मार्गशीर्ष शुद्ध ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
शिवरायांकडे सातारचा किल्ला !
शके १५९७ च्या मार्गशीर्ष शु. ४ या दिवशीं विजापूरकरांच्या ताब्यांत असलेला सातारचा किल्ला श्रीशिवाजी राजे यांनीं हस्तगत केला. हा किल्ला हातीं आल्यानंतर शिवाजी राजांनीं तेथेंच वास्तव्य केलें. तेथें दोन-तीन महिने ते आजारी होते. त्यांच्या चित्तास उद्विग्नता प्राप्त झाली होती. ही उद्विग्नता श्रीसमर्थांनीं दूर केली. शिवाजी राजे यांनीं आपल्या राज्याची भिक्षा समर्थांच्या पायांवर घातली आणि सातारच्या किल्ल्यावरुन परळीला असणार्या समर्थांशीं त्यांनी संभाषण केलें, वगैरे गोष्टी त्यांच्या याच आजाराच्या आगेंमागें घडल्या. शिवाजीमहाराज समर्थांचे शिष्य होते. त्यांची व रामदासांची पहिली भेट केव्हां झाली, शिवाजीला अनुग्रह केव्हां मिळाला, हे प्रश्न अजून वादग्रस्त आहेत. शिवाजी व रामदास यांचा संबंध ध्यानांत ठेवूनहि असें म्हणावेंसे वाटतें कीं, सतराव्या शतकामध्यें महाराष्ट्रभूमींत शिवाजी व रामदास हीं दोन अगदीं स्वतंत्र स्फूर्तिस्थानें निर्माण झालीं होतीं. वयाच्या सतराव्या वर्षी शिवरायांनीं स्वराज्यमंदिराची मुहूर्तमेढ रोवली ती केवळ स्वयंप्रेरणेनेंच. शिवरायांनीं राज्यविस्ताराचें कार्य आणि समर्थांचे धर्मप्रसाराचें कार्य या दोनही गोष्टी एकसमयावच्छेदेंकरुन एकाच प्रांतांत सुरु झाल्या असल्या तरी आरंभीं एकमेकांना परस्पराची जाणीव नसावी. ‘आपुले देशीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें’ असें एका पत्रांत समर्थ शिवरायांना म्हणतात. शिवरायांचा उद्योग, समर्थांचा नतरचा आशीर्वाद, राज्यसमर्पण आदि गोष्टींचा उल्लेख खालील सनदेंत सांपडतो. शिवाजीराजे समर्थांना लिहितात. - "आज्ञा केली कीं, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुन धर्मस्थापना, देवब्राह्मणांची सेवा, प्रजेची पीडा दूर करुन पाळण, रक्षण करावें हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा, या उपरीं राज्य संपादिलें तें चरणीं अर्पण करुन सर्व काळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा जाहली कीं, तुम्हांस पूर्वी धर्म सांगितलें तेंच करावें. तीच सेवा होय."
- ११ नोव्हेंबर १६७५
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP