चैत्र शु. २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.
फिरंगाकडे स्वारीस गेले !
१६५९ च्या चैत्र शु. २ रोजीं चिमाजी आप्पा हे वसई - साष्टीच्या मोहिमेस निघाले.
हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्यावर इंग्रज, डच, पोर्तुगीझ आदि पाश्चात्य व्यापारी व्यापार करीत असत. त्यांमध्यें पोर्तृगीझांना धर्मप्रसाराचें वेड अतोनात होतें. त्यामुळें हिंदु प्रजेस फारच त्रास होऊं लागला. “जमीनदारांचीं वतनें बुडविलीं, गांवचे गांव घेऊन बाटवले, किरिस्ताव केले. घरांत कोणी नसले तर पोरें नेऊन बाटवावीं. देवधर्म बुडाला, प्रांतांतील तीर्थक्षेत्रें लोपलीं. देवालयें फोडून साफ केलीं, ब्राह्मणांस मुलखांत फिरण्याची बंदी झाली. कोणीं कांहीं व्रतें, उद्यापनें, होम वगैरे आरंभिला कीं त्याचें घर वेढलें. शेजारीपाजारी त्यांत पडले कीं त्यांसहि धरुन न्यावें.” असा हा छळ शिवरायांच्या काळापासून होत होता. शेवटीं वसईचे देशपांडे, देसाई, अंताजी रघुनाथ, गंगाजी नाईक वगैरे लोकांनीं आपलें गार्हाणें पेशव्यांच्या कानावर घातलें. शेवटीं पेशवे यांनींहि हें काम मनावर घेतलें. चिमाजी अप्पांची या कामगिरीवर नेमणूक झाली. त्याप्रमाणें चिमाजी आप्पांनीं चिमणाजी भिमराव, रामचंद्र हरी व शंकराजी केशव या आपल्या सरदारांस - ‘वसईस व साष्टीस पाठविलें. व आपण स्वत:वर्ष प्रतिपदेच्या दुसरे दिवशीं, सुध २ मंगळवारीं परस्थानें बागांत गेले. तेथून गुरुवारीं रात्रीं फिरंगणाकडे स्वारीस गेले.’ साष्टी बेटांतील ठाण्याचा कोट फिरंग्यानें तीन वर्षापूर्वी बांधण्यास सुरुवात केली होती. कोटाचें काम चालू असतांना हिंदु रयतेवर अत्यंत जुलूम झाला होता. चिमाजीचा रोख पहिल्यानें याच बाजूस होता. चार दिवसांत तो ठाण्याजवळ येऊन पोंचला. आणि त्याच रात्रीं त्यांनीं साष्टी बेटांत प्रवेश केला. फिरंगी अधिकारी लुई बेतेलो गांगरुन गेला. थोडयाशा प्रतिकारानंतर साष्टी बेट व ठाण्याचा कोट हीं दोन्ही ठिकाणें मराठयांना मिळालीं. आणि पुढल्या अव्दितीय लढयास हुरुप प्राप्त झाला. चिमाजी आप्पांच्या कर्तृत्वानें बहरुन गेलेली वसईची ही मोहीम मराठयांच्या इतिहासांत अव्दितीय़ आहे.
- २२ मार्च १७३७
N/A
References : N/A
Last Updated : August 29, 2018
TOP