मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष शुद्ध १४

मार्गशीर्ष शुद्ध १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


रावणाच्या लंकेचे दहन !

मार्गशीर्ष शु. १४ या दिवशी श्रीहनुमान यानें मदोन्मत्त अशा रावणाची लंका जाळून टाकली. रामाज्ञेवरुन मारुतिराय लंकेंत आले व त्यांनी सीतेला सर्व वृत्तांत कथन केला. रामानें पाठविलेलीं अंगठी त्यानें सीतेला दाखविली. तेव्हां तिलाहि खूण पटली. सीतेनें रामाला दाखविण्यासाठीं आपल्या डोक्यांतील चूडामणि मारुतीजवळ दिला. सर्व निरोप घेऊन हनुमान अशोक वनांतून निघाले. परंतु त्यांना तितकेसें समाधान वाटलें नाहीं. आपल्या सामर्थ्याचा प्रभाव येथें दाखवावा असें प्रमदावन उद्धवस्त करण्यास सुरुवात केली. सर्व वृक्ष काडकाड मोडून गेले. सुंदर दीर्घिका व विहिरी मोडून टाकिल्या. जिकडे तिकडे हाहा:कार उडाला. रावणाला ही सर्व बातमी समजल्यावर त्याचे डोळे क्रोधानें लालभडक झाले. आपल्या अति बलाढ्य अशा ऐंशी हजार राक्षसांना त्यानें मारुतीवर पाठविलें. त्यांतील बहुते राक्षस मरुन गेले. त्यानंतर रावनानें सेनापति प्रहस्ताचा मुलगा अम्बुमाली यास मारुतीचा नायनाट करण्यासाठीं पाठविलें. या वेळीं हनुमंतानें रावणाच्या राजवाड्याचाहि विध्वंस करण्यास सुरुवात केली. मारुतीनें जम्बुमालीचाहि पराजय केल्यावर रावणानें सेनापति रावणानें अनुक्रमे सात अमात्य-पुत्र, स्वत:चा मुलगा अक्ष, इंद्रजित यांना हनुमंतावर पाठविलें. इंद्रजितानें मारुतीवर ब्रह्मास्त्र सोडलें, आणि दोरखंडांनीं बांधून त्याला रावणापुढें नेले. मारुतीनें रावणाची चांगलीच कान उघाडणी केली. अर्थात्‍ रावणास ते कशी रुचणार ? रावणानें हुकूम सोडला, "या वानरांना आपल्या पुच्छाचा मोठा अभिमान वाटतो. द्या ते पेटवून." मारुतीच्या शेपटीला शहरांतील सर्व वस्त्रें गुंडाळण्यांत आलीं आणि तें पेटविण्यांत आलें. शेपटी पेटल्यानंतर मारुतीनें या घरावरुन त्या घरावर असें उड्डाण सुरु केलें. हजारों रमणीय वाडे जळूं लागले. राक्षसराक्षसिणी किंचाळून बाहेर पळूं लागल्या. अनेक रस्त्यांनीं बनलेल्या रावणाच्या वाडयासहि आग लागली ! "आला, कपिरुपी अग्नि आला म्हणून जिकडे तिकडे एकच हलकल्लोळ माजून राहिला."

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP