मार्गशीर्ष वद्य ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सेनापति द्रोणाचार्यांचा वध !
शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ११ या दिवशीं भारतीय युद्धांत कौरवांकडील प्रसिद्ध सेनापति द्रोणाचार्य यांचा वध झाला. जयद्रथाचा वध झाल्यावर दुर्योधन द्रोणाचार्यांना टाकून बोलला, "आचार्य, आपण आतून पांडवाकडील आहांत ..... " त्यावर द्रोण रागाने बोलले, "दुर्योधना, या वाकशल्यांनी मला कां टोंचतोस ? बाबा, शकुनीनें द्यूतांत जे फांसे टाकले ते फांसे नव्हते, अर्जुनाचे बाण होते ... सती द्रौपदीला सभेंत खेंचून आणून जो अधर्म केलात त्याचें आतां फळ भोगा ..... तरी पण कर्तव्य म्हणून मी आज प्रतिज्ञा करतों कीं, जीवांत जीव आहे तोंपर्यंत आज मी युद्ध करीन." आणि या दिवशीं रात्रींसुद्धा घनघोर संग्राम सुरु झाला. द्रोणांनीं मोठा पराक्रम करुन द्रुपद, त्यांचे नातु व विराट यांचा नाश केला. द्रोणांचा पराभव होण्याचें चिन्ह दिसेना. ‘द्रोणपुत्र अश्वत्थामा मेला’ अशी बातमी उठल्याखेरीज द्रोणांचा पराभव अशक्य असें श्रीकृष्णांनी हेरलें आणि त्याच्याच सूचनेवरुन मालवराजा इंद्रवर्मा याचा अश्वत्थामा नांवाचा हत्ती ठार करुन ‘अश्वत्थामा मेला’ अशी बातमी वृद्ध द्रोणाचार्यांना कळविण्यांत आली. सत्यनिष्ठ धर्माकडूनहि खात्री झाल्यावर या म्हातार्याच्या मर्मावर वार बसला. लहानपणीं पाण्यांत पीठ कालवून तें दूध म्हणून पिणारा आणि आनंदानें बागडणारा एकुलता एक पुत्र अश्वत्थामा-द्रोणांचा पराभव अशक्य असें श्रीकृष्णांनीं हेरलें आणि त्याच्याच सूचनेवरुन मालवराजा इंद्रवर्मा याचा अश्वत्थामा
-द्रोणांचा प्राण-नाहीसा झाला ! पुत्रशोकानें विव्हल झालेल्या द्रोणांनीं शस्त्र खालीं टाकलें. द्रोणाचा सूड घेण्यासाठी उतावीळ झालेला धृष्टद्युम्न द्रोणांच्या रथावर चढला, व शोकसमाधींत निमग्न होऊन शस्त्रसंन्यास करुन बसलेल्या त्या पंचाऐशीं वर्षांच्या वृद्ध गुरुची शेंडी धरुन त्यानें तरवार उपसली, " हा ! हा ! गुरुंना जिवंत धरा ! मारुं नका ! " या अर्जुनादि पांडवांच्या ओरडण्याकडे पितृवधामुळें संतप्त झालेला धृष्टद्युम्न कोठून लक्ष देणार ! त्यानें आपल्या तरवारीच्या फटक्यासरशीं त्या अजिंक्य वृद्ध वीराचें मस्तक छाटून कौरवसेनेपुढें फेंकून दिलें.
- १ नोव्हेंबर इ.स. १९३१
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP