चैत्र वद्य १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“औरंगजेबास जिंकून राज्य रक्षावें !”
शके १६११ च्या चैत्र व. १० रोजीं झुल्फिकारखानानें रायगडास वेढा दिला असतां राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला.
संभाजीनंतर राजाराम गादीवर आला. कांहीं दिवसांनीं राजारामास पकडण्यासाठीं मोंगलांनीं रायगड राजधानीसच वेढा दिला. रायगडावरील लोकांच्यावर मोठा कठीण प्रसंग आला. त्या वेळीं सर्व मुत्सद्दी व सरदार विचारविनिमय करुं लागले. “खजिन्यांत शिल्लक नाही, पागा व फौज सर्व मोडले, किल्ले बेसरंजाम झाले, पूर्वीचीं अनुभवी माणसे मरुन गेलीं. मोंगलांच्या निरनिराळया फौजा मराठी राज्यांत सर्वत्र घूसून नाश करुं लागल्या, अशा स्थितींत राज्य राखण्यासंबंधानें मुत्सद्दयांची बहुतेक निराशाच झाली. शत्रूशीं टक्कर देणें शक्य नव्हतें.” राजारामास पुढें करुन राज्य वांचवावें असा विचार झाला. तो राजपत्नी येसूबाई हिला पसंत पडला. तिनें सांगितलें, “तुम्हीं सर्व पराक्रमी सरदारांनीं एकविचारें चालून राजारामानें त्यांचे बायकांसुध्दां बाहेर पडावें. आम्हांस मुलांस घेऊन राहण्यास योग्य जागा रायगडासारखी नाहीं. तुम्ही सर्व बाहेर पडल्यावर शत्रु तुमचे अंगावर जातीलि. तुमचा सर्वाचा जमाव एके ठिकाणी पोक्त झाला म्हणजे आम्हांस तिकडे काढून न्यावे.” येसूबाईची स्वार्थनिरपेक्ष मसलत सर्वाना पसंत पडली. येसूबाईला एकटें टाकण्याचें जिवावर आलें तरी प्रसंग ओळखून राजाराम बोलला, “राज्याचे अधिकारी शिवाजीराजे पूर्वीचे तेच हे ऐसे लक्ष ठेवून, आम्हीं कारभारी, आमचे आज्ञेंत राहून, पूर्वीहून विशेष पराक्रम करुन, औरंगजेबास जिंकून राज्य रक्षावें. याविषयीं सर्वाची शपथाप्रमाणें व्हावी.” याप्रमाणें सर्वाच्या शपथा आणि एकवाक्यता झाल्यानंतर चैत्र व. १० रोजी राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. त्याचेबरोबरच रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी मल्हार, सचिव हेहि बाहेर पडले आणि त्यांनीं फौजेच्या जमवाजमवीस सुरुवात केली; आणि सर्वत्र लक्ष देऊन जसा प्रसंग येईल त्याप्रमाणें वागावें, असे सर्वांनीं ठरविलें. पुढें प्रतापगडासहि शत्रूनें वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावें लागलें.
- ५ एप्रिल १६७९
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2018
TOP