यशवंतराय महाकाव्य - सर्ग नववा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


मराठी फौजेची कोट्यावर चाल - बिनी - लढाऊ हत्ती - जरीपटका - स्वार - तोफखाना - पायदळ  - मराठे लोक कोटा - शहराच्या वाटा बंद करून भोंवतालचा प्रदेश उध्वस्त करितात - मल्हारराव होळकराकडून कोटाशहर आपले ताब्यांत देण्यासाठीं यशवंतरायास ताकीद - त्याचे उत्तर - मराठ्याचा शहरावर हल्ला - रजपूत लोक त्यांस मागें हटवितात - मल्हारराव कोटा - शहरास वेढा घालून बसतो.

श्लोक
सकाळीं पुरस्थां जनां वीर मोठे । दुरूनी दिसूं लागले ते मराठे ॥
सडे स्वार ते पांचशें एक ठायां । अशा येति टोळ्या लढाई कराया ॥१॥
बिनी चालली ही पुढें थोर वेगें । उन्हामाजि तेजें कशी शोभुं लागे ! ॥
कसे दक्षणी उंच हे थोर घोडे । हजारों तयीं बैसुनी स्वार दौडे ॥२॥
निळे जांभळे पांढरे लाल वेष । फुलोनी जणो टाकिती तो प्रदेश ॥
उडे वायुनें लोळ जैसा धुळीचा । करी धुंद सार्‍या दिशा लोट त्यांचा ॥३॥
उभारून डौलें वरी नीट कान । वरी तोंड खिंकाळती जे करून ॥
जरी वीस चालोनिया कोस आले । तरी अश्व हे थोर वेगें निघाले ॥४॥
तिरासारखे एक रेषेंत जाती । तसे नीट जातील वाटे दिगंतीं ॥
जमीनीस लागेल पाऊल कैसें । हवेंतून नेती मनुष्यांस भासे ॥५॥
वरी स्वार ही ठेवितो नीट मांड । स्वभावें सहों दाविता वेग गाढ ॥
निमित्तास डाव्या करीं घे लगाम । दुजा हात कांहींच पाहे न काम ॥६॥
तयांचीं दिसूं लागती नीट गात्रें । कशीं चालतां हालताती शिरस्त्रें ॥
चकाकोनि नेत्रां दिपावीति शस्त्रें । सुसाटें उडूं पहाती रम्य वस्त्रें ॥७॥
तयां मागुनी हत्ति येती प्रचंड । वरी त्यांचिया नौबती वाजतात ॥
वरी सोंड दौलें पदें टाकितात । स्वशब्दें दिगंता जणो फोडितात ॥८॥
जया वंदितां भूपती सर्व देशीं । निशाणें तयां मागुनी येति ऐशीं ॥
जरी येइ धोका तयां प्राण द्याया । उभे भोंवती स्वार त्यांतें जपाया ॥९॥
महावीर मागें मराठे कुलीन । त्वरें वाहनीं दिव्य येती बसून ॥
पदें श्रेष्ठ ज्यांची जसे स्वाधिकार । तशी वाहनें त्यांस नाना प्रकार ॥१०॥
महाडीक मानी इमानी पवार । किती भोंसले इंगळे बांड शूर ॥
तसे मोहिते आणि शिंदे चवाण । तया सैन्य - भागांत शोभायमान ॥११॥
मधें शोभला चंद्र मल्हारराव । दिसे थोर गंभीर शांत स्वभाव ॥
हजारों प्रसंगीं परी उग्रवीर्य । जयानें जग अदाखवीलें अवार्य ॥१२॥
तया मागुनी चालतो तोफखाना । दुजीं युद्ध - साहित्य - यंत्रेहि नाना ॥
जयांची कृती ख्यात लोकीं अचाट । पदाती असे कंठिती धीट वाट ॥१३॥
व्यवस्थेंत येतात मागून सादी । तयांची भिती बापुडा कोण बांधी? ॥
धरोनी जिही ख्यात भाले विशाल । करीं कांपवीले अरी कांहिं काळ ॥१४॥
असें सैन्य भासे समुद्रोपमेय । धुळीचे वरी लोळती लाट काय ! ॥
निशाणें शिडें शोभती ती नभांत । मधें पोंहते नक्र हत्तीच होत ॥१५॥
करी शब्द डंका दिगंतास गाजे । गदारोळ ही वीर वीरांत माजे ॥
पहा अश्व खिंकाळती एक काळीं । समुद्रास त्या गर्जना योग्य झाली ॥१६॥
तटापासुनी पाव कोसांत आली । बिनी येउनी थांबती तेथ झाली ॥
यशस्वी करी तों सुरू तोफखाना । उडे तोफ पंनास नादें दणाणा ॥१७॥
मराठ्यांत जो पूर्व संकेत होता । व्यवस्थेत त्या सैन्य - संभार येतां ॥
तटाभोंवतें सैन्य गेलें अफाट । पुरांतून बाहेरची बंद वाट ॥१८॥
उभ्या राहुट्या तंबु झाले क्षणांत । तिथे धान्य बाजार आले समस्त ॥
जसे काय तेथें वसे थोर गांव । अशी गदि वाटे न मुंगीस वाघ ॥१९॥
त्वरें जाति पेंढार ते भोंवताले । जसे लांडगे काय खाया मिळाले ॥
लुटाया धराया जयां एक काम । न भाल्यांस ज्यांच्या मिळाला विराम ॥२०॥
घरें वेशिबाहेरचीं दग्ध केलीं । लुटूनी गुरे धान्य - वित्तादि नेलीं ॥
न कोणास कोट्यांत व्हावा प्रवेश । न बाहेर यायास ही संधि लेश ॥२१॥
दिसे छावणी शत्रुची जों अपार । गमे काय कल्पांतिचा हा समुद्र ! ॥
मधें बेट कोटा उरे एक बिंदू । क्षणें ग्रासिता यास होईल सिंधू ॥२२॥
असे मुख्य कोट्यामधें कामदार । यशस्वी जनां शासिता जो उदार ॥
तयालागिं मल्हार धाडी निरोप । पुरस्थां जनां दाविता उग्र कोप ॥२३॥
“ तुम्हीं युद्ध साहित्य जें काय केलें । त्वरें पाहिजे आमुच्या हातिं आलें ” ॥
जरी ठेवितां हातचें शास्त्र खालीं । क्षमा दिल्लिरा मागतां याच काळीं ॥२४॥
दयेनें तरी जाउं देऊं तुम्हांला । अशा युक्तिनें भीति नाहीं जिवाला ॥
तुम्हीं बायका लेंकरें आप्त घ्यावे । सवें शीघ्र बाहेर आतां निघावें ॥२५॥
तुम्ही जातिचे हिंदु धर्माभिमानी । अशी ऐकितों कीर्ति मोथे इमानी ॥
म्हणूनीच दावूं दया इच्छितों ही । क्षमा बंडवाल्यांस न्यायें न कांहीं ॥२६॥
उदेली जरी दुर्मती पौर लोकां । स्वकृत्येंचि ते पात्र होतील शोका ॥
नद्या शोणिताच्या इथे वाहतील । मिळूं चंबळेच्या जळा धांवतील ॥२७॥
म्हणूनी मती आयकावी हिताची । न कोट्यास आशा दह्रा रक्षण्याची ॥
सवें वित्त घेऊन बाहेर जावें । अमूल्या जिवा यत्नें जपावें ॥२८॥
न जाती न धर्म अन कर्मा न शर्मा । अम्ही पाहतो आचरीतां स्वधर्मा ॥
तुम्ही सर्व ही दंडनीय प्रभूतें । बळें येथ आलीं तयाचीं प्रभूतें ” ॥२९॥
निरोप प्रकारें अशा दूत नेत । यशोधीस जो जाउनी सांगतात ॥
तयाचे जळे चित्त कोपानळाने । स्वमित्रांस बोलाविलें शूर त्यानें ॥३०॥
‘ कसें काय हो ? मित्र माझे उदार । करावा कसा संकटीं या विचार ? ॥
अशी वेळ आली खरें धैर्य दावा । असे शक्ति ती या प्रसंगास लावा ॥३१॥
कसा बेत तो होउं द्या एकदाच । नको तो पुन्हा तोर चित्तास जाच ॥
जरी पाहिजे कीर्ति व्हावें पुढार । जिवाचीच आशा तरी जाल दूर ॥३२॥
विचाराल माझा जरी बेत आतां । मला ये कधीं ही न मागें पहातां ॥
