चैत्र शु. १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.
चैत्र शु. १
१) शालिवाहन शकाचा आरंभ !
चैत्र शु. १ हा दिवस शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा म्हणून भारतात महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रांत याच शकाची विशेष महती आहे.
पुराणग्रंथांत ज्यांचें वर्णन आंध्रभृत्य म्हणून केलें आहे त्यांचाच उल्लेख शिलालेखांतून आंध्र राजघराण्यांतील राजे सातवाहन म्हणून केलेला असतो. या ‘सातवाहना’ चें अपभ्रष्ट रुप शालिवाहन. ख्रि.पू. २३० ते ख्रि.उ. २२७ शालिवाहन राजाचा काळ समजण्यांत येता. त्याचें वसतिस्थान गोदा व कृष्णा यांच्या मुखाजवळ होतें. ‘सातवाहन’ या कुलनामानें विभूषित असलेल्या तीस राजांनीं आंध्र देशांत राज्य करुन इतरत्र राज्यविस्तार केला. त्यांपैकीं कोणत्या सातवाहनानें कोणत्या प्रसंगीं शक सुरु केला याचा निर्णय लागत नाहीं. महाराष्ट्राच्या उपलब्ध इतिहासाच्या सुरुवातीस आद्य राजवंश म्हणून सातवाहनांचा उल्लेख सांपडतो. मद्रास इलाख्यांतील धरणीकोट (पूर्वी धनकटक ) ही सातवाहनाची मूळ राजधानी असली तरी गौतमीपुत्र व पुलुमायी यांनीं महाराष्ट्रांत आपलें राज्य स्थापून पैठण ही राजधानी निश्चित केली. त्या वेळीं ‘शक’ म्हणजे परकीय, सर्व देशभर धुमाकूळ घालीत होते. या वंशांतील राजांनीं ‘शका’ वर मिळविलेल्या एखाद्या विजयापासून शालिवाहन शक सुरु झाला असावा.
हिंदु संस्कृतींतील कित्येक पवित्र गोष्टी चैत्र शु. १ ला घडलेल्या आहेत म्हणून हाच शक रुढ झाला. या वेळीं वसंत ऋतु सुरु होत असल्यामुळें कित्येक उत्सव या नूतन वर्षारंभीच्या दिवसापासून सुरु होतात. हिंदु लोक हा दिवस पुण्य कालाचा मानतात. याची गणना प्रसिध्द अशा साडेतीन मुहूर्तात केली आहे. या दिवशीं सर्व कुंटुंबवत्सल लोक आपल्या घरासमोर गुढया - तोरणें उभारतात. मंगलस्नानादि विधी आटोपल्यावर कडुलिंबाचीं पानें मिर्यें, हिंग, लवण, जिरें व ओवा यांसह भक्षण करण्याचा प्रघात आहे. यायोगें आरोग्य, बल, बुध्दि व तेजस्विता यांची प्राप्ति होते असें आर्यवैद्यकाचें मत आहे. या दिवशींच्या मुहूर्तावर आरोग्यप्राति- व्रत, विद्या- व्रत करण्याची चाल आहे.
- ३ मार्च ७८
-------------
चैत्र शु. १
२) संघटनेचा आद्य प्रणेता !
शके १८१२ च्या चैत्र शु. १ रोजीं नागपूर येथे एका गरीब भिक्षुकाच्या घरीं ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या विख्यात संघटनेचे जनक व संवर्धक डाँ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म झाला.
वेदाभ्यास आणि भिक्षुकवृत्ति या संपत्तीच्या आधारावर अत्यंत जुन्या व बाळबोध पध्दतीनें डाँक्टराचें घराणें नागपुरांत वर्तत होतें. लहानपणापासूनच डाँक्टरांनीं मनाची बळकटी व चिकाटी हे गुण संपादित करुन आपला विकास करुन घेण्यास सुरुवात केली. नागपूर, यवतमाळ व पुणें येथें आरंभीचें शिक्षण संपल्यावर डाँक्टर कलकत्ता येथील नँशनल मेडिकल काँलेजमधून एल्. एम्. अँण्ड एस्. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु वैद्यकीचा व्यवसाय न करतां देशाची नाडी तपासावी अशी या धनवंतर्याची प्रथमपासूनच इच्छा होती. त्याप्रमाणें सन १९२० - २१ सालीं असहकाराच्या चळवळींत भाग घेऊन डाँक्टरांनीं आपल्या सार्वजनिक कार्याला सुरुवात केली.
शके १८४७ च्या विजयादशमीला नागपूर येथील मोहित्यांच्या जुन्या वाडयांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा ओनामा झाला. थोड्याच काळांत या संस्थेचा विस्तार सबंध हिन्दुस्थानभर झाला ! भगवा ध्वज, लष्करी शिस्त, बौध्दिक वर्ग, या मार्गानीं भारतात जागृति करण्याचे कार्य संघानें एकनिष्ठेनें आणि त्यागवृत्तीनें केलें. डाँक्टरांनीं संघटनेचा महामंत्र भ्रांत बनलेल्या भारतीयांना दिला कीं, “संघटनाशास्त्रांत गर्वाला, फुशारकीला, जबरदस्तीला किवा व्यक्तिगत महत्त्वाला जागाच असूं शकत नाहीं. ... परंतु संघटनेला आदर्श व्यक्तिमत्त्वाची मात्र अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या गुणांना दुसरीकडे किंमत येईल, कीर्तीच्या रुपानें मोबदलाहि मिळेल, पण त्याच गुणांचें सार्थक संघटनेसाठी तुमचें सर्वस्व खर्च केल्यानेंच होणार आहे.” रा. स्व. संघाच्या रुपानें डाँक्टर अजरामर झाले आहेत. त्यांच्या संदेशानें भारतांतील असंख्य तरुण मार्गप्रवृत्त झाले आहेत.
- २१ मार्च १८९०
N/A
References : N/A
Last Updated : August 29, 2018
TOP