मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष वद्य ४

मार्गशीर्ष वद्य ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


स्वामी श्रद्धानंद यांचा खून !

शके १८४८ च्या मार्गशीर्ष व. ४ या दिवशीं सुप्रसिद्धा गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक व हिंदु समाजाच्या उपेक्षित भागाकडे लक्ष वेधविणारे थोर गृहस्थ स्वामी श्रद्धानंद यांचा अमानुषपणें खून झाला. स्वामींचा जन्म शके १७७८ मध्यें पंजाबांतील तळवण गांवीं झाला. यांचें मूळचें नांव मुनशीराम असें होतें. प्रथम हे नास्तिक होते, परंतु पुढें दयानंद सरस्वतींच्या व्याख्यानांचा परिणाम यांच्यावर होऊन हे पक्के आर्यसमाजी बनले. लाहोर येथें वकिली सुरु केल्यावर यांनी हिंदूंच्या उपेक्षित भागाकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला. यांचें ‘सद्धर्मप्रचारक’ साप्ताहिक प्रथम उर्दू लिपींत निघत असे, पण पुढें तें देवनागरी लिपींत निघूं लागलें. यांनीं स्त्रीशिक्षणावर एक लेखमाला लिहिली व जालंदर येथें सन १८९० मध्यें कन्याशाळा सुरु केली. विधवाविवाह व अनाथरक्षण या प्रश्नासंबंधींहि यांनी लोकांना प्रत्यक्ष कार्याची दिशा दाखविली. पुढें यांनी प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा पुरस्कार केला व त्यासाठीं हे पैसे जमवूं लागले. सन १९०२ मध्यें हरिद्वारजवळ गंगा नदीच्या किनार्‍यावर झोंपड्या बांधून यांनीं गुरुकुलाच्या कार्यास सुरुवातहि केली. पुढें या गुरुकुला़चा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याला विश्वविद्यालयाचें स्वरुप आलें. त्यानंतर सन १९१७ मध्यें यांनी संन्यास घेतला. रौलट बिलाविरोधी झालेल्या चळवळींत यांनीं बरेंच कार्य केलें. दिल्लीस पोलिसांनीं जमावावर बंदुका झाडण्यास सुरुवात केली तेव्हां हे निधड्या छातीनें पुढें झाले व स्वत:वर निशाण धरणार्‍या पोलिसांना म्हणाले, "मी हा श्रद्धानंद, चालव गोळी" अर्थातच पोलिस नरम पडले. मलबारांतल्या मोपल्यांनीं हिंदूंना बाटविण्यास सुरुवात केली, तेव्हां हे तेथें धांवत गेले आणि त्यांनी अनाथांचें रक्षण केलें. शेवटीं दिल्ली येथील आपल्या आजारातून बरे होत असतां मार्गशीर्ष व. ४ रोजीं अबदुल रशीद नांवाच्या एका इसमानें रुग्नशय्येवर पडलेल्या या वृद्ध संन्याशास गोळी घालून ठार केलें. सबंध हिंदुस्थानला जबरदस्त धक्का बसला.

- २३ डिसेंबर १९२६

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP