चैत्र व. ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
भारताचार्याचा स्वर्गवास !
शके १८६० च्या चैत्र व. ६ रोजीं सुप्रसिध्द विव्दान्, मार्मिक संशोधक, मराठी व इंग्रजी भाषेचे विख्यात अभ्यासक भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचें निधन झालें.
शिक्षणक्रम पुरा झाल्यावर चितामणरावांनीं. प्रथम कोल्हापूर व ग्वाल्हेर संस्थानांत न्यायाधिशाचें काम केलें. त्या वेळेपासून त्यांचा विद्याव्यामंग सतत चालू राहून त्यांनीं संस्कृत, प्राकृत, मराठी, हिंदी व उर्दू या भाषांचा चांगला अभ्यास केला. त्यांनीं लिहिलेलीं श्रीकृष्णचरित्र व श्रीरामचरित्र हीं पुस्तकें आबालवृध्दांना अजूनहि वाचनीय वाटतात. महाभारताचा व्यासंग दांडगा असल्यामुळें त्याचें ‘महाभारताचा उपसंहार’ हें पुस्तक अत्यंत संशोधनात्मक व विचारपूर्ण झालें आहे. रामायणावर परीक्षणात्मक लिखाणहि त्यांनीं थोडें लिहिलें आहे. शिलालेख, ताम्रपट, दानपत्रें, इत्यादींच्या साहाय्यानें व पेशावरपर्यंत स्वत:प्रवास करुन वैद्य यांनीं ‘मध्ययुगीन भारत’ या नांवाची तीन पुस्तकें लिहून जुन्या इतिहासांत बहुमोल भर घातली. इतिहासाचार्य कै. वि. का. राजवाडे यांच्या ‘ज्ञानेश्वरीचे मराठी व्याकरणावर यांनीं लिहिलेले पांच टीकालेख’ व ‘निबंध आणि भाषणें,’ या त्यांच्या पुस्तकांतील लेख पाहून यांच्या भाषाशास्त्राच्या अभ्यासाचीहि चांगलीच कल्पना येते. ‘माझा प्रवास’ नांवाचें, १८५७ च्या क्रांतियुध्दाची हकीकत सांगणारें पुस्तक त्यांनीं प्रसिध्द केलें आहे. पानपत - प्रकरणावर आधारलेली “दुर्दैवी रंगू” ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी सुप्रसिध्द आहे. टिळक विद्यापीठाचे कुलपति म्हणून त्यांनीं काम केल्यावर विद्यापीठानें त्यांना विव्दत्कुलशेखर ही पदवी दिली होती. ते पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळाचे अध्यक्ष आणि संस्थापक होते. ‘History of Sanskirt Literature', `Riddle of the Ramayan', `Epic India', Shivaji - the Maratha Swaraj' आदि त्यांचे इंग्रजी ग्रंथहि मान्यता पावले आहेत. १९०८ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचें अध्यक्षपद त्यांनीं विभूषित केलेलें होतें.
- २० एप्रिल १९३८
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2018
TOP