चैत्र व. ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
राणा संग्रामसिंहाचा जन्म !
शके १३०४ च्या चैत्र व. ९ रोजीं मेवाडचा महापराक्रमी राणा संग्रामासिंह ऊर्फ संग याचा जन्म झाला.
संग्रामसिंह हा रायमलचा पुत्र. भावाभावांच्या कलहामुळें पूर्वायुष्यांत संग्रामसिंह आज्ञातवासांत राहिला. सैन्याचा सेनापति होण्याची ज्याची योग्यता तो संग गुराखी बनला. “रणांगणावर शत्रूचा रांधा करण्याचें ज्याचें काम तो राणा संग भाकरी भाजूं लागला. ” श्रीनगरच्या राव करमचंदाकडे नोकरीस राहून तो सैन्यांतील शिपाई बनला. यथावकाश बंधूंचा नायनाट झाल्यावर बाप राज्याच्या विवंचनेंत असतां संग चितोडास आला आणि थोडयाच दिवसांत तो चितोडचा राजा बनला ! या वेळीं मेवाडभूमि यवनांकडून घेरली गेली होती. दिल्ली, माळवा, गुजराथ, सिंध, पंजाब या प्रांतांतून आपलें आसन स्थिर करुन मुसलमानी सत्ता चितोडवर डोळा ठेवून संधीची वाट पाहत होती. परंतु राणा संग्रामसिंहानें त्या सर्वांना एकदम तोंड देऊन चितोडचें वैभव कायम राखलें. ऐशीं हजार सेना जमवून संगानें मेवाडचें रक्षण केलें. दिल्लीच्या इब्राहीम लोदीचा त्यानें पराभव केला. याच वेळीं संग लुळापांगळा झाला. ऐशीं जखमांचीं वीरभूषणें त्याच्या कणखर देहावर शोभून दिसत होती. एका डोळयानें आंधळा, एका हातानें थोटा, एका पायानें लंगडा, राणा रणांगणावर तेजस्वितेनें तळपत असे. रणथंमोरसारखा अजिंक्य किल्ला त्यानें जिंकल्यामुळें त्याची दहशत सर्वत्र बसली. त्याच्या आयुष्यांतील क्रान्तिकारक व घनघोर असा संग्राम दिल्लीचा बादशहा बाबर याच्याशीं झाला. या युध्दांत राणा घायाळ झाला. चितोडचें रक्षण आपल्या हातून झालें नाहीं म्हणून राणा दु:खानें विव्हळत असतां कोणा अधमानें त्याच्यावर विषप्रयोग केला. त्याचा प्राण घेण्याचें सामर्थ्य कोणाच्याहि तरवारींत उरलें नव्हतें म्हणून जणुं त्याच्यावर हा प्रसंग आला. यांतच राण्याचा अंत झाला.
राणा संग्रामसिंह मजबूत, धिप्पाड, गौरवर्ण, तेजस्वी, कृतज्ञ, बुध्दिमान आणि न्यायी असा होता. खुद्द बाबरानेंहि त्याचें स्तुति - स्तोत्र गाइलें आहे !
- १२ एप्रिल १३८२
-------------------
चैत्र व. ९
मुरारबाजीचा अद्भुत पराक्रम !
शके १५८७ च्या चैत्र व. ९ रोजीं पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशीं लढतांना अद्भूत पराक्रम करतांकरतां प्रख्यात वीर मुरारबाजी धारातीर्थी पतन पावला !
चंद्रराव मोरे यांच्या पथकांत बाजी मुरार नोकरीस होता. याचा मुलगा मुरारबाजी. याचा जन्म शके १५३८ मध्यें झाला. शिवरायांनीं मोरे यांच्यावर जेव्हां स्वारी केली तेव्हां मुरारबाजीचा पराक्रम पाहून शिवाजीनें त्याला आपल्याच पदरी ठेवून घेतलें; आणि त्यास पुरंदरची किल्लेदारी दिली. दरम्यान दिल्लीहून शिवाजीचा पाडाव करण्यास आलेल्या दिलेरखानानें शके १५८७ च्या चैत्र व. ९ रोजीं पुरंदरला वेढा दिला. मुरारबाजीनें त्यांना दाणावैरण मिळूं न देण्याची व्यवस्था करुन त्यांचा दारुगोळा पेटवून दिला. मोंगलांनीं मोठया निकरानें खालचा कोट काबीज केला; आणि त्यानंतर मोंगल सेना गाफिल राहिली तेव्हां मराठयांनीं वरुन गोळयांचा वर्षाव सुरु केल्याबरोबर शत्रुसैन्याची दाणादाण उडाली. मोंगल - मराठे यांचें तुंबळ युध्द झालें. खुद्द मुरार तर तरवार गाजवीत दिलेरखानाच्या तंबूपर्यंत आला तेव्हां खानासहि आश्चर्य वाटलें; आणि अत्यंत त्वेषानें दिलेरखानानें मराठयांच्यावर हल्ला केला. कित्येक मराठे वीर जखमी झाले, कित्येक मरण पावले. लढतां लढतां मुरारची ढाल तुटली, तेव्हां हातास शेला गुंडाळून मुरारबाजी तिच्यावर शत्रूचे वार झेलूं लागला. खानाच्या व त्याचें शिर उडालें ! मराठयांचा श्रेष्ठ वीर,शिवरायांचा विश्वासू योध्दा याप्रमाणें गतप्राण झाला. मुरारबाजीचें शव मोंगलाच्या हातीं लागूं न देता मराठयांनीं तें शिवरायांकडे रायगडावर पाठविलें. शिवाजीस अतोनात दु:ख झालें. मुरारबाजी पडला म्हणून काय झालें, आम्हीही तसेंच लढूं.” असा त्यांचा निश्चय होता. त्याच्या मृत्यूच्या दुसर्याच दिवशीं शिवाजीमहाराज पुरंदर किल्ल्यावर आले.
३० मार्च १६६५
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2018
TOP