चैत्र व. २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“एकविचारें राज्याभिवृध्दि करावी !”
शके १६५३ च्या चैत्र व. २ रोजीं सातारचे शाहू छत्रपति व कोल्हापूरचे संभाजी राजे यांचेमध्यें प्रसिध्द असा वारणेचा तह होऊन तंटा कायमचा मिटला.
शके १६२९ मध्यें मोंगलांचे कैदेंतून सुटल्यानंतर शाहूनें आपल्या राज्यविस्तारास सुरुवात केली. याच वेळीं कोल्हापूरास स्वतंत्र गादी स्थापन झाली होती. तीवर राजसबाईचा मुलगा संभाजी हा कारभार पाहात होता. मराठी राज्यांत ही अशी दुही राहिल्यामुळें निजामादि शत्रूंना फावलें. दरम्यानच्या काळांत संभाजीनें शाहूच्या राज्यांत लुटालूट आरंभली. प्रतिनिधींच्या साह्यानें शाहूनें संभाजीचा पाडाव केला.संभाजी सलोग्वा करण्यास सिध्द झाला. दोघां राजबंधूची भेट कर्हाडापुढें जाखणवाडीच्या माळावर झाली. “ परस्पर सन्निध येऊन, ऐक्यता होऊन शाहूमहाराज यांच्या पायावरी डोई श्रीमन्महाराज राजश्री संभाजीमहाराज छत्रपति यांणीं ठेविली महाराजांनीं परस्परें उभयतां बंधूंनीं आलिंगनें केलीं, त्या समयीं मोहरा व रुपये व सोन्याचीं फुलें व रुप्याचीं फुलें परस्पर सत्के जाहले. त्या वेळीं तोफेची सरबत्ती व नाना प्रकारचीं वाद्यें, व शहाजानें वाजवून आनंद झाला. फाल्गुन शु. तृतीया मंदवारीं दोन प्रहरां याप्रमाणें भेटीचा समारंभ झाला.”
यानंतर चैत्र व. २ रोजीं जो वारणेचा तह झाला त्यांतील कलमें थोडक्यांत अशीं:-“इलाखा वारुण महाल तहत संगम दक्षिण तीर कुल दुतर्फा मुलूख दरोबस्त देखील ठाणीं व किल्ले तुम्हांस (संभाजीस) दिले आसत. तुंगभद्रेपासून तहत रामेश्वरदेखील संस्थानें निमे आम्हाकडे ठेपून निंमे तुम्हाकडे करार करुन दिलीं असत. तुम्हाशीं जे वैर करतील त्यांचें पारिपत्य आम्हीं करावें. आम्हांशीं वैर करतील त्यांचें पारिपत्य तुम्हीं करावें, तुम्हीं आम्हीं एकविचारें राज्याभिवृध्दि करावी. वारणेच्या व कृष्णेच्या संगमापासून दक्षिण तीर तहत निवृत्तिसंगम (कृष्णा - तुंगभद्रेचा संगम ) तुंगभद्रेपावेतों दरोबस्त देखील गड ठाणीं तुम्हांकडे दिलीं असत ... इकडील चाकर तुम्हीं ठेवूं नये, तुम्हांकडील चाकर आम्हीं ठेवूं नये.”
- १३ एप्रिल १७३१
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2018
TOP