श्री शंकराचार्य वंदना - अध्याय अठरावा
निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.
जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
व्यासांनी वाढविले आयुष्यमान । कुमारील भट्टांचा तुषाग्नि प्रवेश । निघाले गाठावयस मंडनमिश्र । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
एक मासानंतर आचार्य । पोचले महिष्मती नगरात । मंडनमिश्र कुठे राहतात । विचारती नदीवर दासींना ॥३॥
ज्या घराच्या ओसरीवर । शास्त्रार्थ करिती मैना पोपट । आपापल्या वाणीने स्पष्ट। तेच सदन पंडितांचे ॥४॥
ऐकुनि शिष्य आश्चर्यचकित । ज्या घराची ऐसी खूण । ज्ञानमय सर्व वातावर्ण । कैसे खरोखर हे मंडनमिश्र ॥५॥
सांगे द्वारपाल आचार्यासी । श्राद्धदिनी नाही भेटणार । पंडित आपणा यतीवर । जावे आज परतून ॥६॥
आचार्य शिरले घरांत । मंडनमिश्रांचा क्रोध अनावर । परी म्हणति सांगा यतीवर । कुतो मुंडी - कोठून आला ? ॥७॥
आचार्य म्हणति हासून । ‘ गलदेशात् मुंडी - गळ्यापर्यंत मुंडन ’ । मंडनमिश्र बोलती चिडून । ‘ पंथास्ते पृच्छ्य ते माया ॥८॥
अरे मुंडन नाही विचारीले । मार्ग मी विचारला ’ । बगल देत प्रश्नाला । आचर्य करिती प्रतिप्रश्ना ॥९॥
‘ मार्गाने केली कां तक्रार । कशाला त्याची उठाठेव ’ । मंडनमिश्रांचा वाढे क्रोधभाव । म्हणति ‘ तुझे बोडके ’ ॥१०॥
तरीही हासून आचार्य । म्हणती ‘ बोललात योग्य ’ । चिडून पुसति पंडितराय । ‘ किं सुता पीता ? - दार प्यायला कां रे ’ ॥११॥
पुन्हा करीत शब्दच्छल । आचार्य विचारति सस्मित । ‘ सुरा किं पीता ? । दारु कां असते पिवळी ’ ॥१२॥
मंडनमिश्रांना कळेना । काय म्हणावे या संन्याशा । कसली धरुनि आशा । आला नेमका श्राद्धाचे वेळी ॥१३॥
जैमिनी आणि कृष्णद्वैपायन । ऐकता दोघांचा संवाद । मंडनमिश्रास घालून साद । म्हणति ‘ संन्यासी विष्णुरुप ॥१४॥
संन्याशाचा न करिता अपमान । आला जो अतिथी होऊन । त्याचा करावा तूं सन्मान । यथोचित यथायोग्य ’ ॥१५॥
मंडनमिश्र आले भानावर । क्रोधास घालून आवर । म्हणती ‘ यावे यतीवर । करावी भिक्षा ग्रहण ’ ॥१६॥
सांगती स्पष्ट शंकराचार्य । ‘ अन्नभिक्षा मी नाही मागत । वादभिक्षा घाल झोळीत । कुमारील भट्टांचेच मनोगत ’ ॥१७॥
कानी पडता गुरुंचे नांव । मंडनमिश्र बोले बदलून भाव । ‘ श्राद्धदिनी नको वादाचे नांव । उद्यां करु शास्त्रार्थ ’ ॥१८॥
मान्य म्हणती आचार्य । ‘ परी शास्त्रार्थाचा निर्णय । करण्या व्यक्ति एकचि योग्य । उभयभारती - आपुली पत्नी ’ ॥१९॥
मंडनमिश्र म्हणति, ‘ योग्य निवड । सत्यासत्याची तिजला चाड । उद्यापासून तिलाही सवड । परी माझी एक अट ’ ॥२०॥
आचार्य म्हणति, ‘ सांगा सत्वर ’ । मंडनमिश्र म्हणे ‘ पत्करावा संसार । जरी वादात तुमची हार । आणि व्हावे मीमांसक ’ ॥२१॥
आचार्य घालती प्रति - अट । घ्यावा आपणहि संन्यास । जरी पावलात पराभवास । पत्करावे अद्वैतमत ॥२२॥
पत्नी उभयभारती करी स्पष्ट । जरी मी जाणते शास्त्रार्थ । निर्णय व्हावा सार्थ । योजेन एक नवा मार्ग ॥२३॥
देईन दोघासी पुष्पमाला । घालावी दोघांनी आपुल्या गळा । सुकेल ज्याची आधी माळा । मानावा तो पराभूत ॥२४॥
असे सर्व नियम ठरले । अनेक शास्त्री पंडित जमले । वाग्युद्ध जणूं सुरु झाले । दोघेहि पंडीत, शास्त्रनिष्ठ ॥२५॥
मंडनमिश्र करिती प्रथम प्रश्न । जीव ब्रह्म ऐक्याचा आधार । ‘ तत्वमसि ’ वाक्याचे सार । आचार्य देती उत्तरा ॥२६॥
वाद चाले शांत स्वरे । ना कोणाचा आवज चढे । ना कोणाचा क्रोध वाढे । माळा ताज्याच्या ताज्या ॥२७॥
अखेर मंडनमिश्रा उमगले । आचार्यांचे विवरण सखोल स्पष्ट । माझेही अज्ञान करील नष्ट । मज होणे पराभूत ॥२८॥
पराभवाच्या शंकेने मनःस्ताप । फुले सुकली आपोआप । ताजेपणाचा झाला लोप । उभयभारती देई निर्णय ॥२९॥
‘ मंडनमिश्र आज पराभूत ’ । पूर्ण झाले वादसत्र । मज घेणे संन्यासव्रत । मंडनमिश्र म्हणती पूर्वानुसार ॥३०॥
पतीच्या रक्षणार्थ उभी सती । आचार्या म्हणे उभयभारती । ‘ संन्यासास हवी पत्नीची सम्मती । देईन मी हरले तर ’ ॥३१॥
सर्वांस मोठा अचंबा वाटला । वादापूर्वी नव्हता ठरला । हरल्यानंतर काम उद्भवला । प्रश्न पत्नीच्या सम्मतीचा ॥३२॥
क्षणभर राहुनि स्तब्ध । आचार्य म्हणती मजसि मान्य । आपणा जिंकुनी होईन धन्य । चालवावा पुढे शास्त्रार्थ ॥३३॥
उभयभारती विचारी प्रश्न । संन्याशास वर्ज्य जे कामशास्त्र । त्याचीच व्हावी चर्चा विस्तृत । जमलेले म्हणती विपरीत ॥३४॥
आचार्य बोलती ‘ हे माते । शास्त्रार्थाचा हा विषय नोहे । परी मी मान्य केले पाहे । द्यावा काळ अभ्यासास ’ ॥३५॥
उभयभारती होई आनंदित । म्हणे ‘ घ्यावी एक मासाची मुदत । जिंकण्या मज वादात । विषय राहील कामशास्त्र ’ ॥३६॥
आचार्यांचे सुरु विचार मंथन । काय योजितो परमेश्वर । संन्याशाने अभ्यासावा शृंगार । कशाचा घ्यावा आधार ॥३७॥
आचार्यांसी झाले स्मरण । उपनिषदातहि आहे वर्णन । कैसे असावे कामजीवन । अभ्यासावे बृहदारण्यक ॥३८॥
सांगती शिष्यास देऊनि छाटी । आता राहीन एकांती । जरी येईल आपत्ति । तरीच मज ही दाखवावी ॥३९॥
अन्यथा आणू नये व्यत्यय । मज करावयाचा निर्णय । गृहस्थाश्रम आहे कां वर्ज्य । ब्रह्मज्ञानी साधकास ॥४०॥
घातली अटी मज संसाराचि । म्हणूनि सक्ति संन्यासाची । अन्यथा ख्याति गृहस्थाश्रमाची । वेदान्तधर्महि जाणतो ॥४१॥
आत्मज्ञानी मुमुक्षुस । जाती, वर्णाश्रम, विचारावे कशास । चित्तशुद्धीचा हव्यास । हाच करणे प्रयास ॥४२॥
ब्रह्मचर्येनंतर संसार । संसारानंतर अरण्यवास । अखेरीस घेणे संन्यास । क्रम कां सांगितला वृथाच ? ॥४३॥
अलिप्तपणा शिकणे प्रथम । भोगातहि साधणे श्रेयस । श्रेयसाचे हाती संसार । सोपवुनि साधणे संन्यास ॥४४॥
भोग, त्याग, संन्यास । भक्ति, कर्म आणि ज्ञान । सर्वांचा सुंदर योग साधून । वेदान्त सांगे करावा व्यवहार ॥४५॥
श्रुतिस्मृतिंच्या आधारे । सर्व सामान्यास समजाविणे । हेहि कार्य करुनि घेणे । उभयभारतींच्या निमित्ताने ॥४६॥
शंकराचार्य लागले कार्यास । दूर करुनि सर्वांस । श्रृतिस्मृतींचा वेगळा अभ्यास । सुरु झाला अहोरात्र ॥४७॥
काय घडले अखेर । कोणाची जीत कोणाची हार । उभयभारती की शंकर । जाणावे पुढील अध्यायी ॥४८॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । अठरावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४९॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP