यशवंतराय महाकाव्य - सर्ग सतरावा
श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.
भिल्ल यशवंतरायास घेऊन परत कोटा शहरास जाण्याकरितां निघतात - यशवंतरायाची व बैराग्याची गांठ - यशवंतराय त्या बैराग्यास आपली संकटें व दुःखें सांगतो - तो बैरागी त्यास निर्भय राहण्याविषयीं आश्वासन देतो.
श्लोक
वज्राप्रमाणें यशवंत - हस्त । त्यांतून दैबें सुटलों जिवंत ॥
हातांत तो सांपडला म्हणून । भिल्लांस आनंद घडे न सान ॥१॥
जाईल कोठें निसटून भीती । भिल्लांचिया फार मनांत होती ॥
ते शृंखळा ठोकुन हातपायां । कोट्यास नेती यशवंतराया ॥२॥
तो स्वस्थितीच्या विषयीं विचार । होता जरी खिन्न करीत फार ॥
जाणून हातां प्रतिबंध राहे । भिल्लांसवे हांसत बोलताहे ॥३॥
“ वाटेल जावें जरि कीं सुटून । या शृंखळा जातिल ही तुटून ॥
ढेंकूळ ठेवून नदी वहातां । कां मूर्ख तीतें अडवूं पहातां ! ” ॥४॥
तो हात दोन्ही सहजीच झाडी । तोडी बिड्या भूमि - तळास पाडी ॥
हें घाबरे पाहुन भिल्ल झाले । तों धीर आला यशवंत बोले ॥५॥
“ या अर्गला काय करीति मातें ? । मी दूर गेलों असतों स्वपंथें ॥
इच्छा असे जी परमेश्वराची । उल्लंघना केंवि करीन तीची ? ॥६॥
लोकां प्रसंगीं त्यजिलें पळालों । कोट्यांतुनी, जोधपुरा निघालों ॥
कोपावला ईश्वर काय रागें । मातें धरायास तुम्हांस सांगे ॥७॥
जे यत्न केलें विविध प्रकारें । ते जाहले निष्फळ पूर्ण सारे ॥
तो हा पुन्हा राक्षस - तुल्य येतों । दुःखी निराशेंत बुडून जातों ॥८॥
ते लोक माझे प्रियमित्र शुद्ध । जे दावणीला असतील बद्ध ॥
जाऊन वेगें मिसळेन त्यांत । मी त्या स्थळीं मृत्यु वरीन शांत ” ॥९॥
औदार्य हें पाहुन तन्मनाचें । सन्मान देति स्तवितात वाचे ॥
घोड्यावरी घालुन त्यास नेती । कोट्याकडे संतत चाल घेती ॥१०॥
वाटेंत विश्रांतिस घ्यावयाला । भिल्लांचिया मानसिं हेतु आला ॥
देवालया पाहुन रम्य धाले । ते दोन घंटा उतरूं म्हणाले ॥११॥
बैरागि तेथें यशवंत पाहे । मुद्रा जयाची बहु भव्य आहे ॥
त्या प्रेक्षकें पाहुन एक वेळ । तद्रूप ध्यावें मनिं सर्व काळ ॥१२॥
माथां जटा पिंगट जूट - बद्ध । रूद्राक्ष कंठ - श्रवणांत नद्ध ॥
शोभा धरीभस्म ललाट - देशीं । आकाश - गंगा गगनांत जैशी ॥१३॥
ज्याच्या वया सत्तर ऐशिं वर्षें । आहेत भासे बघतांच ऐसे ॥
दाढी मिशा शुभ्र मुखासभोंती । स्वच्छंद वाढून विराजताती ॥१४॥
पाऊस वारा आणि ऊन यांला । सहों जयाचा जणु देह केला ॥
वयोपरत्वें न विकार झाला । देहीं दह्री तो बल - संचयाला ॥१५॥
नानाप्रकारें तप आचरून । तीर्थाटनें संतत ही करून ॥
लागे दिसूं दिव्य शरीर - कांती । पाहून ती नेत्र दिपून जाती ॥१६॥
अंगावरी घेउन दिव्य शाल । व्याघ्रासनीं बैसतसे खुशाल ॥
चाले मुखीं मंत्र - पवित्र कांहीं । रुद्राक्ष - माला फिरवीत राही ॥१७॥
सौम्याकृती निर्मळ कांति वाटे । पोटीं दयेचा नद काय सांठे ॥
तोंडाकडे पाहुन दुःख यानें । भोगीयलें हें परि सुज्ञ जाणें ॥१८॥
मूर्तीस पाहूनच पुण्य - शील । पापें मनुष्याप्रत टाकितील ॥
बोलेल यासीं जरि शब्द दोन । तो स्वर्ग - लोकास करि प्रयाण ॥१९॥
योगींद्र हा पाहुन दिव्य - रूप । भरून ये हर्ष मनीं अमूप ॥
