यशवंतराय महाकाव्य - सर्ग सहावा
श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.
आवशीच्या प्रहर रात्रीचें वर्णन - बंडवाल्यांचे उद्योग - यशवंतराय - दिल्लीरखान - दोघांचें संभाषण - दिल्लिरखान यशवंतरायास ठार मारूं पाहतो - मारण्याकरितां मित्र तेथें येऊन दिल्लिरखानास कैद करितात व त्यास जिवें मारण्याकरितां यशवंतरायाची आज्ञा मागतात - यशवंतराय खानास सोडवितो - तो पळून जातो.
श्लोक
झाल्या रिकाम्या मशिदी चवाठी । रस्त्यांतली मोडलि दाट दाटी ॥
बाजार विस्तीर्ण हि बंद झाला । व्यापारि गेले आपुल्या गृहाला ॥१॥
जी आलि होती भरती अपारा । सकाळपासून जगत्समुद्रा ॥
जातां दिसे ती पुरिं सामसूम । न रात्र जों जाहलि एक याम ॥२॥
कोठे कुठे वादन नृत्य गीत । चाले गृहीं कीर्तन साधु - गीत ॥
कोठें पुराणें सुरसें सुबोधें । आबालवृद्ध श्रवितात मोदें ॥३॥
शेजारि शेजारि परस्परांत । गोष्टी सुखाच्या बसले करीत ॥
वृत्तांत जो कीं घडला दिनांत । चाले हठें त्यावर वाद नीट ॥४॥
दिल्लीरखानास पहावयाला । जाती सकाळीं जन ते कशाला ? ॥
नानाप्रकारें मग तर्क चाले । जो तो मना येइल तेंवि बोले ॥५॥
विश्रांति घेती नच बंडवाले । त्यांचा पुरीं संतत यत्न चाले ॥
होई पुढें तुंबळ फार युद्ध । सामान त्याचें करितात सिद्ध ॥६॥
काळें चमत्कार जगास दावूं । जयां गमे पूर्ण यशास घेऊं ॥
अज्ञात ते आचरिती स्वपंथ । प्रवाळकीटांसम यत्नवंत ॥७॥
सर्वत्र झालें जंव सामसूम । फावे तयांला करण्यास काम ॥
गेलीं भुयारें भरुनी गृहांचा । तेथें दिसे धांदल माणसांची ॥८॥
प्रस्ताव चाले यशवंत याचा । कित्येक गाती गुण दोहनाचा ॥
त्या भूषणातें किति आठविती । क्रोधें किती मोंगल निंदिताती ॥९॥
दूती यमाच्या म्हणतात ज्यांसीं । त्या बंदुकांच्या दिसतात राशी ॥
स्त्रीजाति जों सोडिति तोंड घोर । लक्षांवधी मारिति जीव ठार ॥१०॥
बर्च्या कटयारी तरवारि भाले । नानाकृतींचे बहु तोफगोळे ॥
निर्मावया चालति कारखाने । संख्या तयांची किति कोण जाणे ॥११॥
होणार येथें रण फार घोर । हें दोहनादी समजून पौर ॥
स्त्री बालकें वृद्ध अशक्त यांतें । दुर्गास ते धाडिति दुर्गमातें ॥१२॥
मासानुमासें रण हें घडेल । दुष्काळ जाणून पुरीं पडेल ॥
भांडें भरी दोहन धूर्त आधीं । धायें श्रमानें करूनी खरेदी ॥१३॥
येऊन ठेपे जवळी लढाई । साह्यास्य बोलाविति आप्त भाई ॥
येऊन गेहें भरिलीं तयांनीं । ते गुंतले भोजन - गान - पानें ॥१४॥
न द्वेष वा मत्सर वाग्विवाद । कोठें न चिंता न कुठे प्रमाद ॥
एके मनें चालति बंडवाले । उद्योग ते पाहति आपुलाले ॥१५॥
शासी जसा षण्मुख देव - सेना । तैसाचि यांतें यशवंत जाणा ॥
त्या रात्रि होता स्वगृहांतरांत । कित्येक पत्रे बसला पहात ॥१६॥
पत्रांत कांहीं करितो खुणाही । कांहीं करें घेउन नीट पाही ॥
भावार्थ घे टांचुन कागदांत । बैसे विचार क्षण तो करीत ॥१७॥
“ झाला असे दिल्लिर फार भीत ” । वार्ता अशी दूत कळीवतात ॥
सेना असे अल्पच त्याजपाशीं । भीतो लढाया म्हणुनी अम्हांशीं ॥१८॥
से आमुचा बाळगितात धाक । शिपाइ मोठे सरदार लोक ॥
सध्यांच संखेंत बळांत भारी । असों, अरी कोण अम्हां निवारी ? ॥१९॥
सेना महाशूर तयारि मोठी । जी बाळगीली रजपूत जाटीं ॥
होईल तीचा उपयोग आम्हां । लावूं अशा थोर पवित्र कामा ॥२०॥
जे आमुचे भूपति जातभाई । धाडोनि पत्रें करितात घाई ॥
“ घ्या सोडवोनी पुर देश कोटा । लागेल तें साह्य करूं न तोटा ॥२१॥
स्वतंत्र आम्ही रजपूत मानी । जिंकावया योग्य न मोंगलांनीं ॥
म्हणून झालों झटुनी स्वतंत्र । घ्यावा तुम्हीं हाच मनांत मंत्र ॥२२॥
कीं हा शिवो मोंगल न स्व - धामा । न डाग लागो ‘ रजपूत ’ नामा ॥
दिल्लीपती तो बळहीन झाला । स्वतंत्र व्हा संधि असे तुम्हांला ” ॥२३॥
येणार साह्या रजपूत शूर । येथून कोसांवरि वीस दूर ॥
मी अष्टमीच्या उठुनी सकाळीं । मारीन दुष्टां धरूनी अकाळीं ॥२४॥
चिंती असें जों यशवंतराय । तों येउनी सेवक वंदि पाय ॥
“ द्वारामधें चार उभे असामी । स्वामी तुझ्या इच्छिति येउं धामीं ॥२५॥
विचारतां नांव न सांगतात । परंतु सभ्याकृति दीसतात ॥
इच्छा तुझ्या दर्शनिं त्यांस आहे । आज्ञा कशी सेवक वाट पाहे ” ॥२६॥
एकीकडे कागदपत्र ठेवी । मुखीं न चिंता - लव वीर दावी ॥
संकेत - वाचे हळु शब्द बोले । स्वसेवकातें यशवंत डोले ॥२७॥
मोठ्या स्वरें काय वदे सदुक्त । येवोत ते न प्रतिबंध युक्त ॥
तूं मार्ग त्यां दाखविं या महाली । भृत्य स्वकृत्या करूं जाय खालीं ॥२८॥
प्रकाश मोठा करूनी दिव्यांचा । विशाल घे खङ्ग करांत साचा ॥
दीप - प्रकाशीं तळपे हत्यार । जें सर्वदा सन्निध राहणार ॥२९॥
गेला पुढें पांच पदें पहाया । गृहागता मान हि योग्य द्याया ॥
अज्ञात चारी करिती प्रचार । स्ववेष खोटा करितात दूर ॥३०॥
तों भेट झाली नमिती दुरून । ते एकमेकां कर सांवरून ॥
बैसावया दावुन आसनास । क्षेमें विचारी मग तो गृडेश ॥३१॥
तों त्यास उद्देशुन वौर्य - धाली । बोलावया दिल्लिर घाट घाला ॥
“ कां हा तुझा भीतिद खङ्ग मोठा । गेहागता दाविसि तूं मराठा ॥३२॥
कैसाहि तूं क्रूर महाभिमानी । आहेस मोठा परि तूं इमानी ॥
आलों तुझी ऐकुन कीर्ति पाहीं । या कारणें भीति अम्हांस नाहीं ॥३३॥
युद्धांत वैरी परि बंधु गेहीं । कोणी कुणा वैरि घरांत नाहीं ॥
जे शूर ते वृत्ति अशी उदार । ठेवीति हा नेणसि कीं प्रचार ॥३४॥
मी स्वार्थ्य साधीन म्हणें मनांत । कल्याण व्हावें तव हेंहि इष्ट ॥
या साठिं जें मी वदणार आतां । तें ऐक, हो सावध - बुद्धिमंता ॥३५॥
गेहाधिकारी यशवंत बोले । जें ऐकतां सज्जन - वृंद डोले ॥
आलास विश्वास धरून पूर्ण । तस्मात् तुझा ठेविन योग्य मान ॥३६॥
जें बोलणें काय असे खुशाल । तें बोल तूं जाणुन देश काल ॥
ही ऐकुनीयां यशवंत - वाणी । बोले पुन्हा दिल्लिरखान मानी ॥३७॥
दिल्लीपती बादशहा दयाळ । ज्या सर्व देशीं नमिती नृपाळ ॥
ज्या सार्वभौमाप्रत शुभ्र - कीर्ती । ही हिंदु - भूमी अनुकूळ होती ॥३८॥
त्या भूपतीशीं करणें विरोध । अक्षम्य हा होय महापराध ॥
नाहीं तुला ठाउक काय पूर्ण ? । बोलाविसी जो मरणास तूर्ण ॥३९॥
कां तूं बळें कोपवितोस सिंह ? । जाणून कां ओढिसि हव्यवाह ॥
दर्पांध सर्पास न भीसि काय ? । ऐशा कृतीनें वदशील हाय ॥४०॥
विध्याप्रमाणें स्थिर ज्यास पाया । राज्यास त्या आणिसि कीं अपाया ॥
लागेल वेशीवर मात्र शीर । याचा न कैसा करिसी विचार ? ॥४१॥
झालां तुम्हीं सर्वच दुष्ट एक । देतां चिथावून इथील लोक ॥
स्वार्थास साधूं कुमती पहाती । द्वारीं यमाच्या दुसर्यांस नेती ॥४२॥
व्हावा इथें अंमल मोंगलाचा । संकेत हा केवळ ईश्वराचा ॥
होतें प्रजांचें कृतपूर्व पुण्य । तेणें चि हा पावति भूप धन्य ॥४३॥
कर्तव्य माझें पुर रक्षण्याचें । तें मी करीतों स्थिर काय वाचे ॥
जाई न जों मी मरुनी लयास । रक्षीन लोकां करुनी प्रयास ॥४४॥
आला तुम्हांला जय पूर्ण त्यांत । मी नष्ट झालों समजूं मनांत ॥
येणें परी देश मिळेल वाटे ? । दे सोडुनी या विफळ भ्रमातें ॥४५॥
माझा धनी काय असे अशक्त ? । लक्षावधी सैन्य तयार तेथ ॥
डोळा जरी वक्र करील रोषें । कोट्यावरी, होइल सांग कैसें ? ॥४६॥
एकाहुनी एक बळी विशाळ । झुंजार रागें दिसणार काळ ॥
येतील येथें सरदार शूर । दुष्टा जनां होइल दंड घोर ॥४७॥
बंडांत नाहीं परिणाम गोड । हेका तुझा यास्तव सर्व सोड ॥
जातील चोरांसह साव फांशी । जाऊं नको गुंतुनिया अपेशीं ॥४८॥
सौख्यांत जे लोळति आज जीव । बंडांत त्यां दावुन नेसि माव ॥
ते मारिले जातिल व्यर्थ व्यर्थ । तद्रक्षणीं होशिल कीं समर्थ ? ॥४९॥
त्यांच्या स्त्रियाही लडिवाळ बालें । देशोधडी लागति जीं दुकाळें ॥
अन्नाविणें प्राणच टाकितील । हाडें तयांची तुज शापितील ॥५०॥
लगेल हा देश धुळीस सर्व । तेव्हां तुझा कीं उतरेल गर्व ? ॥
स्नेही मरूनी पडतील खालीं । होशील जागा मग तूं अकाळीं ॥५१॥
माझ्या मतानें जरि चालशील । कल्याण - मद्बोध तुझें करील ॥
स्वीकार तूं चाकरि मोंगलांची । मानास्पदा वित्त - यशोद साची ॥५२॥
वांछा जरी द्रव्य अपार व्हावें । तें मन्मतानें तुजला मिळावें ॥
देतों तुला आज इनाम गांवें । ऐश्वर्य भोगून तुवां रहावें ॥५३॥
कीर्ती रणीं गाजवुनी हत्यार । घ्यावी अशी हौस असेल फार ॥
विस्तीर्ण या मोंगल - राज - देशीं । केव्हां तरी संधि मिळेल तैसी ॥५४॥
या दुष्ट कर्मा जरि सोडिशील । राज - प्रसादा तरि जोडिशील ॥
होशील मोठा सरदार जो कीं । याहून शोभास्पद काय लोकीं ? ॥५५॥
तूं कोंवळा केवळ बाळ सान । जाली नसे पंचविशी अजून ॥
नाहीं तुला ठाउक दुःख कांहीं । ऐश्वर्य भोगून सुखांत राही ” ॥५६॥
तो मानब हावी खळ खान ऐसें । बोलूनियां वाक्य उगाच बैसे ॥
पाहे न्यहाळून मनोविकार । त्याच्या मनींचे मुखिं वाचणार ॥५७॥
तो शांत - वृत्ती यशवंतराय । ऐकून घे बोलत खान काय ॥
प्रत्युतरा सत्वर देउं लागे । खानास धीर - स्वर - शब्द - सांगे ॥५८॥
“ तूं दिल्लिरा ! क्रूर कृतांत - तुल्य । माझ्या मना झोंबसि जेंवि शल्य ॥
माझ्या हिताची तुज बुद्धि कोठें । तूं सर्व हें दाविसि ढोंग वाटे ! ॥५९॥
तो दुष्ट राजा तव तूं हि दुष्ट । असा तुम्ही मोंगल सर्व नष्ट ॥
हांकून द्यायास तुम्हांस काहीं । उपाय योजूं तरि पाप नाहीं ॥६०॥
माझा असे जन्ममही च माता । अत्यंत ती पूज्य अम्हां समस्तां ॥
येतां तुम्ही तीस विटाळ झाला । तो पाहिजे दोष अशेष गेला ॥६१॥
त्यानीं जया पुण्यद यज्ञ व्हावे । धर्मासही उज्वल रूप यावें ॥
तें दूषिलें बांधुनियां मशीदी । हें शल्य कैसें मज दुःख नेदी ॥६२॥
झाला असा काय नफा अम्हांतें ? । सौख्य प्रजेला घडलें किती तें ? ॥
राजे तुम्ही माद तुम्हांस आला । धिक्कारितों यास्तव मोंगलांला ॥६३॥
सर्वस्व गेलें न कुठेहि थारा । नाहीं सुखाचा क्षण एक वारा ॥
साहूं असे हाल सुखेंकरून । झालों नसो मूर्ख असे अजून ॥६४॥
दिल्लीपतीनें अधिकार हा की । तूतें दिला थोर अलभ्य लोकी ॥
तो चालवावा जपुनी इमानें । व्हावें तुवां शोभित पूर्ण मानें ॥६५॥
विद्या कला - कौशल वाढवावें । पूर्वीं दिलें संतत चालवावें ॥
व्यापार शेती दुसर्याहि वृत्ती । उत्तेजण्याला तुज संधि होती ॥६६॥
लक्ष्मी घरीं येउन दूर गेली । बुद्धी तुला दुष्ट अशी उदेली ॥
नातें पित्याचें विसरून होसी । वैरी कितीचे तरि जीव घेसी ? ॥६७॥
खोटें मदांधा ! करुनी निमित्त । पूर्वीं तुवां जे लुटिले गृहस्य ॥
अन्याचिया मागति भीक दारीं । अन्याय कैसा न मना विदारी ? ॥६८॥
जे वागती पुण्य - करें स्वधर्में । त्यांची न तूं रोधिलीं काय कर्मे ? ॥
कोट्यामधें नाशुन सर्व शर्में । दुष्टा तुवां भेदिलिं लोक - वर्में ॥६९॥
साध्वी किती बाटविल्या खळारे ! । अंगांत येती स्मरतां शहारे ! ॥
तो सद्गुणी भूषण अत्युदार । कां मारिला त्यां अनयेंचि ठार ॥७०॥
वर्णूं किती ते अपराध वाचे । झाले घडे शंभर पातकाचे ॥
होईल जेव्हां गमतें विनाश । आतां कसा इच्छिसि वांचण्यास ? ॥७१॥
निद्रिस्त जे लोक अजून होती । कर्में तुझीं ज्यांस न कोप देती ॥
त्यां वांचवाया करितों उपाय । हा सांग माझा अपराध काय ? ॥७२॥
स्वातंत्र्य पावो मम जन्म - देश । इच्छा अशी फार असे मनास ॥
नाहीं मला लेश धनाभिलाष । धिक्कारितों त्वत्सम दुर्जनांस ॥७३॥
स्वातंत्र्य माझें मजला मिळालें । झालों दरिद्री तरि काय गेले ? ॥
मेलों तरी मत्सम अन्य लोक । होतील देतील तुम्हांत शोक ॥७४॥
जो दावितोसी मजलागिं बाऊ । तें सैन्य दिल्लीहुन येव येऊ ॥
अंगांत जों हिंमत सांठवेल । तों भांडुनी जाण मरूं स्वशाल ” ॥७५॥
या मर्मवाक्यें यशवंत ताडी । स्व - शत्रुचें हाणुन चित्त फोडी ॥
ओशाळला खान मनांत फार । विचार द्याचे बघुनी उदार ॥७६॥
पाहे असे जाहलि मध्यरात्र । हा एकटा निद्रित जीव मात्र ॥
सर्पाप्रमाणें खवळे अपार । तों घोर त्यातें सुचला विचार ॥७७॥
कोपें धडाडे नयनांत अग्न । हुंकार टाकी वदनें भयाण ॥
आंठ्या कपाळावर दिसतात । राहे उभा चावित ओठ दांत ॥७८॥
जों शस्त्र घेऊं यशवंत लागे । तों खान घे तें हिसकून रागें ॥
गर्जोनि मित्रां उठण्यास सांगे । एका क्षणीं ते उठतात मागें ॥७९॥
बोले - तुला सांगत बोध होतो । तो ज्ञात कैसा बधिरास होतो ? ॥
ठेवूं तुला न क्षणही जिवंत । कीं आमुचा तूं करिशील घात ॥८०॥
हे शब्द जों खान वदून जाय । उड्डाण घेतो यशवंतराय ॥
सिंहाप्रमाणें करि गर्जनेला । वाडा तयानेच घुमून गेला ॥८१॥
या वेळिं शोभे यशवंतराय । डौलें पुढें ठेवुन एक पाय ॥
आली पुढें रम्य विशाळ छाती । बाहु बळी थोर तटाटताती ॥८२॥
धिप्पाड ती आकृति चित्त हारी । ये रक्तता पंकज - तुल्य - नेत्रीं ॥
तो खालचा थर्यर ओंठ हाले । मुखांतुनी श्वास सुदीर्घ चाले ॥८३॥
“ गेहागता भीति कधीं नसावी । अद्यापि होती मज रीति ठावी ।
सर्पावरी जो उपकार दावी । निभर्त्सना त्या पुरुषा असावी ॥८४॥
हे दुष्ट हो ! जंबुकसे कशाला । सिंहाचिया चालुन गेहिं आलां ? ॥
एका क्षणें धाडिन मृत्यु - पंथें । आतां तुम्ही जाल पळून कोठें ? ” ॥८५॥
मारी बळें लात दणाण वाजे । ‘ या वीर हो ! ’ जी यशवंत गर्जे ॥
आकाश येतें जणु कोसळून । चित्रासम स्तब्ध दिलीरखान ॥८६॥
गेल्या दुभंगून महालिं भिंती । तेथें दिसूं लागति आंत मूर्ती ॥
येती पुढें तों अठरा असामी । जे गुप्त होते यशवंत - धामी ॥८७॥
केला गदारोळ महाभटांनीं । विकोश केल्या तरवारि त्यांनीं ॥
नेत्रें तयांनीच दिपून गेली । गमे जाणो वीज फिरे महालीं ॥८८॥
खानास तो दोहन शौर्यशाली । पाडी बळे हाणुन लात खालीं ॥
देतो उरीं पाउल शस्त्र काढी । पोटामधें कोप उठे धडाडी ॥८९॥
सxxत त्या शौर्य - बलाढ्य तेथें । जे दोहनाचे प्रियमित्र होते ॥
ते टाकिती सत्वर आंवळून । जे राहिले शेष पठाण तीन ॥९०॥
“ मित्रा ! उदारा यशवंतराया ! । दिल्लीर हा योग्य नसे जगाया ॥
आज्ञा मला दे म्हणुनी दयाळा ! । खानाचिया कापिन कंठ - नाळा ॥९१॥
विश्वास जो यावरि ठेविलास । होऊनियां प्रांजल बोललास ॥
तें श्वान गेला विसरून सारे । मारावया पाहि तुला कसारे ! ॥९२॥
काळीज याचें उलटें पशूचें । बोलों न याचे अपराध वाचे ॥
राहील हा दुष्ट जिवंत सप । देईल आम्हां तरि फार ताप ॥९३॥
अन्याय - दुःखें रडतात लोक । त्यांचामुखें वर्णिल कोण शोक ? ॥
रक्तोदकें तो विझवीन आज । आज्ञा जरी दे यशवंतराज ” ॥९४॥
शांतीनें हृदय भरे वदे वर्दान्य । मित्रांतें प्रिय यशवंत संत - मान्य ॥
“ हा खान स्वजन - महापमानदायी । हें जाणें परि करिजे विचार कांहीं ॥९५॥
इमान यानें जरि मोडिलें असे । परंतु तें आमुचिया मनीं वसे ॥
जया न ठावी नय - नीति पद्धति । शिको तियेला पशु हा नराकृति ॥९६॥
या क्षुद्र मी पशुवरी नच हात टाकीं ।
जाणून कां वरिन थोर अकीर्ति लोकीं ? ॥
आला घरीं म्हणुन वंद्य अम्हांस आहे ।
या सोडितां तरिच शांति मनास राहे ” ॥९७॥
परिसुन वच ऐसें दोहनें मुक्त केला ।
पळत पळत गेहा खान दिल्लीर गेला ॥
खल - नन - कृत वाक्यें क्षोभ या फार आला ।
परि मग यशवंत स्वांतरीं शांत झाला ॥९८॥
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP