मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष वद्य ८

मार्गशीर्ष वद्य ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


पं. मालवीय यांचा जन्म !

शके १७८३ च्या मार्गशीर्ष व. ८ रोजीं प्रसिद्ध हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म झाला. यांचे मूळ घराणें मालव प्रांतांतील. माळवा सोडल्यानंतर प्रयाग क्षेत्रीं या घराण्यानें आपलें अस्तित्व कायम केलें. मालवीयांच्या घराण्यांतील सर्वच पुरुष विद्वान व उदारचरित असे होते. पं. प्रेमधर मालवीय हे मदनमोहनांचे आजे. संस्कृत विद्येंतील यांची कीर्ति त्या वेळी अत्यंत मोठी होती. यांचे चिरंजीव व्रजनाथ मालवीय हेहि विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. भागवतावर लिहिला गेलेला यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. भागवतावर लिहिला गेलेला यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याच भाग्यशाली पित्यास मार्गशीर्ष व. ८ या दिवशीं जो मुलगा झाला तो म्हणजे मदनमोहन. पित्यानें यांच्या शिक्षणाची फारच काळजी घेतली. धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार घरच्या घरींच होत असल्यामुळें मदनमोहन मालवीयांचा विकास चांगलां होत होता. प्राथमिक शिक्षण घरींच घेतल्यानंतर धर्मज्ञानोपदेश पाठशाळा व विद्याधर्मवर्धिनी सभा या संस्थांतून यांचें शिक्षण सुरु झालें. अलाहाबाद जिल्हा स्कूल मधून प्रवेश परीक्षा व म्यूर सेंट्रल काँलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे लक्ष सार्वजनिक कार्याकडे वळलें. धर्मकारण व शिक्षण हे यांचे आवडते विषय होते. अलाहाबाद लिटररी इन्स्टिट्यूट व हिंदु समाज या संस्थांतून ते काम पाहूं लागले. आणि हळूहळू यांच्या कार्याचा विस्तार होऊन जगप्रसिद्ध अशा बनारस येथील विश्वविद्यालयाची निर्मिति यांच्याकडून झाली. यांच्यासंबंधीं कै. तात्यासाहेब केळकर यांनी एके ठिकाणीं म्हटलें होतें :"हिंदुत्वाचा आदर्श कोण ? असा मला कोणीं प्रश्न केला तर मी हिंदुस्थानांतील एकाच विभूतीकडे बोट दाखवीन. ती म्हणजे पंडित मदनमोहन मालवीयजी .... जुन्या व नव्या संस्कृतीचा सुंदर मिलाफ कसा घालावा हें पंडितजींइतकें कोणीच जाणीत नाहीं. हिंदु विश्वविद्यालय हे या सुंदर मिलाफाचें उत्कृष्ट उदाहरण आहे ..... देवाजवळील नंदादीपानें जी चित्ताला एक प्रकारची प्रसन्नता वाटते ती पंडितजी आहेत. " हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृति यांचा अभिमान पंडित मालवीय यांना फार असे.

- २५ डिसेंबर १८६१

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP