विठोबाआण्णांचें निधन !
शके १७९५ च्या चैत्र व. ११ रोजी महाराष्ट्रांतील सुप्रसिध्द कवि, प्रवचनकार व ग्रंथकार विठोबाआण्णा दप्तरदार निधन पावले !
मोंगलाईतील बेदर गांवचें हें घराणें. यांचे आजे बाळाजीपंत यांना दप्तरदारीची सनद मिळाली आणि हे दप्तदार झालें. ‘सुश्लोकलाघव’ हा आण्णांचा प्रसिध्द ग्रंथ. यांच्या कवितेंत रसिकता, विव्दत्ता, प्रेम, भक्ति, कोटिबाजपणा, इत्यादि गुण असल्यामुळें ती रसिकांना आल्हादकारक वाटते. यांचे संस्कृत ग्रंथहि प्रसिध्द आहेत. आण्णा मोठे रामभक्त होते. उत्तरायुष्यांत यांना अर्धागवायूचा रोग जडला. “रात्रंदिवस रामनाम, रामाचें ध्यान व रामाचें भजन, असें एक वर्ष गेलें. शके १७९५ ची रामनवमी आण्णांनीं उत्साहानें साजरी केली. वद्य एकादशीच्या दिवशीं प्रात:कालींच स्नानसंध्या, पूजा, इत्यादि नित्यकर्म आटोपून क्षीरीचा नैवद्य श्रीरामचंद्रास समर्पण केला. नंतर ‘अपराधस्तोत्र’ म्हणून तीर्थ - तुलसीपत्राचा स्वीकार केला. व अतिशय तृषा लागली होती म्हणून थोडी क्षीर सेवन केली व उदकप्राशनापूर्वी ‘श्रीराम’ असा मोठयाने नामघोप करुन उदक मुखांत घातलें. झालें, संपलें. त्यांचे पंचप्राण श्रीरामनामाबरोबरच रामांत विलीन झाले.”
संस्कृत आणि मराठी या दोनहि भाषांचा आण्णांचा व्यासंग मोठा जबर होता.“मोरोपंतांच्या मागें जुन्या पध्दतीनें कविता करणारे जे कवि होऊन गेले, त्यांत विव्दत्तेनें, सदाचरणानें, व काव्यगुणांनीं युक्त असा कवि विठोबाआण्णांसारखा दुसरा झाला नाहीं. ... आण्णांची कीर्तनशैलीहि अत्यंत चित्तवेधक होती. अगाध विव्दत्ता, प्रासादिक कवित्व, अप्रतिम रसिकता व सरस वक्तृत्व, इत्यादि गुणांमुळें त्यांच्या कीर्तनास मोठा रंग येत असे.”
‘विधवाविवाह सशास्त्र कीं अशास्त्र ?’ या शंकराचार्याच्यापुढें झालेल्या वादांत यांनीं प्रामुख्यानें भाग घेऊन त्याकरिता श्रुतिस्मृतींतील वचनांनीं युक्त असा ‘विवाहतत्त्व’ नावाचा ग्रंथ दप्तरदार यांनीं लिहिला. ‘शिवस्तुति’, ‘हेतुरामायण’, ‘प्रयोगलाघव’, इत्यादि त्यांचे संस्कृत ग्रंथ प्रसिध्द आहेत.
२३ एप्रिल १८७३