‘मला लोक काय म्हणतील ?’
शके १४५० च्या चैत्र शु. १४ रोजीं फत्तेपूर - शिक्री येथें महापराक्रमी राणा संग आणि बाबर यांचें घनघोर युध्द होऊन राणा संग याचा पराभव झाला.
या काळीं रजपुतांपैकीं एकटें मेवाडचेंच राज्य बलाढय होतें. चितोड गडावर राणा संग नांवाचा पराक्रमी राजा राज्य करीत होता. दिल्लीच्या सुलतान इब्राहीम लोदीचा अनेकवार पराभव या राण्यानें केलेला असल्यामुळें त्याचें वजन अतोनात वाढलें होतें. बाबराला त्याचें भय फारच वाटे. त्याच्याशीं सलोखा करण्यास राणा तयार नव्हता. दोघानींहि युध्दाची तयारी जोरांत केली. ग्वाल्हेर, अजमीर, शिक्री, रायसेन, काल्पी, इत्यादि ठिकाणचे राजे त्याला मदत करणार होते. एका पायानें पंगु, एका डोळयानें अंध, एका हातानें थोटा असा हा राणा संग्रामासिह उर्फ संग पराक्रम करण्यास सिध्द झाला. शिक्रीजवळ खानवा येथें दोनहि फौजा एकत्र येऊन युध्दास सुरुवात झालीइ. एकदोन हल्ल्यानंतरच बाबराचें सैन्य पळूं लागलें. आपल्या अधर्माचरणामुळें आपला पराभव होतो असें पाहून बाबरानें ईश्वराची करुणा भाकून ऐषाराम सोडून दिला. मद्यपानास बंदी केली. आपल्या सैन्यास त्यानें उत्तेजित केलें, “उठा बंधूंनो ! अपयश पदरीं घेऊन जगण्यापेक्षां धर्मासाठीं आजच मरण्यास सिध्द व्हा. देहांत प्राण असेपर्यंत लढूं पण हार जाणार नाहीं, अशी शपथ घ्या.” या स्फूर्तिदायक उपदेशामुळें मुसलमान पुन: अवेशानें लढूं लागले. “तोफांचे गोळे सुटले, घोडे किंचाळूं लागले, प्रेतांचे ढीग पडले, रक्ताचे पाट वाहूं लागले, घनघोर संग्राम झाला.” अशा वेळीं कोणी एक रजपूत बाबरास फितुर झाला. राणा संगास बर्याच जखमा झाल्या. त्याच्या सैनिकांनीं त्याला पहाडांत पळवून नेलें ! रजपूत सैन्य निराशेनें रणांगणांतून माघारें फिरलें ! पराजयाचें वृत्त ऐकून राण्यास मनस्वी वाईट वाटलें. “मी रणांगणावर मरण्याची इच्छा करीत असतांना मला गैरशुध्दींत असतांना येथें आणून मोठा घात केलात. मला लोक काय म्हणतील ? ‘पळपुटा’ संग्राम म्हणून मुलें देखील मला हंसतील. चितोडच्या संरक्षणार्थ राणा मेला अशी कीर्ति माझी व्हावयास पाहिजे होती.” असे उद्गार राण्यानें काढले.
- १६ मार्च १५२८
----------------
चैत्र शु. १४
“... नांवें सांगणार नाहीं !”
शके १७७९ च्या चैत्र शु. १४ रोजीं सत्तावनच्या स्वातंत्र्य - युध्दांतील पहिल्या चकमकींतील हुतात्मा मंगल पांडे हा फांसावर चढला !
सत्तावनच्या क्रांतियुध्दाला ‘चरबी माखलेलीं काडतुसें’ हें प्रासंगिक कारण घडलेलें दिसलें तरी ‘स्वधर्म नि स्वराज्य यांच्या पवित्र हेतूनें प्रेरित होऊनच १८५७ चे वीरश्रेष्ठ लढले’ असा निर्वाळा इंग्रज इतिहासकारहि देऊं लागले. चरबी माखलेल्या काडतुसांचा पहिला प्रयोग १९ व्या तुकडीवर होणार होता. काडतुसें घेण्यास नकार दिल्यावर त्यांच्यावर सक्ती करण्यांत आली आणि; शेवटी या तुकडीला नि:शस्त्र करण्याचें ठरलें. ही मानखंडना शिपायांना सहन झाली नाहीं. मंगल पांडे नांवाचा ब्राह्मण क्षात्रवीर त्यांचा पुढारी बनला. “रणांगणावर अत्यंत धाडसी नि शूर, तर चारित्र्यानें अत्यंत शुध्द नि पापभीरु, अशा या स्वधर्मावर प्राणापलीकडेहि प्रेम करणार्या तेजस्वी, तरुण ब्रह्मवीराच्या हृदयांत स्वदेश - स्वातंत्र्याची कल्पना चमकून जाऊन त्याचा सबंध देह अद्भुत अशा विद्युत् शक्तीनें चेतून गेला.” त्यानें उठावणीला सुरवात केली, “उठा, बंधूंनो, उठा, तुम्हांला तुमच्या धर्माची शपथ आहे. या आपल्या स्वातंत्र्यास्तव या नीच शत्रूवर आपण तुटून पडूं या.” विरोध करणार्या इंग्रज अधिकारी मंगल पांडयाच्या गोळीला बळी पडले. युरोपियन सैनिक त्याला पकडण्यास धांवले. तेव्हां फिरंग्याच्या हातीं सांपडण्यापेक्षां मरण बरें म्हणून यानें आपल्या हातची बंदूक स्वत:वर झाडून घेतली व तो घायाळ होऊन पडला.
न्यायालयापुढें चौकशी होऊन मंगल पांडे यास फांशीची शिक्षा सुनावण्यांत आली. बराकपूरमध्यें फांशीं देण्यास कोणीहि तयार होईना. तेव्हां कलकत्त्याहून चार मांग बोलाविले, आणि चैत्र शु. १४ या दिवशीं या हुतात्म्याला वधस्थलाकडे नेण्यांत आलें. “आपल्या बरोबरीच्या सहाय्यक कटवाल्यांचीं नांवें प्राणांतींहि सांगणार नाहीं असें म्हणत असतांनाच एकदम गळफासंसाचा दोर खेंचला गेला. नि मंगल पांडयाचा दिव्य आत्मा स्वर्गास गेला. स्वातंत्र्याच्या बीजाला मंगल पांडयाचें उष्ण रक्त मिळाल्यामुळें त्याचा वृक्ष लौकरच मोहोरुन आला.”
- ८ एप्रिल १८५७