चैत्र व. ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.

रायगड शिवरायांच्या ताब्यांत !

शके १५७८ च्या चैत्र व. ७ रोजीं श्रीशिवाजीमहाराज यांनीं चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायरी ऊर्फ रायगड किल्ला आपल्या ताब्यांत आणला.
सोळाव्या शतकामध्यें स्वातंत्र्याची प्रभात सुरु होत होती. मावळ प्रांतांत श्रीशिवरायांनीं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याची खटपट चालू केली. जावळीचे राजे चंद्रराव मोरे यांचा कल विजापूर दरबाराकडे होता. शिवाजी राजांच्या ताब्यांत रायगड, तोरणा, वगैरे किल्ले आल्यानंतर सहजच त्यांचें लक्ष नजीकच्या चंद्ररावांच्या ताब्यांत असलेल्या रायगडावर गेलें. तेव्हां चंद्ररावांचा मोड करण्यासाठीं शिवराय शके १५७७ मध्यें जावळीवर चालून गेले. “महाबळेश्वरचा निसणीचा घाट दरियाचा उतरुन जावळीस वेढा घातला. जावळी अवघड वाट, जाळया कळकीच्या दाट, तेथें महिनाभर झुंज जाहलें. महिना एक महिन्यानें कृष्णाजी बाजी मोरे जावळी सोडून आपलें हासमसुध्दां रायगडास गेले. रायगड बळकावून राहिले.” ही हकिकत समजतांच शिवराय यांनीं आपला मोर्चा रायगडाकडे वळवला. “महाराज व चंद्रराव मोरे यांची भेट होऊन रायगड महाराजांच्या ताब्यांत द्यावा असें ठरलें,या अटीच्या निश्चितीसाठीं चंद्ररावाचे दोन मुलगे बाजीराव व कृष्णराव शिवाजीच्या ताब्यांत ओलीस म्हणून राहिले. असा प्रकार होऊन रायरीचा किल्ला महाराजांच्या ताब्यांत आला.”
हाच रायरीचा किल्ला पुढें छत्रपतींची राजधानी म्हणून नांवारुपास आला. रायगड हें महाराष्ट्राचें किंबहुना अखिल भारताचें एक राजकीय पुण्यक्षेत्र आहे. हा रायगड कुलाबा जिल्ह्यांतील महाड तालुक्यांत आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून २८५१ फूट आहे. “रायगड पाहाडी किल्ला चांगला; आजूबाजूस शत्रूची फौज बसावयास जागा नाहीं. घोडे माणूस जाण्यास महासंकट, वरकड किल्ले पन्हाळे वगैरे बहुत पण खुलासेंवार व मैदान मुलुखांत यास्तव आजच्या प्रसंगास हीच जागा बरी.” यावरुन रायगडाची सुरक्षितता ध्यानांत येते.
- ६ एप्रिल १६५६

N/A

References : N/A
Last Updated : September 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP