चैत्र व. ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“श्रीशंभु कृपा करील !”
शके १६४२ च्या चैत्र व. ८ रोजीं शाहू छत्रपति यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्हाडनजीक मसूर येथें पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं.
विशेष आजारी नसतांना बाळाजी विश्वनाथ एकाएकीं मरण पावले. यांच्या मृत्युसमयीं बाजीराव एकोणीस वर्षाचे होते. लहानपणापासून बाजीराव बाळाजीबरोबर वागत असल्यामुळें प्रत्यक्ष परिस्थितीचा व राजकारणाचा अनुभव त्यांस चांगलाच होता. धनाजी व चंद्रसेन जाधव, कान्होजी आंगरे, दमाजी थोरात, निजाम,सय्यद बंधु, इत्यादि लोकांच्यासंबंधींची माहिती आणि त्यांतील डावपेंच बाजीरावच जाणीत होता. लेखन, वाचन, हिशेब, घोडयावर बसणें, कसरत, भाल्याची फेंक या तत्कालीन शिक्षणांत तो तरबेज होता. महत्त्वाकांक्षा, शौर्य व धाडस हे गुण तर त्याच्या अंगीं उपजतच होते.
“नानाविध संकटें, व आणीबाणीचे प्रसंग त्यास अनुभवावे लागल्यामुळें त्याचें शरीर व मन काटक व बलसमृध्द बनलें होतें... बाळाजीच्या मृत्यूनंतर राज्याचा प्रपंच पुढें कोण चालवील, आपुलकीच्या भावनेनें आपणांशीं अनुरक्त राहून राज्याचा वाढणारा पसारा कोण सांभाळील, स्वार्थी व आपमतलबी सरदारांना आळा कोण घालील, ही चिंता शाहूस उत्पन्न झाली.” पेशवाईचीं वस्त्रें कोणास द्यावींत हा प्रश्न निर्माण झाला. “नंतर वस्त्रांचें बोलणें लागलें. ते काळीं बाजीरावसाहेब बहुत उद्दाम प्रकृतीचे, अवघा वेळ शिपाईगिरींत मग्न, राज्यभार चालवावयास सबुरी असावी तो भाव नव्हता. यामुळें या पदाचे उपयोगीं नाहींत. अशी राजश्री यांसी बहुतांनीं मसलत दिली. सर्वाचें ऐकून घेऊन सर्वास एक उत्तर दिलें कीं, बाळाजी विश्वनाथ यांनीं या राज्यांत जीवादारभ्य श्रमसाहस करुन पुढें सुख भोगिलें नाहीं. याजकरितां यांस तूर्त वस्त्रें देतों. याचे दैवी असल्यास श्रीशंभु कृपा करील; उपयोगी नाहीं असें दिसल्यास पुढें विचार होईल. अशी श्री देवाची प्रार्थना करुन महाराजांनीं बाजीरावसाहेबांसी वस्त्रें दिली.” याच प्रसंगी चिमणाजी बल्लाळास पंडित किताब, दमाजी थोरातास सरंजाम व पुरंदरे यास मुतालिकाचीं वस्त्रें मिळालीं.
- १८ एप्रिल १७२०
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2018
TOP