चैत्र शु. ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहा्सीक महत्व.
श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये !
चैत्र शु. ९ या दिवशीं सूर्य मध्यान्हीस आला असतां पुनर्वसु नक्षत्रावर पांच ग्रह उच्चस्थानीं असून कर्कलग्नीं गुरु व चंद्र असतांना कोसल देशच्या अयोध्येचा राजा दशरथ यास कौसल्या राणीपासून, सर्व लोकांना नमस्कार करण्यास योग्य, असे श्रीरामचंद्र जन्मास आले.
कुरुवंशानें आर्यावर्तात वसाहत केल्यानंतर आर्याची दुसरी एक लाट गंगा नदीच्या पलीकडे पूर्व भागांत पसरली. त्यांमधील कोसल कुलांत दशरथ राजा राज्य करीत होता. त्याच्या तीन राण्यांच्या पोटीं एकहि पुत्रसंतान नव्हतें, परंतु पुत्रकामेष्टि यज्ञ केल्यानंतर अग्निदेवाच्या कृपेनें कौसल्येस रामचंद्र, कैकेयीस भरत, सुमित्रेस लक्ष्मण व शत्रुघ्न अशी एकेका दिवसानंतर मुलें झालीं. त्यांपैकी रामचंद्र अत्यंत बुध्दिमान, तेजस्वी व बलवान् होता. त्यानें आपल्या जीवितांत जीं लोकोत्तर कृत्यें केलीं, त्यावरुन भारतीयांनीं त्याला अवतार कल्पिलें आहे.
राम सत्यवचनी होता, पितृवचन पाळणारा होता, एकपत्नीव्रतानें राहणारा होता, आदर्श राजा होता म्हणून भारतीयांचें त्याच्यावर प्रेम आहेच; परंतु त्याच्या एकाच कृत्यानें त्याची कीर्ति अजरामर झाली आहे आणि तें म्हणजे देवादिकांना छळणार्या दुष्ट रावणाचा त्यानें केलेला नाश. जणुं रामाचा अवतारच त्यासाठीं होता. रावण म्हणजे, ‘रावयति विद्रावयतीति रावण: ।’ प्रजाजनांना भिवविणारा तो रावण. यज्ञयागादिकांना व पुण्यकर्माना विघ्न आणणारे, गोब्राह्मणांना पीडा देणारे, वेदवतीसारख्या साध्वीवर बलात्कर करणारे जे राक्षस त्या काळीं होते त्यांचा नायक म्हणजे रावणच. तेव्हां त्याचा वध करुन रामानें अलौकिक सत्कृत्य केलें. रावणराज्यामुळें सर्व पृथ्वी गांजून गेली होती. “रावणाच्या जुलुमाच्या दुखण्यानें ती कण्हूं लागली. ती गाईसारखी दीन झाली; आणि क्षीरसागरांत गाढ झोंपणार्या विष्णूला आपल्या विकल स्वरानें जागृत करुन त्याच्याजवळ तिनें आपलें दु:ख निवेदन केलें. श्रीभगवान् विष्णूला दया येऊन त्यानें तिला आश्वासन दिलें आणि दशरथाच्या पोटीं जे रामचंद्र जन्मास आले त्यांनीं तें आश्वासन पूर्ण केलें.”
N/A
References : N/A
Last Updated : August 29, 2018
TOP