यशवंतराय महाकाव्य - सर्ग अठरावा
श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.
यशवंतरायास भिल्ल होळकरापुढें घेऊन जातात - दोघांची भेट व संभाषण - यशवंतरायाचा आईस निरोप.
श्लोक
मग यावया जनन - भूमिला निघे । यशवंत तो फिरून मागुती बघे ॥
नच त्या स्थळा त्यजुन दूर जाववे । विष - तुल्य तें विरह - दुःख जाणवे ॥१॥
शिरिं घेउनी भरियले जलें घट । फिरती पुढें कितिक सुंदरी झट ॥
बलिपुष्ट ही धरि दिशेस दक्षिण । गमला तदा अशुभही सुलक्षण ॥२॥
म्हणतो मनीं “ शकुन चांगले असे । दिसती पुढें न कळतें घडे कसें ॥
खल बांधुनी परि वध - स्थळाकडे । मज नेति हें दिसत थोर सांकडें ” ॥३॥
मन सांवरे श्रवुन योगि - भाषण । स्थिर शांतता वसलि तेथ येउन ॥
लव राहिलें न भय मृत्युचें तया । न करो हि होळकर वा करो दया ॥४॥
“ जरि सोबती सुटति संकटांतुन । खरचीन या समयिं मी स्व - जीवन ॥
खपले बळें झटुन तीन मास जे । नच यावया अरि जयांपुढें धजे ॥५॥
मिळवो पुर प्रियकर स्वतंत्रता । किति या हठें सतत भांडलों स्वतां ॥
म्हणुनी न होळकर कोप टाकिल । पुरताच या समयिं सूड घेइल ॥६॥
स्मरतें पुन्हा वदत योगि जें वच । भलतें घडे गमतसे कधीं नच ॥
असतात जे सुजन बुद्धि - संयुत । व्यवहार ते आति पूर्ण जाणत ॥७॥
बघतां नरा विषय संकटामधें । करि सांत्वना विबुध गोंडसें वदे ॥
परि त्यागुनी अधिक योगि बोलला । जवळील हा मजसिं आप्त भासला ” ॥८॥
दिवशींच त्या नगरिं भिल्ल पोंचती । जंव पावला तपन अस्त - पर्वतीं ॥
पडली मराठि बघतात छावणी । सुखि होय होळकर जेथ राहुनी ॥९॥
यशवंत तो हळु पुढें करी गती । खल भोंवते मिळुन भिल्ल चालती ॥
रजपूत त्या बघति खिन्न होउनी । परि काय ते करिति शक्ति त्यां उणी ॥१०॥
धरिला बळीहि यशवंतराय हा । अशि बातमी सुखद होय जी महा ॥
पसरे त्वरें श्रविति दक्ष दक्षणी । भरितात ते गगन सिंह - गर्जनीं ॥११॥
यशवंत सद्गुण - गणीं विराजित । जन - मान्य होळकर युद्ध - पंडित ॥
बघती कसे निरखुनी परस्परां । म्हणती मनीं नर ‘ सुधन्य तूं खरा ! ’ ॥१२॥
नगरी तया समयिं एक देवळीं । यशवंत होलकर भेटले बळी ॥
दुसराच हा समय भेटिचा अहा ! । परि भिन्नता किति दिसे तिये पहा ! ॥१३॥
बहु आदरें सुखवि पेशवा जया । मिळवून जो रणिं विराजतो जया ॥
जन - मान्य होळकर आसनीं वसे । गगनांत कीं रविच कांतिनें दिसे ॥१४॥
इकडे तया पुढति पौर - नायक । रजपूत - लोक - मनिं सौख्यु - दायक ॥
दिसला पराजित बलाढ्यही निका । निज कांतिनें रहित चंद्रसा फिका ॥१५॥
मग शूर होळकर कोप - निर्भरें । करि भाषणाप्रत कठोरशा स्वरें ॥
“ यशवंत तूं म्हणवितोस आपणा । यश कायसें मिळविलेंस दुर्जना ॥१६॥
कृति ज्याचिया सुजन - भव्य - दायक । प्रभु दिल्लिचा तव दयाळु मालक ॥
उठलास त्यावर असें हि जाणुन । स्वजनीं अम्हावरहि शोक आणुन ॥१७॥
करणी तुझीच सकळांस भोंवती । जगसी सुखें अजुन केंवि दुर्मती ॥
इतुक्या जिवांप्रत तुवांच नाशिलें । फळ भोग बा स्मरून कर्म आपुलें ॥१८॥
नय - मार्ग - तत्पर नृपा न मानिते । स्वजनावरी अतुल दुःख आणिते ॥
तव तुल्य दुर्मद जगांत येउन । पर - वांचनें अयश जाति घेउन ॥१९॥
घटल्या तुझ्या खटपटी जरी किती । धरि जन्म - भू अधिक दुःखदा स्थिती ॥
नृप - कोप हा अनल - तुल्य पेटला । शलभापरी पडसि त्यांत दुर्बळा ! ॥२०॥
तुज दोहना हि तव मित्र मंडळा । झणि धाडितों करून बद्ध दिल्लिला ॥
तुज भेटणें निज सुहज्जना जरी । दवडीं वृया समय हा न तूं तरी ॥२१॥
झगडून तूं सतत तीन मास ते । बहु नाशिसी स्वजन दुःख वाटतें ॥
किति पावले विलय वीर कीं हिरे । धन खर्चिलें गणित त्यास कायरे ! ॥२२॥
असुनी असे हि यशवंटराजया । मज वाटतें उचित दाखवूं दया ॥
असतां तया समयिं कोटियामधें । मन दाविसी सरळ थोर सौख्य दे ॥२३॥
उठलास ज्यावर हत्यार घेउन । अतिरुष्ट त्या नृपतिचें असे मन ॥
बचिं गुंतलों म्हणुन त्याचिया न ये । तुज मोकळें करूं अकीर्तिच्या भयें ॥२४॥
परि होति ज्या खटपटी तयांत मी । न करीं उणे तुजसिं सोडवूं श्रमीं ” ॥
यशवंत ही मग तयास बोलला । परिसून होळकर डोलतो भला ॥२५॥
“ छाळिलें पुरा अरि - जनीं परोपरी । किति पावलों म्हणुन दुःख अंतरीं ॥
रजपूत मीं जमविले लढावया । अपराध तूं म्हणसि त्यास कासया ? ॥२६॥
पति दिल्लिचा अति बलाढ्य तो जरी । करूनी कृपा नृपति - धर्म आचरी ॥
तरि कायसी गरज होय संगरा । क्षण हा मनीं कर विचार तूं खरा ॥२७॥
शिव भूपती स्वजन - सौख्य - वर्धन । करि साहसी झटुन शत्रु - मर्दन ॥
पथ योग्य मीं धरियला असून तो । तुज काय बा म्हणुन कोप आणितो ! ॥२८॥
जुलमी अशा नृपतिशीं लढावया । उठलों बळें यश दिगंतिं न्यायया ॥
पुरवूं मधें पडसि तूं स्वहेतुला । अपराधि यास्तव म्हणेन मी तुला ॥२९॥
भुवनीं मराठि सरदार झुंजती । यवनासवेंच परि वैर बांधिती ॥
निज धर्म त्यां सतत वाढवूं मती । करणी तुझी उलट त्यांत जाण ती ॥३०॥
करितास तूं न जरि चाल या पुरीं । धन - वासनाच पुरवावया खरी ।
नगरांत या समज सर्वही जन । असतों बलाढ्य धन - धान्य - वर्धन ॥३१॥
तव दुर्नयेंकरून मृत्यु पावतों । परि खेद यास्तव मला न वाटतो ॥
किति मारिले असति लोक तूं बळें । अपराध ज्यां न शिवलाहि ते भले ॥३२॥
जरि दंडणें तुजसिं होय नागरां । तव दंड तो मजवरी पडो बरा ॥
जन अन्य ते निरपराधि जाणणें । वधितोस त्यां धरून काय कारणें ? ॥३३॥
सकळांस मीं उठविलें म्हणोनियां । तरवरि भेटुत गळ्यास माझिया ॥
तव कोप - वन्हिंत पडेन आहुती । जन सर्व जाउत घरास मागुती ॥३४॥
समरांत आजवर वीर थोरसे । पडले अनाथ जन अन्य ही तसे ॥
मग रक्त शिंपडुन भूमिच्या तळा । इतरांस रक्षण करीन दुर्बळां ॥३५॥
अनयें तुझ्या मुकति लोक जे जिवा ! करिती मलीन तव कीर्ति - वैभवा ॥
सरशील काय अजुनीहि मागुती ? । पुरली न घातकर हांव काय ती ? ” ॥३६॥
यशवंत शांत गुणवंत यापरी । वदुनी उभा असुन मौन तो धरी ॥
मग त्यास होळकर दूर न्यावया । कथितो मनीं उपजली जरी दया ॥३७॥
जवळीच वास - गृह जें उभारिलें । जन पौर बांधुन जियेहि ठेविले ॥
तिकडे शिपाइ यशवंत याप्रत । झणि नेति ते विजय - दुर्मदोद्धत ॥३८॥
निज मित्र दोहन हि मान सागर । यशवंत पाहत अनेक नागर ॥
दृढ शृंखला चरण - हस्त - बंधन । जखमा शरीरिं बहु आतळे मन ! ॥३९॥
झुजणार मर्द करणार कीर्तिला । अतिशूर जाणति न मृत्यु - भीतिला ॥
बसले तिथे अचल काय पर्वत । करि इंद्र ज्या समयिं पक्ष खंडित ॥४०॥
रडले तया बघुन दुःख पावले । जणु जीव बाहिरच जाउं धांवले ! ॥
यशवंत सांत्वन करी मृदु - स्वरें । सुखवी क्षणैक निज मित्र ते खरे ॥४१॥
तंव येउनी म्हणत एक चाकर । “ असला हुकूम जरि कांहि तो कर ॥
उपजून त्वद्गृहिंच पूर्ण वाढलों । पदरीं तुझ्या वसुन सौख्य पावलों ॥४२॥
तुजसारखे न ममाताळु मी धनी । बघणार यास्तव मरेन हें मनीं ॥
म्हणुनीच शेवटिल भेट घ्यावया । बसलों इथे मजवरी करी दया ! ” ॥४३॥
यशवंत सेवक जनांत भक्तिला । बघुनी अशा गहिंवरास पावला ॥
पडतांच संकट सुमित्र सोडिती । म्हणतात ते जन असत्य बोलती ॥४४॥
“ सखया खुशाल द्घरिं जा सुखें रहा । सुख - होय जेंवि जननीस तें पहा ॥
हत - भाग्य पुत्र नसतां तिला कसें । तुजसारख्याविण सुखास येतसे ? ॥४५॥
प्रिय माय पुष्ण्य - चरिता वसे घरीं । तिस सांगतों कळविं नीट यापरी ॥
मीनं तत्पदें स्मरून सौख्य मानितों । परि नेत्र केंवि निववूं ? न जाणतों ॥४६॥
तव पुत्र मी चरणिं नम्र होउनी । करिं शेवटील विनंती धरीं मनीं ॥
उदरीं तुझ्या जननि जन्म घेउन । नच कांहिं केलि करणीं ह्मणे मन ॥४७॥
मज हौस फार रणशूर होइन । तरवार गाजविन कीर्ति घेइन ॥
परि इष्ट होय जगदीश्वरा न तें । म्हणुनी चरित्र मम खुंटतें इथे ! ॥४८॥
ह्मणवूं सुधन्य वदनांतुनी तव । करणी अचाट करितों जगीं नव ॥
जरि कांहिं काळ जगतों महीवरी । परि हाय ! हें घडतसे कसें तरी ! ॥४९॥
मजपासुनी सुख तुला किती मिळे । जननी अभाग्य तनुजास हें कळे ॥
परि पुत्र - वत्सल दया - नदोद्भव । करिसी कृपा धरिसि थोर गौरव ॥५०॥
मम नाश दिल्लि - पति चिंतितो जरी । तरि काय होळकर तो कृपा करी ॥
फिरलें समस्त मम दैव हें असें । म्हणुनी निराश मम जीवनीं वसें ॥५१॥
मम मृत्यु - शोक लव ही न तूं करी । न उदास - वृत्ति किमपी हि तूं धरीं ॥
झुरणीस लावुन न देह शोषणें । न च दुःख ० शकुं हृदयांत पोषणें ॥५२॥
मज एकदा जननि बोलसी अतां । करिं सत्य वागुन तसेंच तूं स्वतां ॥
कुळ उच्च त्या उचितसें च वागणें । प्रभु - रोष बैसुन निमूट सोसणें ॥५३॥
जरि पौर ते मजसिं दोष देतिल । तरि त्यांस सांग जरि रुष्ट होतिल ॥
झटलों तया हित करूं मनांतुन । मरतों करून मम देह अर्पण ॥५४॥
धन फार जें किसनदास मेळवी । गरिबांस दे सकल त्यांस तोषवीं ॥
तव दुःख जीर्ण तनु तींत शोक हा । खिळवूं नको दृढ सुशांत तूं रहा ॥५५॥
जन्मास येउन सुखांतच नित्य राहे ।
कोणी असा न नर या भुवनांत आहे ॥
दुःखें सुखें सकल भेटति जीव - मात्रा ।
आई ! विचित्र जगिं या परि लोक - यात्रा ” ॥५६॥
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP