भगवद्गीतेचा अवतार !
शकपूर्व २००९ च्या मार्गशीर्ष शु. ११ ला भगवान् श्रीकृष्ण यानीं अर्जुनास गीतेचा उपदेश केला. सर्व जगांत अद्वितीय ठरलेल्या भगवद्गीतेचा जन्म आज झाला. गीतेच्या जन्मकथेची हकीगतहि संस्मरणीय अशीच आहे. मदानें उन्मत्त झालेल्या कौरवांकडून पांडवांवर अतोनात अन्याय झाला. प्रत्यक्ष श्रीकृष्णानें युद्ध टाळण्यासाठीं केलेली शिष्टाई फुकट गेली, तेव्हां कुरुक्षेत्रावर - पानिपतच्या पटांगणावर कौरवांचे अकरा अक्षौहिणी सैन्य व पांडवांचें सात अक्षौहिणी सैन्य येऊन ठेपलें. दोनहि छावण्यांतून हत्तींच्या गर्जना, घोड्यांचे खिंखाळणें, योद्ध्यांचे सिंहनाद, धनुष्यांचे टणत्कार व शंख, भेरी, नगारे यांचा गंभीर ध्वनि सुरु झाला. धृष्टद्युम्न पांडवांचा सेनापति होता. वयोवृद्ध असणारे भीष्म कौरवांचे सेनापति झाले. अर्जुनाच्या रथाचें सारथ्य स्वत: श्रीकृष्णानें स्वीकारलें. आणि प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी ज्यांच्याशी आपणांस लढावयाचें आहे, त्या वीरांना निरखून पाहण्याच्या हेतूनें अर्जुनानें समोरील सैन्याकडे नजर टाकली. तेव्हां या वीराच्या मनांत आलें, "लक्षावधि वीर प्रियपितामह, आचार्य, स्वशुर, शालक, पुत्र, पौत्र, बंधु, आप्त, मित्र .... यांच्याशीं का लढून मी राज्य मिळवणार ?" अर्जुन हतवीर्य होऊन त्याच्या डोळ्यांतून झरझर अश्रु वाहूं लागले. आणि ‘गोविंदा, या कुलक्षयापासून त्रिखंडाचें राज्य मला मिळालें तरी नको. मी युद्ध करणार नाहीं. ’ असें श्रीकृष्णाला म्हणून अर्जुनानें धनुष्य खालीं टाकलें. क्षत्रियानें आपला धर्म सोडला. त्या वेळीं श्रीकृष्णानें त्यास गीतेच्या उदात्त धर्माचा उपदेश केला : " अर्जुना, तुझ्यासारख्या वीराचे ठायी हें कारूण्य योग्य नाहीं. धर्मयुक्त युद्धाहून कोणतीहि अन्य गोष्ट क्षत्रियास श्रेयस्कर नाहीं. तेव्हां सुखदु:ख, लाभालाभ, जयपराजय यांस समान लेखूण युद्धास आरंभ कर, आणि ध्यानांत असूं दे कीं, जेथें श्रीकृष्ण आणि पार्थ आहेत तेथें श्री, विजय, भृति, आणि नीति यांचें वास्तव्य असतें." भगवंतांनीं अर्जुनास दिलेला हा उपदेश आहे.
- १८ आँक्टोबर इ.स. पूर्व १९३१