(१) श्रीजनार्दनस्वामींची समाधि !
शके १४९७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजी प्रसिद्ध सत्पुरुष आणि एकनाथमहाराज यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनीं समाधि घेतली. जनार्दनस्वामी मूळचे चाळीसगांवचे देशपांडे. यांचा जन्म फाल्गून व. ६ शके १४२६ मध्यें झाला. पूर्वायुष्यांत हे यवनांच्या सेवेंत होते. हे देवगड ऊर्फ दौलताबाद येथील मुख्य अधिकारी व यवन पातशहाचे विश्वासू मुत्सद्दी झाले. जनार्दनस्वामी मोठे शूर, करारी स्वभावाचे, टापटिपीचे व तेजस्वी पुरुष होते. महाराष्ट्रांत यावनी धर्माचा जोर सर्वत्र असतांहि यांच्या स्वधर्मनिष्ठेची दुंदुभि चोहोंकडे दुमदुमून राहिली होती. हे दत्ताचे सगुणोपासक होते. पहांटे उठल्यापासून तों मध्यान्हकालपर्यंत स्नानसंध्या, समाधि व दत्तसेवा यांत ते निमग्न असत. दुपारच्या वेळीं कचेरींतील काम झालें म्हणजे मग रात्रीं ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे निरुपण करीत. यांच्यासाठी पातशाही हुकुमावरुन देवगडावर दर गुरुवारीं कचेर्यांना सुट्टी होती. दत्ताच्या सगुण साक्षात्कारामुळें स्वामींच्या ठिकाणीं समता, शांति व अनासक्ति नांदत होती. भक्तिज्ञानवैराग्याचा हा पुतळा हिंदु-मुसलमानांना सारखाच प्रिय वाटे. नित्य भजनपूजन व आत्मचर्चा यांच्या दिव्य परिमळानें ‘देवगड’ पुण्यवान् झाला होता. ‘श्रीमद्देवगिरी जनार्दनपुरी वैकुंठलोकापरी’ असें वर्णन एका कवींने केलें आहे. याच जनार्दनस्वामींनी शेजारच्या पैठण क्षेत्रींअ वास करणार्या बालभावतास-एकनाथास-आपल्याकडे आकर्षून घेतलें. आणि त्यांना आपल्या कृपेनें जगदुद्धार करण्यास समर्थ केलें. जनार्दनस्वामी हे दत्ताचे परमभक्त होते. त्यांची श्रद्धा पाहून दत्तानें त्यांना साक्षात् दर्शन दिलें होतें. स्वत: दत्तांनीं जनार्दन स्वामीवर अनुग्रह केला; या प्रसंगाचें वर्णन एकनाथमहाराज करतात :
"गुरु प्राप्तिलागीं सर्वथा । थोर जनार्दनासी चिंता ।
विसरला तिन्ही अवस्था । सद्गुरु चिंतिता चिंतनीं ॥
देवो भावाचा भोक्ता । दृढ जाणोनि अवस्था ॥
येणें जालें श्रीदत्ता । तेणें हातु माथां ठेविला ॥
- २९ नोव्हेंबर १५७५
--------------------------
(२) जिवबादादा बक्षी यांचे निधन !
शके १७१७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजीं महादजी शिंदे यांचे प्रसिद्ध सेनापति व मुत्सद्दी जिवबादादा बक्षी यांचे निधन झालें. हे शेणवी जातीचे असून यांचें आडनांव केरीकर असें होतें. दौलतराव शिंद्यांच्याबरोबर यांनीं खर्ड्याच्या लढाईंत मोठा पराक्रम केला होता. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक देण्याविषयीं यांनी प्रथम सल्ला दिला होता, परंतु बाळाजी विश्वनाथाचा औरस वंशज हयात असल्याचें समजल्यावरून यांनी आपला सल्ला चुकीचा असल्याचें कबूल केलें. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांत यांचे निधन झालें. "जिवबादादांस एकाएकीं मोठा ज्वर येऊन त्यांत वायुप्रकोपहि झाला म्हणून, मोठमोठे वैद्य आणवून उपचार करविले. पण गुण दिसेना; ताप हटेना. अगदीं थकत चालले." दौलतरावांना व पुत्र नारायणरावांना चार उपदेशाच्या गोष्टी यांनीं सांगितल्या आणि स्वत:चें लक्ष ईश्वराकडे लाविलें. ‘विधियुक्त भस्म चर्चून गळ्यांत रम्य रुद्राक्षमाला व हातांत स्मरणी हीं त्यांनी धारण केलीं होतीं व नेत्र मिटून ते ध्याननिमग्न झालेले दिसत. भोंवतालीं सर्वत्र पवित्र वातावरण दुमदुमून राहिलें होतें. ब्राह्मणांकडून गीतापाठ, विष्णुसहस्त्रनाम, शिवकवच इत्यादीचें पठण सुरु होतें. शेंकडों लोक समाचार घेण्यासाठीं उपस्थित होते. अशा स्थितींत मार्गशीर्ष व. १२ बुधवार रोजीं जिवबादादांना ग्लानि येऊन त्यांची हालचाल बंद पडली आणि थोड्याच वेळांत रा-म असा अस्पष्ट उच्चार होऊन जिवबादादांचे प्राणोत्क्रमण झालें. शेजारीं दौलतराव शिंदे होते. "शिंद्यांच्या दौलतींत अत्युत्कृष्ट मनुष्य जिवबादादा बक्षी मरण पावले." यामुळें सर्वांच्या अंत:करणास वेदना झाल्या. "निर्मळ अंत:करण, पवित्र वर्तन, साधी राहणी, गोड स्वभाव, स्पृहणीय स्वराज्यनिष्ठा आणि समाधानकारक धर्मशीलता या उत्कृष्ट गुणांचा जिवबादादा हे एक पुतळा होते ...... आपण कोणी मोठे मनुष्य आहों व बाकी सारे क्षुद्र आहेत, अशी बुद्धि यांची नव्हती. " जिवबादादांचे विस्तृत चरित्र राजाध्यक्ष यांनीं लिहिलें आहे.
- ६ जानेवारी १७९६
-----------------------
(३) इतिहासाचार्यांचें निधन ।
शके १८४८ च्या मार्गशीर्ष व. १२ या दिवशीं महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध वाड्मयसेवक, अभ्यासक, इतिहाससंशोधक व नवसिद्धान्तप्रतिपादक इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचें निधन झालें. आवश्यक असें शिक्षण झाल्यानंतर सुरुवातीस यांनीं कांही वर्षे न्यू. इं. स्कूलमध्यें जीवनाला विशेष प्रकारचें वळण लागलें. इंग्रजी भाषेंतील उत्कृष्ट ग्रंथांचें भाषांतर करण्यासाठीं यांनी प्रारंभी ‘भाषांतर’ नांवाचें मासिक काढलें. प्रो. काथवटे यांच्या सांगण्यावरुन यांनी वाई येथें जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांचें संशोधन सुरु केलें. पानिपतविषयक अनेक प्रकारची सामग्री त्यांना पहिला भाग भाऊशास्त्री लेले यांनीं मोदवृत्त प्रेसमधून प्रसिद्ध केला. इंग्रजी लेखक व बखरी यांवर विश्वास ठेवण्यांपेक्षां अस्सल कागदपत्रें शोधण्यास फार महत्त्व आहे, असा यांचा आग्रह होता. यानंतर यांनीं साधनांचे बावीस खंड प्रसिद्ध केले. "संपादन, संकलन व संशोधन यांपेक्षांहि मिळालेल्या साधनांवरुन नवे नवे सिद्धान्त प्रतिपादिण्यांत यांचा तल्लखपणा विशेष प्रगट होतो. आपल्या इतिहासाचीं साधनें घरोघर विखुरलेलीं असून त्यांच्या द्वारां आपन इतिहासांत मोलाची भर घालूं शकूं, असा विश्वास निर्माण करुन यांनीं अनेकांना कार्यप्रवृत्त केलें. इतिहाससंशोधनाला संघटित स्वरुप देण्यासाठीं यांनी सन १९१० मध्यें पुण्यास भारत इतिहाससंशोधक मंडल स्थापन केलें. याच मंडळांतून यांनीं महानुभावांच्या गुप्त लिपीचा उलगडा करुन त्या संशोधनाचा मार्ग खुला केला, आणि आपण स्वत: यानंतर भाषा, व्याकरण व समाज यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. एकनाथपूर्व ज्ञानेश्वरीचा शोध यांनींच लाविला. यांच्या कोणत्याहि लिखाणांत यांची स्वतंत्र बुद्धि दिसून येते. देशाभिमान, कळकळ आणि महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल चिन्ता त्यांच्या वाड्मयांत सदैव दिसून येई. राजवाडे जन्मभर अकिंचन, फिरते आणि असंग्रही राहिले.
- ३१ डिसेंबर १९२६