मार्गशीर्ष शुद्ध ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
हिंदु राजा जयपाल याचा पराभव !
शके ९२३ च्या मार्गशीर्ष शु. ९ रोजीं पंजाबचा प्रसिद्ध जयपाल आणि गझनीचा सुलतान महंमुद यांचें मोठें युद्ध होऊन जयपालचा पराभव झाला. आठव्या शतकापासून मुसलमानांचे पाय भारतांत दृढ होऊं लागले होते. त्यांची राज्यतृष्णा व क्रूरतेचीं कृत्यें यांमुळें सारा भारतवर्ष त्या वेळीं हादरुन गेला होता. जयपाल हा जातीनें ब्राह्मण असून तो काबूलच्या शाही घराण्यांतील भीमदेवाचा मुलगा होता. शके ९०२ मध्यें याची आणि सबक्तगिनाची लढाई होऊन याचा मोठा विजय झाला होता. यानंतर सबक्तगिनाचा दासीपुत्र सुलतान महंमद याचें लक्ष वैभवसंपन्न अशा भारताकडे गेलें. महंमद गझनीनें पंचवीस वर्षांच्या काळांत हिंदुस्थानवर एकूण सतरा स्वार्या करुन अगणित लूट त्यानें बरोबर नेली. लोकांची कत्तल करणें, जाळपोळ करणें, देवळें पाडून मशिदी उभारणें या प्रकारांना तर सीमा नव्हती. महंमदाची पहिली स्वारी शके ९२३ मध्यें झाली. नोव्हेंबर महिन्यांत मोठी फौज घेऊन महमद पेशावरच्या रणभूमीवर येऊन दाखल झाला. लाहोरचा राजा जयपाल आपलें सैन्य घेऊन त्याजवर चालून गेला. हिंदूंची फौज मोठी होती; पण तींत शिस्त नव्हती. मार्गशीर्ष शु. ९ रोजीं दोनहि सैन्यांत निकराची लढाई होऊन जयपाल व त्याचे दोन मुलगे महंमुदाच्या हातांत सांपडले. जयपालाची सर्व संपत्तिहि महंमुदासच मिळाली. आपलीं दोन मुलें महंमुदाकडे ओलीस करवून घेतली. तरी झालेल्या पराभवाबद्दल त्यास फारच वाईट वाटलें. शेवटीं त्यानें अग्निकाष्ठ भक्षण करुन प्राणत्याग केला. आक्रमक अशा इस्लामी संकटास तोंड देण्याचें सामर्थ्य दुर्दैवानें त्या वेळीं भारतांत नव्हतें. "हिंदु राज्यांचा वृद्धापकाळ झाला होता. शौर्याचे दिवस निघून गेले होते. कोण आला व कोण गेला याची त्यास चाड राहिलेली नव्हती. अंगांतील सत्त्व निघून गेल्यामुळें जुलुमास्तव हातपाय हालवावे अशांतली त्यांची स्थिती झालेली होती" अशा अवस्थेंत हिंदूंच्या वाट्यांस पराभवाखेरीज काय येणार ?
- २७ नोव्हेंबर १००१
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018

TOP