चैत्र शु. ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.
जिवावरचें बोटावर निभावलें !
शके १५८५ च्या चैत्र शु. ८ रोजीं शिवाजीच्या राहत्या वाडयांत तळ देऊन गुरगुरणार्या शाहिस्तेखानावर रात्रीं छापा घालून शिवरयांनीं त्याचा पराभव केला.
दक्षिण कोंकण व पुणें - सातारा या प्रांतांतून शिवाजीला एकसारखा त्रास देण्याचें कार्य शाहिस्तेखान करीत होता. मोरे, अफझुलखान, सिद्दी जोहार, आदींचा पाडाव सहज झाला असला तरी आतांचा प्रसंग बांका होता. या समयीं शिवाजी पुण्यानजीकच सिंहागडावर होता. भीतीमुळें खानानें पुण्याचा बंदोबस्त पक्का ठेवला होता. शिवाजीनें प्रथम दोन ब्राह्मणांना शहरांत पाठविलें आणि त्यांच्याकरवीं खानाच्या व्यवस्थेची माहिती मिळविली. आणि चैत्र शु. ८ रोजीं सायंकाळीं चारशें निवडक मावळे बरोबर घेऊन तो पुण्यास आला. बाबाजी बापूजी आणि चिमणाजी बापूजी या दोन सरदारांनीं पहारा बदलण्याचें निमित्त करुन वाडयांत प्रवेश केला. रमजानचा उपास रात्रीं सोडून मंडळी झोंपण्याच्या तयारींत होती. स्वयंपाकघराच्या बाजूस निवडक लोकांनिशीं चिमणाजी बापूजी आला, व मध्यरात्रीं लष्करी बाजा सुरु होतांच कुदळींनीं भितीस भोंक पाडून ते सर्व आंत शिरले. कापडी पडद्यांनीं बनविलेल्या खोल्यांचे पडदे तरवारीनें कापून लोक थेट खानाच्या खोलींत आले. जनानखान्यांतील स्त्रियांत एकच गोंधळ उडाला.
खानाचा मुलगा फत्तेखान मारला गेला. एका चाणाक्ष बाईने दिवे मालविले. तों फारच आरडाओरडा झाला. एवढयांत पुढच्या दरवाजानें बाबाजी बापूजीची टोळी आंत आली तेव्हां खान भाला घेऊन सज्ज होता; पण त्याचें कांहीं न चालून तो खिडकींतून निसटून जाऊं लागला; याचे वेळीं शिवाजीनें वार करुन त्याच्या हाताचीं बोटें छाटून टाकलीं. खान आणि त्याचे लोक पळून गेल्यावर शिवाजीचें काम झालें ! या चकमकींत पहारेकर्यापैकीं सहा इसम मृत्यु पावले. खानाचा मुलगा, सहा बायका व दासी मारल्या गेल्या. चार वर्षें आपला वाडा शाहिस्तेखान वापरतो आणि उपद्रव देतो म्हणून शिवाजीनें असा सूड उगविला.
- ५ एप्रिल १६६३
------------
चैत्र शु. ८
मोंगलावर मात केली !
शके १६५९ च्या चैत्र शु. ८ रोजीं थोरल्या बाजीराव पेशव्यांनीं दिल्लीवर हल्ला करुन मोंगलांचा पराभव केला.
आजपर्यंत महंमूद गिझनी, अल्लाउद्दीन खिलजी, आरंगजेब आदींनीं आपल्या राक्षसी सामर्थ्यानें लाखों विस्कळित हिंदूंचा धुव्वा उढविला होता. आतां मराठयांच्या पराक्रमास भरतें येत होतें. बादशहा व उमराव सर्वच नामर्द बनून शिंदे, होळकर पवार, जाधव, कदम, बाजी भीमराव, इत्यादींचें बळ उसळया घेत होतें. गुजराथ, माळवा प्रांतांची कायमची सुभेदारी बाजीराव बादशाहाकडे ठासून मागत होता, आणि त्याला नकार आल्यामुळें बाजीराव उत्तरेच्या मोहिमेवर निघाला. शिंदे - होळकर सर्वत्र दंगल उठवून मोंगलांस दमास आणीतच होते. मल्हारराव होळकरानें जी गनिमी काव्याची लढाई दिली ती बादशहाचा सल्लागार सादतखान यास समजली नाहीं; तो आपला विजयच समजून बेफिकीर राहिला. आपण मराठयांचा संपूर्ण पराजय केला असें त्यानें बादशहास कळविलें ! तेव्हां आपण जिवंत आहोंत हें दर्शविण्यासाठीं बाजीराव निकडीनें दिल्लीस येऊन ठेपला. शहरांत काळकादेवीची जत्रा चालू होती; त्यांतील कांहीं हत्ती व दुकानें मराठयांनीं लुटलीं. ही बातमी बादशहास समजतांच तो गोंधळून गेला. पळून जाण्यासाठीं त्यानें यमुनेंत नावा सज्ज केल्या. पण याच वेळीं अमीरखान नांवाच्या माणसानें शहरांतील बारा हजार स्वार, वीस हजार पायदळ व तोफखाना यांसह बाजीरावावर हल्ला केला. भ्याल्यासारखें सोंग करुन बाजीरावानें मोंगलांस पूर्णपणें अंगावर घेतलें. एकदम चवताळून मराठयांनी मोंगलांस तलवारीनें कापून काढलें. शहरवासी लोकांना वा बादशहास त्रास देण्याचा बाजीरावाचा मानस नव्हता. आपल्या विजयी झालेल्या अल्प फौजेनिशीं बाजीराव लोकांचीं मनें शांत करण्यासाठी दिल्लीहून सात कोसांवरील सराई - आला बिदीखान - येथें जाऊन राहिला.
मराठे - मोंगलांचा हा झगडा इतिहासांत अपूर्व गणला गेला आहे. दोघांनींहि आप आपलें बल संपूर्णपणें उपयोगांत आणलेलें दिसून येतें.
- २८ मार्च १७३७
----------------
चैत्र शु. ८
‘राज्यद्रोह हाच माझा धर्म !’
शके १८५२ च्या चैत्र श. ८ या दिवशीं प्रसिध्द दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरु केला.
हिंदुस्थानच्या किनार्यावर अपरंपार मीठ तयार होतें. परंतु या मिठावर सरकारला प्रचंड कर देणें जनतेला आवश्यक झालें होतें. जनतेचे वाली महात्मा गांधी यांना ही गोष्ट अन्यायाची वाटली. त्यांनीं त्याविरुध्द लढा पुकारला. कोणालाहि पटतील अशा अकरा मागण्या महात्माजींनीं व्हाइसराँयकडे सादर केल्या. सरकारकडून धमकावणीचें उत्तर आलें. गांधीजी त्याला डरणारे थोडेच होते ! ‘गुढगे टेकून भाकरी मागितली असतां धोंडा पदरांत पडला’ असे उद्गार काढून गांधी पुढील तयारीस लागले. ‘या चळवळींत यश मिळालें नाहीं तर पुन:साबरमतीच्या आश्रमांत पाऊल टाकणार नाहीं’, ‘माझ्या आयुष्यांतील हा स्वराज्याचा शेवटचा लढा आहे.’ वगैरे प्रतिज्ञांनीं त्यांनीं सर्वांचें लक्ष आपणांकडॆ ओढून घेतलें. ‘अत्याचार घडले तरी हा लढा मी थांबविणार नाहीं’, असे आश्वासन त्यांनीं लोकांना दिलें. आणि ‘हें धर्मयुध्द आहे. आणि तें ईश्वराचें नांव घेऊन मी चालविणार आहें’, अशी भूमिका घेऊन फाल्गुन शु. २ या दिवशीं ते साबरमती आश्रमांतून बाहेर पडले. ‘दांडी’ हें गुजराथमधील स्थान त्यांनीं सत्याग्रहाकरितां निवडिलें होतें. गांधीजींच्या भालावर कुंकुमतिलक होता. गळयांत हातसुतांचे हार होते. सुवासिनींनीं ओवाळिल्यानंतर गांधीजींनीं ‘दांडी यात्रे’स सुरुवात केली. ‘राज्यद्रोह करणें हाच मुळीं माझा धर्म, तोच मी प्रजेला शिकवीत आहें,’ असें गांधींचें सांगणें होतें.
त्याप्रमाणें सर्व भारतांत या अव्दितीय लढयाचे पडसाद उमटूं लागले. ठिकठिकाणीं गांधींचें स्वागत झालें. शेवटीं चैत्र शु. ८ या दिवशीं प्रभातकालीं गांधीजींनीं समुद्रकिनार्यावरील मीठ उचलून कायद्याचा भंग केला. “एका महाभंगल यज्ञाचा तो आरंभ होता. सर्व तीर्थाचा राजा असलेल्या सागराच्या तीरावर पारतंत्र्याचा अश्वमेध करणारें यज्ञकुंड महात्माजींनीं प्रज्वलित केलें.”
- ६ एप्रिल १९३०
N/A
References : N/A
Last Updated : August 29, 2018
TOP