असा एकटा शत्रु - सैन्यीं पडेन । खर्‍या मी मराठ्याप्रमाणें मरेन ” ॥३३॥
असें ऐकतां वाक्य त्याचें विरक्त । तया सांगती ओरडोनी समस्त ॥
‘ मरूं बाजुला बा ! तुझ्या देश भक्ता । दिली लात गेहा मुलां स्त्रीस वित्ता ’ ॥३४॥
करी गर्जना ऐकुनी हें प्रमोदें । निरोपास दूतासवें काय तो दे ॥
“ मराठे तुम्हीं मार्ग - दर्शी न आम्हां । अम्ही जाणतों आपुल्या पूर्ण कामा ॥३५॥
असे एक ठावा अम्हां मार्ग नीट । न सोडूं कधीं जन्म - भीमीस धीट ॥
जमीनीस कोट्यांतल्या रक्त वाहूं । मरूं जागच्या जागिं येथेंच राहूं ॥३६॥
तुम्हां वाटलें दावितां भीति मात्र । पळूं टाकुनी हातचें काय शस्त्र ? ॥
तुम्हीं रोहिल्यां मोगलांतें दटावा । न या देशिं कोणास ही धाक ठावा ॥३७॥
तुम्हीं देशदेशीं फिरोनी मराठे । अरी जिंकिले हें न आश्चर्य वाटे ॥
कसें काय तें युद्ध - कौशल्य पाहूं । उभे जेधवां झुंज द्यायास राहूं ” ॥३८॥
असे ऐकतां शब्द मल्हार कानें । तयाच्या मनीं क्रोध अत्यंत बाणे ॥
हिताची कथा सांगतां उत्तरातें । अशा देति तस्मात् घडो जें घडे तें ! ॥३९॥
जाळिन पोळिन नाशिन नेइन सर्व लया ।
दाविन कोप कस आसतो मम भू - वलया ॥
नागर नाशुन नांगर या नगरीं फिरवी ।
पाडिल दाहि दिशांस उजेड सुकीर्ति - रवी ” ॥४०॥
बोलवि तो सरदार हुशार उदार - मती ।
जे निज शौर्य - बले जित कीर्तुसवें रमती ॥
येउन लीन पदें सुकुलीन शिरीं नमिती ।
जाणवितां रिपु - भाषण कोप विषा वमती ॥४१॥
होळकरे मग त्यांस हुकूम असा दिधला ।
“ घेउनियां अपुलीं पथकें पुर घेउं चला ॥
चोहिंकडे उठुनी करुं एक उठाव उठा ! ! ।
तुंबळ संगर - संगत कीर्तिस घेउं झटा ! ” ॥४२॥
एकसरें रण पंडित खंडित - शत्रु - मद ।
गर्जति वाजति डिंडिम चंड रिपु श्रमद ॥
जाय पुरें भरूनी नभ - मंडळ तूर्य - रवें ।
घोष तसे उठती नर - केसरिंचे बरवे ॥४३॥
चाळिस एकच काळिं धडाधड तोफ सुटे ।
होति दिशा बहू धुंद कळे नच कोण कुठे ॥
थोर जरीपटका कटकावरि उंच दिसे ।
गर्जति धांवति वीर - समूह जसे ॥४४॥
सुंदर उंच गृहें हि धडाधड कोसळती ।
सांपडती किति लोक मधें मरती पडती ॥
उंच असें स्थळ पाहुन पौर तिथें जमती ।
भीति - भरे रण तुंबळ हें बघुनी भ्रमती ॥४५॥
पाहुन हें यशवंत न लेश हि घाबरला ।
घेउन नागर एक मनें तट रक्षि भला ॥
बीज जसा हिकडे तिकडे फिरतो चपळ ।
फार सहाय्य करी स्वजनां न बसेच पळ ॥४६॥
तीन हि वेळ तटावर चालुन होळकर ।
येइ परी परते झुजतां प्रहरोप्रहर ॥
साहुं शके भडिमार तटावरला न भट ।
येइ पुढें चवथ्या समयीं नच सोडि हठ ॥४७॥
त्या दिवशीं जय त्या मिळतां अगदीं न दिसे ।
अस्त रवीस घडे म्हणुनी मग शांत बसे ॥
युद्ध सुरू करुनी दुसर्‍या दिवशीं उठला ।
वेढुन नागर तीन असा महिने झटला ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP