चैत्र शु. ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.


मत्स्य भगवानांचा जन्म !

चैत्र शु. ३ या दिवशीं मत्स्य भगवानांचा जन्म झाला. दशावतारांतील हा पहिला अवतार होय.
दुष्टांचा संहार आणि सज्जनांचें रक्षण करुन धर्मसंस्थापनेसाठीं परमेश्वर अवतार घेत असतो असा भारतीयांचा विश्वास आहे. मत्स्यावतार हा दशावतारांतील पहिला अवतार आहे.पंचविसाव्या कल्पाशेवटीं ब्रह्मदेवाची रात्र सुरु झाली आणि सर्वत्र प्रलयकाल सुरु होऊन स्वर्ग, पृथ्वी, आदि सर्व लोक बुडून गेले. सर्वत्र अधर्माचरण माजून अंदाधुंदी सुरु झाली. ब्रह्मदेव निद्रिस्त असतांना त्याच्या मुखांतून जे वेद बाहेर पडले ते हयग्रीव नामक दैत्यानें पळविले. त्या दैत्याचा संहार करण्यासाठीं भगवान्‍ विष्णूंनीं मत्स्याचा अवतार घेतला.
या वेळीं सत्यव्रत नांवाचा पृथ्वीपति होता. हा तपस्वी राजा एकदां कृतमाला नदींत स्नान करुन तर्पण करीत असतां त्याच्या ओंजळींत एक मत्स्य आला. राजा त्याला नदींत फेकणार तों तो मत्स्य म्हणाला, “राजा, माझें रक्षण कर.” तेव्हां आपल्या कमंडलूंत त्यास घालून राजा घरीं आला. पण घरीं येतांच त्या मत्स्याचा देह वाढूं लागला. कमंडलूंत, विहिरींत,सरोवरांतहि तो मांसा मावेनासा झाला. तेव्हां राजानें चकित होऊन विचारलें, “मत्स्यरुपानें मला मोहित करणारा तूं कोण आहेस ?” त्यावरुन मत्स्य भगवान्‍ प्रसन्न होऊन बोलले, “आजपासून सातवे दिवशीं प्रलयकाल होईल त्या वेळीं मी एक नौका पाठवीन. त्या वेळीं तूं आणि सप्तर्षि त्या नौकेंत बसा.” मत्स्य अदृश्य झाला, आणि बरोबर सातवे दिवशीं प्रलयकाल होईल त्या वेळीं तूं आणि सप्तर्षि त्या नौकेंत बसा.” मत्स्य अदृश्य झाला, आणि बरोबर सातवे दिवशीं समुद्र एकाएकीं वाढून सर्व पृथ्वी पाण्यांत बुडून गेली. ठरल्याप्रमाणें सत्यव्रताला पाण्यांत एक नांव दिसलीइ. तीवर तो सप्तर्षीसह चढला. त्या राजानें भगवान्‍ मत्स्याची स्तुति केली. प्रलयकालाच्या शेवटीं मत्स्यानें हयग्रीव दैत्याला मारलें आणि त्यापासून वेद घेऊन ते ब्रह्मदेवाला देऊन टाकले. सत्यव्रत राजाला जें ज्ञान मत्स्य भगवानांनीं दिलें आहे तें मत्स्यपुराणांत सांपडतें. हिंदु संस्कृतींतील मत्स्य - कूर्मादि अवतार उत्क्रांतिशास्त्राला धरुन आहेत असें जाणत्यांचें मत आहे.

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP