चैत्र शु. १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.
“आम्ही बुंदेलखंड सोडतों !”
शके १६५१ च्या चैत्र शु. १२ या दिवशीं थोरले बाजीराव पेशवे यांनीं जैतपूर येथें महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
पहिल्या बाजीरावानें उत्तरेंत मोठाले पराक्रम केले त्यापैकींच हा एक आहे. सतराव्या शतकांत उत्तर हिंदुस्थानांत मराठे व रजपूत यांचें ऐक्य होऊन दिल्लीच्या बादशाहीस हादरे बसूं लागले. बुंदेलखंडाचा छत्रसाल राजा स्वतंत्रपणें वागूं लागला. बुंदेलेहि मराठयांना साह्य करुं लागले. रजपूत आणि बुंदेले यांच्या मदतीनें मराठे दिल्लीहि काबीज करतील या भीतीनें बादशहानें अलाहाबादचा सुभेदार महमदशहा बंगश या पराक्रमी पुरुषास मराठे - छत्रसाल व रजपूत यांचें पारिपत्य करण्यासाठीं हुकूम दिला. हा बंगश अफगाणिस्तानांतील बंगश खोर्यांतील. त्याचा बाप आईनखान औरंगजेबाच्या वेळीं हिंदुस्थानांत आला होता. आपल्या कर्तबगारीनें अहंमदशहानें नशीब काढलें. गंगेच्या कांठीं शम्शाबाद परगण्यांत माऊ येथें राहून त्यानें चारपांच हजारांची फौज पदरीं बाळगली होती.इ फर्रुखसियरच्या कारकीर्दीत यास मोठया जहागिरी मिळाल्या. छत्रसालाला जिंकण्याच्या भानगडींत त्याचा मुलगा मारला गेला. तेव्हां महमदशहा चवताळून बुंदेलखंडांत शिरला. मोठया निकराची लढाई होऊन छत्रसालचा पराभव झाला. गुप्त रीतीनें छत्रसालानें बाजीरावाची मदत मागितली.
“जो गति ग्राह गजेन्द्रकी सो गति जानहु आज ।
बाजी जात बुन्देलकी राखी बाजी लाज”
ही त्याची विनवणी ऐकून बाजीरावानें ही कामगिरी अंगावर घेतली. आणि मोठया निकराअनें बंगशशीं युध्द करुन त्यांत त्याचा पराभव केला. जैतपूरवर बंगशची अन्नान्नदशा झाली. त्यानें बाजीरावास करार लिहून दिला, “आम्ही बुंदेलखंड सोडून जातों. पुन:छत्रसालावर चढाई करणार नाहीं.” पुढें दोनतीन वर्षातच छत्रसालाचें निधन झालें. मरते समयीं बाजीरावास त्यानें आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा दिला.
महंमदशहाच्या या पराभवामुळें बाजीरावाचें नांव उत्तरेंत गाजून राहिलें.
- ३० मार्च १७२९
N/A
References : N/A
Last Updated : August 29, 2018
TOP