भगवद्गीतास्तोत्र - अध्याय नववा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७५७५॥
पूर्व प्रसंगीं बोलिला । अर्जुनासी देव भला ॥
अक्षरें प्रथम निरुपिला । परब्रह्म योग जो ॥१॥
आतां राजविद्या येथें । राज गुह्य तेणें पंथें ॥
ऐकिजेल जी समर्थे । काय कैसें महात्म्य ॥२॥
हें तों गुह्याहुनी गुह्य । आह्मी तूंतें सांगूं पाहे ॥
तूं सज्जन परिसु लाहे । हे तरी कां पा वंचना ॥३॥
विज्ञानेसिं तुज ज्ञान । यया ज्ञानें एक साधन ॥
आहे मोक्ष अनुसंधान । तुका ज्यांत उद्धरे ॥४॥
॥७५७६॥
विद्या गुह्यांत जो राजा । धर्म उत्तम सहजा ॥
पावन व्हावया सांप्रत जा । नित्य सेवी श्रद्धेनें ॥१॥
नव्हे शाब्दिक हें ज्ञान । कांहीं धरिशी अनुमान ॥
देतों प्रत्यक्ष निवडून । येइल पाहे अनुभवा ॥२॥
नित्य जें सुख सुकाळ । साध्य होतें सर्वहि काळ ॥
तेंच करुं हस्तामळ । तुकयालागीं आवडे ॥३॥
॥७५७७॥
होईन मी ब्रह्मज्ञानी । ऐशा छंदाच्या आस्थानीं ॥
पाहती ग्रंथ संमत मुनी । कैसे अनुभव बोलिले ॥१॥
मुनी बोलिले मजसाठीं । नानातर्क हटवटी ॥
तेचि पाहूनि फुंदे होटीं । परि आह्मा नेणेची ॥२॥
शब्द माझा उपेक्षिला ॥ गीता धर्म उच्छेदिला ॥
तो मज मित्रद्रोही झाला । यमपुराला मी वोपी ॥३॥
मग तेथें लागे दंड । जन्म नरकाचे उदंड ॥
जन्मलिया मृत्यु भंड । तुका ह्मणे चुकेना ॥४॥
॥७५७८॥
हाचि विश्व सर्पदोरें । मी या धारण निर्विकारें ॥
पार्था करा वांचुनि सारे । सूत्र याचें चाळितों ॥१॥
नयनावांचुनी पाहातों । कैसा भ्रांत जीव भीतो ॥
मोक्षालय सांडोनियां तो । वनीं पळतो विषयांच्या ॥२॥
कोणी दडे कोणी पडे । आइत्या हर्षे नचे उडे ॥
हृदया वांचुनि मन वेडें । माझेम होतें हांसतां ॥३॥
शेवट शब्दाचा सांगतों । भूत भास मज मधीं तो ॥
त्या सर्पात मी दोर तो । नसे हाच नवलाहो ॥४॥
मिथ्या सर्प सत्य झाले । रज्जुसर्प भ्रांतिमुळें ॥
सद्गुरुकृपें निरसलें । तुकया भ्रांति रज्जुत्वें ॥५॥
॥७५७९॥
तेही सृष्टि सर्प वीरा । दुर्लभत्वें मी दूर दोरा ॥
वायु मोडी तरुवरा । पृथ्वीसंगें अलिप्त ॥१॥
पाहे युक्ति कैसी मौज ॥ ऐश्वर्य योग सांगूं तुज ॥
येरवीं हें स्वस्वरुप बीज । हातीं येणें अप्राप्त ॥२॥
भूतीं नसोनि अर्जुना । धरितो हेकें कल्पना ॥
किंवा कल्पा बुद्धि नाना । माझी ऐसी तुका ह्मणे ॥३॥
॥७५८०॥
नभीं वायु हा दृष्टांत । देतां सत्यभामाकांत ॥
सर्वत्र चि सदोदित । मित्र अथवा रिपु हो ॥१॥
कळे मोठा नभींच तो । अवकाशीं वावरतो ॥
आत्मा यांत त्यापरि तो । तूंच सर्व मानरे ॥२॥
स्मृत अस्मृत प्रमाण । अवघा आत्मा बुझे खूण ॥
येथें जी जी ह्मणोनि चरण । वंदी पार्थ ह्मणे तुका ॥३॥
॥७५८१॥
द्रष्टा रज्जुच मी माया । माझी दृष्टी निजालया ॥
तीत लीन जगकाया । सर्व मीच हे मानी ॥१॥
कल्पादि सृजा । जो मी प्रभू या भूतांजा ॥
जाणें ज्ञान योग माझा । शिव मातें भासतो ॥२॥
ह्मणोनि तो मायातीत । स्वरुपीं रतला संतत ॥
तुका चरणीं शरणागत । कृपा माझी त्यावरी ॥३॥
॥७५८२॥
पुन: पुना पार्था । विश्व हें सर्वथा ॥
माया प्रतिपंथा । अधष्टि तूं ॥१॥
तिची दृष्टी मोहरे । जीवोत्पत्तीद्वारें ॥
माझियाविष्करें । रुपावरी ॥२॥
निर्मितो मीच जाण । स्वात्मबुद्धीचें कारण ॥
दोरि कीं तें स्वप्न । जंबुकाचें ॥३॥
भूत ग्रामतीला । स्वयींच निर्मियेला ॥
बरवा भासला । तुकयासी ॥४॥
॥७५८३॥
मातें सृष्टयादीकें व्याप्तीचीं कटकें । अथवा लटिके स्वप्नधर्म ॥१॥
न बाधती वीरा धनंजय पुरा । पाहे सारासार धुंडाळुनी ॥२॥
कीं मी उदासीन कैसा तो सांगेन । कर्मासी व्यापून अंतर्बाह्य ॥३॥
परि ना लंपटु पाहातां खटपटु । चांगलें चोखटु नेणे तुका ॥४॥
॥७५८४॥
मी द्रष्टा देखणा सर्व कर्म खुणा । जैसा कां पाहुणा चौ दिसांचा ॥१॥
दृष्टिनें हें माझे सृष्टिबळें । अग्निसंगें कुटिजे लोहो जेवीं ॥२॥
माया चराचर जाणे मी अक्षर । गोंडाळांत नीर वेगळेंची ॥३॥
या हेतूनें विश्व सर्प महागर्व । होतो अविर्भाव मजदोरीं ॥४॥
रवी मृगजळ तेणें परि पुष्कळ । तुका ह्मणे खेळ अचाट हा ॥५॥
॥७५८५॥
तो महाईश जगा जगदीश । पर हा महेश नेणें भावा ॥१॥
तेथें मूढमती मातें अवमानीती । कोणाबळें तरती कळेना हें ॥२॥
मानवदेहांत देखोनी कर्मात । ह्मणती अनंत आह्मा ऐसा ॥३॥
परंज्योती प्रभू नेणुनी स्वयंभू । नेणतां हा क्षोभू झाला तुकया ॥४॥
॥७५८६॥
वृथा आशा स्वर्गवस्ती ज्यां नैसर्ग । पिशाच्या कुळवर्ग लग्नीं जैसा ॥१॥
वृथा कर्मे तेवीं मृत्युलोकीं गोवी । लांव मोहे बरवी काय बाळा ॥२॥
ऐसें ही जाणता धरी जो ममता । ज्ञानी ह्मणताना हांसूं येतें ॥३॥
राक्षसी आसुरी मूढा प्रकृती खरी । आश्रित भिकारी तुका वंची ॥४॥
॥७५८७॥
महा सुबुद्धि तो पार्था मी सांगतों । नांव घेतां येतो डोलूच गा ॥१॥
दैवी प्रकृतीनें आदरी मत्पूजनें । जैसी पद्मवनें मानसांत ॥२॥
वरी ते गा भक्ती अद्वैतींच प्रीति । कीं मी आदि अंतीं जाणूनीयां ॥३॥
एकापासी भाव दुजा तेथें वाव । पतिव्रता नांव तुका ह्मणे ॥४॥
॥७५८८॥
माझी कथा वार्त्ता ऐके द्रवचित्ता । नित्य रत ममता माझी ऐसी ॥१॥
जेणें देवजोडे त्या यत्नीं वावडे । अभंग पवाडे दृढव्रत ॥२॥
वंदिती भक्तीनें निजात्मप्रीतीने । स्वरुप रीतीनें नित्यमुक्त ॥३॥
जगा ययापरी त्याच्या द्वारीं करीं ॥ काठी धरु हारी ह्मणे तुका ॥४॥
॥७५८९॥
वृत्तिअ हो मीच कीं भावन ते एकी । सती पैं पावकीं माया त्यागें ॥१॥
किंवा मजवाटे ध्यातो तो गोमटें । कर्म हव्य वाट विश्वतोमुख ॥२॥
एकत्वेंच ऐसा विश्वरुपीं पीसा । एकची जिज्ञासा परि गमे ॥३॥
बहुधा असती देवा ये जगतीं । याजक ह्मणती तुकाराम ॥४॥
॥७५९०॥
विश्वतोमुख पूर्ण त्याची हे गा खूण । बुझे अंत:करण ऐसाच कीं ॥१॥
मुख यज्ञ पुरे पितृ व्रत सारें । मीच मी द्रव्यरे मंत्राआज्य ॥२॥
तेथें मुख्य अग्नी तो मी ऐके कानीं । हुतही निदानी मीच होम ॥३॥
तुका ह्मणे नाहीं आत्म्यावीण कांही । सांगे वर्म पाही गुरु शिष्या ॥४॥
॥७५९१॥
बाप मी माय मी जग धरणार मी । ज्ञेय तें शुद्ध मी जाणीवगा ॥१॥
अकार उकार तीसरा मकार । अर्ध मात्रावर ओंकार मी ॥२॥
ऋग्वेद मी अयुर्वेद महाराजु । सामवेद तेजु गायन मी ॥३॥
गती पाळक मी साक्षी आगमनिगर्मी । तुका ह्मणे स्वामी पुढे बोले ॥४॥
॥७५९२॥
वासस्थान पार्था मीच पैं सर्वथा । नव्हेच अन्यथा वचन हें ॥१॥
शरणागता मान्य सखा मी सौजन्य । इच्छिती जघन्य पडेचिना ॥२॥
मी सृष्टि उत्पत्ति वाढे माझ्या हातीं । मोडे सहज रीतीं क्रोधाचीये ॥३॥
विधि मी बीज मी सतत नित्य मी । तुका ह्मणे स्वामी काय बोले ॥४॥
॥७५९३॥
तपतों तो ताप वर्षतों ते वृष्टी । ओढितों मी सृष्टी सोडीतों मी ॥१॥
मोक्ष मी पांडवा मरण माझेंनीच । जडहीगा साच मजसाठीं ॥२॥
चैतन्य चंचळ निश्चळ माझेनी । अर्जुना तूं मानी गोष्टि खरी ॥३॥
तुका ह्मणे भाग्य आधिला हा पार्थ । देव पूर्ण अर्थ सांगे जया ॥४॥
॥७५९४॥
इंद्रादिक रुपें यजूनी बहुधा । केला पुण्य बांधा अक्षयत्वें ॥१॥
मातेंच पैं वेदीं तीहीं सोमपानीं । मग ते निदानीं घेती सुखा ॥२॥
इंद्रासनारुढ होती अमर दृढ । घेती सुरवाड उर्वशीचा ॥३॥
दिविचर फेरे घेती विमानांत । तुका ह्मणे भूत भविष्य केलें ॥४॥
॥७५९५॥
ऐसे भोग भोगी जंववरी सुकृत । सरल्या पतीत तोची होय ॥१॥
हाक फोडी धर्मदूत महा गजरें । तळीं या लोटारे उन्मत्तासी ॥२॥
पडे दंड शीरीं तेव्हां अंतराळीं । विमान डळमळी अधोमुख ॥३॥
तेजें भरे नभ पाहाती भूलोक । ह्मणती पुण्यश्लोक ढांसळला ॥४॥
कौतुक करीती नेणती आपुलें । पाप जें कां केलें छळीतसे ॥५॥
असो हे निपुण वैदिकांचीं कर्मे । निरुपीतों कर्मे गतागती ॥६॥
पावती सखया ऐसे कामाकामी । तुका ह्मणे आह्मी बरे असों ॥७॥
॥७५९६॥
अन्य त्यागें मातें भजे गर्भवंत । व्यापारा नेणत एक ध्यानें ॥१॥
चिंतींती भजती जन जे पार्थिवा । अभियुक्त सेवा नित्यमार्गी ॥२॥
त्याचा योगक्षेम राहे आनंदांत । वाहतों मनांत चिंता ऐसी ॥३॥
मज चिंता नाहीं आपले तनूचि । काळजी भक्तांची ह्मणे तुका ॥४॥
॥७५९७॥
येरवी कौंतेया अन्यत्र ही देवा । भावें करी सेवा कोणी प्राणी ॥१॥
अन्य भक्ति भजे अन्य उपासनें । येती भरंवसेने अमुच्या घरीं ॥२॥
परंतु अविधीपूर्वक संचय । जेणें योगें क्षय सर्वस्वाचा ॥३॥
तैसें नको वीरा स्पष्ट मी सांगतों । गुंती न करी तूं तुका ह्मणे ॥४॥
॥७५९८॥
मीच स्वामी भोक्ता प्रभू आहूतीचा । आणीक मंत्रांचा असो कोणी ॥१॥
अग्नी मम मुखें पाहती तत्वझाडा । तेथें तो उघडा ईश मीच ॥३॥
उपाधिक बीज तें ही मी अर्जुना । ठावकें सज्जना तुका ह्मणे ॥४॥
॥७५९९॥
भजनाचीं फळें असती बहुत । आह्मी सांगों त्यांत मुख्य चार ॥१॥
देवतोपासनी देवांस पावतो । पदवी भोगितो ऐश्वर्याची ॥२॥
पितरा उद्देशें श्राद्ध पक्ष दर्श । तेणें घ्यावे हर्ष पितृलोकीं ॥३॥
भूतांचे यजन साधन श्मशानीं । अंतीं तेंच स्थानीं अधिकारी ॥४॥
आतां माझी भक्ती मातेंच पावेल । आनंदें गायील तुका जैसा ॥५॥
॥७६००॥
संकट तें नाहीं वैष्णवा पूजेचें । स्वल्प हतवटीचें वर्म सांगूं ॥१॥
पत्र हो वृक्षाचें तुलसीचें वेलाचें । फलही फुकाचें सांपडे जें ॥२॥
वनफळ भिल्लटिचें परी असो । चवी न गवसो जयामाजी ॥३॥
नातरी पाण्याचें संकट पडेना । होतों मी हीवेंना भक्तीतापें ॥४॥
भक्षी पसरुनी मुख लाडें कोडें । निष्काम आवडे ह्मणें तुका ॥५॥
॥७६०१॥
तुं ह्मणसी आह्मी भक्ति कैसी कीजे । श्लोकार्थ सांगीजे याच लागीं ॥१॥
करिसी कर्म हातें मुखें जें भक्षीसी । अथवा दानें देसी याचकांला ॥२॥
होमिसी यद्यपि राजसुहयमेधीं । नेमें तप कधीं आचरसी ॥३॥
पार्था जें तें करी मदर्पण सर्व । एक गेल्या गर्व तुका होतो ॥४॥
॥७६०२॥
घेउनी सुकृत ह्मणसी देसी काय । गोष्टी सुख माय तेच ऐक ॥१॥
फला बर्या वाईटाचा तूं विभागी । पासोनियां उगी वृत्ती मुक्त ॥२॥
असा या संन्यासें युक्तचि ते त्वरा । पावसी सत्वरा मज मुक्त ॥३॥
तुका दास गुरु किंकर पावन । झाला तेणें जन उद्धरीलें ॥४॥
॥७६०३॥
भूताकृती भिन्न छंद यांचे भिन्न । साधू सर्वा भिन्न एक मोहो ॥१॥
द्वेषु न उमटे जे प्रीय तें तैसें । धरत्रीचे असे शीळ जेवीं ॥२॥
वडील धाकुटा सद्गुरु न जाणे । ऐसी ममता जेणें साधीजेगा ॥३॥
माझे ठायी तोची त्याचे ठायीं मीची । दर्पण बिंबाची तुका कळा ॥४॥
॥७६०४॥
जरी असे दुराचारी । वाल्हा कोळी याचेसरी ॥१॥
भजे मन न आणिका । शैव जैसा कीं त्र्यंबका ॥२॥
तो तो साधुच मानावा । जेथें देव सांपडावा ॥३॥
तेथें निश्चयचि देव । तुकया नेणे हव्यकव्य ॥४॥
॥७६०५॥
तोगा होतो शीघ्रगती । धर्मात्मा हे जाण स्थिती ॥१॥
शांती शाश्वत पावतो । कीं मारुती मज भासतो ॥२॥
पार्था नासेना मद्भक्त । ध्रुव तेंवी राहे स्वस्थ ॥३॥
पैज घाली तूं हे जगीं ॥ तुका लीन पांडुरंगीं ॥४॥
॥७६०६॥
चांडाळादिक जातीनें । आश्रय घ्यावा संगतीनें ॥१॥
पापी तेही महा गतीनें । येथें गर्जती पुराणें ॥२॥
मातें पावती भजतां । येथें नोहे द्वैत वार्त्ता ॥३॥
स्त्रिया वैश्य शूद्र ही । तुका ह्मणे पार नाहीं ॥४॥
॥७६०७॥
पुण्य ब्राह्मण राजर्षि । गाधि जामदग्न्य ऋषी ॥१॥
त्याचें कायसें नवल । आहे मोक्ष चवरडोल ॥२॥
अनित्य दु:ख मृत्युलोकीं । फळ हेंच गा अवलोकीं ॥३॥
मातें पार्थिवा भजावें । तुकया ऐसें उद्धरावें ॥४॥
॥७६०८॥
आतां प्रसंगांतीं गोष्ट । तुसीं एक बोलूं स्पष्ट ॥१॥
मन ज्याचें माझ्या रुपीं । भक्ति माझ्या जैशा गोपी ॥२॥
माझें यजन वंदन । राधा प्रिय नंदसून ॥३॥
मदाश्रित चित्त असे । मज पावे तुका कैसें ॥४॥
॥७६०९॥
ऐसा मद्याजीचा अर्थ । नवमीं ऐकें भला पार्थ ॥१॥
प्रसंग संपला येथुनी । भाव जाणावा सज्जनीं ॥२॥
राजविद्या राजगुह्य । योग वर्णिलासे पाहे ॥३॥
श्रवण पठणें संशय । तुका ह्मणे लया जाय ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 18, 2019
TOP