॥७९५२॥
तें ही स्मरोनी अद्भुत । झाली एकादशीं मात ॥१॥
पार्था विश्वरुप दावी । पुन:पुन्हा मी आठवीं ॥२॥
नृपा मानुनी आश्चर्य । वारंवार स्फुरे आर्य ॥३॥
सांग तुजला हें सुख । आलें किंवा प्राप्त दु:ख ॥४॥
यया संजयाच्या बोला । अंधू मनांत तापला ॥५॥
मूर्ख पोरगें व्यासाचें । भलतें बडबडे जें रुचे ॥६॥
यासीं बरे दटाउनी । आपलें घ्यावें विचारुनी ॥७॥
मग बोलिला त्या भावें । जैसें ब्रम्हया दशग्रीवें ॥८॥
शास्त्राध्ययनीं रामास । वाखाणितां धडके त्रास ॥९॥
तैसें ह्मणे प्रज्ञाचक्षू । राहूं देहा कृष्णपक्षु ॥१०॥
खाऊं घालिती पांडव । त्यांचा वल्गसी गौरव ॥११॥
पुरे पुरे हे चावटी । ज्या गा पाणि कक्षुपूटी ॥१२॥
एक पुसतों तें सांग । प्रस्तुत युद्धाचा प्रसंग ॥१३॥
येथें मांडिलें समर । यशश्रीचा कोण वर ॥१४॥
मज भासे माझे सुत । करिती पांडवांचा घात ॥१५॥
यावरि तुझें गा ज्योतिष । सांग ऐकूं दे विशेष ॥१६॥
आमुच्या महा महा धूरा । तिकडे अवघा चाराचुरा ॥१७॥
धर्मे मेळविलें पीसें । जेवीं प्रेता पैं कोळसे ॥१८॥
यया धृतराष्ट्रबोला । चित्तीं संजयो पातला ॥१९॥
तुका ह्मणे त्याचे रीतीं । शिक्षि ऐकावें पंडितीं ॥२०॥
॥७९५३॥
बरें ऐकियलें राया । जे सरवीया बोलसी ॥१॥
आह्मीं कोपावें तें वांया । नमना या गुरुच्या ॥२॥
तव प्रसादें हा लाभ पद्मनाभ जोडला ॥३॥
तुझ्या अवगुणाकार । नसे धीर कारण ॥४॥
अवगुण जाय ज्याचा । तो दैवाचा मोहरा ॥५॥
देहस्वभाव कठिण । गेल्या प्राण जाईना ॥६॥
उपदेशें खवळे कसा । जैसा ससा वागुरीं ॥७॥
दीप दीपवाळी गावी । सुकरा चवी विष्टेची ॥८॥
अनसूया परीसली । उठे रुसली ज्यारीण ॥९॥
ज्वाळां नृसिंह मंत्रांत । नाचे भूत स्वच्छंदें ॥१०॥
असो ज्याचा त्यास लाभ । तोचि क्षोभ इतरां ॥११॥
येथें हरीनें वर्णिलें । मागें झाले त्रिगुण ॥१२॥
सत्व चोख मध्यम रज । तमा आज पतन ॥१३॥
शुद्ध सत्व गुण उत्तम । तम अधम वोखटा ॥१४॥
आतां पांडव परिवार । प्रिय शूर सत्व तें ॥१५॥
भीष्म द्रोणा परी साह्य । रज होय सबळ तो ॥१६॥
तमोगुणी ते कौरव । मेले जीव जाणार ॥१७॥
तमाधम तूं दीससी । कीं निंदीसी गीतेला ॥१८॥
शुद्ध सत्व ते गा जाण । जे सुजाण गीतेचें ॥१९॥
आतां जेथें तो श्रीकृष्ण । योग विष्णु योगीया ॥२०॥
तैसा तेथें पार्थ वीर । धनुर्धर प्रतापी ॥२१॥
माझ्या मतें तेथें जय । भाग्या लय श्री नीती ॥२२॥
शाश्वत मती होरा । हा नवरा दीसतो ॥२३॥
शेवटिवें हें उत्तर । दृढोत्तर दे ग्रंथी ॥२४॥
अंधा पावक शीतळ । किरण माळ होईल ॥२५॥
मेरु चळेल आसनीं । हनुम्यामनीं स्त्री रीघे ॥२६॥
न घडावें तें घडेल । परी बोल ना मिथ्या ॥२७॥
ऐसा निष्ठुराचा बोल । लागे खोल शब्दातें ॥२८॥
असो इकडे अर्जुन । सावधान रथेंसी ॥२९॥
कपी मनीं हर्षान्वित । तो फोडित किंकाळी ॥३०॥
जन्मेजयासीं पावन । वैशंपायन बोलीला ॥३१॥
अठरा अध्ये ऐसी गीता । समाप्तता पावली ॥३२॥
मोक्ष संन्यास तो येथें । जगन्नाथें वर्णीला ॥३३॥
झाले अठरा अध्याय । ज्ञानोपाय चोखट ॥३४॥
श्रीगुरु पांडुरंगदास पुरवी आस तुकया ॥३५॥
॥७९५४॥
जन्माचें सार्थक असेल ज्या करणें । आराधणें तेणें गीता देवी ॥१॥
अज्ञान जाऊनी ज्ञानीं रत होणें । आराधणें तेणें गीता देवी ॥२॥
शुद्ध प्रेम यावें वाणी शुद्ध करणें । आराधणें तेणें गीता देवी ॥३॥
लक्षुमीकांताची कृपा ज्यास घेणें । आराधणें तेणें गीता देवी ॥४॥
आरंभीलें व्रत शेवटा ज्या नेणें । आराधणें तेणें गीता देवी ॥५॥
साधन सिद्धिचें सौख्य जया घेणें । आराधणें तेणें गीता देवी ॥६॥
जन्ममृत्यु रोग परिहार करणें । आराधणें तेणें गीता देवी ॥७॥
कलियुगप्रसंगें घडति दुराचरणें । आराधणें तेणें गीता देवी ॥८॥
दृष्टादृष्ट पापें हेळा संहारणें । आराधणें तेणें गीता देवी ॥९॥
ऐसा गीतादशकुवरा जीवीं धरणें । आराधणें तेणें गीता देवी ॥१०॥
श्रीगुरुदासातें प्रेम तुका देणें । आराधणें तेणें गीता देवी ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : June 19, 2019
TOP