यशवंतराय महाकाव्य - सर्ग एकविसावा
श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.
मल्हारराव आनंदरावानें सांगितलेल्या वृत्तांताबद्दल खात्री करून घेतो - यशवंतरावाच्या पायांतील बेडी तोडून त्यास मल्हारराव होळकराकडे नेतात - तेथें मल्हारराव होळकराचे व आनंदराव डफळे ( वैराग्याचा वेष घेतलेला ) याचें आपल्याशीं खरें नातें काय आहे हें यशवंतरावास कळतें - हें वर्तमान ऐकून यशवंतरायाची झालेली स्थिति - मल्हाररावाचें प्रेमळ भाषण - मल्हारराव, आनंदराव व यशवंतराव हे कमलेस भेटण्याकरितां कोटाशहरांत जाण्यास निघतात.
श्लोक
असें आनंदाचें वचन परिसोनी प्रियकर ।
अकस्मान्मल्हारी चकित उठला तो झडकर ॥
तटस्थ स्वस्थानीं क्षणभरि महावीर बसला ।
स्थिती त्याची झाली कवण कवि वर्णील तिजला ? ॥१॥
उभा राहे तेथें जणु अचल पाषाणच असे ! ।
स्थिती शोभा - स्थानीं वदनिं हृदयींची दिसतसे ॥
महाहर्षें नेत्रें टवटवित मुद्राहि दिसती ।
तदा आश्चर्यानें निरखि डफळ्यातें क्षण कृती ॥२॥
म्हणे “ हे आनंदा सुचरित सख्या ! पुष्पपुरुषा ! ।
पहासी तूं आजी मजसिं ठकवाया तरि कसा ? ॥
असंभाव्या गोष्टी घडतिल मला हें कळविसी ।
मम स्वांता रक्षूं व्यसनिं यशवंता वळविसी ? ॥३॥
अगाधा ज्या लीला असति अथवा कीं प्रभुचिया ।
शके अल्पज्ञानें न नर समजूं पामर तयां ॥
न जाणो तूं होसी अमृत - घनसा वत्सल महा ।
हरीच्या संकेतें करिसि गमना या स्थळिं पहा ॥४॥
जनांतें कोत्याच्या त्रसित यवनांच्या कर - तळीं ।
बघे यत्नें नूत्नें झठुनि जपुनी सोडवुं बळी ॥
म्हणोनी ते गाती निशिदिन जयाचें सुचरित ।
असे कीं तो माझा सुमति मुलगा ? सांग खचित ॥५॥
जयाच्या शौर्याचें स्तवन करणें प्राप्त मजला ।
स्व - राज्याच्या पाया निज नगरिं जो घालुं सजला ॥
प्रतापी ही म्याले थरथर सदा मोंगल जया ।
असे कीं तो माझा सुत बहुगुणी ? सांग सखया ! ॥६॥
बळाचा शौर्याचा निधि विदित तो बादल मला ।
असा ज्या वीरानें झगडुन रणीं भिल्ल वधिला ॥
जयाच्या हातानें कुमति खळ तो दिल्लिर मरे ।
असे कीं तो गाजी ममसुत ? सख्या सांगसि खरें ? ॥७॥
कसा नाचे झेंडा सतत भगवा भूपति - शिरीं ।
प्रचंडें स्वारांची प्रबळ पथकें ठेविं पदरीं ॥
असे जिंकूं आम्ही परि न शकलों तीन महिने ।
जया, कीं तो माझा प्रिय सुत असे ? सत्य कथणें ॥८॥
जया माझे स्नेही प्रबळ हटवूं नित्य झटले ।
न शौर्यानें कोटा झगडुन तयांला परि मिळे ॥
मराठे लोकांचे सकल करिता यत्न विफळ ।
असे कीं तो माझा तनुज यशवंत श्रुत - बल ? ” ॥९॥
असे नाना प्रश्न प्रथम करि मल्हार डफळ्या ।
तयाच्या हर्षाच्या हृदयिं उठती थोर उकळ्या ॥
महौत्सुक्यें तेव्हां झटपट पदें टाकित फिरे ।
निराशा शंका ही पुनरपि मनीं येउन भरे ॥१०॥
वदे तों आनंद स्व - जन - गण - संताप हरिता ।
खरें जें मी पूर्वीं तुजसिं वदलों तें जन - मता ! ॥
असा हा सोन्याच अदिवस बघतों धन्य सखया ! ।
प्रसादें ईशाच्या; म्हणून सदया आठविं तया ॥११॥
असे येथें देवालय जवळ कोसांवर दहा ।
सकाळीं मी तेथें करित बसलों पूजन पहा ॥
तिथें येतां कोणी तरुण पुरूषाला बघितलें ।
मना माझ्या त्याचेम अनुपम असें रूप गमलें ॥१२॥
स्थिती रीती त्याची बघुन गति ही वेष वचन ।
गमे मोठा कोणी तरि व्यसनिं हा मग्न सुजन ॥
सभोंते राहोनी सततच त्तथा भिल्ल जपती ।
बिड्या हातीं पायीं जड बहुत ही त्यास असती ॥१३॥
स्वभावें ती त्याची स्थिति बघुन आला कळवळा ।
पुढें त्यातें याया जवळ कर - संकेत दिधला ॥
विचारीलें ‘ सुज्ञा ! तव तनु कशी बंदिंत पडे ? ।
पिता आई कोठें असति ? तव कोठें जनि घडे ? ’ ॥१४॥
मला आलें तेव्हां कळुन सुख झालें अतिशय ।
कृपा - वृष्टी माझ्यावरि करि कसा श्रीश सदय ? ॥
गुणी कन्या माझी स्थळिं कवण राहे मज कळे ।
तिच्या पुत्रा दुःखी बघुन मन भारी कळवळे ॥१५॥
तुझ्या हातीं त्यांचे मरण जगणें राहत असें ।
कळे तेव्हां माझें स्थितिवर कसें चित्त निवसे ? ॥
तया ‘ भीती सोडीं ’ म्हणुन मग आश्वासन - पर ।
सुखाचें बोलोनी वचन उठवीलें झडकर ॥१६॥
तुझा माझा होता बहुत दिवस स्नेह बरवा ।
भरे तेणें चित्तीं ह्मणुन मग उत्साह हि नवा ॥
प्रयन्तें रक्षावा तनुज कमलेचा म्हणुनियां ।
तुला आलों प्रार्थूं प्रथम कथिलें तें च सदया ! ॥१७॥
असे एकाएकीं सुखद नव वृत्तांत कळती ।
जणो कीं हीं स्वप्नें सुखवुन मनाला फसविती ॥
असो आतां पायाम पडुन तुजला हेंच विनवीं ।
तुझी भार्या देखो तुजसिं यशवंतास सुखवीं ” ॥१८॥
महात्मा मल्हारी वचन वदला होळकर तो ।
“ जिवांचा प्राण्यांच्या विधि तरि कसा घोळ करितो ! ॥
जयाच्या दृष्टीनें नयन सुखवावे हरहर ! ।
अतया मारूं हातीं धरवित हत्यारा खरतर ॥१९॥
वहातां ओघानें प्रबळ नदिच्या मृन्मय घट ।
जसे अन्योन्यांला बघति थडकूं येति निकट ॥
तसा मी संसारीं झटपट कराया झट निघे ।
स्वपुत्राला नेणें जवळ यशवंता जरि बघें ॥२०॥
किती पुण्यें केलीं ? कितिक तरि मी जन्म जपलों ।
प्रभो ! त्वत्सेवेला, किती तरि तपें घोर तपलों ? ॥
जयांचीं हीं आलीं अवचित अशीं सुंदर फळें ।
तुझी लीला देवा ! मजसिं मति - मंदास न कळे ! ।२१॥
मनीं इच्छा नाना धरून जन संसार - गहनीं ।
पुढें जातां जातां थकुन बसती वाट चुकुनी ॥
पिता पुत्रां गांठी पडति समयी त्या अवचित ।
प्रभूचीं हीं सूत्रें अवघड कळायास खचित ॥२२॥
जशीं कांटेझाडें जवळ पळतां फाडिति तनू ।
तशीं दुःखें पीडा करिति किति मी त्यांप्रत गणूं ? ॥
अशाही संसारीं परि न जन राहील कवण ? ।
जरी देवा ! त्यातें सुखकर असा दाविसि दिन ॥२३॥
सुखें स्वर्गीं नाना असति कथिती ग्रंथ अवघे ।
तयांची य अलोकीं तरि कवण तो धन्य चव घे ? ॥
अहाहा ! आनंदा ! सुख मजसिं जें आज मिळतें ।
तयाच्या योगानें महि-तल मला श्रेष्ठ गमतें ॥२४॥
नियंता पौरांचा सुभग मतिमंतांत पहिला ।
अहंता भिल्लाची हरित सुख - संतान महिला ॥
विहंता खानाचा निज यश समंतात् पसरितो ।
जयंता त्या जैसा मुरप यशवंतास बघतों ॥२५॥
अहो ! आणा कोणी सुजन यशवंता झडकरी ।
बिड्या तोडा वत्सा असुख न घडो लेशहि भरी ॥
उठा आणा माझ्या सकळ सरदारांस जवळ ।
तयांतें पाहूं दे प्रिय तनुज माझा श्रुत - बल ! ” ॥२६॥
असें जों मल्हारी वचन वदला गद्गद मुखें ।
कुणी गेले आणूं त्वरित यशवंताप्रत सुखें ॥
प्रयत्नें काढोनी कर - चरणिंचें घट्ट निगड ।
तया नेती स्वामीजवळ पळती ते धडधड ॥२७॥
तयांची ती मुद्रा बघुन यशवंतास नवल ।
गमे जों ते आले सविनय तयाच्याच जवळ ॥
तिथे पाहे पौराधिप चकित बैरागि मुदित ।
महात्मा मल्हार स्थित सदय दृष्टी निरखित ॥२८॥
म्हणे तों आनंद प्रथम “ यशवंता ! प्रिय - गुणा ! ।
नको वाटूं देऊं मज बघुनियां विस्मय मना ॥
नसें मी बैरागी जरि तुजसिं बाहेरून दिसें ।
मला आनंदाख्या समज तव मातामह असें ” ॥२९॥
उठे तों मल्हारी दिसलि तरि त्याची स्थिति कशी ।
पडे गालीं बाष्प प्रचुर घडते वृष्टिच जशी ! ॥
गळां दाटे वाटे कठिण भरला त्या गहिंवर ।
म्हणे “ बा ! ये पुत्रा ! मज कर सुखी या महिवर ॥३०॥
मनाची जी माझ्या स्थिति घडतसे पाहुन तुला ।
मनीं प्रेमाचा जो खळबळुनियां लोट उठला ॥
अशा गोष्टी मातें सुचविति खरा तूं मम सुत ।
न कां आनंदाचें मग वचन ऐकेन विहित ॥३१॥
तुला वत्सा ! झालों प्रसवुन सुखी या महि - तळीं ।
न जाणें दुर्दैवें परि असुनि तूं नित्य जवळी ॥
तुझी आई तूं मी मिळुन सगळा काळ दवडूं ।
मरायाच्या पूर्वीं मम हृदयिं हें इच्छित घडू ॥३२॥
गुणी विद्वान्मानी कुशल व्यवहारांत सुकृती ।
पुरस्कर्ता धर्मा नय - पटु उदार - स्थिति - मती ॥
बळें गाढा शौर्यें अतुल सकल - ज्ञान - महित ।
असा माझा पाहें तरुण अणखी सुंदर सुत ॥३३॥
जशी रानीं कोठें पडलि ठिणगी कोण बघतो ! ।
क्रमें काळें तीचा भयंकर असा लोळ बनतो ॥
मराठा तूं तैसा पडुन परदेशीं निज गुणें ।
अतिप्रख्यातीला चढसि यश तें यास्तव दुणें ॥३४॥
विचित्रा ज्या गोष्टी कथितिल पुराणांतिल जन ।
कथा वैचित्र्यानें मम अधिक त्यांतें म्हणविन ॥
जसे झोंके खातां चपळ गगनीं वावडि फिरे ।
मनुष्या आयुष्य - क्रम घडतसे त्यापस्चि रे ! ॥३५॥
तुझी आई तूतें धरि जंव न गर्भीं बहु दिन ।
तिला केलें तेथें त्यजुन नृप कार्यार्थ गमन ॥
तयानें हा झाला विरह कमलेचा बहुदिन ।
असो क्षात्रा धर्मा सतत मम धिक्कार कठिण ! ॥३६॥
हंसावें बोलावें क्षणभर बसावें न निचळ ।
रडावें रांगावें दुडदुड पळावें हि चपळ ॥
अशी लीला बाल्यीं तव नच पहाया मज मिळे ।
पिता हा मी तूझा किती तरि अभागी नच कळे ! ॥३७॥
तुला अंकीं माझ्या बसवुन शिकूं साह्य करणें ।
तुवां केल्या प्रश्ना परिसुन विचित्रांस हंसणें ॥
तुवां जें मागावें धरून हठ त्यातें पुरवणें ।
न होतें हें दैवीं म्हणुन गमते व्यर्थचि जिणे ! ॥३८॥
पित्यानें पुत्राला सकळ शिकवावें समुचित ।
तया शस्त्रें शास्त्रें विविध करवावीं अवगत ॥
मराठ्यांच्या रीती असुन सरदारांत असली ।
न संधी दुर्दैवें तुजसिं शिकवूं म्यां बघितली ! ॥३९॥
‘ जिथें नाहीं पाणी स्थळिं तरू अशा एक उठला ।
न माळी त्या पाहे न जल लव ओपी न जपला ॥
परंतु स्वानंदे प्रति दिन चढे तोच वरती ।
सुगंधें तत्पूष्पांतिल मग दिशा सर्व भरती ’ ॥४०॥
तुझ्या कंठीं विद्या सहजचि पडे मोहित तुला ।
धरी ही तारूण्यामधिं हि तव त्या अद्भुत फळा ॥
मना आली प्रौढी सरळपण औदार्य अवघें ।
रणीं या कोट्याच्या तुमुल महिने तीनहि बघे ॥४१॥
स्वराज्य स्थापावें ह्मणुन झटलासी प्रतिदिन ।
करावें मीं याचें उचित असतां नित्य मनन ॥
तुझ्या मार्गी ती ती अडचण पुढें मीं ढकलिली ।
अशा गोष्टी आतां स्मरुनच मना खंत जडली ! ॥४२॥
कशाला मीं केलें समर असतें तुंबळ ? मुला ! ।
तुझी कांहीं पूर्वीं जरि मिळवती माहिती मला ॥
कशाला जीवाचा अमित हरिला प्राण असता ? ।
अनार्थाचा झाला कहर शहरीं सज्जन - मता ! ॥४३॥
असो जी जी झाली मजकडुन पीडा प्रतिदिनीं ।
नव्हे ती मीं केली समज पुरतें हें समजुनी ॥
तुवां सौख्यें आयुःक्रम चिर करावा म्हणुनियां ।
विनंती त्या ईशाजवळ करितों पूर्ण सदया ! ” ॥४४॥
वदे ऐसें प्रेमें रडुनि रडुनी होळकर तो ।
स्वहस्तें सन्मानें धरून यशवंता बसवितो ! ॥
तिघे एकमेकां बघुन सुख - सिंधूंत बुडले ! ।
तयाच्या योगानें सकळ गत गोष्टी विसरले ॥४५॥
अभागी तृष्णेनें तळमळत पांथस्त पडतो ।
‘ अहो ! द्याहो पाणी लव तरि ’ असे शब्द करितो ॥
अशा वेळीं लोंढा प्रबळ नदिचा येउन भिडे ।
तसे झाले पौराधिपति यशवंता मग पुढें ॥४६॥
सुखाब्धीच्या लाटांमधिं बुचकळे मारि मिटक्या ।
रडे हांसे झाली स्थिति बहु चमत्कारिक तया ॥
धरी आजोबाचे चरण मग वंदी स्वजनका ।
गळा दाटे प्रेमें म्हणुन बसला तो क्षण मुका ॥४७॥
“ अहो ! आलें माझें सुकृत अवघें आजच फळा ।
तुम्हां दोघांच्या मी म्हणुन बघतों मूर्ति विमळा ॥
अहो ताता ! केले बहुत अपराध प्रतिदिन ।
क्षमा व्हावी त्यांची म्हणुन चरणांतें विनविन ॥४८॥
जयांच्या म्यां पायां पडुन सुखवावें घडिघडी ।
कराया त्यांच्याशीं सतत झटलों मी वरचढी ॥
पितापुत्रीं झालें रण नवल हें लोक म्हणती ।
अहाहा ! दैवाची किति तरि चमत्कारिक गती ! ॥४९॥
अहो ताता ! मातामह लवकरी येथुन चला ।
सुखी माझी जावी बुडुन जननी पूर्ण कमला ॥
न जाणो ती कांहीं करिल भय वाटे मज असें ।
चला जाऊं कोट्यामधिं म्हणूनियां ” तो वदतसे ॥५०॥
आनंद, मल्हार, पुराधिकारी ।
घेऊनियां मंडळि अन्य सारी ॥
घोड्यांवरी बैसुनियां निघाले ।
वेगें बघाया कमलेस आले ॥५१॥
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP