मार्गशीर्ष वद्य १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
जयद्रथास प्रायश्चित्त मिळालें !
शकपूर्व २००९ च्या मार्गशीर्ष व. १० रोजीं कौरवांकडील सेनानी जयद्रथ यास अर्जुनानें श्रीकृष्णाच्या साह्यानें ठार केलें. आदल्याच दिवशीं अर्जुनाचा षोडश वर्षांचा मुलगा अभिमन्यू द्रोणाचार्यांनीं रचलेल्या चक्रव्यूहांत शिरला आणि त्यानें अद्वितीय पराक्रम केला. पण या सोळा वर्षाच्या बालकावर द्रोण, अश्वत्थामा, कर्ण, कृप, कृतवर्मा आणि बृहद्बल या सहा जणांनीं एकदम प्रहार करण्यास सुरुवात केली. अभिमन्यू विरथ झाला, हातांत गदा घेऊन तो पायींच लढूं लागला. दु:शासनाचा गदा घेऊन त्यास सामोरा आला; दोघे गदेच्या प्रहारांनीं मूर्च्छित झाले, आणि दु:शासनाचा पुत्र सावध झाल्यावर त्यानें अभिमन्यु मूर्च्छित असतांनाच त्याला गदेचा प्रहार करुन ठार मारलें ! आणि जयद्रथानें त्या मृत बालकाला लाथ मारली. संशप्तकाच्या युद्धांत गुंतलेला अर्जुन विजयी होऊन परत आल्यावर त्याला हा भीषण प्रकार कळला. तेव्हां संतप्त होऊन अन्यायाचा पुरेंता सूड उगवण्यासाठीं त्यानें प्रतिज्ञा केली, "सूर्यास्ताच्या अगोदर मी जयद्रथाला ठार करीन, नाहीं तर स्वत: अग्निप्रवेश करीन" आणि त्याच्या गांडीव धनुष्याच्या ठणत्कारांने दशदिशा भरुन गेल्या. कौरवांचे वीर भीतीनें त्रस्त झाले. जयद्रथाच्या रक्षणासाठीं सौमदत्ति, कर्ण, अश्वत्थामा, शल्य, वृष, व कृप असे वीर ठेवून शुभ्र कवच व उष्णाव घातलेले द्रोणाचार्य युद्धास तयार झाले. दुर्योधनानें द्रोणाकडून घेतलेंले दिव्य कवच घातलें असल्यामुळें अर्जुनाचे बाण निष्फळ झाले. तरी देखील या दिवशीं दोनहि पक्षांत भयंकर रणकंदन झालें. संध्याकाळच्या सुमारास अर्जुनाचा रथ जयद्रथापाशीं आला. येथील सहा वीरांशी त्यानें युद्ध केलें, परंतु, युद्धाचा रंग ठीक दिसेना तेव्हां श्रीकृष्णांनीं मायाजालानें सूर्यावर अभ्रें आणून सर्वत्र काळोख पसरविला. ‘अर्जुनाची प्रतिज्ञा खोटी झाली’ असें म्हणत जयद्रथ विजयानंदानें बाहेर आला. इतक्यांत सूर्य एकदम ढगाबाहेर येऊन रणांगणावर किरणें पडलीं. त्याच्या प्रकाशांत अर्जुनानें जयद्रथाचें शिर उडविलें.
- ३१ आँक्टोबर इ.स.पू.१९३१
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP