मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य|

श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सव्विसावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
बाल स्वामींचे शंका निरसन । काम केले बौद्धांचे खंडन । वेदान्तधर्माचे प्रतिपादन । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
आचार्य जेव्हां ध्यानमग्न । त्यांचे विषयी स्वानुभव । शिष्य आपल्या स्मरणांतून । सांगती अहमहमिकेने ॥३॥
एक शिष्य म्हणे आवर्जून । स्मरणशक्तिचे आचार्या वरदान । प्राप्त असावे जन्मापासून । राजशेखराचे घ्या उदाहरण ॥४॥
राजशेखर साहित्यप्रिय । लिहिले त्याने एक नाटक । वाचून दाविले आचार्यास । कोण्या एके काळी ॥५॥
तदनंतर गेले आचार्य । धर्मप्रसारार्थ प्रांती इतर । दुर्दैवे पीडिला राजशेखर । नाटक झाले भस्मसात ॥६॥
कालांतराने भेटता आचार्य । राजशेखर झाला शिष्य । ऐके शास्त्रचर्चा दिव्य । मनी धरुनि शरणभाव ॥७॥
सांगा मजसि राजशेखर । मधेच पुसति आचार्य । साहित्य रचना नवीन काय । राजासि सुचेना उत्तर ॥८॥
अखेर सांगे मनोगत । आता नाही मन रमत । साहित्य, कला क्षेत्रांत । नाटक गेले अग्नीत ॥९॥
स्वर झाला सद्गदित । अश्रु उभे नयनात । शब्द पुढे उमटेनात । राजशेखर दिसे म्लान ॥१०॥
करुणालयचि शंकराचार्य । वात्सल्य ओतप्रोत नयनांतून । वदति किंचित् हासून । “ स्मरते तुझे नाटक ” ॥११॥
राजा कांहीसा भांबावला । म्हणे “ मलाहि स्मरते तैसे । परी मूळ लिखाणा जैसे । कैसे आता होईल ? ” ॥१२॥
आचार्य सांगती, “ लेखणी उचल । लिहून घे सांगतो तैसे । नंतर सांग योग्य की कैसे । होईल जे लिखाण ” ॥१३॥
किंचित् थांबुनि करिती स्मरण । राजशेखर घेई लिहून । बघता संपले सांगून । जैसे होते तैसेच ॥१४॥
हर्षाला नुरला पारावर । स्मरणशक्तिचे अपूर्व दर्शन । राजा धरी आचार्य चरण । केवढी कृपा मजवर ॥१५॥
आचार्य म्हणति “ उठ राजा । होऊ दे आनंदित सारी प्रजा । नाटकाचा प्रयोग करी, जा । संधी उत्तम कलाकारा ” ॥१६॥
राजा विचारी होऊन शांत । “ कैसे राहिले सर्व स्मरणांत । आपणासी तर व्याप अनंत । नाटक त्यापुढे अति क्षुद्र ” ॥१७॥
आचार्य सांगती समजावून । “ ध्यानांत घे नीट पंचीकरण । कळेल कैसे घडते स्मरण । शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण ॥१८॥
कशाचेहि करिता श्रवण । आपमहाभूताचे स्निग्धत्व । चित्तवृत्तिशी करी निगडीत । परी हवा अभ्यास ॥१९॥
पृथ्वी महाभूताचे स्थिरत्व । अस्मिता होऊनि जागृत । ठसा उमटे अंतःकरणात । धारणाशक्ति प्रत्येकाची ॥२०॥
आठवा वेदपठनाची रीति । एकाग्र मनानें ध्यानस्थिती । त्या योगे वाढे स्मरणशक्ति । परी हवा अभ्यास ॥२१॥
तुझे पूर्वी ऐकता नाटक । विषय होता वेदान्ताशी निगडीत । सामान्यासहि करी आकर्षित । म्हणोनि राहिले स्मरणात ॥२२॥
परमेश्वाचे खरे इच्छित । तूं, मी तर निमित्तमात्र । त्यासी हवे ते घडे निश्चित । म्हणून स्मरले नाटक ” ॥२३॥
ऐकता नाटकाची कथा । दुसरा शिष्य सरसावला । म्हणे “ असाच आहे बोलबाला । पद्मपादाचार्यांच्या चतुःसूत्रींचा ” ॥२४॥
जमलेले भक्त शिष्य । आतुरतेने विचारती त्यास । सांगावे त्याही प्रसंगास । जरी स्वतः अनुभविला ॥२५॥
सुरु झाली दुसरी कथा । केरळ यात्रेत आचार्यांच्या । आश्चर्यकारक प्रसंग घडला । महाशूर नामक तीर्थक्षेत्री ॥२६॥
एके दिवशी अकस्मात । भेटीस आले पद्मपदाचार्य । आनंदे पुसति शंकराचार्य । आहे ना सर्व क्षेमकुशल ॥२७॥
पद्मपादांचे मन उचंबळे । टपटपा अश्रूंची धार गळे । गुरुचरणांशी खिळले डोळे । शब्द उमटेना मुखांतून ॥२८॥
उठविती आचार्य शिष्यास । वात्सल्यभावे कुरवाळीत । आपुल्या हाते नेत्र पुसत । वदति सांग काय घडले ॥२९॥
आचार्यांचा हात फिरता । दुःखावेग दूर झाला । सांगू लागले कर्मकथेला । ‘ कर्मकांडी मामाने घात केला ॥३०॥
ब्रह्मसूत्र भाष्यावर । ‘ विजयडिंडिम ’ नामे टीकाग्रंथ । लिहून झाला साद्यंत । मामाने तो पाहिला ॥३१॥
मज वाचावयाचा म्हणून । घेतला माझी स्तुती करुन । मी परतलो यात्रेहून । म्हणे नष्ट झाला अग्नीत ॥३२॥
अद्वैत मतापुढे नाही टिकाव । मामाच्या मनी उपजला वैरभाव । वरी वई दाखवून प्रेम भाव । विषप्रयोगहि केला मजवर ॥३३॥
आतां काय करु मी आचार्य । पुन्हां कैसी ती रचना घडेल । केली होती टीका सखोल । अभ्यास मननाचा परिपाक ’ ॥३४॥
जगद्गुरु म्हणति, “ पद्मपादा । सोसल्यास तूं अनंत आपदा । विजयडिंडिम ही ग्रंथसंपदा । नाही झाली पूर्ण नष्ट ॥३५॥
ब्रह्मसूत्रांतील पहिल्या चार । सूत्रांवरची तुझी टीका । पूर्वीच दाविली नव्हतीस कां । स्मरणांत आहे ताजी माझ्या ॥३६॥
तुझी टीका बहारदार । म्हणून कोरली स्मृतीपटलावर तेवढीच करील तुला अमर । उचल लेखणी सांगतो मी ” ॥३७॥
आचार्य क्षणैक स्तब्ध बसले । पद्मपाद तयार झाले । लेखणी घेऊन सरसावले । चतुःसूत्री टीका यथापूर्व ॥३८॥
झाले विस्मित सर्वजण । म्हणती कैसे हे अगाध स्मरण । शिष्यकृतीचे पुन्हां उद्धरण । पद्मपाद पावले समाधान ॥३९॥
ऐकता ऐशा रम्यकथा । म्हणती धन्य झाली भारतमाता । युगांती अवतार ऐसा लाभता । कैसे ज्ञान लोपेल ? ॥४०॥
ध्यानावस्था संपता उठोन । आचार्य पाहती सर्वास । पुसति चालला कशाचा प्रयास । काय साधले जमुनि ? ॥४१॥
लहानगा एक निष्पाप बटु । ‘ सांगे ऐकतो तुमची कीर्ति । सर्वत्र पसरली ख्याति । आपुल्या स्मरणशक्तिची ’ ॥४२॥
आचार्य सांगती सर्वा स्पष्ट । “ होऊ नये उगाच भाट । वाढवूं नये गुरुचा थाट । मूळ कार्यास लागे नाट ॥४३॥
कीर्तन हे तर भक्तीसाधन । कशास करावे ईश्वरावाचून ।  तत्वाचे करावे चिंतन । वाढवूं नये व्यक्तिमाहात्म्य ॥४४॥
हे आहे कामकोटी पीठ । सर्वदा व्हावे सर्वज्ञ पीठ । प्रत्येकाने आणावी ज्ञान वीट । ज्ञानमंदीर उभारावे ॥४५॥
होवोनिया अतीव धीट । मार्ग चालू नये धोपट । करुनिया विचार श्रेष्ठ । मार्ग चालावा पुढील ॥४६॥
ठेवण्या ज्ञानदीप तेवता । हवी अभ्यासाची दृढता । क्षणही उसंत न घेता । साधकाने करावा शास्त्रार्थ ॥४७॥
ऐसे जरी घडेल । तरीच ज्ञान ना लोपेल । वेदान्तधम्र फोफावेल । प्रत्येका आनंद लाभेल ” ॥४८॥
श्री शंकराचा ज्ञानावतार । सर्वास करी योग्य बोध । वेळोवेळी करुन सावध । सर्वत्र तेणे आनंद ॥४९॥
परी ज्याने केला देहधारण । त्यास होणे देहमुक्त । मिळते कां कांही इतिवृत्त । जाणावे पुढील अध्यायी ॥५०॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । सव्विसावा अध्याय येथे समाप्त । कृपा होवो सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥५१॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP