श्री शंकराचार्य वंदना - अध्याय तेरावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
श्री विश्वेश्वरानें होऊन प्रकट । आचार्यांसी कैसी दाविली वाट । गैर रुढींचा करवा नायनाट । वर्णिले द्वादश अध्यायी ॥२॥
प्रसंग गेला घडून । आचार्य करिती एकांती मनन । माझ्या विचारांतील कांही न्यून । गेले ईशकृपे सरुन ॥३॥
पुन्हां सुरु नित्यनेम । घाटावर अध्ययन अध्यापन । सर्वास करावे विद्यादान । योग्यतेनुरुप ॥४॥
उरकुनि गंगेचे स्नान । चढता गंगेचा घाट । कानी व्याकरणाचा पाठ । स्वर वार्धक्ये जर्जर ॥५॥
शंकराचार्य पाहती थबकून । कोणी एक वृद्ध ब्राह्मण । सर्व शक्ति एकवटून । करीत बसला घोकंपट्टी ॥६॥
वृद्धाच्या हाती नुरले बळ । निसटले हातांतून पंचपात्र । पायर्‍यांवरुन गडगडत । शब्द उमटे ठण् ठण् ॥७॥
आचार्य मनी दाटे करुणा । पंचपात्र देत ब्राह्मण । हासून करिती गोड भजना । चर्पटपंजरिका नाम सार्थ ॥८॥
वृद्धा, आता नको व्याकरण । समीप येत आहे मरण । आतां सांग रक्षिल कोण । तुजला गोविंदावाचून ॥९॥
धरुनि धनाची कामना । आप्तेष्ट हे होती गोळा । परी होता लोळागोळा । कोणी ना विचारतील ॥१०॥
लोक कोण, आपण कोण । प्रपंच मिथ्या आता जाण । सोडूनि सारे माझे मी पण । करावे नामस्मरण ॥११॥
व्रते दान वा उपासना । तीर्थाटन वा पुण्यस्नाना । करी न जाणता आत्मज्ञाना । मोक्षप्राप्ति कदापी ना ॥१२॥
आचार्यांचा स्वर मधुर । भावभक्तिला आला पूर । सहजच कंठी उमटे सूर । नारायण नारायण ॥१३॥
निमित्त झाला वृद्ध ब्राह्मण । सहजचि घडले तत्वनिरुपण । नको घालवू हरीभजनाविण । मानवा रे आपुले जीवन ॥१४॥
झाली वर्षे दोन सहस्रांवर । चर्पटपंजरिका स्तोत्रचि सुंदर । आजहि तोषवि अंतर । भज गोविन्दम् ॥१५॥
महिमा नामाचा जरी थोर । सहस्त्र नामे श्री विष्णूस । योग्य कोणते परी स्मरणास । गोविंद किंवा नारायण ॥१६॥
सामान्यांचे साधे प्रश्न । त्यांचे करणे समाधान । विष्णुसहस्त्रनामाव । करिती भाष्य सर्वप्रथम ॥१७॥
प्रत्येक नांवाचा योग्य अर्थ । स्पष्ट करिती शब्दांची गुंफण । अथवा सांगून व्याकरण । तेणे होई सोपे स्मरण ॥१८॥
रचिली पुढे ती अनेक भाष्ये । मानिती विद्वान त्या सर्वश्रेष्ठ । त्यांचीच झाली मुहूर्तमेढ । विष्णुसहस्त्रनाम भाष्यानें ॥१९॥
छोट्या मोठ्या कार्यातून । विशाल कार्याचा श्रीगणेशा । करवुनि घ्यावा तुम्ही महेशा । आचार्य विनविती परमेश्वरा ॥२०॥
सामान्यपणे लोक म्हणति । कैसी अपूर्व काव्यस्फूर्ति । भाषा किती ओघवती । लालित्यपूर्ण रसाळ कृति ॥२१॥
जैसी जैसी वाढे कीर्ति । गावोगावींचे निपुणमति । शिष्य व्हावया धावूनि येती । आचार्यांपाशी प्रतिदिन ॥२२॥
ऐसा वाढता शिष्यगण । परस्परांत चाले वरचढपण । आचार्यांसि प्रिय कोण । आपल्यातील मी की तो ॥२३॥
शिष्यांच्या मनी जरी भाव । गुरुसी व्हावे प्रिय आपण । अगाध गुरु निष्ठेवीण । होईल कैसा भाव पूर्ण ॥२४॥
एखाद्या प्रसंगानिमित्ते । गुरुनिष्ठेचे दर्शन घडावे । गुरु शिष्य नाते स्पष्ट व्हावे । सर्व संशय संपुष्टा जावे ॥२५॥
आचार्यांच्या मनीचा विचार । प्रत्यक्षांत आणणार ईश्वर । त्याचेच कार्य तो करणार । योग्य समयी पृथ्वीवर ॥२६॥
एके दिवशी शिष्य सनंदन । उभा होता पैलतीरावर । शंकराचार्य म्हणति येई लवकर । खोळंबा सार्‍या कामाचा ॥२७॥
नव्हती काठावरती नाव । पोहण्याचा नव्हता सराव फार । हाक मारिता गुरुवर । सनंदन धावला सत्वर ॥२८॥
अपूर्व निष्ठा आचार्यांवर । सनंदन म्हणे गुरु तारणार । साहसे पाय ठेवी पाण्यावर । सांगे ओरडून आलो आलो ॥२९॥
लोक म्हणति कैसा अविचार । होणार नाही पैलपार । नक्कीच हा बुडणार । पात्र गंगेचे कां आहे उथळ ॥३०॥
सनंदन जेथे ठेवी पाऊल । तेथेच प्रकटे विशाल कमळ । वेगे पावला आचार्यांजवळ । लक्ष्मीनृसिंहाची सारी कृपा ॥३१॥
लोक म्हणती खरोखर । गुरुच शिष्या तारणार । पैल पार करणार । ज्याची निष्ठा अपार ॥३२॥
शिष्यास जडला सेवेचा नाद । गुरु घालिती जेव्हां साद । सनंदनाचा झाला पद्मपाद । धावला वेगे गुरुकडे ॥३३॥
जाणती मनी शंकराचार्य । ईश्वरे नेमिला सनंदन । करावया माझे रक्षण । शिष्यरुपी माझे जवळ ॥३४॥
आचार्यांचा जीवनक्रम । काशीवासियांसी परम सुखद । परी आचार्यांच्या मनी खेद । कां भेटेना माता भवानी ॥३५॥
काय घडला प्रसंग । पूर्ण झाली कामना कैसी । अद्भुत रसाळ वृत्तांतासि । जाणावे पुढील अध्यायी ॥३६॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । तेरावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥३७॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP