मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य|

श्री शंकराचार्य वंदना - अध्याय एकविसावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
कापालिकांचा कैसा पराभव । शृंगेरीत बांधले मठ मंदीर । कैसा बनला शिष्य परिवार । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
आचार्य येणार कालडीस । वार्ता पसरे सर्वत्र । आनंदे पुलकित गात्र । वाट पाहती जन अधीर ॥३॥
गेला एकटा कालडीहून । शिष्यांसह येणार परतून । भाग्य आमुचे याचे आगमन । होईल गांव हा धन्य ॥४॥
शंकराचार्य येता कालडीत । व्यर्थ न घेता सत्कार । तत्काळ गाठिती मातृद्वार । वचन होते निभावणे ॥५॥
वृद्ध आर्याम्बा अंथरुणावर । केव्हां भेटेल बाळ शंकर । मनासी विचारी वारंवार । नेत्री भावना अपार ॥६॥
शांतपणे आचार्य शंकर । येऊनि धरिती मातेचे चरण । ‘ किती गे झालीस क्षीण । आता हरेन सारा शीण ’ ॥७॥
भेटता बाळ अवचित । आर्याम्बा झाली सद्गदित । म्हणे “ सरली माझी खंत । तव भेटीने चित्त शांत ॥८॥
केली होतीस शंकरा व्यवस्था । परी आप्तांना नुरली आस्था । सांगेन सर्व नंतर कथा । देई आधार मांडीचा ” ॥९॥
वैराग्याचा साक्षात् पुतळा । तरीहि दाटला शंकराचा गळा । पाणी भरले दोघांच्या डोळा । भेट पाहण्या लोक गोळा ॥१०॥
आचार्य वदति प्रेमे पुन्हां । आवरुनि आपुल्या भावना । ‘ संपल्या आई कष्ट वेदना । पूर्ण करीन तव कामना ॥११॥
घरांत आईची सेविका एक । आणि कुणी वृद्ध निर्धन । यांनीच सांभाळले रात्रंदिन । लुबाडण्या मात्र आप्तजन ॥१२॥
कळले आई आता सारे । कल्याण करीन या दोघांचे । आणि गुह्य जे तुझ्या मनीचे । निश्चये करीन आज्ञापालन ॥१३॥
आर्याम्बेचे वदे मातृहृदय । “ शंकरा झालास भगवत् पादाचार्य । केलेस अविश्रांत धर्मकार्य । थकला असशील रे बाळा ॥१४॥
होऊ दे तुझे संध्यास्नान । घास घेई एकदोन । निवांतपणे मग बोलेन । थोडा तरी घे विश्राम ” ॥१५॥
मायलेकरे पावती समाधान । शंकर चुरीत असता चरण । ‘ साधणे आता महाप्रयाण ’ । आर्याम्बा सांगे हृद्गत ॥१६॥
आजवरी थांबले मी शंकरा । भेटणे होते तुज लेकरा । आता नको वासनेला थारा । सद्गती लाभेल ऐसे करी ॥१७॥
महाप्रयाणाचा आला समय । आईसमीप सदा आचार्य । विचारिती हवे नको काय । तत्क्षणी करिती सर्व सोय ॥१८॥
शांत वृत्ति तपही थोर । आर्याम्बा म्हणे शंकरास । “ बाळा मनीची एकच आस । पहावे सगुण श्रीकृष्णास ॥१९॥
चतुर्भुज रे त्याची मूर्ति । गळा हार वैजयंती । डोळे भरुनि पहावी अंती । तेणे लाभेल अद्भुत शांती ” ॥२०॥
आचार्यांनी डोळे मिटले । नम्रभावे हात जोडले । शब्द वाणीतून प्रकटले । स्तोत्र ‘ श्रीकृष्णाष्टक ’ ॥२१॥
सहाय्यकारी जो भक्तासी । आवाहन केले त्या कृष्णासी । दर्शन देई मम मातेसी । प्रकटे साक्षात् श्रीकृष्ण ॥२२॥
आर्याम्बा झाली कृतकृत्य । पुत्राने केले वचन सत्य । असाध्य ते झाले साध्य । याच देही भेटे भगवंत ॥२३॥
भाव उमटले अष्टसात्विक । अवघ्राण केले पुत्रमस्तक । आशीर्वच दिले अनेकानेक । विष्णुपदी पोचली आर्याम्बा ॥२४॥
सर्वज्ञ पुत्राचे रुप आगळे । शंकराचार्यांचे भरले डोळे । क्षणमात्र संयम त्यांचाहि ढळे । मृत्यूस दुज्या क्षणी आदरिले ॥२५॥
जमले सारे आप्तजन । जगद्गुरुस सांगती शास्त्र । ‘ संस्कार करण्या तू ना पात्र । संन्याशास कुठले गोत्र ? ’ ॥२६॥
आचार्य सांगती वारंवार । “ करा जरा नीट विचार । श्रुति - स्मृति संमत आचार । दिले वचन पूर्ण करावे ” ॥२७॥
भ्रष्ट नष्ट बुद्धीचे आप्तजन । शास्त्राहून मानिती रुढी थोर । म्हणती, ‘ तुझा हा अधर्माचार । नाही सहन करणार ’ ॥२८॥
आचार्य सांगती समजावून । “ संन्यासापूर्वी दिले वचन । करीस संस्कार आणि दहन । करणे वचनाचे पालन ॥२९॥
श्रुति स्मृति सांगती गर्जून । करावे सदा आज्ञापालन । मातापित्यांचे फेडावे ऋण । पाहावा त्यांच्यांत भगवंत ॥३०॥
शास्त्रानुसार असावे वर्तन । रुढीच्या मुळाशी जर अज्ञान । सर्वथा सदा ते सोडून । शुद्धाचरण राखावे ” ॥३१॥
तमोगुण हेच ज्यांचे बळ । आप्तजन उठले तत्काळ । आम्ही सांगू तोच धर्म पाळ । अन्यथा भोग बहिष्कार ॥३२॥
गर्विष्ठ उन्मत्ता कसली जाण । बाळगुनि खोटा अभिमान । ज्ञानावताराचा अपमान । शव सोडूनि जाती निघून ॥३३॥
आचार्यांना झाला खेद । परी जाणत होते सारे वेद । मातृशरीराचे करुनि तीन भेद । स्वयेच शव नेले वाहून ॥३४॥
पश्चातापे कोणी दग्ध । पुढे आले करण्या मदत । अंत्यसंस्कार केला विधीविहित । जन सारे आश्चर्यचकित ॥३५॥
राजाच्या कानी गेले वृत्त । अंतरी होऊनी संतप्त । म्हणे दंडीन ते दुष्ट आप्त । धावला सत्वर शंकर - गृही ॥३६॥
राजा राजशेखरासी ज्ञत । आचार्यांचा पूर्ण वृत्तान्त । केरळ प्रांताचे हे अमोल रत्न । कैसे मूर्खांनी पीडिले ॥३७॥
आचार्यांचे धरुनि चरण । राजा म्हणे “ मी शरण शरण । मस्तकी सदा करीन धारण । द्याल आज्ञा जी आपण ” ॥३८॥
आचार्य म्हणती “ मी संन्यासी । धर्मप्रसारार्थ फिरणे मजसी । आईची सेवा करण्यार्‍यासी । द्यावीत तिची संपत्ती ॥३९॥
जरी लोभी आप्तजन । करु नये तूं त्या शासन । ज्यांनी सोडिले धर्माचरण । कर्म भोगतील त्यांचे ते ॥४०॥
सोडुनि वृथा अहंकार । धरतील जरी भक्तिभाव । क्षमा करील केशवराज । कालडीचे ग्रामदैवत ” ॥४१॥
आचार्यांच्या सत् सहवासांत । राजशेखर झाला कृतार्थ । म्हणे आचार्य समाजहितार्थ । कांही नियमावली सांगावी ॥४२॥
आचार्यांनी मानिली विनंती । मुक्काम आढवुनि केरळ प्रांती । एक सुंदर रचना करिती । राजा म्हणे ही ‘ शंकरस्मृती ’ ॥४३॥
अखेर सांगति राजास । “ प्रयाण करणे आम्हांस । वेदान्तधर्म शिकविणे सर्वास । करणे संचार सर्व दूर ” ॥४४॥
राजा विनवी आचार्यांस । मज मानावे आपुले शिष्य । करुनि घ्यावे कांही सत्कार्य । संगतीचे लाभो भाग्य ॥४५॥
आचार्य म्हणती ‘ तथास्तु ’ । अर्पूनि सेवकासी मातेची वास्तू । निर्धनासि देऊनि चीज वस्तू । उचलति पाऊल यात्रेस्तव ॥४६॥
कोठे गेले शंकराचार्य । कोणते केले कैसे कार्य । वेदान्त्यांसी कैसे दिले अभय । जाणावे पुढील अध्यायी ॥४७॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । एकविसावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४८॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP