मार्गशीर्ष शुद्ध २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"रायगड मोंगलांस दिधला ! "
शके १६११ च्या मार्गशीर्ष शु. २ या दिवशीं मराठ्यांची राजधानी रायगड मोंगलांच्या हातीं जाऊन येसूबाई व शिवाजी यांना कैद झाली. संभाजीची भीषण हत्या झाल्यानंतर मराठ्यांचा नायनाट करण्यासाठी बादशहा सिद्धा झाला. रायगडावर स्वारी करुन राजारामासहि पकडून आणण्याच्या कामगिरीवर बादशहानें वजीर आसदखान याचा पुत्र इतिकदखान यास पाठविलें. त्याप्रमाणें खानानें रायगडास वेढा घातल्यावर मोठाच कठीण प्रसंग निर्माण झाला. शिल्लक राहिलेले मुत्सद्दी आणि सरदार जमा होऊन विचार करुं लागले. "खजिन्यांत शिल्लक नाहीं, पागा व फौज सर्व मोडलें, किल्ले येसरंजाम झाले, पूर्वीची अनुभवी माणसें मरुन गेली आणि मोंगलांच्या निरनिराळ्या फौजा मराठ्यांच्या प्रांतास उपद्रव देऊं लागल्या." अशा कठीण अवस्थेंत सर्वत्र निराशाच होती. या प्रसंगीं येसूबाईस सल्ला दिला कीं, राजारामानें बाहेर पडून आपला बचाव करावा. ही योजना सर्वांना पसंत पडली. सर्वांची एकवाक्यता व शपथविधि झाल्यानंतर राजाराम रायगडावरुन बाहेर पडला. तरी रायगड हस्तगत करण्याचा प्रयत्न बादशहानें मोठ्या जोमानें सुरु केला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ही जोडी आपल्या अतुल पराक्रमानें मोंगलांस त्रास देत होतीच. संभाजीच्या भीषण वधामुळें मराठ्यांच्यांत सूडाची विलक्षण भावना उसळून आली होती. शौर्य आणि पराक्रम यांच्या साह्यावर मराठे सहज विजयी झाले असते. परंतु फितुरी हा एक दुर्गुण मराठ्यांना पदोपदी नडला आहे. रायगडास वेढा घलून सात-आठ महिने झाले तरी इतिकदखानाचें एक पाऊलहि पुढें पडलें नव्हतें. परंतु वाईच्या सुभेदारीच्या लालसेनें सूर्याजी पिसाळ मोंगलांना फितुर झाला. त्यायोगें मार्गशीर्ष शु. २ ला मोंगलांचा रायगडावर सुलभ रीतीनें प्रवेश झाला. राजपत्नी येसूबाई मुलासह मोंगलांच्या स्वाधीन झाली ! शिवरायांच्या मृत्यूनंतर दहाच वर्षांच्या आंत त्यांच्या सुनेवर व नातवावर हा कठीण प्रसंग आला. खानानें सर्व रायगड लुटला. शिवरायांचे सिंहासन फोडिलें.
- ३ नोव्हेंबर १६८९
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018

TOP