दृष्टी तदंगीं यशवंत लावी । न पांपणी या समयीं मिटावी ॥२०॥
हालूं नये तेथुन त्यास वाटे । पोटामधें विस्मय फार दाटे ॥
हा लोक - संताप निवारण्याला । योगींद्र जन्मास जगांत आला ॥२१॥
गंगेंत पापें ढकलून द्यावीं । स्नानें जशी शुद्धि नरें वरावी ॥
दुःखें तशीं सांगुन यास पूर्ण । शांतीस इच्छी यशवंत तूर्ण ॥२२॥
बैरागि तोही सहजीच दृष्टी । ठेवी करी तो जणु दुग्ध - वृष्टी ।
जों रूप पाहे यशवंत याचें । कल्लोळ पोटीं उठती दयेचे ! ॥२३॥
ज्यांची वदे बोध रसाळ वाचा । परोपकारा अवतार ज्यांचा ॥
ते कोणच्याही स्थितिचा मनुष्य । पाहून दुःखा हरिती अवश्य ॥२४॥
जे एज महात्मे असतात लोक । वरीति वेळीं जरि दुःख शोक ॥
ऐकोनि त्यांची नय नीति रीति । समान दुःखी जन अन्य होती ॥२५॥
तो योगि जेव्हां यशवंतराया । दे हस्त - संकते समीप याया ॥
सान्निध्य पावे कमलात्मजात । साष्टांगपातें नमना करीत ॥२६॥
शांतस्वरें वत्सल तो विरागी । दिल्लीर - शत्रूस विचारि योगी ॥
“ बा कोण कोठील कळीव मातें । कां भोगिसी बंधन कां श्रमातें ॥२७॥
स्वकीय वृत्तांत कथून कांहीं । होणार उद्वेग मनास नाहीं ॥
ऐसें जरी वाटतसेल चित्ता । तरि त्वदीया परिसेन वृत्ता ” ॥२८॥
तों काय बोले यशवंतराय । “ मी अर्पितों त्वत्पदिं नम्र काय ॥
हे साधु - रूपा सदय - स्वभावा । वृत्तांत आतां मम आयकावा ॥२९॥
आहे मराठ्यांत उदार शूर । प्रख्यात ज्याची बल - कीर्ति दूर ॥
मानी असा जो सरल - स्वभाव । माझा पिता तो जगदेवराव ॥३०॥
आनंदनामें डफळे कुळांत । संग्राम - शार्दूल असे सुवृत्त ॥
आहे तयाला कमला सुकन्या । ती जाण माझी जननी सुधन्या ॥३१॥
मातामहाची अणखी पित्याची । झाली तुटातूट अवार्य साची ॥
कोट्यास याया जननी निघाली । संगें मला घेउन तेथ आली ॥३२॥
ऐशी अवस्था परदेश कोटा । विचार तीतें मग होय मोठा ॥
व्हावी इथे काय गती रहातां । स्वदेश आहे बहु दूर आतां ॥३३॥
तों सर्व चिंता पळवावयाला । जो संकटीं कारण एक झाला ॥
पाळी अम्हांला गृहिं कृष्णदास । मी वाढलों त्याच घरीं हताश ” ॥३४॥
तो वृत्त सांगे मम या प्रकारे । संक्षिप्त त्यातें यशवंत सारें ॥
दिल्लीर कोटा शहरास आला । त्यानें कसा काय अनर्थ केला ॥३५॥
पावून रात्रंदिन दुःख शोक । त्रासून त्याच्या जुलमास लोक ॥
कोट्यांत कैसे उठले विरुद्ध । दिल्लीर गेला न करून युद्ध ॥३६॥
पौरास दंडूं मग युक्ति काढी । दिल्ली - पती होळकरास धाडी ॥
झालें कसें त्या पुरिं युद्ध गाढें । धैर्ये कसा नागर लोक भांडे ॥३७॥
होऊन त्या वेळिं पुढार अंगें । तो शत्रु हाणी परि केंवि भंगे ॥
साह्यास आणूं रजपूत - मेळा । चिंटून तो जोधपुरा निघाला ॥३८॥
माया कशी भिल्ल - जनीं रचून । त्या ठेविलें घोरवनीं धरून ॥
मल्हाररावा पुढती तयाला । ते नेति हें सांगुन तो म्हणाला ॥३९॥
“ माझा असे हा इतिहास सांग । कांहीं समाधान - सुशब्द सांग ॥
एका प्रकारें च न दुःख मातें । गोष्टी किती या छळिती मनातें ! ॥४०॥
मी लोक - कार्यार्थ झटूं निघालों । आसक्त रात्रंदिन त्यांत झालों ॥
आयास ते व्यर्थ समग्र होती । या कारणें फार मनास खंटी ॥४१॥
मी वीर - वंशीं उपजून काय । केलें मिआळ्या यश ? हायहाय ! ॥
आलों तसा येथुन नीट चालें । कोणी न काढील हि नांव काळें ॥४२॥
घोड्यावरी बैसुन धीट भाला । साह्यास घेते तरवार ढाला ॥
झेंडा जयांचा अटकेस लागे । मी शोभतों काय तयांत ? सांगे ॥४३॥
करून चिंता दिनरात्र सारखी । स्वदेश झाला असता जरी सुखी ।
तरि स्व - कर्तव्य सरे जगांतलें । मनास ऐसें असतेंच वाटलें ॥४४॥
गर्जे तुफानीं खवळे समुद्र । पडे तिथे तैल हि अल्प मात्र ॥
तैसे महात्मे जन संकटांत । पडून त्यांतें करितात शांत ॥४५॥
मी मंद - धी पाहुन तोच सिंधू । गेलों पडाया जंव वारि - बिंदू ॥
तों शब्द केला लव त्यांत गेलों । आलों तसा व्यर्थ जगांत मेलों ॥४६॥
माता गुणाढ्या कमला शुशीला । आधार आतां नच कोणि तीला ॥
भर्ता पिता पुत्र असून नाहीं । झाली अनाथा भुवनांत पाहीं ! ” ॥४७॥
हें बोलताहे यशवंतराय । बैरागियाची स्थिति काय होय ॥
होणार वृष्टी नभ मेघ - जालें । भरे, तसें तोंड उदास झालें ॥४८॥
अकस्मात डोळ्यांतुनी अश्रु आले । जणो डोंगराला झरे हे उदेले ॥
तसे, थेट गालावरी येति खालीं । जणो काय मोत्येंच खालीं गळालीं ! ॥४९॥
त्या शुभ दाढीवर अश्रु येती । तेथेंच वाटे अडकूं पहाती ॥
कीं ती दंवानें भिजलीं रहाती । जीर्णें तृणें कार्तिक - सुप्रभातीं ॥५०॥
आश्चर्य वाटे यशवंतराय । बैरागि लागे तरि कां रडाया ॥
“ हें काय ? हें काय ? महानुभावा । कां आपणा दुस्तर शोक व्हावा ? ॥५१॥
या पामराचें परिसून वृत्त । काम जहालें कष्ट - निमग्न चित्त ? ” ॥
योगींद्र तेव्हां मनिंचा विकार । तो आंवरी बोलत गोड फार ॥५२॥
“ बा रम्यशीला ! यशवंतराया ! । चिंता तुवां ही नलगे कराया ॥
संसार मी सोडुन दुःख - शोका । आहें उदासीन समस्त लोका ॥५३॥
स्थिती तुझी पाहुन त्याचसारखी । स्मृती मला मागिल होय जाण कीं ॥
म्हणून माझें मन धांवलें तिथे । हे अश्रु झाले मम दुःख सांगते ॥५४॥
सौख्यांत तूं घालविलेंस जन्म । केलें कधीं त्वां नच युद्ध - कर्म ॥
ठावा मनोभंग तुला न लेश । आयास झाले म्हणुनी जिवास ॥५५॥
औदार्य मोठें सरळ स्वभाव । प्रौढी विचारीं बहु दूर धांव ॥
आनंद - वृत्ती बल शौर्य भारी । एकत्र हें सर्व तुझ्या शरीरीं ॥५६॥
लोकांस हातांत कसें धरावें । संतुष्ट ठेवून सुखी करावें ॥
तूं जाणसी साधुन घेउं कार्य । होतास तूं धुर्य पदास योग्य ॥५७॥
कार्यास जी सिद्धि तुझ्या न आली । कोट्यांत लोकांस विपत्ति झाली ॥
तोही तुझा दोष नव्हे सुशीला । घेऊं नको दुःख करून बाळा ! ॥५८॥
ही ठेंच लागे पहिल्याच वेळीं । तीनें निराशा तव फार झाली ॥
होऊं नको यास्तव तूं उदास । सोडीं धिराची न कधींच कांस ॥५९॥
मल्हार ही जाणिल सद्गुणाला । चिंतील तो नाश तुझा कशाला ? ॥
मोठ्यांस मोठे न कधीं छळीती । केशास नाहीं तव जाण भीती ॥६०॥
देशाभिमानी नय - मार्ग - चारी । धर्म प्रसारा झटणार भारी ॥
मल्हार तो होळकर स्वभावें । त्यातें तुला पाहुन सौख्य व्हावें ॥६१॥
धोका जिवाला न तुझ्या वसेल । कोट्यास जा निर्भय तूं खुशाल ॥
भेटेन काळें तुज त्या पुरांत । आनंद भेटे समजें मनांत ” ॥६२॥
प्रेमाचे उठति मनीं भरें उमाळे ।
तों वाणी स्फुट वदनांतुनी न चाले ॥
दे आशीर्वचन पवित्र योगिराया ।
तो सांगे मग कमला - सुतास जाया ॥६३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP