यशवंतराय महाकाव्य - सर्ग बाविसावा
श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.
कमलाबाई यशवंतवायाविषयीं चिंता करिते - तिला यशवंतरावाचा निरोप कळतो - तो ऐकून ती यशवंतरावाच्या जीविताविषयीं निराश होत्साती शोक करिते - तिच्या वाड्यांत मराठे लोक शिरतात - त्यांच्या येण्याबद्दल तिच्या मनांत आलेली शंका - त्या समयीम तिचें वर्तन - मल्हाररावास पाहून कमलाबाई मूर्च्छा पावते.
श्लोक
घडलें रण कोटियामधें । जय तें पूर्ण मराठियांस दे ॥
जिकडे तिकडे रडारडी । उठती थोर लहान यामधीं ॥१॥
यशवंत न मान सागर । दिसती दोहन अन्य नागर ॥
पडले सगळेच बंदिंत । पुर कोटा म्हणुनी भयावृत ॥२॥
यशवंत निरोप पाठवी । जननीच्या चरणांस आठवी ॥
न घडो भलतें म्हणे मनीं । कमलेतें सुत - शोक होउनी ॥३॥
बसली असतां स्व - मंदिरीं । निज पुत्र - स्मरणास ती करी ॥
नयनांतुन अश्रु चालती । वदनीं श्वासहि उष्ण ऊठती ॥४॥
“ मुलगा कुल - दीप लाडका । परदेशीं कुशली असेल का ? ॥
अथवा अरि टाखुनी भया । क्षण देती न बसूं कुठे तया ? ॥५॥
यशवंत थकेल चालतां । स्वशिरीं पाउस ऊन सोसतां ॥
श्रम सोसुं कसा शकेल कीं । स्थिति ऐशी न तयास ठाउकी ॥६॥
अजुनी घर सोडुनी कुठे । नच गेलें मम बाळ धाकुटें ॥
फिरला असशील वांसरा ! । किति तूं दूर ! तुला न आसरा ॥७॥
जरि भूक तहान लागते । तरि मी नित्य तुला विचारतें ॥
जवळी बसवून बाळका । परदेशीं वदतील गोड कां ? ॥८॥
बघतें तुजला हि एकदां । यशवंता असतें सुखी तदा ॥
तिळ तीळ तुटून जीव हा । गमतें जाइल बाहिरी पहा ! ॥९॥
मिळुनी तव मित्र भोंवते । स्थिर यत्नें जपतात कीं तुतें ॥
अथवा रिपु - सैन्य वारिधी । छळिती जेंवि सशास पारधी ! ॥१०॥
सुजनें तुज आसरा दिला । कवणें जाणुनि संकटीं मुला ! ॥
अथवा फिरतोस निर्जनीं । विपिनीं भूक तहान लागली ॥११॥
निज कार्य न सिद्ध जाहलें । म्हणुनि त्वन्मन खेद पावलें ॥
हत - वीर्य हत्यार ठेविसी । कठिण क्षत्रिय - धर्म टाकिसी ॥१२॥
अथवा मिळवून सोबती । दुसरे ज्यांस अपार हिंमती ॥
बघतोस पुन्हा अरींप्रत । रणिं जिंकूं तरि काय सांप्रत ? ॥१३॥
मम बालक कोणत्या स्थळीं । वसला काळजि हीच लागली ॥
प्रभुजी ! कर एवढी दया । सदया संकटिं रक्षिजे तया ” ॥१४॥
कमला बहु दीन यापरी । यशवंत - स्मरणास ती करी ॥
खिडकींतुन पाहते दुर । वर आकाश अपार - विस्तर ॥१५॥
हिकडे तिकडे फिरे त्वरें । दिसतें तोंड निराश बावरें ॥
पडते महिला क्षण क्षण । करिते खोल सुदीर्घ - चिंतन ॥१६॥
इतक्यांत महालिं चाकर । विनवी येउन जोडुनी कर ॥
“ तुजलागिं निरोप सांगुनी । मज धाडी यशवंत सद्गुणी ” ॥१७॥
कमला उठली समुत्सुक । खुलती हर्ष - विफुल्ल नेत्रक ॥
“ सुजना मज सांग सांगरे ! । यशवंताप्रत पाहिलें खरें ? ॥१८॥
मम बाळ खुशाल कीं असे ? । कवण्या जाउन तो स्थळीं वसे ? ॥
मज काय निरोप पाठवी ? । वद कांहीं न मनांत सांठवीं ” ॥१९॥
मग चाकर खिन्न तोंड तो । करि शोकें सुसकार सोडितो ॥
“ कमले ! सुख सर्वदा मिळे । कवणा धन्य नरा न हें कळे ॥२०॥
सुख दुःख रहाटगाडगें । वरि आम्ही घट बद्ध जीव गे ॥
फिरवी प्रभु जेंवि इच्छितो । म्हणुनी आम्हि तसेच फीरतों ” ॥२१॥
हळु भीत च भीत बोलतो । कमलेला हि सींचत पाहती ॥
वदला यशवंत जे धनी । सगळें नीट मनांत आणुनी ॥२२॥
मरणार असें कळोनियां । सुत जो धाडि निरोप त्या तया ॥
परिसून दहा घडे कशी । कळवाया मम जीभ कायशी ! ॥२३॥
बसली घटकाभरि स्थिर । न तदा हालव९इ नेत्र सुंदर ॥
जणु वीज पडे नभांतुन । कमलेच्याच शिरीं धडाडुन ॥२४॥
मग शोक समुद्र तुंबळ । करि पोटी सहसा उचंबळ ॥
नयनांतुन येइ बाहिर । मुख टाकी भरूनी अनावर ॥२५॥
पहिले जरि ओंठ तांबडे । रडतां लालि तयां नवी चढे ॥
सुटला जणु हार मौक्तिकें । पडती अश्रु - जलें अमोलिकें ॥२६॥
दगडासम ज्या असे मन । जरि तेथें असता असा जन ॥
रडल्याविण त्या न राहवे । कमलेच्या वदना न पाहवे ! ॥२७॥
“ अपराध करून काय मी । भगवंता ! अशि होतसें श्रमी ॥
किति कोप तुझा सुदारूण । प्रभुजी ! काय तयास कारण ? ॥२८॥
यशवंत ! सुजाण लेंकरा ! । मजला आज दुरावशी खरा ॥
तुजवांचुनि एक ही क्षण । मम चित्तास पडेल चैन न ॥२९॥
किति तूं मतिमान् पराक्रमी । किति आणूं गुण ते मनांत मी ? ॥
मज जें सुख या जगीं वसे । अवलंबून तुझ्यावरी असे ॥३०॥
तव जीवन तेंचि जीवन । मजला, राहिल आज जीव न ॥
जगण्यास कशास पाहिजे ? । यशवंताविण काय राहिजे ? ॥३१॥
मम बोध न टाकिला तुवां । करिसी तूं किति मातृ - गौरवा ! ॥
मज दुःख दिलें न एकदां । मम अर्ध्या वचनांत तूं सदा ॥३२॥
न सुखें तुज भोगुं मीं दिलीं । नच संपत्ति तुवां हि भोगिली ॥
तव हेतु पुरे न जाहले । म्हणुनी फारच चित्त पोळलें ॥३३॥
किति ही तरि मी अभागिणी । मम दुःखें सकळा जगा उणीं ! ॥
खचला मज धीर सोडितो । मजला मृत्यु बराच भासतो ! ॥३४॥
उपजून न काळ जाहला । तंव मी मृत्यु घरांत आणिला ॥
जिजपासुन जन्म घेतलें । तिस मीं मृत्यु - पथास लाविलें ! ॥३५॥
जननी जरि मोकली मला । करिता रक्षण बाप जाहला ॥
अजमीर - रणीं भयानकीं । पडल्या आमुचिया चुकामुकी ॥३६॥
मग वल्लभ शूर साहसी । जगदेव प्रिय सोडिही मसीं ॥
मग या यशवंत बालका । बघुनी मानित मी असें सुखा ॥३७॥
किति हट्ट कितीक खेळणीं । किति लीला तरि आठवूं मनीं ! ॥
हंसणें बसणें हि बोलणें । मज दे कौतुक मंद चालणें ॥३८॥
विरहें कितिदां प्रियाचिया । उठल्यें मृत्युस मी वरावया ॥
स्वस्तुआस्तव देह रक्षिला । न असा हा परिणाम लक्षिला ॥३९॥
मतिमंत उदार - मानस । यशवंत प्रिय ज्यास साहस ॥
अभिमान बघून वाटला । प्रतिसंवत्सर वाढतां भला ॥४०॥
किसनें जरि संपदा दिली । न च यानें बहुकाळ भोगिली ॥
निज - देश - विमोचनास्तव । झटला दावुन वीर्य - गौरव ॥४१॥
परि तें रूचलें न ईश्वरा । जय आला म्हणुनी न नागरां ॥
धुळधाण उडालि सर्वथा । स्मरतें काय ह्मणून या कथा ? ॥४२॥
नय - शील उदार वत्सल । स्तविती होळकरास निर्मळ ॥
परि टाकुन तो कसा दया । बघतो मारूं सुतास माझिया ॥४३॥
गुण - मौल्य न ज्या नरां कळे । यशवंता तव शत्रु हे असे ॥
सुटशील न आज संकटीं । मग मी राहुं कशास एकटी ? ॥४४॥
नुकताच उठे तरू वर । न फुलांचा पुरताहि ये भर ॥
इतक्यांत कडाडुनी नभीं । पडते वीज तयावरी जशी ॥४५॥
गति याच परी तुझी मुला ! । यशवंता ! गुणवंत वत्सला ! ॥
सरलें नच वर्ष चोविस । सरतो तों इतिहास सर्व ही ॥४६॥
असली असतां तुझी दशा । तुजवांचून भयाण या दिशा ॥
जग शून्य गमे मनाप्रत । म्हणुनी टाकिन देह सांप्रत ॥४७॥
पडतां पडतां नभांतुन । तव आधार करीत रक्षण ॥
परि तूंहि लयास पावसी । दुसरी काय गती असे मशीं ? ॥४८॥
मम पुत्र करील कीर्तिला । मज आणील सुधन्यता भला ॥
परि दैव म्हणे नसो असे । म्हणुनी ही स्थिति आज येतसे ॥४९॥
मरतां मरतांहि एकदां । तव पाहीन मुखास सौख्यदा ॥
लिहिलें विधिनें न काय हो । मम भाळीं तरि जीव - नाश हो ! ॥५०॥
कमले ! सुख - लेश ही क्षण । तुजला दुर्लभ आजपासुन ॥
तव जीवित व्यर्थ देह ही । रडते सोसुन भार ही मही ॥५१॥
यशवंत धरी अशी गती । तुज आधार कुठे सरस्वती ? ॥
सुभगे ! कमलालये ! तुला । वर कोठून मिळे असा भला ? ॥५२॥
विनया ! पर - देशिं जा फिर । कर्णे ! स्वर्ग - पयास तूं धर ॥
रण - शौर्य पळो जगांतुन । करितें कीर्तिस कोण बंधन ? ॥५३॥
जन या नगरांतले तुम्ही ! । रडतां संतत होइजे श्रमी ॥
तुमच्याच हितर्थ - साधनीं । मरतो मत्सुत शूर सद्गुणी ॥५४॥
बसल्या चरणांत शृंखला । तुमच्या येउन धीर मोंगलां ॥
तुमचें करण्यास मोचन । विधि उत्पन करी असा जन ? ॥५५॥
जशि बाळपणांत पोषक । यशवंता ! तव मार्ग - दर्शक ॥
पर - लोक - पथास लागत्यें । तुज आधीं तुज मार्ग दावित्यें ” ॥५६॥
कमला विमला असें वदे । रडवी लोक सभोंवती रडे ॥
करुणा जणु मूर्तिमंत ती । करिते भूमि - तळावरी स्थिती ॥५७॥
जंव या परि शब्द बोलत्ये । पळतां स्वार पथांत पाहत्ये ॥
शिरले गृहिं दोनशें जन । पद त्यांचें पडतें दणादण ॥५८॥
“ कमला बसली कुठे असे ? ” । जन गर्जोनि विचारिती असें ॥
तिज होय अपार विस्मय । शिरलें कांहिं मनामधें भय ॥५९॥
वाटलें तिला दुष्ट हे अरी । काय कारणें येति या घरीं ॥
कां तरी तिचें नांव घेउनी । गर्जती उठे हा जय - ध्वनी ॥६०॥
यांचा कांहीं दुष्ट हेतू असेल । स्त्री - वर्गाचा मान चित्तीं नसेल ॥
आले येथें निश्चयें हे मराठे । गेला माझा हाय ! तो बाळ कोठें ? ॥६१॥
आर्या
इतर स्त्रियांस आली असती मूर्च्छा भयें प्रसंगा या ॥
परि भ्याल्या डफळ्यांच्या न कधींच मुली सुना न वा आया ॥६२॥
दडदड येति मराठे वरती चढुनी तिच्या महालांत ॥
वेगें कमला उठली क्रोधानें लाल होउन रहात ॥६३॥
श्लोक
जी त्या महालीं तरवार मोठी । खुंटीवरी टांगलि एक होती ॥
ती घेउनी मेण करून दूर । दारामधें धांवुन येइ शूर ॥६४॥
“ फांस लावुनी गळ्यास माझिया सुताचिया ।
कां छळावया मला त्यजून येतसां भया ॥
याल दोन पाउलें पुढें मराल तत्क्षणीं ।
जा चला चला मुखें मला न दाखवा तुम्हीं ” ॥६५॥
तिची मूर्ति आधींच लावण्य - खाणी । तिला कोप अत्यंत शोभेस आणी ॥
क्षणें नेत्र - तेजेंच जाळील वाटे । भयें विस्मयें जाति मागें मराठे ॥६६॥
डोळे सुंदर लाल ओंठ हलती गालांस लाली चढे ।
काळे कज्जल - तुल्य केश रुळती खांद्यावरोनी पुढें ।
क्रोधें शब्द फिरे हत्यार तळपे हातीं अशी आकृती ।
जाती नेत्र दिपून पाहुन मग स्वस्थानि ते थांबती ॥६७॥
टाकी पाउल मंद सद्गद तदा मल्हार झाला पुढें ।
डोळे लागुन त्यास पाहि कमला वृत्तांत कैसा घडे ॥
किंकाळी मग फोडि धाडकर ती खालीं पडे मूर्च्छित ।
झाली धांदल सर्व लोक भिउनी आले पुढें धांवत ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP