यशवंतराय महाकाव्य - सर्ग बारावा
श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.
अनंताचार्यांचा पुण्यापर्यंत प्रवास - पुण्यासभोंवतालच्या प्रदेशाचें वर्णन - पुण्याचें वर्णन - जुनें पुणें व नवें पुणें यांच्या स्थितींतील महदंतर - त्यावर कवीचे विचार - अनंताचार्यानें वर्णिलेली त्या वेळची पुण्याच्या दरबारारची स्थिति - आपलें काम सदाशिवरावभाऊकडून करून घेण्याबद्दल अनंताचार्यांचा निश्चय.
श्लोक
यम - दिशेस अगस्त्य जसा निघे । विबुध - नायक - कार्य करूं बघे ॥
नगर - नायक - कार्य - परायण । द्विज तसा निघतो करूनी पण ॥१॥
स्वपथ चालुन कोस दहा दहा । सधन गांठित दक्षिण - देश हा ॥
विविध - देश - विशेष - निरीक्षण । करूनियां हरिखें भरलें मन ॥२॥
गवतही उगवूं नशके जिथे । सरळ उंच नभाप्रत पोंचते ॥
उठति चार दिशांस असे भले । बघत डोंगर विंध्य - गिरींतले ॥३॥
बहु सख्या मिळवून नद्या सवें । पतिस पश्चिमदेशिं मिळे जवें ॥
सुसलिला विमला जन - शर्म - दा । निजपथीं तरला द्विज नर्मदा ॥४॥
न किरणा रविच्या मिलते गती । पशु जिये भय - दायक राहती ॥
विमल वाहति निर्झर आंतुन । बघत सातपुड्यांमधलें वन ॥५॥
हळुहळू जंव दक्षिण - देशिं तो । शिरतसे बहु विस्मय पावतो ॥
नच सपाट जमीन कुठे दिसे । खडक डोंगर जेथ तिथे असे ॥६॥
प्रबल वेग गतींस जयांचिया । बहु लहान नद्या दिसती तया ॥
जमिन फार सुपीक कुठे कुठे । परि न मालव - तुल्य गमे इथे ॥७॥
प्रबल गौर उभार सुरेखसे । वसति उत्तर - देशिं भले जसे ॥
न दिसती रजपूत सुलक्षणी । नविन लोक बघे द्विज दक्षणी ॥८॥
दिसति येथिल लोक न देखणे । चपळ रांकट निष्ठुर ठेंगणे ॥
दिसति शांत जरी कपटी महा । सडसडीत परी बळि ते पहा ! ॥९॥
दिसति सह्य - गिरींतिल डोंगर । प्रथित जे चिर भारत - भूवर ॥
यवन - भूपति - नाश - परायण । शिव जिथे बसुनी करि गर्जन ॥१०॥
धरि सदा यशवंत - हितीं मन । विबुध - वर्य अनंत विचक्षण ॥
जवळ पुण्यपुरा द्विज ठाकला । दिवस जों घटकेवर पावला ॥११॥
झळक मंदिल सुंदर डोकिला । धवल वेष शरीरिं खुले भला ॥
असुन शांत सुकांति मुखावरी । वय उतार शरीर बळी परी ॥१२॥
सकल - शास्त्र - विचार - परायण । सुवचना करिता हरिता मन ॥
सदय होउन शिक्षण पूर्वि दे । म्हणुन ज्या यशवंत गुरू वदे ॥१३॥
द्विज अनंत असा सकलांपुढें । दवडवी स्वहया दुडक्या पदें ॥
जवळ रक्षक - नायक चालतो । मग अनंत तयाप्रत बोलतो ॥१४॥
“ बघा सख्या ! रमणीय सुदेश हा । दिसुन येइ अशा समयीं अहा ! ॥
उगवुनी नुकता मिरवे रवी । महि - तला कनकें जणु सारवी ! ॥१५॥
इथुन तेथुन शेतमळे किती । उठुन भूमिस व्यापुन टाकिती ॥
अजुन कार्तिक मास न संपला । म्हणुनि गारच देश दिसे भला ॥१६॥
दंव नसे सुकलें अजुनी जरी । प्रखर भास्कर ही न करां करी ॥
जमिन हीच धनीण इची करीं । कठिण शेतकरी करि चाकरी ॥१७॥
बसुनियां छपरावरि गोफणी । धरुन हांकिति पक्षि - गणां कुणी ॥
झणझणा करिं गोफण जों फिरे । पळति दूरचि बापुडिं पांखरें ॥१८॥
कितिक पेटविती जन आगटी । जवळ बैसुन शीत निवारिती ॥
हळुहळू पडतो हुरडा मुखीं । बसुन सांगति गोष्टि तिथे सुखी ॥१९॥
वय दहा वरूषें शिशु धाकुटे । चपळ धांवति घेउन आउतें ॥
कितिक येथ पतींस गुणी स्त्रिया । मदत देति पहा तिकडे सख्या ! ॥२०॥
हरभरा गहुं बाजरि जोंधळा । पिकुन गार इथे दिसतो मळा ॥
जमिन देइल धान्य सुखें जर । कितिक खाइल मानव हा तर ? ॥२१॥
कितिक जुंफुन मोट जन स्वतां । वृषभ सुंदर हांकिति तत्वतां ॥
श्रम गमो वृषभां हलका सुखें । करिति गायन सुस्वर हें मुखें ॥२२॥
पसरती निजपक्ष जशीं शिडें । उडति घारि नभीं दिसती पुढें ॥
नजर कोसभरी दुर फेंकिती । त्वरित शोधुन भक्ष्य हि काढिती ॥२३॥
धरून वेष निळे हिरवे असे । उडति पक्षि तरुंवरुनी कसे ! ॥
करिति नादित देश मधु - स्वरें । सुख खरें जगिं भोगिति पांखरें ॥२४॥
घरटियांत बसून पिलांसवें । दवडिती निशिला अति उत्सवें ॥
उठति जों अरूणोदय जाहला । धरिति संतत उद्यम आपुला ॥२५॥
गगन - राज्य अफाट तया रवी । उगवुनी नृपती बहु तोषवी ॥
म्हणुन पक्षिच भाट सुखावले । करिति गायन ही स्तुति भासलें ॥२६॥
पसरलें जरि दाट दिसे धुकें । किरण त्यांत परी शिरकूं शके ॥
खुलति दोनहि एकच होउन । दिसति पारद आणखि दर्पणा ॥२७॥
दिसति अस्फुट त्यांतुन डोंगर । पसरलीं बहु दाट वनें वर ॥
म्हणति सह्य जया गिरि हा असे । सकल पश्चिम व्यापुनियां वसे ॥२८॥
किंतिक जाति नभांत निमूळते । किति सपाट शिरीं गिरि देख ते ॥
कितिक एकच रांग धरूनियां । असति खिंड दिसेन कुठे तयां ॥२९॥
गरुड तो शिव भूपति यावरी । रचुन दुर्ग पहा घरटीं करी ॥
तिथुन घालुन झेंप दिनोदिन । लुटित देश करी रिपु - मर्दन ॥३०॥
म्हणुन पूज्य समस्त मराठियां । असति डोंगर हे न मिती तयां ॥
इथुन राज्य - नदी उगवूनियां । पसरली अरिला करिती भया ॥३१॥
शिव अचाट अशी करणी करी । स्वरिपु जिंकुन थोर यशा वरी ॥
म्हणुन तत्सरणार्थ असे भले । विजय - दर्शक खांबच रोंविले ! ॥३२॥
भरभराट नवाच दिनादिना । सुखवि राज्य मराठि कसें जनां ॥
अचल बैसुन पाहति हे असे । विगत - पक्ष - जटायु - शरीरसे ॥३३॥
उगम पावति पुण्य - नद्या वरी । सुखविती भुवनास बहूपरी ॥
विलसती दृढ - दुर्ग कितींवर । म्हणुन नीट मनामधिं हे धर ॥३४॥
दुरून वाहत येति मुळा मुठा । विलसती तरु - कुंज तया तटां ॥
भगिनि काय सुशील म्हणूनियां । करित गोष्टि सुखें फिरतात या ॥३५॥
दुरुन थोर पुणें दिसुं लागलें । बघुन धातिल नेत्रच आपुले ॥
प्रबल दैव असे म्हणुनी पुर । घडतसे नयनांप्रत गोचर ! ॥३६॥
असुन गांव लहान भिकारडें । पुर इथें उठलें तरि केवढें ! ॥
वसति हिंदु - पदाधिपती बरे । गहन काल - महात्म्य असे खरें ! ॥३७॥
अखिल - देश - नृपाल अशा स्थळीं । नमिति येउन राज - पदा बळी ॥
बघति वाट हुकूम कसा घडे । तदनुकूलच वर्तन ही पुढें ॥३८॥
यवन - राज्य - तमें जग घेरिलें । म्हणुन हिंदु महाभय पावले ॥
उगवती रविसे भट पेशवे । पलति शत्रु तयां नच राहवे ॥३९॥
स्वपद हें दिधलें करूनी कृपा । स्तवन योग्यच शाहु महानृपा ॥
करि रवि निज अर्पण तेज कीं । अनळिं मावळतां नच तारकीं ॥४०॥
मधुर गायन नर्तन वादन । उपवनांत विलास सुभोजन ॥
सकल लोक इथे उपभोगिती । प्रतिदिनीं नव उत्सव चालती ॥४१॥
धरूनियां तरवार सखी करीं । भरून चंदन रक्त तनूवरी ॥
रण - वनीं यश हंस धरावया । रसिक वीर तयार पुण्यांत या ॥४२॥
फिरून आठ दिशांस सुपंडित । करून खंडित सद्गुण - मंडित ॥
विविध - शास्त्र - वनांतिल केसरी । दुरून येउन राहति या पुरीं ॥४३॥
मधुर निर्मल सौम्य सरस्वती । सुकवि जे वदनांतुन काढिती ॥
करिति संतत संत - सुवर्णन । लुटुन नेति पुण्यांतून या धन ॥४४॥
करिति वाडवडील अशा कथा । नयनिं वैभव तें बघतों स्वतां ॥
वसति - देश जरी अपुला दुर । परिसतों परि कीर्ति निरंतर ॥४५॥
झळकती दुरुनी दिसती अहा ! । कळस निर्जर - मंदिरिंचे पहा ॥
गगन - छत्रच सांवरूनी शिरीं । दिसति दंड उभे इतुके वरी ॥४६॥
उचलती स्वशिरें वरती घरें । स्व - धन - गर्व्च त्यांस जणो भरे ! ॥
नयन हे खिडक्या उघडूनियां ।बघति येतिल कोण पुरांत या ” ॥४७॥
द्विज अनंत चले हळु पावलीं । उपवनें खुलतात जया स्थळीं ॥
दुरून पाहुन या महिता पुरा । भरतसे मनिं विस्मय कीं पुरा ॥४८॥
जरि अनंत जिवंत असोनियां । बघत आज असे नगरास या ॥
कुठुन पाहिल तो नृप - मंदिरें ? । कुठुन सौख्य विलास इथे खरे ॥४९॥
बघु आज दशेस पुण्याचिया । कवण सुज्ञ म्हणेल पुणें तया ? ॥
न असतें जरि चंचल वैभव । किति सुखी असते मम बांधव ! ॥५०॥
अससि निर्दय फारच संपदे ! । पळसि काय म्हणून दुरी मदें ? ॥
न रण - शौर्य न साहस सद्गुण । स्थिर करूं शकती तुजला क्षण ॥५१॥
न भगवें फडकेल निशाण या । महिवरी, गत जें पुरतें लया ॥
परत घेउन लूट पुण्याप्रत । कधिंच येतिल वीर न सांप्रत ! ॥५२॥
सण घडे दसरा प्रतिवत्सरीं । परि न सौख्य मनाप्रत तो करी ॥
जमुन येउन योध निजस्थळीं । उतरती न पुण्याजवळी बळी ॥५३॥
‘ न रजपूत निजाम न हैदर । नच नजीब बघो तुमचा कर ’ ॥
धुळिस त्यां मिळवा न असे कधीं । सुटति आज हुकूम पुण्यामधीं ॥५४॥
रजत कांचन मौक्तिक माणिक । धन जयां जवळी बहु आणिक ॥
विलय पावति थोर कुबेरसे । धनिक सांप्रत अन्न तयां नसे ॥५५॥
तरुण कोणि कुलीन महाजन । स्व - कुल - वैभव आठवुनी क्षण ॥
बघति दीन जुन्या तरवारिला । फुकट जन्म तयांप्रत भासला ॥५६॥
वसति पुण्य - परेश जिथे बरे । नयन - सौख्यद सुंदर मंदिरें ॥
प्रभु - महाविरहाधि न सोसवे । म्हणुन जाळुन घेति न राहवे ! ॥५७॥
बसुन आरब उंच हयांवर । करिति रक्षण जेथ निशाभर ॥
दिसत तें शनवार - पटांगण । किति उदास ! जना बघवेच न ! ॥५८॥
समयिं त्या असतां चढती कला । स्व - धन संचय पुष्कळ खर्चिला ॥
सधन पूर्व - जनीं रचिलें घरां । उठविलें नगरीं जणु डोंगरां ! ॥५९॥
सुख - विलास- निमग्नच माणसें । वसुन उत्सव जेथ सदा असे ॥
पडति तीं सदनें प्रतिवत्सरीं । कवण दागदुजीहि तयां करी ? ॥६०॥
अतुल वैभव शास्त्र - कला - गुण । सकल जाति पुण्यांतुन लोपुन ॥
नवनवीं व्यसनें नव दुर्गुण । नव विचार इथे नव भाषण ! ॥६१॥
जरि पुढें अणखी शत वत्सर । स्थिति अशीच असेल अम्हांवर ॥
स्व - जन - राज्य इथे वसलें असें । वदति कीं अमुचे पणतू कसे ? ॥६२॥
जनहि दुर्बळ होति दिनोदिन । विसरले अपुले मुळचे गुण ॥
बदलुं पाहति पद्धति ते जुनी । म्हणुन फार विषाद वसे मनीं ॥६३॥
जंव विचार असे मनिं खेळती । बहु उदास तया घडते स्थिती ॥
म्हणुन एकिकडेच तयां करूं । पुनरपि स्वकयेस करीं धरूं ॥६४॥
म्हग अनंत पुन्हा वदुं लागला । “ हृदयिं संशय फार बळावला ॥
परिसतील वचा मम पेशवे ? । पुढिल तें भवितव्य न जाणवे ॥६५॥
नृपति - बंधु सदाशिवराव तो । सकल काम पुण्यांतिल पाहतो ॥
तह ठराव पुण्यांतिल गादिच्या । मसलती करितो दरबारच्या ॥६६॥
विलसतो दुसरा रघुनाथही । निजबळें चिर कांपविता मही ॥
पतरला अटकेवर जाउन । करित धर्मच त्याप्रत बंधन ॥६७॥
धरून दोनहि बंधु महागुण । सुदृढ मत्सर त्यां करि बंधन ॥
वरचढी बघतात करावया । स्वहित साधुन त्यांतच घेउं या ॥६८॥
शिंदे तसे होळकरादि वीर । मराठि राज्या दृढ खांब धीर ॥
त्यां आवडे तो रघुनाथराव । ज्याचा असे मोहक सुस्वभाव ॥६९॥
आहे जरी शूर महाभिमानी । सदाशिवा लोक न फार मानी ॥
तो पेशव्याच्याच परि प्रसादें । वाढूनियां होळकरा भया दे ॥७०॥
जाईन भेटूं मग पेशव्यातें । भेटेन आधींच सदाशिवातें ॥
सांगेल तो मार्ग धरीन पाहें । कीं आपणां त्यांतच इष्ट आहे ” ॥७१॥
अनंताचार्यांनीं मसलत मनीं हीच धरिली ।
तियेला तन्मित्रें अनुमतिहि तेव्हांच दिधली ॥
प्रवासाचा व्हावा म्हणति जन ते शेवट बरा ।
महोत्साहें मार्गें शिरति बघती पुण्य - नगरा ॥७२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP