मार्गशीर्ष शुद्ध ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"मान दिली ...... पण इमान दिलें नाहीं !"
शके १५९७ च्या मार्गशीर्ष शु. ५ रोजीं शीखांचे नववे गुरु तेगबहादुर यांना मुसलमानांनी अत्यंत हाल करुन ठार मारिलें. तेगबहादुर हे गुरु हरगोविंद यांचे चिरंजीव. पंजाब प्रांत सोडून हे पुष्कळ वर्षे भ्रमण करीत होते. शेवटीं यांनीं ‘बकाला’ या गांवीं आपलें वास्तव्य केलें. तेग म्हणजे तरवार. या तरवारबहादुरांस शीखांनी आपले गुरु म्हणून निवडलें. हे मोठे शूर आणि त्यागी वृत्तीचे होते. हरगोविंद यांनी आपल्या शिष्यांना शस्त्रें पुरवून लढवय्ये बनविलें होतें. तेगबहादुरानें त्या सर्वाची संघटना करुन त्यांच्यांत खालसा (पवित्र) धर्माबद्दलची श्रद्धा निर्माण केली. याच वेळीं औरंगजेब बादशहाचें धर्मवेड पराकोटीला जाऊन पोंचलें होतें. सर्व उत्तर हिंदुस्थान त्रस्त होऊन तेगबहादुराच्या आश्रयास आला होता. त्या सर्वांना एकत्र करुन तेगबहादुरानें त्यांना धर्मयुद्धास प्रवृत्त केलें. हांसीव सतलाज यांतील प्रदेशांत हे सशस्त्र फौज घेऊन हिंडत असत. औरंगजेबाच्या कानीं ही वार्ता गेल्याबरोबर त्यानें तेगबहादुरास पकडून आणण्याविषयीं हुकूम सोडला. त्याप्रमाणें तेगबहादुरास अटक करण्यांत आली. याचे धर्मप्रेम आणि यांची लोकप्रियता पाहून औरंगजेब बादशहास अत्यंत क्रोध येऊं लागला. तेगबहादुरांचे पांच शिष्य मुसलमानी धर्म स्वीकारण्यास तयार होत नव्हते, म्हणून त्याचा क्रूरपणें वध करण्यांत आला. आपलीहि हीच गत होणार असें समजून तेगबहादुर शांतपणें ईश्वरचिंतन करुं लागले. थोड्याच दिवसांत औरंगजेबाचें आणि या स्वाभिमानी गुरुचें बिनसलें. दिल्लीच्या चांदणी चौकांत तेगबहादुर यांना उभें करण्यांत आलें; नंतर मारेकर्यांकडून त्यांचा शिरच्छेद झाला. मृत्यूच्या वेळीं तेगबहादुरांच्या मानेभोंवती एका कागदाची चिठ्ठी गुंडाळलेली होती. शिरच्छेद झाल्यानंतर सरकारी लोकांनी ती उलगडून पाहिली तों त्यांत लिहिलें होतें, "मान दिली, पण इमान दिलें नाहीं !" आपल्या गुरुचा असा भीषण वध झालेला पाहून सर्व शिष्यांची अंत:करणें हळहळलीं. तेगबहादुरांचें शिर शिष्यांच्या ताब्यांत आल्यावर तें आनंदपूर येथें नेऊन त्यांनीं त्याला अग्निसंस्कार दिला. धडाचा दहनविधी दिल्लीसच झाला.
- ११ नोव्हेंबर १६७५
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP