मार्गशीर्ष शुद्ध १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
भाई मतिदासांचा अमानुष वध !
शके १५९७ च्या मार्गशीर्ष शु. १ रोजीं तेगबहादुरांचे अनुयायी भाई मतिदास यांचा करवतीनें कापून वध करण्यांत आला. या वेळीं दिल्लीस मोंगलांचा शेवटचा पराक्रमी आणि जुलमी बादशहा औरंगजेब राज्य करीत होता. हा बादशहा मोठा धर्मांध आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वासघात, कपटविद्या, हृदयहीनता, इत्यादि दुर्गुणांचा सांठाच त्याच्याजवळ होता. याच्या राक्षसी धर्मप्रेमांत अनेक अपराधी, निरपराधी लोकांची आहुति पडत असे. शेंकडों माणसें हालअपेष्टा भोगीत दिवस कंठीत असत. शीखांचे गुरु तेगबहादूर यांनीं मुसलमानी धर्मास मान्यता दिली नाहीं, म्हणून त्यांना कैदेत पडावें लागलें. अनेक अनुयायी त्यांचाच मार्ग चालत होते. गुरु तेगबहादूरांच्या अनेक शिष्यांना प्राणदंडहि सोसावा लागत होता. मार्गशीर्ष शु. १ रोजीं घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक अशीच आहे. धर्मासाठीं प्राण देणार्या हुताम्यांच्या इतिहासांत हा प्रसंग आपल्या तेजानें सदैव तळपत राहील असाच आहे. तेगबहादुराबरोबर ‘मतिदास’ नांवाचे त्यांचे शिष्य दिल्लीस कैदेंतच होते. त्यांच्या वधाचें फर्मान बादशहाकडून निघालें ! " ऐन मध्यान्हींच्या सुमारास करवतीनें इंच इंच याप्रमाणें डोक्यापासून त्यांना चराचरां कापण्यांत आलें. असें कापलें जात असतां प्रतिक्षणीं त्यांना ‘अजून तरी मुसलमान होतोस काय?’ असें विचारण्यांत येत असे. व प्रत्येक वेळीं ते धीरोदात्तपणें ‘नाहीं’ असें उत्तर देत असत. नुसतें वर्णन वाचूनहि अंगावर शहारे येण्यासारख्या या अनन्वित वेदनांत मतिदासजींनीं नुसता सुस्कारा देखील सोडला नाहीं. अखेरीस तिळातिळायेवढ्या कापलेल्या मतिदासजींच्या रक्ताचा सडा दिल्लीच्या चांदणी चौकांत पडला. पण त्यांचा आत्मा मात्र हिंदु म्हणूनच परलोकास गेला. - " शीखांचा सर्वच इतिहास अशा स्फुर्तिदायक आणि उदात्त घटनांनी भरलेला आहे. मतिदासांच्या वधानंतर तीनचार दिवसांतच गुरु तेगबहादुर यांचा वध झाला. मतिदासजींप्रमाणेंच तेग बहादुरांनींहि अलौकिक धैर्य दाखविलें.
- ८ नोव्हेंबर १६७५
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP