मार्गशीर्ष वद्य ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचें युद्ध !
शके १७३९ च्या मार्गशीर्ष व. ९ रोजीं म्हणजे बरोबर एकशें-तीस वर्षांपूर्वी कोरेगांव येथें इंग्रज व मराठे यांचा संग्राम होऊन त्यांत मराठ्यांचा पराभव झाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठेशाहीस अनिष्ट अशी ग्रहदशा सुरु झाली होती. याच काळाच्या आगेंमागें महाराष्ट्राच्या भाग्यसूर्यास ग्रहण लागलें होतें. "राष्ट्रैक्याला अवश्य अशा तडजोडीचें मुत्सद्दीपण हरिपंत फडक्यांबरोबरच गेलें. स्वकीयांना-परकीयांना चळचळां कांपावयास लाविणारा पराक्रम महादजी शिंदे यांचेबरोबर गेला, मराठ्यांच्या वैभवानें सवाई माधवरावाबरोबर उडी घातली, मराठेशाहीच्या पुण्याईनें अहिल्याबाईबरोबर नर्मदेंत बुडी मारली व मराठ्यांची शारदादेवी मोरोपंतांबरोबर पंढरींत पांडुरंगाच्या चरणांशी दडी मारुन राहिली." मग उरलें काय ? दुसर्याची धन करुन ‘स्व’ त्वाला पारखे होणारे रावबाजी, त्यांच्या धरसोडीच्या धोरणामुळें आणि कचखाऊ स्वभावामुळे खडकी, येरवडा येथें इंग्रजांकडून मराठ्यांचा पराभव झाला; आणि १७ नोव्हेंबर १८१७ या दिवशीं मराठ्यांच्या राजधानीमध्यें शनिवारवाड्यावरील ध्वज उतरवून त्या स्थानीं यूनियन जॅक फडकविण्यांत आलें. मराठेशाहीचा सौभाग्यतिलक पुसला गेला. या समयी धनी बाजीरावसाहेब पर्वतीवरुन आपलें सामान आटोपून पुरंदर, सासवड या मार्गानें पलायन करीत होते. अनेक गांवे करीत ३० डिसेंबर रोजीं ते चाकण येथें आले. ही बातमी इंग्रजांस समजतांच त्यांनी कोरेगांवजवळ १ जानेवारीस त्यास गांठलेंच. श्रीमंतांनीं बापू गोखले यास आज्ञा दिली कीं, आज लढाई करुन पुढें जाण्यास मार्ग काढून द्या. तेव्हां मराठ्यांचा तोफांचा मारा सुरु झाला. संगिनीचें आणि तरवारीचें मोठे युद्ध झालें. रात्रीं नऊ वाजेपर्यंत लढाई होऊन शेवटीं पेशव्यांचे सैन्य छावणींत आलें. इंग्रजांचे एकशेंपंचाहत्तर जखमी झाले. मराठ्यांचे पांचशें लोक पडले. त्याचे अगोदरच बाजीराव जेजुरीच्या वाटेनें सातार्याकडे निघून गेला होता.
- १ जानेवारी १८१७
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018

TOP