तीर्थकर महावीर यांचा जन्म !
शालिवाहनशकपूर्व ६७७ मध्यें चैत्र शु. १३ या दिवशीम जैनांचा चोविसाव तीर्थकर महावीर यांचा जन्म झाला.
हल्लीं प्रचारांत असणार्या जैन धर्माचे प्रचारक हे होत. यांच्यापूर्वी पार्श्वनाथ नांवाचे तेविसावे तीर्थकर सुमारें २५० वर्षापूर्वी होऊन गेले. महावीरांचे वडील सिध्दार्थ नांवाचे होते. ज्ञान नांवाच्या क्षत्रिय कुळांत यांचा जन्म झाल्यामुळें यांना ज्ञानपुत्र असेंहि म्हणतात. महावीर हे राजपुत्र असले तरी पहिल्यापासून विरक्त होते. एक तपभर प्रवास करुन त्यांनीं इंद्रियदमन केलें. कडक तपश्चर्या केल्यानंतर त्यांना केवलज्ञान प्राप्त झालें. त्यानंतर त्यांनीं धर्मोपदेश करण्यांत व इतरांना तपश्चर्येचे नियम समजावून सांगण्यांत आपलें आयुष्य घालविलें. मगध येथील बिंबिसार राजानें यांच्यापासूनच दीक्षा घेऊन जैन धर्माचा स्वीकार केला होता. या काळांतच वेदबाह्य अशा बुध्दधर्माचा उदय झाला होता. धर्माचरणास संन्यासदीक्षा आवश्यक आहे असें दोनहि पंथाचें मत होतें. जैन धर्मपंथ आपल्या पंथाची व्याख्या अशी करतो - “राग, व्देप, इत्यादि दोषांना ज्यानें जिंकलें, अथवा ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय, अंतराय, इत्यादि कर्मशत्रूंना ज्यांनीं जिंकले; तो किंवा ते जिन गणधरादि त्यांच्यामध्यें जे श्रेष्ठ तीर्थकर केवल ज्ञानी, त्यांस जिनेश्वर म्हणतात. त्यांना वीतराग, अर्हत, परमेष्ठी, सर्वज्ञ, शास्ता अशींहि नांवें आहेत. अर्थात् जिनाचे अनुयायी ते जैन होत.” देवालये तीर्थस्थानें, देवता, पूजाविधि वगैरे गोष्टींत जैन धर्माचें साम्य हिंदु धर्मांशीं दिसून येतें. या पंथांत श्वेतांबरी व दिगंबरी असे दोन भेद आहेत. फरक तत्त्बज्ञानाचा नसून धर्माचरणाचा आहे. जैन तत्त्वज्ञानांत नऊ प्रमुख पदार्थ मानण्यांत आले आहेत: जीव, अजीव, पुण्य, पाप, आश्रव, संवर, बंध, निर्जर, मोक्ष.
जैन हे पुरुषरुपी ईश्वर मानीत नाहींत. त्यांची जागा अनेक सिध्दस्थितीला पोंचलेल्या आत्म्यांनीं घेतली आहे. परंतु, जैन मूर्तिपूजक असून त्यांच्यांत प्रार्थनाविधिहि आहे.
---------------
चैत्र शु. १३
जालियनवाला बागेंतील कत्तल !
शके १८४१ च्या चैत्र शु. १३ रोजीं पंजाबांत अमृतसर येथें सुवर्णमंदिराशेजारीं जालियनवाला बागेंत जनरल डायर यानें हजारों निरपराधी आबालवृध्दांची कत्तल केली.
त्या वेळीं रौलट अँक्टला विरोध करण्यासाठीं महात्मा गांधींची सत्याग्रह मोहीम जोरांत सुरु होती. आणि तिला विरोध करण्याचा अट्टाहास ब्रिटिश राजसत्ता बेफामपणें करीत होती. तीनचार दिवसांपूर्वीपासून अमृतसरच्या लोकांचे हाल सुरु झाले. जालियनवाला बागेंत सभा आहे, लाला कन्हय्यालाल हे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत, असें जाहीर करण्यांत आलें. गुप्त पोलिसांशीं सख्य असणार्या हंसराज नांवाच्या गृहस्थानें सभेची तयारी चालविली. सभेस हजारों लोक आले. वरुन विमान घिरटया घालू लागतांच सभास्थान न सोडण्याबद्दल श्रोत्यांना सागून हंसराजानें गुप्त पोलिसांना खुणा केल्या. थोडयाच वेळांत लष्करी लोकांनीं बागेच्या तोंडाशीं वेढा दिला. गोळीबार सुरु होण्यापूर्वीच हंसराज प्लँटफाँर्मवरुन उतरला; आणि पसार झाला. इतर लोक घाबरुन भितीवरुन उडया टाकीत पळूं लागणार इतक्यांत गोळीबार सुरु झाला. सभास्थानास एकच दार होतें आणि तेथें तर लष्करी मारा सुरु होता. असंख्य लोक जखमी झाले. या कत्तलींत सात महिन्यांपासून सत्तर वर्षापर्यंतचीं सर्व वयाचीं माणसें होतीं. त्यांत साधु - बैरागी होते, स्त्रियाहि होत्या. या गोळीबारांत जितकीं अधिक माणसें बळी घेतां येतील तितकीं घेण्याचा निश्चय डायरचा होता. गोळीबारप्रसंगीं जमिनीवर लोळण घेऊन जीव वांचवण्याचा प्रयत्न माणसें करुं लागलीं तेव्हां खालीं बसून गोळया झाडण्याचा हुकूम सुटला ! शेवटीं दारुगोळा संपला तेव्हा कत्तल थांबली. डायरची स्वारी निघून गेली.
बागेंत रात्री प्रेतांचा खच पडला होता. असंख्य जखमी झाले होते. त्यांची विल्हेवाट लावणें शक्य नव्हतें. कारण रात्री ८ च्या नंतर घराबाहेर पडणारास गोळी घातली जाईल असा हुकूम होता. त्यामुळें केवळ पाणी वेळेवर मिळालें नाहीं, म्हणूनहि शेकडों लोकांचे प्राण गेले.
- १३ एप्रिल १९१९