शकपूर्वी २००९ या वर्षी मार्गशीर्ष शु. १२ ला कौरव - पांडव यांमधील विख्यात असें भारतीय युद्ध सुरु झालें. पांडवांचा वनवास व अज्ञातवास संपल्यानंतर न्यायानें त्यांच्या राज्याचा वाटा त्यांना मिळणें अवश्य होतें. परंतु मदमत्त झालेल्या दुर्योधनाकडून तें घडलें नाहीं. तेव्हां युद्धाचा प्रसंग उद्भवला. तत्पूर्वी स्वत: श्रीकृष्णांनी कौरवांकडे जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला - "हे पांडवहि तुझेच आहेत. कौरवपांडवाचा संधि घडवून आण. जोंपर्यंत अर्जुन व कृष्ण कंबर बांधून युद्धास सज्ज झाले नाहींत, जोपर्यंत भीम आपली गदा घेऊन सैन्याच्या शिरोभागी उभा राहिला नाहीं, तोंपर्यंतच हा प्रश्न मिटव - " परन्तु हा श्रीकृष्णाचा सल्ला ऐकून दुर्योधन संतापानें लाल झाला. आणि मूर्तिमंत पाशवी सत्ता बोलली कीं, "सुईच्या अग्रावर राहील एवढी मातीसुद्धां पांडवांना मिळणार नाहीं." शेवटीं श्रीकृष्णाची शिष्टाई फुकट जाऊन युद्धाचा प्रसंग येऊन ठेपला आणि बरोबर तीन हजार आठशें एकूणऐंशी वर्षापूर्वी आजच्याच दिवशीं न्याय आणि अन्याय यांचा फार मोठा लढा सुरु झाला. दोनहि सैन्यांच्या मिळून १८ अक्षौहिणी (एक अक्षौहिण म्हणजे २१८७० हत्ती, २१८७० रथी, तिप्पट म्हणजे ६५६१० घोडेस्वार व पांच पट म्हणजे १०९३५० पायदळ) कुरुक्षेत्रावर युद्धासाठीं तयार झाल्या. पायदळांच्या पायांचा व शस्त्रांचा, घोड्यांच्या टापांचा व खिंकाळ्याचा, हत्तींच्या चीत्कारांचा, रथाच्या गडगडाटांचा व ध्वजाच्या फडफडण्याचा, विराट, सात्यकी, धृष्टद्युम्न, शिखंडी, भीम आदि वीर एका बाजूला, आणि शल्य, शकुनि, जयद्रथ, कृतवर्मा, भीष्म, द्रोण आदि झुंजार दुसर्या बाजूला होते. भीष्मार्जुन, भीम-दुर्योधन, सात्यकी-कृतकर्मा, यधिष्ठिर-शल्य यांचीं द्वंद्वयुद्धें सुरु झाली. संग्रामांत पहिल्याच दिवशीं हजारों हत्ती घोडे व पायदळे मरून रणमैदान रक्तामांसानें माखून गेलें.
- १८ आँक्टोबर इ.स. पूर्व १९३१