चैत्र वद्य १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“तो गोरा कुंभार हरिभक्त !”
शके १२३९ च्या चैत्र व. १३ रोजीं प्रसिध्द भगवद् भक्त गोरा कुंभार यांनीं समाधि घेतली.
ज्ञानेश्वरकालीन संतमंडळांत गोरा कुंभार हे वयानें व ज्ञानानें श्रेष्ठ असल्यामुळें त्यांना सर्व संत ‘काका’ म्हणून संबोधीत असत. हे तेरढोकी येथील रहिवासी असून वैराग्य व भक्ति या बाबतींत फार थोर होते. मडकीं घडविण्यासाठीं माती तुडवून प्रेमाच्या भरांत परमेश्वराचें नाम घेत आनंदानें डुलत. राहावें हा यांचा क्रम होता.या भजनानंदांत रांगतें पोर पायाखालीं तुडविलें गेलें याचेंहि भान गोरोबाकाकांना एकदां राहिलें नाहीं. गोरोबा मोठे करारी असून उत्तम संतपरीक्षक होते. नामदेवांच्या मस्तकावर थापटणें मारुन त्यांना कच्चा घट म्हणून यांनींच ठरविलें. विठ्ठलाच्या भक्तिप्रेमांत सदैव गुंतून राहिलेले गोरोबा रामी आणि संती या आपल्या स्त्रियांबाबतहि विरक्तच होते. “विठ्ठलाचें नाम स्मरे सर्व काळ । नेत्रीं वाहे जल सद्गतींत ॥ कुल्लाळाचे वंशी जन्मलें शरीर । तो गोराकुंभार हरिभक्त ॥” असा उल्लेख त्यांच्यासंबंधीं सांपडतो. गोरोबांची अभंगरचना थोडकीच असली तरी तीत त्यांच्या वैराग्यज्ञानाची व सगुण भक्तीची खूण पटते. वेदांतपरिभाषेंतील शब्द व अनुभवाच्या खुणा त्यांत भरपूर आहेत:-
“केशवाचे भेटी लागलेंसे पिसें । विसरलों कैसें देहभावा ॥
जाली झडपणी जाली झडपणी । संचरलें मनीं आदिरुप ॥
न लिंपेचि कर्मी न लिंपेचि धर्मी । न लिपे षडूर्मी पुण्यपापा ॥
म्हणे गोरा कुंभार सहजीं जीवन्मुक्त । सुखरुप अव्दैत नामदेवा ॥
अशा प्रकारची गोरोबांची वाणी होती. त्यांच्या भक्तिज्ञानाबद्दल सर्व संतांना मोठा आदर होता. कविवर्य मोरोपंतांनीं गोरोबासंबंधीं म्हटलें आहे:-
“सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठिण सर्वथा पटणें ।
गोरा संत परीक्षी मस्तकिं म्हणूनि सर्व थापटणें ॥”
- १० एप्रिल १३१७
-----------------
चैत्र व. १३
“मुक्ति - नवरिला हो वरिलें !”
शके १८२० च्या चैत्र व. १३ रोजीं पुण्याचे जुलमी प्लेग - अधिकारी रँडे याचा खून करणारे दामोदर हरि चापेकर हे फांशीं गेले !
हिंदुस्थानांत पहिला प्लेग शके १८९८ मध्यें आला आणि याच वर्षी सर्वत्र दुष्कळानेंहि कहर उडविला. पुण्याचे प्लेग - अधिकारी मि. रँड हे होते. या लष्करी लोकांपासून पुणेंकरांना अतोनात जाच सहन करावा लागला. सर्वत्र असंतोष माजला. तेव्हां या असंतोषांतून चापेकर बंधूंनीं एक धाडसी कृत्य केलें. राणीच्या राज्यारोहणाची ‘डायमंड ज्युबिली’ ज्या दिवशीं होती त्याच दिवशीं गणेशखिंडीच्या रस्त्यावर रँड व आयर्स्ट या दोघां इंग्रज अधिकार्यांचे चापेकर बंधु असून तीं एका कीर्तनकाराचीं मुलें होती. ब्राह्मण म्हणून त्यांना लष्करांत जाण्याची बंदी झाली होती.
रँडचा खून झाल्याबरोबर सर्वत्र वातावरण तंग झालें. चापेकराना पकडण्याच्या कामीं द्रविडबंधूंचें साहाय्य झालें. खटला सुरु झाला. मुंबई येथील प्रेसिडेन्सी मँजिस्ट्रेट मि. हँमिल्टन यांच्यापुढें दामोदरपंतांनीं विस्तृत जबानी दिली. दोघां बंधूंना फांशीची शिक्षा झाली. कांहीं दिवस येरवडयांत काढल्यानंतर चैत्र व. १३ रोजीं दामोदरपंत फांशीं गेले. फांशीं गेले. फांशीं जातांना त्याच वेळीं तुरुंगांत असणार्या टिळकांची गीता दामोदरपंतांनीं हातांत ठेवली होती. चापेकर फांसावर गेले त्या वेळचें अलंकारयुक्त वर्णन स्वा. वीर सावरकर यांनीं असें केलें आहे.
“न्यायाधिश हा जोशी उत्तम उदय मुहूर्ता योग्य गणी ।
सत्य - देशहित वर्हाड जमलें कीर्ति नीति ह्या वर्हाडणी ।
टिळक गजानन नमस्कारिला फांस बोहलें मग पुरलें ।
स्मरले गीतामंत्र दामुनें मुक्ति - नवरिला हो वरिलें ।
परी अहाहा ! मायावी ही नवरी वर पळवील कुठें ।
कुठें हरपलें वर्हाड सारें; अंगाला बहु कंप सुटे ।”
- १८ एप्रिल १८९८
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2018
TOP